অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वीजनिर्मितीसाठी पवनऊर्जा

पाणी उपसण्यासाठी तसेच ग्रिडबाहेरील वीजनिर्मितीसाठी पवनऊर्जा

देशाच्या ग्रामीण व दुर्गम भागांत, तिथे वारा भरपूर असतो, विकेंद्री पद्धतीने पाणी उपसण्यासाठी आणि विजेच्या छोट्या गरजा भागवण्यासाठी पाणी उपसणार्‍या पवनचक्क्या, एअरोजनरेटर्स म्हणजे वार्‍यावर छोट्या प्रमाणात वीजनिर्मितीची यंत्रे तसेच वारा आणि सूर्य ह्यांपासून संयुक्तपणे वीजनिर्मिती करणे हे चांगले उपाय आहेत.

पाणी उपसणारी पवनचक्की

पिण्यासाठी, शेतीला देण्यासाठी, मत्स्यशेतीसाठी विहीर, कूपनलिका किंवा तलावातील पाणी उपसण्याकरता पाणी उपसणार्‍या पवनचक्क्या उपयोगी असतात.सध्या दोन प्रकारच्या पवनचक्क्या मिळतात, डायरेक्ट ड्राइव (थेट चालणार्‍या)आणि गियर असलेल्या.

सर्वाधिक प्रमाणात वापरल्या जाणार्‍या पवनचक्कीला सुमारे ३ ते ५.५ मीटर व्यासाचा पंखा (रोटर) असतो. ह्या पंख्याला १२ ते २४ पाती असतात व हा सुमारे १० ते २० मीटर उंचीच्या माइल्ड स्टीलच्या टॉवरवर बसवलेला असतो. एका कनेक्टिंग रॉडच्या मदतीने हा पंखा ५० ते १५० मिमी व्यासाच्या रेसिप्रोकेटिंग पंपाला जोडलेला असतो. वार्‍याचा वेग ताशी ८ ते १० किमी झाला की अशी पवनचक्की पाणी उपसू शकते. साधारणापणे दरतासाला १००० ते ८००० लिटरपर्यंत पाणी उपसता येते. अर्थात हा दर पवनचक्कीची रचना, वार्‍याचा वेग आणि पाण्याची पातळी ह्यांनुसार बदलत राहतो.

पवनचक्क्या सुमारे ६० मीटर खोलीपर्यंतचे पाणी उपसू शकतात. त्या चालवण्यासाठी कोणतेही इंधन लागत नाही आणि म्हणूनच भरपूर वारा असलेल्या परंतु दुर्गम प्रदेशांत त्या बसवणे योग्य ठरते कारण पाणी उपसण्याचे कोणतेही पारंपारिक उपाय करणे तेथे शक्य नसते.

अर्थात पाणी उपसणार्‍या पवनचक्क्यांच्या काही अंगभूत मर्यादाही आहेत. दरताशी १२ ते १८ किमी वेगाने वाहणार्‍या वार्‍यातच त्या नीटपणे काम करतात. शिवाय त्या बसवण्याच्या ठिकाणी नुसताच वारा असून चालत नाही तर उंच इमारती आणि मोठ्या झाडांमुळे त्यांच्या कामात अडथळा येतो. पवनचक्कीची किंमत बरीच असल्याने वैयक्तिकरीत्या ती बसवणे परवडेलच असे नाही.

एअरोजनरेटर

एअरोजनरेटर्स म्हणजे वार्‍यावर छोट्या प्रमाणात (३० किलोवॅटप्रयंत) वीजनिर्मिती करणारा जनरेटर. एअरोजनरेटर स्वतंत्रपणे किंवा सोलर प्रकाशविद्युत यंत्रणेबरोबर (सोलर फोटोव्होल्टाइक - SPV) बसवता येतो व विकेंद्री पद्धतीने वीजनिर्मिती करता येते. ह्याला सुमारे १ ते १० मीटर व्यासाचा पंखा (रोटर) असतो. ह्या पंख्याला २-३ पाती असतात. ह्याखेरीज पर्मनंट मॅग्नेट प्रकारचा जनरेटर, नियंत्रक यंत्रणा, फिरवण्यासाठी यॉ मकॅनिझम, स्टोअरेज बॅटरी इ. भाग असतात. हा टॉवरवर बसवलेला असतो. वार्‍याचा वेग ताशी ९ ते १२ किमी झाला की पंखा फिरू लागतो मात्र ह्याचे खरे काम वार्‍याचा वेग ताशी ४०-४५ किमी असतानाच सुरू होते. तसेच तो सतत, म्हमजे आपल्याला हवी तेव्हा वीजनिर्मिती करू शकत नसल्याने तयार होणारी वीज बॅटरीमध्ये साठवावी लागते.

दर किलोवॅट विजेसाठी एअरोजनरेटरचा खर्च सुमारे २ ते २.५ लाख रुपये येतो. ह्याशिवाय पाया घेणे इ. कामांसाठी दर किलोवॅटला सुमारे ५००० रु. लागतात. देखभालीचा वार्षिक खर्च दर किलोवॅटला साधारणतः २००० रुपये असतो.

वारा आणि सूर्य ह्यांपासून संयुक्तपणे वीजनिर्मिती

वारा आणि सूर्यावर चालणार्‍या घटकांच्या प्रमाणानुसार ह्या यंत्रणेचा खर्च दर किलोवॅटमागे २.५ ते ३.५ लाख रुपये असतो. ह्याशिवाय पाया घेणे, उभारणी इ. कामांसाठी दर किलोवॅटला सुमारे १०००० रु. लागतात. देखभालीचा वार्षिक खर्च दर किलोवॅटला साधारणतः ३००० रुपये असतो.

व्यक्तिगत, औद्योगिक तसेच संस्थात्मक वापरासाठी आणि संशोधन व विकासासाठी यंत्रणेच्या मूळ किमतीवर 50% पर्यंत अनुदान दिले जाते मात्र ह्या अनुदानाची मर्यादा दर किलोवॅटला १.२५ लाख रुपये अशी आहे. सार्वजनिक पातळीवर, सरकारी विभागांसाठी, लष्करी व निमलष्करी दलांसाठी नवीन व पुनर्वापरयोग्य ऊर्जास्रोत मंत्रालयाद्वारे हे अनुदान ७५% पर्यंत मिळते व ह्यांच्यासाठी कमाल मर्यादा दर किलोवॅटला २ लाख रुपये अशी आहे. विद्युतीकरण न झालेल्या बेटांसाठी हे अनुदान ९०% पर्यंत दिले जाते वकमाल मर्यादा दर किलोवॅटला २.४० लाख रुपये अशी आहे.

 

स्रोत: भारत सरकारच्या नवीन व पुनर्वापरयोग्य ऊर्जास्रोत मंत्रालयाचे पवनऊर्जेवरील पुस्तक

अंतिम सुधारित : 8/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate