অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वामके

वामके

जठरात गेलेल्या विषारी पदार्थांचे रक्तात शोषण होण्यापूर्वीच उलटी करून ते बाहेर काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांना वामके म्हणतात. आधुनिक वैद्यकात विषबाधेशिवाय इतर कोठेही वमनाचा उपचार म्हणून उपयोग करीत नाहीत. आयुर्वेदामध्ये मात्र दोष शोधना-साठी केल्या जाणाऱ्या पंचकर्मांपैकी वमन ही एक क्रिया आहे.

वमनक्रियेचे म्हणजेच वमनासाठी आवश्यक त्या स्नायूंच्या हालचालींचे उत्तेजन (उद्दीपन) लंबमज्जेतील  वमन केंद्राकडून होते. शरीराच्या विविध भागांकडून या केंद्राकडे तंत्रिका आवेग किंवा मज्जास्फुरण [तंत्रिका (मज्जा) तंतूच्या पटलात घडणाऱ्या क्षणिक भौतिक-रासायनिक बदलाने निर्माण होणारी उद्दीपने] येतात. त्यांमध्ये पचन मार्गातील ग्रसनी (घसा), अन्ननलिका, जठर यांच्या तीव्र विक्षोभामुळे निर्माण होणाऱ्या आवेगांबरोबरच श्वसन तंत्र, हृदय, अंतर्कर्णातील श्रोतृकुहर (गरगर फिरण्यामुळे चक्कर येणे), अप्रिय गंध किंवा ओंगळ दृश्याच्या संवेदना यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या मळमळ वा किळस निर्माण करणाऱ्या आवेगांचाही समावेश होतो. अशा आवेगांमुळे आपोआप वमन होते. त्याला प्रतिक्षेपी वमन म्हणतात. याशिवाय काही रासायनिक पदार्थ (उदा., ॲपोमॉर्फीन)

वमनकेंद्रानजिक असलेल्या रसायनग्राही स्फुल्लिंग क्रिया क्षेत्र (रासायनिक उद्दीपनाला प्रतिसाद देणारे व अशा रीतीने उद्दीपित झाले असता शरीरात इतरत्र प्रतिक्रिया निर्माण करणारे संवेदनशील क्षेत्र) या नावाच्या क्षेत्रावर परिणाम करून त्यापासून वमन केंद्राचे उद्दीपन घडवून आणतात. या क्रियेला केंद्रीय वमन म्हणतात.

पचन मार्गाच्या जठरापासून वरच्या भागावर वमनक्रियेमध्ये ताण पडतो. तसेच जठरातून बाहेर फेकलेले द्रव्य ग्रसनीतून श्वसनमार्गात अंतःश्वसित होण्याचा (ओढले जाण्याचा) धोका असतो. म्हणून तीव्र अम्ल वा अल्कधर्मी पदार्थांसारखी क्षरणकारी (झीज घडविणारी) रसायने पोटात गेली असल्यास वा रुग्ण बेशुद्ध असल्यास वामकांचा उपयोग करणे इष्ट नसते. रॉकेल, पेट्रोल यांसारखी श्वासनलिकेचा दाह करणारी द्रव्येही अशीच धोकादायक असतात.

प्रतिक्षेपी वमनासाठी जठरावर स्थानीय क्रिया करणारी वामके व प्रौढासाठी त्यांच्या सरासरी मात्रा पुढीलप्रमाणे आहेत : तुरटी १ ग्रॅ., अमोनियम कार्बोनेट १.२ ग्रॅ., झिंक सल्फेट १ ग्रॅ., मीठ १०-२० ग्रॅ.,(मोठा चमचाभर) किंवा सैंधव २०-४०ग्रॅ., मोरचूद १ ग्रॅ., मोहरीची पूड १-२ मोठे चमचे, टार्टार एमिटिक (अँटिमनी पोटॅशियम टार्ट्रेट) ३०-६० मिग्रॅ., इपेकॅक पूड १-२ ग्रॅ., इपेकॅक टिंक्चर १५-३० मिलि. व इपेकॅक सायरप ३० मिलि. ही सर्व वामके सु. २००-३०० मिलि. कोमट पाण्याबरोबर देण्यात येत असत. अर्ध्या-पाऊण तासात उलटी न झाल्यास जठरात रबरी नळी (जठरनळी) घालून पोट धुऊन काढणे इष्ट असते.

वरीलपैकी टार्टार एमेटिक व इपेकॅक यांचे काही अंशी रक्तात शोषण होऊन त्यामुळे केंद्रीय वमनही घडून येते; मात्र केंद्रीय वामकांमध्ये सर्वांत प्रभावी वामक ॲपोमॉर्फीन हे आहे. त्याची २–८ मिग्रॅ. एवढी मात्रा अधस्त्वचीय इंजेक्शनद्वारे देतात. मॉर्फीनापासून निर्माण होणारे हे द्रव्य जास्त प्रमाणात दिल्यास ताव्र व अविरत वमन होऊन अवसाद  व मूर्च्छा येऊ शकते. नॅलोक्सोन हा त्यावरील उतारा असून ॲपोमॉर्फिनाचे परिणाम आटोक्यात आणण्यासाठी त्याचा उपयोग करतात.

वामकांचा उपयोग रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी तातडीचा उपचार म्हणून केला जातो. तसेच जठरनळीमध्ये अडकून बसल्याने बाहेर काढण्यास कठीण असे विषारी पदार्थांचे मोठे तुकडे (उदा., विषारी फळे, न विरघळलेल्या गोळ्या) बाहेर काढण्यासाठी वमन उपयोगी ठरते. विष जठरात गेल्यापासून सु. चार तासांत वामक दिल्यास बराच उपयोग होतो व सु. ३० टक्के विष बाहेर काढता येते. बेलाडोनासारख्या औषधाने जठरातून आतड्याकडे जाणाऱ्या मार्गावरील जठरनिर्गमद्वारालगतच्या परिसंकोची स्नायूंचे जोरदार आकुंचन झाले असेल, तर वमनाचा उपयोग ८ ते १० तासांपर्यंत होऊ शकतो. ॲस्पिरीन, लोहाची लवणे यांसारख्या औषधांच्या विषबाधेत तर वमनाचा फायदा २४ तासांपर्यंतही होऊ शकतो.

वामक दिल्यावर उलटी होत असल्यासारखे वाटताच रुग्णाला पुढे वाकवून बसवितात. त्यामुळे गुदमरणे किंवा वमन पदार्थ श्वसन मार्गात जाणे या गोष्टी टाळता येतात. वमनातून बाहेर पडलेले सर्व द्रव्य रासायनिक तपासणीसाठी जपून ठेवतात. वमनक्रिया पूर्ण झाल्यावर जठराचा दाह कमी करणारे पदार्थ देतात. तसेच रक्तात शोषल्या गेलेल्या विषाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी योग्य ती उपाययोजना दीर्घकाळ चालू ठेवतात. बहुतेक वामके ही कफोत्सारक असतात, त्यामुळे श्वासनलिकेतील स्त्राव उत्तेजित होतात. परिणामी तोंडाला पाणी सुटणे, खोकला येऊन कफ पडणे ही लक्षणे काही काळ दिसतात. इपेकॅकमध्ये हृदयाला घातक असे एमेटीन हे अल्कलॉइड असते, हे लक्षात ठेवणे जरूर असते.

वमनक्रियेमध्ये उदर पोकळीतील दाब एकदम वाढतो. त्यामुळे रोहिणीविस्फार (रोहिणीची - शुद्ध रक्तवाहिनीची - भित्ती दुर्बल होऊन निर्माण होणारा फुगवटा), अंतर्गळ (शरीराच्या पोकळीत असलेले इंद्रिय वा त्याचा काही भाग त्या पोकळीच्या भित्तिबाहेर पडणे), गर्भाशय वा मलाशय भ्रंश, अतिरिक्त रक्तदाब, श्वसन मार्गाचे व हृदयाचे विकार यांसारख्या आधीच असलेल्या व्याधींवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. आधुनिक रुग्णालयांमध्ये परिणामकारक औषधयोजना, जठर धुऊन काढण्यासाठी सुरक्षित पद्धती आणि जरूर तेथे सौम्य रेचकांचा वापर या सुविधा असल्यामुळे वामकांचा उपयोग कालबाह्य होत चालला आहे.

 

संदर्भ : 1. Cooper, P. Poisoning by Drugs and Chemicals, Plants and Animals, London, 1974.

2. Laurence, D. R.; Bennett, P. N. Clinical Pharmacology, Edinburgh, 1987.

लेखक - दि. शं. श्रोत्री, द. चि. सलगर

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate