जगातील सर्व देशांत हा रोग आढळतो. विशेषतः उष्ण प्रदेशांत याचे प्रमाण अधिक दिसते. अंधत्वाच्या अनेक कारणांपैकी हे एक प्रमुख कारण असून अलीकडे जागतिक आरोग्य संघटनेने या रोगाच्या निर्मूलनासाठी खास मोहीम सुरू केली आहे. हा रोग विशेष प्रमाणात असलेल्या देशांत या मोहिमेची अंमलबजावणी जारीने सुरू आहे. रोग्याचे हात व कपडे यांपासून आणि माशा वगैरे कीटकांच्या संपर्कामुळे या रोगाचा प्रसार होतो. हा रोग संसर्गजन्य आहे अशी पूर्वीपासून खात्री असली, तरी अलीकडेच क्लॅमिडीया ट्रॅकोमॅटिस या विषाणूच्या संसर्गामुळेच हा रोग होतो असे सिद्ध झाले आहे. दारिद्र्य, दाट वस्ती, गलिच्छपणा वगैरे कारणांमुळे या रोगाचा प्रसार होतो. पुष्कळ वेळा आईपासून लहान मुलाला या रोगाचा संसर्ग होण्याचा संभव असतो.
श्लेष्मकलेवर येणाऱ्या या कणांच्या चार अवस्था असून त्यांवरून या रोगाच्याही चार अवस्था कल्पिल्या आहेत. पहिल्या अवस्थेत श्लेष्मकलेवर अतिसूक्ष्म पांढरट कण दिसतात. या अवस्थेत निदान करणे फार कठीण असते; या अवस्थेत श्लेष्मकला मखमलीसारखी दिसते. दुसऱ्या अवस्थेत स्वच्छमंडलावर रक्तवाहिन्या उगवू लागलेल्या दिसू लागतात. तिसऱ्या अवस्थेत स्वच्छमंडलावर भुरकट ठिपके दिसतात. चौथ्या अवस्थेत पापण्या आकसून वेड्यावाकड्या झाल्यामुळे पडकेस उत्पन्न होतात.
उपचार लवकर आणि सतत करीत राहिल्यास उपद्रवांचे प्रमाण कमी होते, परंतु ते उत्पन्न झाल्यावर त्यांना योग्य असे उपचार करावे लागतात. कणांवर मोरचुदाचा खडा घासून कण फोडणे, तसेच विशिष्ट चिमट्याने कण दाबून फोडणे आणि रोगाच्या फार प्रगतावस्थेत वर्त्मपट्टातील (पापणीला ताठरपणा देणाऱ्या पापणीतील घट्ट तंतुमय पट्टातील) उपास्थी (लवचिक व मजबूत पेशीसमूह, कूर्चा) काढून टाकणे, हे इलाज करतात.
हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे प्रतिबंधक उपाय म्हणजे रोग्याचे कपडे, हातरुमाल, हात वगैरे गोष्टींचा संपर्क टाळणे, हाच होय.
संदर्भ : 1. ordon, F. B. and others, Biology of the Trachoma, New York, 1962.
2. Lyle, T. K.; Cross, A. G. Ed. May and Worth’s Manual of the Diseases of the Eye, London,
1959.
ढमढेरे, वा. रा.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/11/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...