অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मतिमंद मुलांचे शिक्षण

ज्या व्यक्तींचा बुद्धिगुणांक सरासरीपेक्षा कमी असतो आणि त्यामुळे ज्यांना भोवतालच्या परिस्थितीशी मिळते – जुळते घेण्यात अडचण निर्माण होते, त्यांना ‘मतिमंद’ म्हणावे अशा स्वरूपाची व्याख्या अमेरिकन असोशिएशन ऑन मेंटल डेफिशन्सी या संस्थेने केली आहे.

मतिमंद व्यक्तींमध्ये सामान्यतः मर्यादित बुद्धिमत्ता, भोवतालची परिस्थिती समजण्याची असमर्थता, स्वतःची काळजी घेण्याची असमर्थता, अनाकर्षकता, अपुरा व्यक्तिविकास, अपुरे सामाजिक समायोजन, मन एकाग्र करण्याचा अभाव इ. प्रमुख लक्षणे आढळतात. काही व्यक्तींमध्ये समाजविरोधी कृत्ये करण्याची प्रवृत्तीही आढळते. अमेरिकन असोसिएशनने १९६८ मध्ये बुद्धिगुणांकाच्या आधारे मतिमंदतेचे खालील पाच प्रकार पाडले आहेत :

१.

सीमांत मतिमंद

बुद्धिगुणांक

६८ ते ८३

२.

सौम्य मतिमंद

५२ ते ६७

३.

सर्वसाधारण मतिमंद

३६ ते ५१

४.

तीव्र मतिमंद

२० ते ३५

५.

अतितीव्र मतिमंद

२० ते पेक्षा कमी

वरील वर्गीकरणापूर्वी मतिमंदतेचे निर्बुद्ध (इडिअट), २० पेक्षा कमी बुद्धिगुणांक; अत्यल्प बुद्धी (इम्बिसील), बुद्धिगुणांक २० ते ५० चे दरम्यान आणि मंदबुद्धी (मोअरन्), बुद्धिगुणांक ५० ते ७० चे दरम्यान असे वर्गीकरण केले जात असे. मतिमंद व्यक्तींपैकी बऱ्याच व्यक्ती बालवयातच मृत्युमुखी पडतात. त्यामुळे वाढत्या वयाबरोबर मतिमंदांचे प्रमाण कमी होत जाते. दोन वर्षाखालील मुलांत हे प्रमाण ५ टक्के असते; शालेय वयोगटात ते ३ टक्के असते, तर सर्वसामान्य प्रौढांत ते १ टक्क्यापर्यंत खाली येते. सामान्यतः स्त्रियांपेक्षा पुरूषांमध्ये आणि शहरी विभागापेक्षा ग्रामीण भागामध्ये जास्त मतिमंदता आढळते. निकृष्ट आर्थिक – सामाजिक गटांतही हे प्रमाण अधिक असते. संशोधनाअंती असे आढळले की, प्रसूतीच्या वेळेस मेंदू दबला जाणे, लहानपणी मेंदूस इजा, ज्वर होणे; मेंदूत रोगजंतू शिरणे, कंठस्थ ग्रंथीतून पुरेसे आयोडिन न स्रवणे, मेंदूत द्रवपदार्थ साठणे इ. कारणांनी मतिमंदता निर्माण होते. काही व्यक्तींमध्ये आनुवंशिक कारणांमुळेही मतिमंदपणा येतो.

शैक्षणिक दृष्ट्या मतिमंद व्यक्तींचे

  1. शिक्षण देता येण्याजोगे मतिमंद,
  2. कौशल्ये शिकविता येण्याजोगे मतिमंद आणि
  3. अतिमतिमंद असे प्रकार पडतात. शिक्षण देता येण्याजोग्या मतिमंदांचा बुद्धिगुणांक ५० ते ८० दरम्यान असतो; अशी मुले सहाव्या वर्षी लेखन, वाचन, अंकज्ञान शिकू शकत नाहीत; त्यांना या गोष्टी आणखी काही वर्षांनी शिकता येतात; सामान्य बुद्धिमत्तेच्या व्यक्ती ज्या कुशल आणि अर्धकुशल गोष्टी करतात, त्या त्यांना थोड्या उशिरा येतात; कौशल्ये शिकविता येण्याजोग्या मतिमंदांचा बुद्धिगुणांक २५ ते ५० च्या दरम्यान असतो; सर्वसामान्य व्यक्तीच्या एकतृतीयांश वेगाने त्यांची प्रगती होते. या व्यक्तींना नेहमीचे शालेय विषय येत नाहीत; मात्र स्वतःचे संरक्षण करणे, यंत्रांबाबत सावधगिरी बाळगणे या गोष्टी येतात; इतरांनी देखरेख व मार्गदर्शन केल्यास ते अर्थोत्पादक गोष्टी करू शकतात. अतिमतिमंद व्यक्तींचा बुद्धिगुणांक २५ पेक्षा कमी असतो. या व्यक्तींची इतरांनी काळजी घ्यावी लागते. त्यांतील काहींना जेवता – खाता येते, चालता – बोलता येते; परंतु काहींना सतत अंथरूणातच काळ कंठावा लागतो. या प्रकारच्या व्यक्ती लहानपणी दगावण्याचा संभव अधिक असतो. यांना कुशल, अर्धकुशल असे काहीच शिकविता येत नाही; कारण त्यांची मानसिक वाढ ४ वर्षांच्या मुलांपेक्षा अधिक होत नाही.

मतिमंद मुलांना कोणतीही गोष्ट शिकविण्यात पुढील प्रमुख अडचणी येतात

एकाग्रता व संवेदना यांचा अभाव; भावनिक अपरिपक्वता; उतावीळपणा; स्मरण आणि विचार यांमधील दोष; भाषाप्रभुत्वातील अडचण. मतिमंदांमध्ये या सर्वच गोष्टी आढळतात, असे नाही. मात्र सामान्यतः या अडचणी कमीजास्त प्रमाणात सर्वामध्ये आढळतात.

शिक्षण देता येण्याजोग्या मतिमंदांच्या शैक्षणिक कार्यक्रमाची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे असतात

व्यक्तिगत आणि भावनिक समायोजन, सामाजिक समायोजन आणि आर्थिक स्वावलंबन. हे शिक्षण देताना पुढील तत्त्वे पाळतात : सुरूवातीची मंद प्रगती लक्षात घेऊन शिकविण्याचा वेग मंद ठेवावा, प्रत्येक बालकाच्या मंदत्वाचे योग्य निदान करावे, अध्यापक प्रशिक्षित असावेत, शक्यतो समान बुद्धिपातळीची मुले शिकविण्यासाठी एकत्र ठेवावीत. या मुलांच्या सुरूवातीच्या शिक्षणामध्ये आरोग्यशिक्षण, इतर मुलांबरोबर वागण्याचे शिक्षण, प्राथमिक भाषाशिक्षण, अंकज्ञान आणि किरकोळ कारक कौशल्ये यांचे शिक्षण तसेच नित्याच्या वस्तूंची ओळख या गोष्टींचा समावेश असावा.

प्राथमिक शिक्षणामध्ये जीवन – कौशल्ये आणि शालेय विषय यांवर भर असतो. या दोन्ही बाबतींत सारखाच वेळ देणे जरूर असते; कारण दोहोंचे महत्त्व सारखेच असते. मात्र जीवन – कौशल्ये आणि शालेय विषय वेगवेगळे न शिकविता शालेय विषयांतून जीवन – कौशल्यांचा विकास असा दृष्टिकोन ठेवलेला असतो. वाचन आणि अंकज्ञान ही कौशल्ये मूलभूत मानली जातात. त्याचबरोबर संभाषण आणि लेखन यांचाही समावेश असतो. या वयात ही मुले तिसरी – चवथीच्या विद्यार्थ्यांच्या पातळीपर्यंत लेखन, वाचन आणि आकलन या गोष्टी करू शकतात; म्हणून त्यांच्या कुवतीच्या कमाल मर्यादेपर्यंत या गोष्टी त्यांना शिकवाव्यात. या शालेय विषयांमार्फत अंतर, वजन, कालमान आणि आर्थिक व्यवहार यांचे ज्ञान दिले जाते.

या अभ्यासक्रमात भोवतालच्या वातावरणाशी शारीरिक, मानसिक आणि सामाजिक समायोजन करण्याचे शिक्षणही दिले जाते. या मुलांची भावनिक प्रकृती निकोप राहील, अशा तऱ्हेने वर्गातील वातावरण ठेवले जाते. या प्रकारची जी मुले माध्यमिक शाळेपर्यंत शिकतात, त्यांच्या बाबतीत शालेय विषय आणि सामाजिक कौशल्ये पक्की करणे आणि व्यावसायिक शिक्षण देणे यांवर भर असतो. या मुलांच्या बाबतीत अमूर्त आणि भाषेचा अतिरिक्त वापर असलेल्या अध्यापन पद्धती चालत नाहीत. त्याऐवजी व्यवस्थितपणे आखलेल्या आणि टप्प्याटप्प्याने विकसित होणाऱ्या पद्धती प्रभावी ठरतात. औपपत्तिक अभ्यासाऐवजी शिकलेल्या गोष्टींच्या व्यवहारातील उपयोगावर अधिक भर असतो. कौशल्ये शिकविता येण्याजोग्या मतिमंद मुलांच्या शिक्षणात, ही मुले शक्यतो स्वावलंबी व्हावीत आणि समाजाला उपयुक्त ठरावीत, ही उद्दिष्टे ठेवलेली असतात.

या मुलांना अतिशय मर्यादित बुद्धिमत्ता असते, हे शिक्षणक्रम आखताना लक्षात घ्यावे लागते. या मुलांच्या सुरूवातीच्या शिक्षणामध्ये आरोग्य, सुरक्षितता आणि स्वावलंबन यांविषयीच्या सवयीचे शिक्षण असते. ही मुले सुरूवातीस सांगितलेले ऐकणे, स्वतःच्या गरजांची काळजी घेणे, वस्तूंतील फरक ओळखणे आणि इतरांबरोबर जमवून घेणे या गोष्टी शिकतात. प्राथमिक आणि नंतरच्या अवस्थेत घरात उपयोगी पडणे, वाहनाचा उपयोग करणे, स्वतःची सुरक्षितता राखणे, अशा प्रकारचे शिक्षण द्यावे लागते, काही मुलांच्या बाबतींत ती मुले वयाने वाढल्यानंतर त्यांना हातापायांचा उपयोग करून करावयाची कौशल्ये शिकवली जातात आणि ती ती मुले शिकूही शकतात. सुतारकाम, गवंडीकाम, लोहारकाम अशा ठिकाणी मदत; झाडांना पाणी घालणे, जमिनीची मशागत करणे यांसारखी कामे; घरगुती कामे करणे, निरोप पोहोचविणे इ. किरकोळ कौशल्ये तसेच सुरक्षिततेला धोका नसलेली साधी यंत्रे चालविणे इत्यादींचे शिक्षण त्यांना दिले जाते. अतिमतिमंद मुलांना कोणतेही शिक्षण देता येत नाही. जागतिक अपंग वर्षापासून मतिमंदांच्या शिक्षणाकडे सर्वसामान्यांचे लक्ष चांगल्या प्रमाणात वेधले आहे. त्यांच्या शिक्षणासाठी दिल्ली, मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांतून शासकीय व खाजगी संस्थांच्या शाळा सुरू केलेल्या आहेत. त्यांमध्ये फिल्डरेशन फॉर द वेलफेअर ऑफ मेंटली रिटार्डेड, नवी दिल्ली; होम फॉर मेंटली डेफिशन्ट चिल्ड्रेन, मानखुर्द, मुंबई तसेच पुण्यातील कामायनी (स्था. १९६४) व सेवासदन या संस्थेच्या मतिमंद मुलांच्या उल्लेखनीय आहेत.

 

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/10/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate