অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सौरपंपाच्या उभारणीतून मिळाले हक्काचे पाणी

डोक्यावर अनेक हंडे चढवत मैलो न् मैल चालणाऱ्या महिला या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात पहायला मिळतात. ग्रामीण भागात घरातील लेकी-सुनांना या दिव्यातून जाणे अपरिहार्य असते. परंतु याला अपवाद ठरल्या त्या आळंद (ता. फुलंब्री जि. औरंगाबाद) येथील महिला.

रात्री-अपरात्री तास न् तास पाण्यासाठी रांगा आणि त्या रांगेत अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध विशेष: महिला वर्ग असतो. घरातील, शेतीची सर्व कामे आटपून महान दिव्य पार करावे लागते ते म्हणजे पाणी आणणे. तेही मैलो न् मैल उन्हं, वारा, पाऊस अगदी दिवस-रात्रीची पर्वा न करता पाणी आणावे लागते. जणू काही ग्रामीण भागात तर ही ‘परंपराच’ असते आणि अशा विदारक परंपरेला छेद दिला गेला तो आळंद या गावाने. औरंगाबाद जिल्ह्यात स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजनेवर पहिल्या सौरपंपाची उभारणी करण्यात आली आहे. या उभारणीचे सर्व श्रेय जाते ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड, कार्यकारी अभियंता गजानन रबडे, उपअभियंता बाळासाहेब पाटील यांना. या योजनेवर 7.5 अश्वशक्तीच्या इलेक्ट्रीक पंपाद्वारे पाणीपुरवठा चालू आहे. पाणीपुरवठा योजनेवर सौरपंप बसविल्यामुळे नियमित होणाऱ्या भारनियमनावर मात झालेली आहे. यापूर्वी सहा दिवसानंतर मिळणारे पाणी एक दिवसाआड मुबलक प्रमाणात मिळू लागले आहे. त्यातून गावची पाणी टंचाई दूर झाली आहे. महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करणे हे शासनाचे धोरण आहे. यामुळे शासनाचे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत वापरण्याचे धोरण यशस्वी होत आहे.

राज्यात 14 व्या वित्त आयोगाच्या शासन निर्णयामध्ये सोलर पंप बसविण्याच्या कामास प्राधान्य दिल्यामुळे 14 व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीस मिळणाऱ्या निधीमधून सोलर पंप बसविण्याचे उपअभियंता (यांत्रिकी) देखभाल दुरुस्ती यांच्या कक्षामार्फत सूचविण्यात आले आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीने विजेच्या भारनियमनवर मात करण्यासाठी सोलर पंप बसविण्याचे ठरविल्यामुळे देखभाल दुरुस्ती कक्षामार्फत आळंद (ता. फुलंब्री) येथील नळ पाणीपुरवठा योजनेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. सोलरपंप बसविण्यासंबंधी ई- निविदेच्या अटी शर्ती तयार करणे, सौरपंपाचे डिझाईन तयार करणे, सौरपंप बसविण्याचे अंदाजपत्रक तयार करणे इत्यादी कामांसंबधी तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. पाणीपुरवठा योजनेवर पाच अश्वशक्तीचा सौर पंप बसविण्यासाठी पाच लाख 50 हजार रुपये इतक्या रक्कमेचे अंदाजपत्रक तयार करुन ग्रामपंचायतीमार्फत ई-निविदाद्वारे कामाची प्रक्रिया पूर्ण करून योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

राबविलेल्या योजनेमधील नाविन्य

  1. विजेची बचत म्हणजेच विजेची निर्मिती असं म्हटलं जातं. सौरउर्जेचा वापर केल्यामुळे पारंपरिक विजेची बचत होते.
  2. स्वच्छ पर्यावरण- पारंपरिक वीज वापरण्यात येत नसल्यामुळे कोणतेही प्रदूषण होत नाही.
  3. विद्युत भारनियमनाची चिंता नसते- सौरउर्जेचा वापर होत असल्यामुळे विजेचे भारनियमन होत नाही.
  4. सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत सौरपंप चालत असल्यामुळे कायम मुबलक पाणी पूर्ण क्षमतेने मिळते.
  5. शासनाचे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत वापरण्याचे धोरण यशस्वी होते.
  6. विजेची देयके भरण्याची आवश्यकता राहत नसल्याने आर्थिक बचत होते.
  7. वापरण्यात आलेला सौरउर्जेवरील डीसी पंप पूर्णपणे दुरूस्तीमुक्त असल्यामुळे आणि त्याची पाच वर्षांपर्यंतची देखभाल दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी संबंधित एजन्सीची असल्याने देखभाल दुरुस्तीवरील खर्च कमी आहे.

शासनाच्या खर्चात बचत


ग्रामपंचायतीच्या स्वतंत्र नळ पुरवठा योजनेवर सौरउर्जा पंप बसविल्यामुळे ग्रामपंचायतीची विद्युत देयकात आर्थिक बचत झाली. संबंधित कंपनीकडे सौर उर्जेवरील पंपाची पाच वर्षांपर्यंतची देखभाल दुरुस्ती असल्यामुळे होणाऱ्या देखभाल दुरुस्तीच्या खर्चातही बचत होणार आहे. योजनेची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया प्रशासनाच्या दृष्टीकोनातून सोपी व सुटसुटीत आहे. कारण 14 व्या वित्त आयोगाच्या शासन निर्णयामध्ये या योजनेची प्राधान्याने अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. सौरपंप व सौर पॅनल स्थानिक बाजारात सहज, मुबलक व चांगल्या प्रतीचे उपलब्ध होत असल्यामुळे प्रशासनाच्या दृष्टीकोनातून ही योजना सोपी व सुटसुटीत आहे.

इतर जिल्हा परिषदांनी आदर्श घ्यावा


जिल्ह्यातील छोट्या ग्रामपंचायतीच्या स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजनेवर ही योजना परिणामकारक यशस्वी असून 14 व्या वित्त आयोगाच्या ग्रा.पं. ला मिळणाऱ्या निधीतून या खर्चास प्राधान्य दिलेले आहे. यामुळे सर्व जिल्हा परिषदेमध्ये ही योजना राबविली गेल्यास गावामधील पाणी समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.

लेखक - संजीवनी जाधव-पाटील,
माहिती सहायक, विभागीय माहिती कार्यालय, औरंगाबाद.
स्रोत - महान्यूज

अंतिम सुधारित : 3/6/2024



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate