शरीराच्या इजा झालेल्या किंवा आजारी भागांस ते पूर्ववत होऊन कार्यक्षम होण्यासाठी ज्या चिकित्सेमध्ये उष्णता, विद्युत्, जल इ. भौतिकीय साधानांचा उपयोग केला जातो तिला ‘भौतिकी चिकित्सा’ म्हणतात.
सूर्यप्रकाश किरणांचा चिकित्सेकरिता उपयोग अनेक शतकांपासून ज्ञात असावा. या चिकित्सेला ‘सूर्यकिरणचिकित्सा’ म्हणतात. एस्क्यलेपीअस नावाचा देव ग्रीकांच्या वैद्यकाचे दैवत होते, तसेच ते सूर्याचे दैवतही होते. हिपॉक्राटीझ यांच्या काळात या देवाचे मोठे मंदिर उभारण्यात आले होते आणि या ठिकाणी ते प्रकाश व पाणी यांचा वापर रोग बरा करण्याकरिता करीत. क्षीण बनलेल्या स्नायूंच्या उपचारार्थ ते सूर्यस्नानाचा उपचार लठ्ठपणा (मेदोवृद्धी) घालविण्याकरिता आणि चिरकारी (दीर्घकालीन) प्रकारच्या व्रणांवर करीत. १७९५ मध्ये सी. डब्ल्यू. हूफेलांट यांनी ⇨गंडमाळांवर (मानेतील लसीका ग्रंथींच्या क्षयरोगावर) सूर्यप्रकाशाचा चिकित्सात्मक उपचार सांगितला होता. १८७७ मध्ये डाऊन्स व ब्लंट यांनी प्रकाश किरणांच्या (विशेपेकरून कमी तरंगलांबीच्या किरणांच्या) सूक्ष्मजंतुनाशक गुणधर्माकडे लक्ष वेधले. एन्. आर्. फिन्सन या डॅनिश वैद्यांनी १८९६ मद्ये रासायनिक बदल घडवून आणणाऱ्या किरणांची चिकित्सात्मक उपयुक्तता सिद्ध केली.
हजारो वर्षांपूर्वी जीन, जपान, ईजिप्त, ग्रीस, तुर्कस्तान व इटली या देशांतून चिकित्सेकरिता मर्दनाचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जाई [⟶ मर्दन चिकित्सा]. सु. दोनशे वर्षांपूर्वी स्कँडिनेव्हियन देशांत (विशेषेकरून स्वीडनमध्ये) मर्दन चिकित्सेचा उपयोगक करीत. तेथे काही मर्दन प्रकार व शारीरिक व्यायाम पद्धती शिकिविल्या जात. अमेरिकेमध्ये एस्. डब्ल्यू. मिचेल या तंत्रिका तंत्रविशारदांनी (मज्जासंस्थेच्या विकरासंबंधीच्या तज्ञांनी) मनोदौर्बल्य आणि उन्माद (हिस्टेरिया) या रोगांवर मर्दन चिकित्सेचा प्रथम उपयोग केला.
भौतिकी चिकित्सेला वैद्यकीय उपचारातील विशिष्ट स्थान आधुनिक काळात पहिल्या महायुद्धानंतर प्राप्त झाले. बालपक्षाधाताच्या (पोलिओच्या) साथीतून बचावलेले अनेक अपंग व दुसऱ्या महायुद्धानंतर बचावलेले अपंग सैनिक यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न भेडसावू लागताच भौतिकी चिकित्सेला महत्त्व आले. अस्थिभंग, भाजणे व पोळणे, अकस्मात उद्भवणारा पक्षाघात, क्षयरोग, तंत्रिका विकृती यांसारख्या विविध आजारांतही भौतिकी चिकित्सेचा वापर सुरू झाला. ही चिकित्सा जरी ⇨विकलांग चिकित्सेशी अधिक निगडित असली, तरी अलीकडे वैद्यकाच्या सर्वच शाखामध्ये तिचा वाढता उपयोग होत आहे. आधुनिक काळात ‘पुनर्वसन वैद्यक’ अशी वैद्यकाची नवी शाखाच उदयास आली असून भौतिकी चिकित्सा हा तिचा एक महत्त्वाचा घटक आहे. अलीकडील नव्या शोधांमुळे श्राव्यातीत ध्वनी [मानवी श्रवणक्षमतेच्या जरा वरच्या कंप्रतेचा म्हणजे दर सेकंदाला होणाऱ्या कंपनांची संख्या २०,००० पेक्षा जास्त असलेला ध्वनी; ⟶ श्राव्यातील ध्वनिकी] व ⇨लेसर किरण यांसारख्या साधनांचा, तसेच किरणोत्सर्गी समस्थानिकांचा [⟶ किरणोत्सर्ग] उपयोग या चिकित्सेत केला जात आहे.
साधने : भौतिकी चिकित्सेकरिता पुढील साधने वापरतात : (१) जल, (२) माती, (३) प्रकाश, (४) ध्वनी, (५) विद्युत्, (६) उष्णाता, (७) मर्दन व व्यायाम, (८) चुंबक, (९) लेसर किरण आणि (१०) किरणोत्सर्ग.
जल : भौतिकी चिकित्सेत जेव्हा पाण्याचा उपयोग करतात तेव्हा त्या चिकित्सेला ‘जल चिकित्सा’ म्हणतात. ‘निसर्गोपचार’ व ‘खनिज जल’ या नोंदींतून याविषयी माहिती दिलेली आहे. पाणी हा नैसर्गिक पदार्थ असा आहे की, तो उष्णतेचे शोषण व प्रदान अतिशय जलद करू शकतो. तसेच त्याचा घन, द्रव व बाष्प यांपैकी कोणत्याही अवस्थेत उपयोग करता येतो. या गुणधर्मामुले जल हे चिकित्सेचे एक उत्तम साधन बनले आहे.
माती : मातीचे शरीरावर परिणाम तीन प्रकारचे असतात : (अ) यांत्रिक, (आ) रासायनिक आणि (इ) शीतोष्ण. उत्तम भिजविलेल्या मातीचा सर्वांगास लेप देता येतो किंवा मातीत भिजविलेल्या कापडाच्या पट्ट्या विशिष्ट शरीर भागावर लावता येतात. विंचू दंशावर मातीचा लेप गुणकारी ठरला आहे. ‘निसर्गोपचार’ या नोंदीत याविषयी अधिक माहिती दिली आहे.
चिकित्सेकरिता प्रकाशाचा उपयोग केल्यास तिला‘प्रकाश चिकित्सा’ म्हणतात. पूर्वी या चिकित्सेकरिता प्रामुख्याने सूर्यप्रकाशाचा उपयोग करीत असत. सूर्यप्रकाशाचे लोलकातून अपस्करण केल्यानंतर त्यातील घटक किरण ज्ञात झाले. सु. ४,००० Å ते ४० Å (Å = अँगस्ट्रॉम एकक = १०-८ सेंमी.) या दरम्यानन तरंगलांबी असणाऱ्या अदृश्य किरणांना जंबुपार किरण म्हणतात. अनेक रोगांमध्ये या
किरणांचा चिकित्सात्मक उपयोग प्रभावी ठरला आहे. लहान मुलांतील ⇨ मुडदूस या विकृतीत जंबुपार किरण त्वचेतन अवशोषित होऊन ७-डी हायड्रोकोलेस्टेरॉल या पदार्थाचे ड जीवनसत्त्वामध्ये रूपांतर करतात. नैसर्गिक रीत्या सूर्याप्रकाशामुळे ही क्रिया घडते. ज्या देशांत सूर्यप्रकाश अल्पकाळ टिकतो (उदा., ब्रिटन) त्या देशांत अनेक रूग्णालयांत प्रकाश चिकित्सेकरिता खास विभाग सुरू करण्यात आले. जंबुपार किरण उद्भासन (शरीरावर पाडण्याची क्रिया) मुलांच्या शक्तिक्षीणता या विकृतीवरही उपयुक्त ठरले आहे. सूक्ष्मजंतू संक्रमणामुळे बऱ्या होण्यास विलंब लागणाऱ्या जखमा जंबुपार किरणांनी लवकर बऱ्या होतात. अस्थींचा आणि सांध्यांचा क्षयरोग, काही त्वचारोग इत्यादींवर हा उपचार उपयुक्त ठरला आहे.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच युएनओच्या सर्वसाधारण सभ...
जलसंधारणाच्या दृष्टीने नालाबांध महत्त्वाचा आहे. ना...
जल आरोग्य तक्ता तयार करून त्यानुसार पाण्याचे नियोज...
जल-मृद संधारणाच्या कामातून पिण्याच्या पाण्याची तर ...