क्रिमीयन कॉगो हिमोरेजिक फीवर (CCHF) हा विषाणूजन्य असून तो गोचिडा पासून संक्रमित होतो.अलिकडील काळात या आजाराचे बरेच तीव्र स्वरुपाचे तापाचे उद्रेक आढळून आलेले आहेत .
ठळक मुददे
क्रिमीयन कॉगो हिमोरेजिक फीवर (CCHF) हा विषाणूजन्य असून तो गोचिडा पासून संक्रमित होतो.अलिकडील काळात या आजाराचे बरेच तीव्र स्वरुपाचे तापाचे उद्रेक आढळून आलेले आहेत .
- या आजारामध्ये मृत्यूचे प्रमाण ४० टक्के पर्यत आहे.
- या विषाणूचा प्रसार हा गोचिड व पाळीव प्राण्याच्या संपर्कामध्ये आल्यावर होतो
- भारतामध्ये या आजाराचा पहिला रुग्ण जानेवारी २०११ मध्ये गुजरात येथे आढळून आलेला आहे.
- या आजारासाठी कुठलीही लस मानवासाठी तसेच प्राण्यासाठी उपलब्ध नाही.
- हा विषाणू हा जंगली तसेच पाळीव प्राणी उदा. गाय,म्हैस,शेळी इ. प्राण्यांच्या शरीरात राहतो.
- प्राण्यांना या रोगाची लागण ही दुषित गोचिड चावल्यानंतर होते हा विषाणू या प्राण्यांच्या रक्तामध्ये साधारणतः आठवडाभर राहतो अशारितीने गोचिड – प्राणी – गोचिड हे जीवनचक्र चालू राहते
प्रसार
या विषाणूचा मानवामध्ये प्रसार हा दुषित गोचिड चावल्यानंतर किंवा दुषित प्राण्याच्या रक्ताशी संसर्ग झाल्यानंतर होतो. जोखमीचे व्यवसाय –
- कत्तलखान्यातील व्यक्ती
- पशुपालन व्यवसाय
- शेती
- पशुवैदयकिय क्षेत्र
मनुष्य ते मनुष्य अशी या रोगाची लागण जवळचा सहवास उदा. रक्तसंसर्ग, स्त्राव संपर्क किंवा शरीर दुषित रुग्णाच्या संपर्कामध्ये आल्यानंतर होते. रुग्णालयामध्ये पुरेशी काळजी न घेतल्यामुळे तसेच निर्जंतूक उपकरणाचा वापर न केलेमुळे या रोगाची लागण होण्याची सर्वाधिक शक्यता राहते. या रोगाचा पारेषण कालावधी हा १ ते ३ दिवस आहे व जास्तीत जास्त ९ दिवस दिसून येतो.
लक्षणे
या रोगाच्या प्रमुख लक्षणामध्ये ताप, अंगदुखी,गुंगी, मानदुखी व मानेचा ताठरपणा, पाठदुखी, डोकेदुखी, डोळेदुखी किंवा डोळयांना प्रकाश न सोसणे ही आढळून येतात तसेच उलटी मळमळ, जुलाब, पोटदुखी व घसादुखीही आढळून येते. काही वेळा सतत झोप लागणे, नैराश्य, यकृताला सूज, अंगावरती तसेच तोंडामध्ये व घशामध्ये पुरळ दिसून येतात.काही रुग्णांमध्ये काविळीची लक्ष्णे दिसून येतात.
रोगाचेनिदान
या विषाणूची तपासणी प्रयोगशाळेत एलायझा व पी सी आर व्दारे केली जाते.
औषधोपचार
रिबाव्हायरीन (Ribavirin) हे औषध या रोगावर वापरले जाते.
प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजना
- संपूर्ण शरीर झाकले जाईल असे कपडे वापरावेत.
- फिक्कट रंगाचे कपडे वापरावेत त्यामुळे गोचिड बसलेनंतर लगेच दिसून येईल.
- किटकनाशकभारित कपडे वापरावेत तसेच गोचिड प्रतिबंधक क्रिमचा शरीरावर वापर करावा.
- शरीराची तसेच कपडयांची गोचिडीसाठी सतत तपासणी करावी जर गोचिड आढळली तर ती त्वरीत सुरक्षितपणे काढून टाकावी.
- प्राण्यांच्या अंगावरील गोचिडींचा नायनाट करावा तसेच ज्या भागामध्ये गोचिडींचा प्रादुर्भाव आहे तेथे जाणे टाळावे.
- ग्लोव्हज व इतर सुरक्षित साधनसामुग्रीव्दारे जनावरांशी संपर्क करावा.
- कत्तलखान्यामध्ये पुरेशी काळजी घेणेत यावी.
- कत्तलखान्यामध्ये जनावरे आणण्यापुर्वी २ आठवडे योग्य त्या किटकनाशकाची मात्रा देऊन गोचिडींचा नायनाट करावा.
- ज्या लोकांना या रोगाची लागण झाली आहे अशा रुग्णांशी संपर्क करु नये.
- वारंवार हात धुवावेत.
या क्षेत्रामध्ये काम करणा-या लोकांनी या रोगाची लागण होऊ नये म्हणून वरील सर्व खबरदारी घेऊन काम करणे गरजेचे आहे.
स्रोत - महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग