स्वाइन फ्लूच्या देशभरातील रुग्णांनी हजाराचा टप्पा ओलांडला असून पुण्यात याचा प्रादुर्भाव सर्वात जास्त आहे. अर्थात या आजारामुळे घाबरून न जाता त्याचा सामना करण्यासाठी काही खबरदारी घेण्याचा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ देत आहेत. स्वाइन फ्लूसंदर्भात लक्षात ठेवाव्यात अशा काही ठळक बाबी...
स्वाइन फ्लूलाच स्वाइन इन्फ्लुएन्झा, एच१एन१ फ्लू, हॉग फ्लू किंवा पिग फ्लू अशी अनेक नावे आहेत. पक्षी, प्राणी विशेषत: डुकरांमध्ये आढळणा-या तापाच्या या प्रकाराची लक्षणे मानवी शरीरात गंभीर स्वरूप धारण करतात. या तापाचे इन्फ्लुएन्झा ‘ए’ आणि इन्फ्लुएन्झा ‘सी’ असे दोन प्रकार आहेत. यापैकी इन्फ्लुएन्झा ‘ए’चे एच१एन१, एच१एन२, एच३एन१, एच३एन२ आणि एच२एन३ असे प्रकार आहेत. स्वाइन फ्लूचं वेळीच निदान झाल्यास त्याला प्रतिबंध करता येतो. निरोगी शरीर कोणत्याही आजारपणास अटकाव करण्याचा उत्तम मार्ग आहे. यासाठी आपलं शरीर तणावमुक्त असणं गरजेचं आहे.कारण तणावामुळेही शरीर यंत्रणा कमकुवत बनू शकते. काही गोष्टी कटाक्षाने पाळल्यास स्वाइन फ्लूच नव्हे; अन्य कोणताही आजार दूर ठेवता येतो.
थंडी वाजून खूप ताप येणे, घसा दुखणे, स्नायूदुखी, सतत डोके दुखणे, कफ, कमजोरी, निरुत्साही वाटणे, हृदयाच्या तक्रारी असलेल्या रुग्णांना सामान्य रुग्णांपेक्षा याचा अधिक त्रास होतो. कारण या आजाराचा हृदयाच्या कार्यप्रणालीवर परिणाम होतो. त्यामुळे श्वास घेण्यात अडथळे, रक्तदाबात बदल, हृदयाचे ठोके वाढणं, थेट हृदयावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. या कारणांमुळे हा आजार हृदयाच्या तक्रारी असलेल्यांना अधिक त्रासदायक, धोकादायक ठरू शकतो. हा ताप आल्यावर श्वास घेण्यात अडथळा निर्माण होतो. ब्रिटिश हार्ट फाऊंडेशनच्या अहवालानुसार, या आजाराच्या फैलावाच्या काळात फ्लूसारख्या गंभीर प्रसंगी आजारादरम्यान किंवा लागण झाल्यानंतर तात्काळही हृदयविकाराचे धक्के बसू शकतात.
हे कराच!
नियमित योग, ध्यानधारणा आणि श्वासाचे व्यायाम करा. तणावाचं व्यवस्थापन करण्यासाठी आणि हृदयाच्या आजारांवर मात करण्यासाठी शारीरिक क्रिया हा उत्तम मार्ग आहे.
स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. आनंद वाटणा-या कामात स्वत:ला कार्यरत ठेवा. आवडीचं संगीत ऐका. कारण तणाव दूर करण्यासाठी संगीत हे उत्तम साधन आहे.
सूर्यप्रकाशात बाहेर पडा. कारण सूर्यप्रकाशात मिळणारं ‘डी’ जीवनसत्त्व आजारांशी लढण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. हिरव्या पालेभाज्यांचं सेवन करा. कमी कॅलरीच्या समतोल आहाराचं सेवन करा.
हात धुण्यासाठी नेहमी अॅण्टिबॅक्टेरियल साबण वापरा. १५ सेकंद साबणाचा फेस हाताला लावून नंतर हात पाण्याने स्वच्छ धुवा.
माणसाला साधारण आठ तास झोप आवश्यक असते. तेवढी झोप मिळाली की प्रतिकारशक्ती उत्तम राहते. शरीरातील अनावश्यक टॉक्सिन बाहेर टाकण्यासाठी दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे. पुरेसं पाणी प्यायल्याने आजार दूर राहतात. तापासारख्या आजारात प्रतिकारशक्ती उत्तम असणं आवश्यक असतं. कारण शरीरात येणा-या विषाणूंना थोपवण्याचं कार्य प्रतिकारशक्ती करते. म्हणून ती वाढवणं गरजेचं आहे. स्वाइन फ्लूचा प्रसार अधिक होऊ नये म्हणून शासन वेळोवेळी काही सूचना करीत आहे. त्यांचे नियमित पालन करा आणि हा प्रसार रोखण्यास मदत करा. अल्कोहोलमुळे प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे अल्कोहोलमिश्रित पदार्थ घेऊ नका.गर्दी टाळा. गरज नसताना गर्दीच्या ठिकाणी किंवा सहलीला जाणं टाळा.
स्वाइन फ्लूचा प्रतिबंध करण्यासाठी सरकारी यंत्रणाही सज्ज झाली आहे. यासंदर्भातील शंकांचे निरसन करून घेण्यासाठी किंवा मदत मिळवण्यासाठी खालील क्रमांकांवर संपर्क करा.
माहिती संकलन: प्राची तुंगार
अंतिम सुधारित : 5/25/2020
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
उदराच्या वरच्या भागात असलेली आणि पचनक्रियेसाठी जरू...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...