दोन कुत्र्यांवरील यशस्वी रक्ताधानाचा पहिला प्रयोग. यात दोन्ही कुत्र्यांच्या मांडीतील रक्तवाहिन्यांचा उपयोग केला आहे.
एका प्राण्याचे रक्त काढून ते दुसऱ्या प्राण्याच्या रक्ताभिसरणात मिसळण्याच्या क्रियेला ‘रक्ताधान’ म्हणतात. एका व्यक्तीचे रक्त दुस ऱ्या व्यक्तीच्या रक्तात ‘आधान’ करणे म्हणजे ठेवणे अथवा प्रस्थापित करणे हा अर्थ ‘रक्ताधान’ या संज्ञेत अभिप्रेत आहे.
१६१५ मध्ये ॲन्ड्रिअस लायबेव्हिअस या शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष रक्ताधानाचा पुरस्कार केला होता ; पण त्यांनी स्वतः याबाबत कोणताही प्रयोग केला नव्हता . १६२८ मध्ये विल्यम हार्वी यांनी रक्ताभिसरणासंबंधी लावलेल्या शोधानंतर ४० वर्षांनी रिचर्ड लोअर यांनी दोन कुत्र्यांमध्ये प्रत्यक्ष रक्ताधानाचा यशस्वी प्रयोग केला. १६६७ मध्ये फ्रान्सचे राजे चौदावे लुई यांचे वैद्य झां दनी यांनी एका पंधरा वर्षीय मुलास कोकराच्या रक्ताचे आधान केले. हा रोगी सुधारल्याचे सांगतात. इंग्लंडमध्ये रिचर्ड लोअर यांनी असाच प्रयोग केला. १६६७ मध्ये लंडनचे रहिवासी आर्थर कोगन यांनी स्वतःच्या रक्तात डुकराचे रक्त मिसळले होते व तेही यशस्वी झाल्याचे सांगतात. १६६७ मध्ये एडमंड किंग यांनी पहिला मानवी रक्ताधानाचा प्रयोग केला. १६६८ मध्ये प्राणी रक्ताचे आधान केल्यामुळे रोगी दगावला व फ्रान्समध्ये त्या वर्षी एप्रिल महिन्यात पॅरिसच्या वैद्यक विद्याशाखेच्या अनुमतीशिवाय मानवी रक्ताधानास कायद्याने बंदी घालण्यात आली.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस रक्तनाशावर मानवी रक्ताधान हाच उत्तम पर्याय असल्याचे मान्य झाले. १८८४ मध्ये विल्यम हॉलस्टेड या शस्त्रक्रियाविशारदांनी कार्बन मोनॉक्साइडाची विषबाधा झालेल्या रुग्णावर रक्ताधान केले होते. त्याकरिता त्यांनी त्याच रुग्णाचे रक्त फायब्रिनमुक्त ( रक्तक्लथनाच्या म्हणजे रक्त साखळण्याच्या क्रियेत तयार होणाऱ्या लवचिक तंतुमय प्रथिनापासून मुक्त) करून वापरले होते. या अगोदर १८८१ मध्ये हॉलस्टेड यांनी आपले स्वतःचे रक्त आपल्या बहिणीस प्रसूतीनंतरच्या रक्तस्रावावरील उपचाराकरिता रक्ताधान करण्यासाठी वापरले होते. रक्ताधानात प्रमुख अडचण होती ती रक्तक्लथन थोपवून रक्त द्रवरूपात टिकवण्याची. १९१४ मध्ये अगोटे व ल्यूइझन या शास्त्रज्ञांनी सोडियम सायट्रेटाचा क्लथनरोधक गुणधर्म शोधला आणि रक्ताधान करावयाच्या रक्तात ते ठराविक प्रमाणात मिसळल्यास त्याचे विषारी परिणाम होत नाहीत , हेही समजले.
कार्ल लँडस्टायनर यांच्या रक्तगटांसंबंधीच्या संशोधनानंतर १९१० पावेतो रक्ताधान अधिक धोकारहित बनले. पहिल्या महायुद्धात जखमी सैनिकांवर करण्यात आलेल्या उपचारांमुळे रक्ताधानाचे महत्त्व पटले. काही शास्त्रज्ञांनी जखमांमुळे उत्पन्न होणाया गंभीर अवसादावर ( रक्तप्रवाहात एकदम बिघाड झाल्याने होणाऱ्या शक्तिपातावर) रक्ताधानाचे महत्त्व निर्विवादपणे सिद्ध केल्यानंतर मुलकी रुग्णालयांतूनही रक्ताधान उपचार करण्यात येऊ लागला.
रक्तदाते बहुधा जवळचे नातेवाईक किंवा स्वयंसेवक असत. लंडनमध्ये पी. एल्. ऑलिव्हर यांनी रात्रंदिवस केव्हाही मोबदला न घेता रक्त देणाऱ्या रक्तदात्यांची एक संस्था स्थापन केली. यामुळे रक्ताधानातील प्रगतीच्या श्रेयाचा मोठा वाटा ऑलिव्हर व त्यांच्या या संस्थेला देण्यात येतो. त्यानंतर इंग्लंडच्या इतर भागांत तसेच इतर देशांतूनही अशा संस्था भराभर स्थापन झाल्या.
सुरुवातीच्या रक्ताधानाच्या कल्पना व पद्धती हळूहळू बदलत गेल्या. १९३५ मध्ये अखंडित बिंदु-अंतःक्षेपणाने ( थेंबाथेंबाने अखंडपणे रक्तप्रवाहात मिसळण्याच्या) रक्ताधान करण्याच्या पद्धतीचा शोध लागल्यानंतर सर्वच रुग्णांना वीस मिनिटांत वीस औंस ( सु. ५६६ ग्रॅ.) र क्त देण्याच्या जुन्या पद्धतीवर पुनर्विचार सुरू झाले. कोणत्या रुग्णाला किती रक्त व तेही किती वेळात द्यावयाचे या गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या. त्यानंतर जरूरीप्रमाणे दहा मिनिटांत वीस औंस ते दहा तासात वीस औंस रक्ताधान करण्यात येऊ लागले.
पहिल्या महायुद्धात पटलेले रक्ताधानाचे महत्त्व स्पॅनिश यादवी युद्धात ( १९३६– ३९) ठामपणे सिद्ध झाले. दुसऱ्या महायुद्धाची चिन्हे दिसू लागताच रक्ताधान सेवेसंबंधी प्रयत्न सुरू झाले. रक्तदाते मिळवून त्यांचे सायट्रेटमिश्रित रक्त साठवणाऱ्या कोठारांची अथवा ⇨रक्तपेढ्यांची स्थापना करण्यात आली. ब्रिटिश सैन्याकरिता ब्रिस्टल येथे रक्तपेढी स्थापन करण्यात येऊन फ्रान्समधील आघाडीवरील जखमी सैनिकांना विमानाने रक्त पुरवठा केला गेला. साठवलेल्या रक्तातील तांबड्या कोशिकांचे ( पेशींचे) रक्तविलयन ( नाश होऊन हीमोग्लोबिन ते तांबडे प्रथिन अलग होण्याची क्रिया) एक ते दोन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ थोपवता येत नसल्यामुळे साठवण व पुरवठा यांतील अडचणी लक्षात आल्या. पराकाष्ठेच्या प्रयत्नांनंतरही रक्त फक्त चार ते पाच आठवडेच टिकवता आले. यामुळे रक्ताची जागा घेऊ शकेल अशा पदार्थांच्या शोधास चालना मिळाली. शुष्क व द्रव स्वरूपात रक्तद्रव ( रक्तातील कोशिका काढून टाकल्यावर उरणारा द्रव) व रक्तरस ( रक्तक्लथनानंतर वेगळा मिळणारा द्रव) बनविण्यात आले.
दुसऱ्या महायुद्धात नॉर्मंडीवरील चढाईच्या वेळी ब्रिटिश फौजांनी १ , ०१ , २८४ पिंट ( सु. ५७ , ५३० लि.) रक्त व बदली पदार्थांचा चार महिन्यांत उपयोग केला. इतर युद्धक्षेत्रांतही रक्ताचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला गेला. दुसऱ्या महायुद्धामुळे रक्ताधान सेवा हा सेनादलाचा अतिशय महत्त्वाचा घटक असल्याचे सिद्ध झाले.
भावी युद्धातून अण्वस्त्रांचा सर्रास उपयोग होण्याची शक्यता निर्माण झाल्यापासून रक्ताधानास अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. या अस्त्रांमुळे जखमा , भाजणे इ. नेहमी होणाऱ्या दुखपतींबरोबरच शरीरातील रक्त्तोत्पादक अवयवांवरच किरणीयनाचे ( भेदक आयनीकारक किरण - विद्युत् भारित अणू, रेणू वा अणूगट तयार करणारे किरण - पडण्याचे) भयंकर दुष्परिणाम होतात. सैनिकांशिवाय इतर नागरिकांनाही भयंकर पांडुरोगास ( रक्तक्षयाला) तोंड द्यावे लागेल. अशा वेळी असंख्य लोकांना रक्ताधान उपचार करावे लागतील.
आधुनिक संशोधनामुळे रक्ताधान ( संपूर्ण रक्ताचे किंवा एखाद्या रक्तघटकाचे) सर्वच बाबतींत जवळजवळ धोकारहित झाले आहे. रक्तस्रावजन्य अवसादावर हमखास गुणकारी ठरलेला रक्ताधान उपचार आज सर्वमान्य असून आजही काही वेळा त्याचा जरूर नसताना उपयोग केला जात आहे. एका पाहणीत ३५ ते ५०% रक्ताधाने अनावश्यक असल्याचे आढळले आहे आणि फक्त १% रक्ताधाने जीवदायी ठरल्याचे दिसून आले आहे.
रक्ताधान उपचार तसा धोकारहित असता , तरी प्रत्येक वेळी रक्तग्राहक अनेक संभाव्य धोक्यांना सामोरा जात असतो , हे उपचार करणाऱ्याने लक्षात ठेवावयास हवे. आधुनिक तांत्रिक प्रगतीमुळे रक्तघटकही उपलब्ध झाले आहेत. रुग्णास कोणता घटक किती प्रमाणात व किती वेळा द्यावयाचा , संभाव्य प्रतिक्रिया इत्यादींसंबंधीचे संपूर्ण ज्ञान उपचार करणाऱ्या व्यावसायिकाला असणे आवश्यक आहे.
आधुनिक शस्त्रक्रियांच्या वाढत्या विस्तारामुळे रक्ताधानांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. शस्त्रक्रिया केल्या जाणाऱ्या एकूण रुग्णांपैकी सामान्यतः सु. १४% रुग्णांना रक्ताधान करावे लागते. यात तातडीच्या शस्त्रक्रियांचा व बाह्यरुग्ण विभागातील उपचारांचा समावेश नाही. एका विद्यापीठीय वैद्यकीय संस्थेत ६०४ प्रौढ रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या असता त्यांपैकी १२५ रुग्णांना ५ , ००० मिलि. रक्त द्यावे लागले.
आज वैद्यकाच्या बहुतांश शाखांतून रक्ताधान एक आवश्यक उपचार बनला आहे व प्रत्येक सुसज्ज रुग्णालयाचा रक्ताधान विभाग एक अत्यावश्यक भाग ठरला आहे.
आधुनिक रक्ताधान उपचारांचे प्रमुख तत्त्व म्हणजे रुग्णास जरूर असलेल्याच रक्तघटकाचे आधान करणे हे आहे. म्हणून प्रथम कोणकोणते रक्तघटक उपलब्ध आहेत याविषयी माहिती असणे आवश्यक आहे.
सर्वसाधारणपणे नेहमी वापरण्यात असणारे रक्तघटक खाली दिले आहेत ( या रक्तघटकांच्या स्पष्टीकरणासाठी ‘रक्त’ व ‘रक्तक्लथन’ या नोंदी पहाव्यात).
संपूर्ण रक्ताचे आधान ज्या वेळी अतिशय रक्तस्रावामुळे रक्तनाश होतो ( उदा. , जठरांत्रातील रक्तस्राव , मोठी शस्त्रक्रिया वगैर े ) त्या वेळीच बहुधा करावे लागते. रक्तनाशाचे प्रमाण केवळ प्रयोगशालेय तपासणीवरून ठरवणे कठीण असते. त्वचारंगहीनता , मध्यलोप ( तात्पुरती शुद्ध हरपणे) , हृद ्ग तिवाढ , तहान , वायुक्षु धा ( फुप्फुसात हवा घेण्याची अनिवार्य इच्छा होणे) ही लक्षणे बहुधा १ , ५०० मिलि.पेक्षा जास्त रक्तस्राव दर्शवतात. अशा वेळी अन्योन्य रक्तजुळणीची वाट न बघता O रक्तगटाच्या तांबड्या कोशिकांचे आधान उपयुक्त असते. संपूर्ण रक्ताच्या आधानामुळे रक्ताची ऑक्सिजनवहनक्षमता व घनफळ या दोन्हींमध्ये ताबडतोब सुधारणा होते. सर्वसाधारणपणे एक एकक ( ४५० मिल ि .) रक्तनाश कोणताही दृष्परिणाम करीत नाही. मात्र तेवढेच रक्त अत्यल्प अवधीत नाश पावल्यास आडवे पडून राहिलेल्या अवस्थेत परिणाम जाणवत नसला , तरी उभे राहताच हृद् ग तिवाढ व रक्तदाब कमी होणे या गोष्टी संभवतात.
शस्त्रक्रियेच्या वेळी रक्तनाशाचे अचूक मापन करणे शक्य असते. काही शस्त्रक्रियाविशारद शस्त्रक्रिया चालू असतानाच रक्तधान चालू ठेवणे पसंत करतात. काहींच्या मताप्रमाणे त्यामध्ये अनावश्यक रक्तधानाचा धोका असतो.
संपूर्ण रक्त ताजे किंवा रक्तपेढीमार्फत मिळवलेले असते. ज्या रक्तघटकाची आवश्यकता असल्याचे समजले आहे ; परंतु जे उपलब्ध नाहीत त्यांचा पुरवठा संपूर्ण रक्ताधानाद्वारे करता येतो. नवजात अर्भकांना व गर्भाशयांतर्गत रक्ताधानाकरिता वापरावयाचे रक्त दात्याकडून मिळविल्यापासून चार दिवसांच्या आत वापरावेच लागते.
अस्थिमज्जा ( हाडांच्या पोकळीतील मऊ पदार्थ) अल्पविकसनजन्य व रक्तविलयनजन्य या दोन प्रकारच्या पांडुरोगांत रक्ताधान उपचार करावा लागतो. याचा प्रमुख उद्देश ऑक्सिजनवहनक्षमता वाढविण्याचा असतो. चिरकारी ( दीर्घकालीन) अस्थिमज्जा विकृतीकरिता तांबड्या कोशिकांचे सांद्रण वारंवार आधानाकरिता वापरावे लागते. यात सांद्रण बिंबाणू श्वेत कोशिकारहित असल्यामुळे संवेदनशीलताजन्य धोके टळतात. दात्र कोशिका पांडुरोगात जन्मजात विकृत तांबड्या कोशिका असल्यामुळे धोकादायक परिस्थितीत रक्ताधान आवश्यक असते.
बिंबाणुन्यूनताजन्य रक्तस्रावावर बिंबाणु-आधान गुणकारी ठरले आहे. मात्र हा उपचार फक्त गंभीर रक्तस्रावावरच वापरतात. बिंबाणूंचे साठवणीतील जीवनमान तसेच साठवण तापमान अजून अनिश्चित आहे. याशिवाय एका वेळी जवळजवळ सहा एकक रक्तामधील बिंबाणू लागतात.
श्वेत कोशिकांचे आधान ( विशेषेकरून उदासीनरंजी कोशिकांचे आधान) संसर्गजन्य रोगांच्या उपचाराकरिता , जेव्हा असा रोग नेहमीच्या प्रतिजैव ( अँटिबायॉटिक) औषधोपचारांनी बरा होत नाही , तेव्हा वापरतात. रक्तप्रवाहात या कोशिकांची जीवनमर्यादा अत्यल्प असल्यामुळे तसेच साठवणासंबंधीच्या अडचणीमुळे या प्रकारचे रक्ताधान तेवढे उपयोगात नाही. परिणामकारक कोशिकावृद्धीकरिता वीस ते तीस एकक रक्तातील कोशिकांचा व विशिष्ट उपकरणांचा ( कोशिका विलगीकारक वगैरे) उपयोग करावा लागतो.
ताजा थिजवलेला ( शीतकरणाने गोठवलेला) रक्तरस आणि शीत अवक्षेप ( रक्तरसावर शीतकरण क्रिया करून मिळणारा व न विरघळणारा साखा) हे प्रकार अधिक उपयोगात आहेत. संचयित रक्तरस ( निरनिराळ्या रक्त एककांपासून काढून घेऊन मिश्रित केलेला रक्तरस) वापरीत नाहीत. कारण त्यामध्ये यकृतशोथ ( यकृताची दाहयुक्त सूज) उद्भवण्याचा गंभीर धोका असतो. काही रोगांमध्ये रक्तरसापासून मिळवलेली प्रथिने उपयुक्त ठरली आहेत. काही औषधी कंपन्या ही प्रथिने तयार स्वरूपात विकतात. काही कंपन्या इम्युनोग्लोब्युलिनेही तयार करतात.
कोशिका विलगीकारक या उपकरणामुळे रक्तरसविरहित रक्ताधान तंत्र अधिक सोपे बनले आहे. रुग्णाचे संपूर्ण रक्त काढून केंद्रोत्सारक यंत्राद्वारे त्यातील कोशिका काढून घेऊन त्या मिठाच्या योग्य विद्रावात किंवा बदली रक्तरसात मिसळून या मिश्रणाचे रक्ताधान करण्याच्या क्रियेला ‘रक्त रसविरहित रक्ताधान ’ म्हणतात. यात कोशिकांची संख्या कायम राहून रक्तरस प्रथिनांचा अवक्षय होतो. काही विशिष्ट रोगात उदा. , गंभीर स्नायु-दुर्बलता ( स्नायूंचे दौर्बल्य वाढत जाणारी परंतु स्नायूंची अपपुष्टी नसलेली आनुवंशिक विकृती) या उपचाराचा उपयोग होतो.
संपूर्ण रक्ताचे किंवा रक्तघटकांचे रक्ताधान नेहमीच संभाव्य हानिकारक आणि कधी कधी मारकही असू शकते. याकरिता रक्ताधान उपचार जरूर असल्याशिवाय करू नये. तो चालू असताना काळजीपूर्वक देखभालीची नितांत गरज असते. कोणतीही प्रतिक्रिया आढळून येताच , रक्ताधान चालू ठेवावयाचे किंवा बंद करावयाचे हे चटकन ठरवता आले पाहिजे. कधी कधी अधिहृषताजन्य ( ॲलर्जीजन्य) प्रतिक्रिया व रक्तविलयनजन्य प्रतिक्रिया यांतील फरक ओळखणे कठीण असते. अशा अनिश्चित अवस्थेत रक्ताधान थांबवणेच हितावह असते. रक्ताधानाची योजना कितीही काळजीपूर्वक केलेली असली , तरी २% प्रतिक्रिया प्रमाण आढळते. एका अमेरिकन पाहणीत ८० लक्ष संपूर्ण रक्ताच्या आधाना ं त एका वर्षात १ , ६० , ००० लक्षात येण्यासारख्या प्रतिक्रिया अपेक्षित होत्या. रक्ताधान प्रतिक्रियांची अनेक कारणे असून त्यांपैकी काही महत्त्वाची खाली दिली आहेत.
ज्वरोत्पादक प्रतिक्रिया : ग्राहकाचे तापमान ३७° ·२ ते ३७° ·८ से. पर्यंत सौम्य वाढते. रुग्णास थंडी वाजते. ही प्रतिक्रिया पायरोजेन ( ज्वरोत्पादक अज्ञात पदार्थ) व इतर काही कारणामुळे उद्भवते. ज्वर आठ ते दहा तास टिकतो. रक्ताधानाचा वेग कमी केल्यास व हिस्टामीनरोधी औषधे दिल्यास रुग्णास आराम पडतो.
वरील प्रकारापेक्षा अल्प प्रमाणात आढळणारी ही प्रतिक्रिया बहुधा अधिहृषतेचा पूर्वेतिहास असलेल्या रुग्णास आढळते. त्वचा रक्त्तिमा , त्वचा स्फोट व खाज ही लक्षणे उद्भवतात. दात्याच्या रक्तातील प्रतिजन व ग्राहकाच्या रक्तातील प्रतिपिंड यांमधील प्रतिजन-प्रतिपिंड प्रतिक्रिया मूळ कारण असते. हिस्टामीनरोधी औषधे व कॉर्टिकोस्ट े रॉइडे गुणकारी असतात. कधीकधी ही प्रतिक्रिया ताबडतोब गंभीर स्वरूपाची असते व तिला ‘अत्याधिहृषण’ म्हणतात.
दाता व ग्राहक यांच्या रक्ताची असंयोज्यता रक्तविलयनास कारणीभूत असते. रक्ताची निवड करताना काळजीपूर्वक सुजोडता ( दाता व ग्राहक यांच्या रक्तांची जुळणी) ठरवल्यास ही प्रतिक्रिया टाळता येते.
यात रक्तारुणमेह ( मूत्रातून रक्तारुण-तांबड्या कोशिकांतील ऑक्सिजनवाहक तांबडे रंगद्रव्य-जाणे) , रक्तारुणाधिक्य ( रक्तरसात मुक्त रक्तारुण आढळणे) , अल्परक्तदाब इ. लक्षणे आढळतात. A, B, O रक्तगटांसंबंधी ची असंयोज्यता बहुधा आंतरवाहिनी रक्तविलयनास कारणीभूत असते. साठवणीतील रक्ताचे अगोदरच रक्तविलयन झाले असल्यासही अशी प्रतिक्रिया उद्भवते. रक्तारुणमेहानंतर बारा तासांच्या आत कावीळ उद्भवते. प्रतिक्रियेची लक्षणे दिसू लागताच रक्ताधान बंद करून कारण शोधण्याकडे लक्ष देणे आवश्यक असते.
या प्रतिक्रियेत वृक्कहानीचा ( मूत्रपिंडाच्या हानीचा) गंभीर धोका असतो. त्यावर मॅनिटॉल हे मूत्रल ( लघवी साफ करणारे) औषध उपयुक्त ठरले आहे.
पांडुरोगाच्या वयस्कर रुग्णामध्ये रक्ताधानाचा हा धोका असतो. यामुळे फुप्फुस रक्ताधिक्य व हृद ् निष्फलता उद्भवते. कष्ट श्वसन , नील विवर्णता ( रक्ताला पुरेसा ऑक्सिजन पुरवठा न झाल्याने त्वचा निळसर दिसणे) इ. लक्षणे आढळतात. रक्ताधान ताबडतोब बंद करून ऑक्सिजन पुरवठा वगैरे उपचार तातडीने करतात.
दूषित रक्तजन्य प्रतिक्रिया
सूक्ष्मजंतूमुळे दूषित झालेले अल्पसे रक्तही रक्ताधानातून गेले , तरी गंभीर प्रतिक्रिया उद्भवते. थंडी वाजणे , ताप येणे ( ४१°·७ अंश से.पर्यंत) , उलट्या व अतिसार ही लक्षणे आढळतात. रक्ताधान बंद करून प्रतिजैव औषधे देतात.
रक्ताधान तंत्र दोषजन्य उपद्रव :( अ) क्लथजन्य नीलाशोथ : ( रक्ताची गुठळी तयार झाल्याने होणारी नीलेची दाहयुक्त सूज) नीला कापून किंवा न कापता नीलेत प्रवेशिका घालून रक्ताधानाच्या वेळी पूर्ण निर्जंतुक तंत्र न वापरल्यास हा उपद्रव होतो.
( आ) वायु-अंतर्कीलन : रक्ताधानाच्या वेळी रक्तप्रवाहात वायू शिरल्यामुळे रक्तप्रवाह बंद पडून हा गंभीर उपद्रव होतो व कधी कधी मृत्यूस कारणीभूत असतो.
अती रक्ताधान : चोवीस तासांत १० एककांपेक्षा जास्त ( जवळजवळ ५ , ००० मिलि.) रक्त देण्याला ‘अती रक्ताधान ’ म्हणतात. हृद्लयबद्धहीनता , हृद् ग तिरोध ही गंभीर लक्षणे उद्भवण्याचा धोका असतो.
रोग संचारण : दात्याच्या रक्तामध्येच सूक्ष्मजंतू , व्हायरस इ. रोगोत्पादक गोष्टी असल्यास रोग संचारण ( ग्राहकात रोग उत्पन्न होणे) होण्याचा संभव असतो. खालील तीन प्रमुख रोग रक्ताधानामुळे संचारित होण्याची शक्यता असते.
( अ) उपदंश : दूषित रक्त शरीरात शिरल्यानंतर सर्वसाधारणपणे चार महिन्यांच्या आत ग्राहकामध्ये उपदंशाच्या द्वितीयावस्थेची लक्षणे उद्भवतात. उपदंशाचे सूक्ष्मजंतू ४०° से. तापमानात साठवण केलेल्या रक्तात ९६ तासांपेक्षा जास्त जीवनक्षम नसतात. ताजे रक्त किंवा त्याचे घटक यांच्या शीतकरणानंतरही सूक्ष्मजंतू रोगोत्पादक असू शकतात. प्रत्येक रक्ताची ते वापरण्यापूर्वी व्ही. डी. आर. एल. ( व्हेनेरिअल डिसिझेस रिसर्च लॅबोरेटरी) नावाची विशिष्ट परीक्षा केल्यानंतरही रोग उत्पन्न झाल्याची उदाहरणे आहेत. धंदेवाईक दात्याच्या रक्तापासून अधिक धोका असतो.
( आ) यकृतशोथ : दात्याच्या रक्तात यकृतशोथाचे व्हायरस असल्यास रोग उद्भवतो. रक्ताधानानंतर ६० ते १२० दिवसांच्या परिपाक कालानंतर ( रोगकारक शरीरात शिरल्यापासून प्रत्यक्ष लक्षणे दिसेपर्यंतच्या काळानंतर) लक्षणे उद्भवतात. रोगाचा चिरकारी प्रकारात व कर्करोगात शेवट संभवतो. यकृतशोथाचा धोका जागतिक स्वरूपाचा असून फक्त अल्ब्युमीन व इतर रक्तरस प्रथिनांचे आधान धोकारहित असते.
( इ) हिवताप : ( मलेरिया). कोणत्याही रक्त ग्राहकामध्ये रक्ताधानानंतर काही आठवडे किंवा महिन्यांनंतर थंडी वाजून ताप आल्यास हिवतापाची जबरदस्त शंका येते. हिवतापाचे सूक्ष्म परजीवी ( दुसऱ्या जीवावर उपजीविका करणारे सूक्ष्मजीव) प्लास्मोडियम व्हायव्हाक्स व प्ला. फाल्सिफेरम हे दोन्ही ४° से. तापमानात जीवंत राहू शकतात. हिवतापाचा पूर्वेतिहास असलेल्या दात्याचे रक्त न स्वीकारणे हे उत्तम.
वरील रोगांशिवाय आंत्रज्वर ( टायफॉइड ज्वर) , परांत्र ज्वर ( पॅरा टायफॉइड ज्वर) , इन्फ्ल्यूएंझा इ. रोग रक्ताधानामुळे संचारित होतात. अलीकडील एड्स अथवा रोगप्रतिकारक्षमता - न्यूनताजन्य लक्षणसमूह ( ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशिअन्सी सिंड्रोम) हा विशिष्ट व्हायरसजन्य रोगही संचारित होण्याची शक्यता असते. त्याकरिता रक्तदात्यांची ( विशेषेकरून पाश्चात्त्य देशांतून) विशेष परीक्षा केली जाते.
ज्या पांडुरोगी रुग्णांना वारंवार रक्ताधान करावे लागते त्यांच्या शरीरात लोह संचय वाढण्याचा नेहमी धोका असतो. ३०० मिलि. रक्तामध्ये १५० मिग्रॅ. लोह असते. यकृत , प्लीहा ( पानथरी) व अस्थिमज्जा या ठिकाणी लोह संचय होतो आणि परिणामी यकृत-सूत्रण रोग उत्पन्न होतो.
रक्ताधानानंतर काही आठवड्यानंतर या प्रतिक्रियेची लक्षणे दिसू लागतात. दात्याच्या रक्तातील तांबड्या कोशिकांचा नेहमीच्या कालावधीपेक्षा लवकर नाश होऊन रुग्ण पांडुरोगी बनतो. याच प्रकारे बिंबाणुन्यूनताही संभवते. या कारणामुळे रक्ताधानानंतर काही आठवडे ग्राहकाकडे बारकाईने लक्ष द्यावे लागते.
रक्ताधान बहुधा रूढ असलेल्या बिंदु-अंतःक्षेपण पद्धतीने हाताच्या कोपरापुढील नीलेद्वारे करतात. रुग्णाच्या गरजेप्रमाणे अंतःक्षेपणाची गती कमी-जास्त करता येते. जेव्हा रक्ताची तीव्र घनफळ न्यूनता असेल तेव्हा एक एकक रक्त पहिल्या दहा मिनिटांत देतात. अशा परिस्थितीत शीत रक्तही चालते. जादा रक्त द्यावयाचे असल्यास मात्र त्याचे तापमान शरीर तापमानाएवढे असणे योग्य. ज्या बाटलीतून किंवा प्लॅस्टिक पिशवीतून रक्त देतात तिची रुग्णापासूनची उंची बिंदु-गती नियंत्रित करू शकते. रुग्णाच्या नीला आकुंचित झाल्या असल्यास कधी कधी पिशवीवर बाह्य दाब वाढवून रक्ताधान करावे लागते.
अंतर्रोहिणी किंवा अंतर्नीला रक्ताधानाने कोणताही फरक पडत नाही किंवा विशेष फायदा मिळत नाही. अंतर्रोहिणी रक्ताधानाकरिता बरीच पूर्व तयारी करावी लागते म्हणून जलद रक्त पुरवठा करता येत नाही.
इतर पद्धतींमध्ये ‘अंतर्पर्युदर’ ( उदरगुहेत) रक्ताधान करणे व ‘अस्थिमज्जांतर्गत’ ( लांब हाडाच्या पोकळीत) रक्ताधान करणे यांचा समावेश होतो. दोन्ही वेदनामय असू शकतात व रक्ताधानाची गती मर्यादित असते. अंतर्पर्युदर रक्ताधानातील ९०% तांबड्या कोशिका रक्तात मिसळतात ; परंतु त्यास एक आठवडा लागतो.
इ. स. १९३४ मध्ये एल्. जे. टायबर या शास्त्रज्ञांनी अपस्थानीय गर्भ-विदारणामुळे ( अंडवाहिनीत गर्भ वाढून उदरगुहेत तिचे विदारण होण्यामुळे) उदरगुहेत रक्तस्राव झालेल्या १२३ स्त्री-रुग्णांमध्ये आत्म रक्ताधान ( रुग्णाचे रक्त घेऊन त्याचे त्याच रुग्णास रक्ताधान करणे) केले होते व त्यांपैकी फक्त एकच रुग्ण दगावला होता. अंतर्पर्युदर रक्तस्रावावर मग तो प्लीहा , यकृत यांसारख्या मोठ्या अवयवांच्या विदारणामुळे झालेला असला , तरी आत्म रक्ताधान उपचार उपयुक्त ठरला आहे. यात उदरगुहेतील रक्त हळूवार चूषण करून घेऊन गाळणीमधून परत रक्त प्रवाहात मिसळतात.
कधी कधी बदली रक्ताधान ( रुग्णाचे रक्त काढून त्याच वेळी योग्य रक्ताचे रक्ताधान करणे) उपचार उपयुक्त असतो. गंभीर पांडुरोगाने आजारी असलेल्या किंवा गंभीर विषबाधा झालेल्या रुग्णावर बदली रक्ताधान जीवदायी ठरते. १ , २०० ते १ , ७०० मिल ि . रक्त रुग्णाच्या मांडीतील ऊरुनीलेतून काढून त्याच वेळी १ , ००० ते १ , ५०० मिल ि . सांद्रित तांबड्या कोशिका दुसऱ्या बाजूच्या बाहूतील नीलेतून देतात. नवजात अर्भकातील रक्तविलयनजन्य रोगावरही बदली रक्ताधान उपयुक्त ठरले आहे.
भारतातील सर्व प्रमुख शहरांतून रक्ताधानाच्या सोयी उपलब्ध आहेत ; परंतु त्या अपुऱ्या व काहीशा मागासलेल्या आहेत. एकट्या मुंबई शहरालाच वर्षाला दीड लाख बाटल्या ( प्रत्येकी ३०० मिल ि .) रक्ताची गरज आहे. नव्या तंत्राप्रमाणे रक्तघटक वेगळे करून देता येण्याची सोय करणे आवश्यक आहे.
संदर्भ : 1. Alstead, S.; Girdwood. R. H., Ed., Textbook of Medical Treatment, Edinburgh,
1974.
2. Petersdorf , R. G. and others, Ed., Harrison’s Principles of Internal Medicine, Singapore, 1983.
3. Schwariz, S. I. and others, Ed., Principles of Surgery, Singapore, 1984.
4. Scott, R. B. Ed., Price’s Textbook of the Practice of Medicine, Oxford, 1978.
5. Shah S. J. and others, Ed., A. P. I. Textbookof Medicine, Bombay, 1986.
लेखक : य. त्र्यं. भालेराव
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
सरीसृप (सरपटणाऱ्या प्राण्यांच्या) वर्गाच्या लॅसर्ट...
जगभरात तेलाचा वापर फार पूर्वीपासून होतो आहे. पूर्व...
अॅक्टिनोझोआचे ऑक्टोकोरॅलिया आणि हेक्झॅकोरॅलिया अस...
सजीवांबद्दलची ममता व्यक्त करण्यासाठी हा दिवस जगभर ...