कोठल्याही विषयावर/समस्येवर आरोग्यशिक्षण करायचे असल्यास त्याला थोडी व्यवस्थित रूपरेषा द्या. खालील पाय-यांनी गेलात तर काम सोपे आणि चांगले होईल. आधी स्वतः प्रश्न नीट समजावून घ्या- जो विषय / समस्या हाती घेत आहात त्यात नेमके प्रश्न कोणते आहेत हे आधी मनाशी निश्चित करा. उदा. एड्ससंबंधी आरोग्यशिक्षण हाती घ्यायचे असेल तर एड्स पसरतो कसा, पसरू नये म्हणून नेमके काय करता येईल याचा तपशील ठरवा.
एड्सच्या बाबतीत पुरूषांना लागण होते ती बहुधा वेश्यांकडून, मग असे संबंध टाळणे किंवा निदान निरोध वापरणे हा महत्त्वाचा भाग झाला. पण एखाद्या भागात वेश्यासंबंधापेक्षा मादक पदार्थांच्या इंजेक्शनाद्वारे हा आजार पसरत असेल तर तिथे वेगळे धोरण ठेवावे लागेल. तसेच पुरूषाकडून स्त्रीला लागण होते ती बहुधा पत्नीला. इथे वेश्या व्यवसायाचा संबंध लांबचा आहे. पत्नीला एड्सग्रस्त नव-यापासून संरक्षण कसे मिळेल याची आखणी वेगळी करावी लागेल. हा वैद्यकीय तपशील ठरवणे महत्त्वाचे आहे. या तपशिलातही क्रम ठरवणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, काही जण 'निरोधवापर' हा महत्त्वाचा मुद्दा ठरवतील तर काहीजण विवाहबाह्य संबंध टाळणे हा मुद्दा प्रमुख मानतील. त्या त्या परिस्थितीत हे ठरविता येते.
सुरुवात करतांना लोकांना काय माहिती आहे हे आधी ध्यानात घ्या. तिथून सुरुवात करा.त्यांच्या समजुती, कल्पना, प्रश्न, माहिती करून घ्या. हे करणे फारसे अवघड नाही. संबंधित मंडळींमध्ये बसून चर्चा केली तरी काम होते. शाळेतल्या मुलींशी पाळीसंबंधी बोलताना हा साधा प्रयोग आम्ही केला, त्यातून आम्हांला त्यांच्या कल्पना, अडचणी,भीती वगैरेंबद्दल नेमकी माहिती मिळाली. याच गोष्टींचा वापर करून पुढचे सर्व कार्यक्रम बेतण्यात आले. वर्गासमोर भाषणे देऊन हे काम झाले नसते.
आरोग्यशिक्षणाचा विषय आणि लोकांच्या त्याबद्दलच्या कल्पना/अडचणी यांची माहिती झाल्यावर नेमके काय साधायचे आहे, कोणता तपशील पुरवला पाहिजे वगैरे गोष्टी निश्चित करा. हवे तर हे स्पष्टपणे लिहून काढा आणि कार्यक्रम संपताना यातले किती साध्य झाले,कितीजणांपर्यंत हे सर्व नीटपणे पोचले याचा अंदाज घ्या. साधे प्रश्न विचारून हा अंदाज घेता येईल. काही वेळा खूप तपशील असेल तेव्हा चक्क प्रश्नोत्तर पत्रिका वापरून आधीच्या व नंतरच्या ज्ञानात काय फरक पडला हे समजू शकते. अर्थात यासाठी तीच प्रश्नपत्रिका कार्यक्रमाच्या आधी व नंतर वापरावी लागेल. हे झाल्यावर आता नेमके काय काय शिकवायचे याचा तपशील ठरवा. उदा. एड्ससंबंधी कार्यक्रमात पुढील मुद्दे येऊ शकतील- एड्स म्हणजे काय, कसा होतो, कसा पसरतो, लक्षणे , तपासण्या, प्रतिबंधक काळजी, गैरसमजुतींचे निराकरण वगैरे. हे सर्व लहान लहान टिपणे करून नोंदवून ठेवा. यातले माहिती म्हणून काय पोचले पाहिजे, लोकांना काय काय करता आले पाहिजे (उदा. निरोधचा वापर), मनोवृत्ती बदलायच्या तर नेमके काय करायचे हे सर्व नोंदवून ठेवा . हा झाला तुमच्या आरोग्यशिक्षणाचा गाभा. आता शिकण्या-शिकवण्याच्या पध्दती ठरवा. विषयाप्रमाणे गटाच्या कुवतीनुसार आणि साधनांनुसार पध्दती ठरतात. अनेक पध्दती आहेत.
माहिती देण्यासाठी वेगळी पध्दत असेल. कौशल्ये शिकवायची तर प्रत्यक्ष काम करून घ्यावे लागेल, मनोवृत्ती बदलायच्या तर त्यासाठी वेगळे कर्यक्रम आखावे लागतील. आपल्याकडे यासाठी काय काय साधने आहेत त्याची नोंद घ्या , नवीन काय लागेल ते मागवून घ्या. या पध्दती कोण वापरणार त्यांची तयारी करून घ्यावी लागेल. या सर्व गोष्टी चांगल्या जुळल्या नाही तर कार्यक्रम यशस्वी होणार नाही. मात्र पध्दतींचे फार अवडंबर करू नका. सांगणा-याची कळकळ व शिकणा-याची तळमळ या दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. साधने दुय्यम आहेत. या दोन गोष्टी नसतील तर सर्व साधने असूनही उपयोग नाही. पध्दती ठरल्यानंतर त्यांची पुरेपूर चाचणी घ्या. त्यातले दोष काढून टाका.
उदा. बहुपर्यायी प्रश्न ही एक चांगली पध्दत आहे. विद्यार्थ्यांना विषयाची किती माहिती आहे हे पाहण्यासाठी आम्ही शेकडो बहुपर्यायी प्रश्न तयार केले. (बहुपर्यायी प्रश्न म्हणजे प्रश्न व त्याखालील संभाव्य उत्तरांतून निवड करण्याची पध्दत.) एका गटात याचा प्रत्यक्ष वापर करून उत्तरे नीट मिळतात की नाही हे पाहिले. त्याप्रमाणे सुधारणा केल्या कारण बरेच प्रश्न नीट लिहिले गेले नव्हते असे दिसते. तसेच पोस्टर्स करताना त्यातली चित्रे व मजकूर संभाव्य प्रेक्षकांपैकी काहीजणांना दाखवून त्यांना काय वाटते हे समजावून घ्यावे व त्यात यथायोग्य बदल करावेत. तरच त्याचा अपेक्षित उपयोग होईल. जे ठरवले आणि प्रत्यक्षात जे झाले याबद्दल मूल्यमापन करा. लोकांच्या ज्ञानात काय भर पडली, ठरवल्याप्रमाणे काही गोष्टी त्यांना करता येतात काय, त्यांच्या संबंधित मनोवृत्तीत/धारणेत काय फरक पडला,इ. संदर्भात मूल्यमापन करा. मूल्यमापन केल्यावर कोठे चुकले, काय सुधारणा केली पाहिजे याबद्दल दिशा मिळू शकते.
निरनिराळया पध्दतींनी शिकवल्यानंतर असे दिसते वाचल्यापैकी 10 टक्केच लक्षात राहते ऐकल्यापैकी 20 टक्के लक्षात राहते पाहिल्यावर त्यातले 30टक्के लक्षात राहते ऐकणे आणि वापर करणे असे दोन्ही झाले तर 50 टक्के लक्षात राहते. पाहून स्वतः केल्यानंतर 70टक्के लक्षात राहते हे लक्षात घ्या आणि शक्यतो 'पाहून करणे' ही पध्दत जास्तीत जास्त अमलात आणा.सर्वात चांगले आरोग्यशिक्षण यानेच होते. निरनिराळी साधने वापरल्यानंतर तुमच्या असे लक्षात येईल की प्रत्येक साधन पध्दतीचा परिणाम तुलनेने कमीजास्त असतो. त्यात उतरता क्रम लावला तर अशी यादी करता येईल. करून पाहणे नाटुकली वगैरेत भूमिका करून दाखवणे/ठसवणे प्रात्यक्षिक पाहणे प्रतिकृतीवर शिकणे (उदा. तांबी गर्भाशयाच्या प्रतिकृतीत बसवणे) व्हिडिओपट किंवा सिनेमा दाखवणे. पारदर्शिका (स्लाइड शो) दाखवणे. यासाठी संगणक उपयुक्त असतो. पोस्टर्स, क़ॅलेंडर्स पलटतक्ते इ. नुसती चर्चा, भाषण इ. वाचायला देण.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 7/7/2020
निकोप शरीरसंवर्धनासाठी विद्यार्थांना जे शिक्षण दिल...
युवा शक्तीला ऊर्जा आहे, जिद्द आहे. हे खरे असले तरी...
निरनिराळया देशांत समाजाच्या आरोग्यमानात काय फरक पड...
आरोग्यकारक विचारांचा,सवयींचा समाजात प्रसार व्हावा ...