অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

खनिज तेल

खनिज तेल कशाला म्हणतात.?

खडकात आढळणाऱ्या नैसर्गिक तेलाला खनिज तेल म्हणतात.

त्यामध्ये मृत्तिका, काही खनिजे, धातू इ. पदार्थही अल्प प्रमाणात असतात. अशा तेलाचे ऊर्ध्वपातनाने (वाफ करून व मग ती थंड करून द्रव पदार्थ मिळविण्याच्या क्रियेने) परिष्करण (शुद्धीकरण) करून त्यापासून गॅसोलीन (पेट्रोल), केरोसीन (रॉकेल), जळणासाठी वापरण्यात येणारा वायू इ. पदार्थ मिळवितात. म्हणून नैसर्गिक खनिज तेलाला कच्चे तेल(क्रूड ऑइल) असेही म्हणतात. पेट्रोल हा शब्द भारतात व इतर काही देशांत सामान्यपणे मोटारगाड्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या गॅसोलिनासाठी वापरतात. हे पेट्रोल खनिज तेलाचा केवळ एक भाग असते. पेट्रोलियम ही संज्ञा लॅटिन भाषेतील ‘पेट्रा’ म्हणजे खडक आणि ‘ओलियम’ म्हणजे तेल या शब्दांपासून तयार झालेली आहे. म्हणजे पेट्रोलियमाचा शब्दशः अर्थ शिला–तेल असा आहे.

निरनिराळ्या तेलक्षेत्रांतील खनिज तेलांचे रासायनिक संघटन अगदी सारखेच नसते, पण ती मुख्यतः हायड्रोकार्बनी संयुगांच्या मिश्रणांची बनलेली असतात. खडकात आढळणारी हायड्रोकार्बने कधीकधी वायूच्या, तर कधी अतिशय श्यान (दाट) द्रवाच्या किंवा कधीकधी घन स्वरुपात असतात. हायड्रोकार्बनांची घनस्थिती म्हणजे बिट्युमेन व अस्फाल्ट, द्रवस्थिती म्हणजे तेल व वायुस्थिती म्हणजे नैसर्गिक वायू होय. कित्येक ठिकाणी तेलाबरोबर वायुरूप वा घनरूप हायड्रोकार्बने कमीअधिक प्रमाणात आढळतात. म्हणून कधीकधी त्यांचाही समावेश खनिज तेल या संज्ञेत केला जातो.

इतिहास

खनिज तेल सु. चार हजार वर्षांपासून माहीत आहे. काळ्या व कॅस्पियन समुद्रांभोवतालच्या प्रदेशांत तेल व वायू बाहेर पडतात, हे इ. स. पूर्वी माहीत होते. मध्यपूर्वेत इराण, इराक, सौदी अरेबिया व ईजिप्त या भागांत प्राचीन काळी पृष्ठभागावर असलेल्या निक्षेपातील (साठ्यातील) अस्फाल्टी बिट्युमेनाचा निरनिराळ्या प्रकारांनी उपयोग करीत व त्याला स्लाइम, पिच, बिट्युमेन किंवा अस्फाल्ट या अर्थांची नावे प्रचलित होती. या भागांत प्राचीन काळी संयोजक (सिमेंट) म्हणून बिट्युमेन वापरीत असत. रत्ने जडविणे, हत्यारे व उपकरणे यांची पाती मुठीत घट्ट बसविणे, रस्ते बांधणी, औषधे, जहाजांच्या भेगा बुजवून त्या जलाभेद्य करणे इत्यादींसाठी बिट्युमेन वापरीत, तसेच प्रेते गुंडाळण्याच्या पदरांमध्ये बिट्युमेन वापरल्याचे आढळते. ईजिप्शियन लोक ममी व्यवस्थितपणे गुंडाळून बांधण्यासाठी अस्फाल्ट वापरीत. एक इमारती कमान बांधण्यासाठी पिच (डांबर) वापरण्यास बायबलमध्ये सांगितले आहे. तसेच बॅबलचा मनोरा बांधताना स्लाइम (बिट्युमेन) संयोजक म्हणून वापरल्याचा उल्लेख आहे. नैऋत्य इराणात बिट्युमेनयुक्त पदार्थ चार हजार वर्षांपूर्वीपासून वापरात आहेत. बिट्युमेनयुक्त वालुकाश्माच्या सुमेरियन कालीन कलाकृती पुष्कळ संग्रहालयांत आहेत. इराकमध्ये अस्फाल्ट व तेल भिन्नभिन्न उपयोगांसाठी इ. स. पू. ४००० च्या सुमारास वापरले असल्याचे आढळते.

नैसर्गिक वायू

नैसर्गिक वायूचे उल्लेखसुद्धा इतिहासात पुष्कळ आहेत. बाकू (कॉकेशस) येथील अग्निपूजकांचे मंदिर ज्या ठिकाणी खडकातून वायू बाहेर पडतो त्या मुखावरच बांधलेले असून या शाश्वत अग्नीला पुजण्यासाठी दूरदूरवरून लोक तेथे येतात. किर्कूक तेलक्षेत्रातील बाबा गुर्गुर (इराक) येथे सध्याही नैसर्गिक वायू जळतो. नॅप्थार या हिब्रू शब्दावरून आलेला (नाव पडलेला) नॅप्था हा पदार्थ धार्मिक अग्नी पेटविण्यासाठी वापरीत. चिनी लोक दोन हजार वर्षांपूर्वी लवण विद्रावातून लवण मिळविण्यासाठी इंधन म्हणून नैसर्गिक वायू वापरीत.

चिनी लोकांनी खनिज तेलासाठी इ. स. पूर्वी विहिरी खणल्या होत्या. लवणासाठी खणताना त्यांना तेल व वायू सुरुवातीला मिळाले. नंतर मात्र लवणी विहिरीतून तेल व वायूच मुख्यत्वेकरून ते मिळवीत. विहिरी खणण्यासाठी चिनी लोक प्रहार करणारी यंत्रे वापरीत. या यंत्रांच्या खालच्या भागात जमिनीत भोके पाडण्यासाठी कठीण अशी हत्यारे बसविलेली असत. याशिवाय ते बांबूचे नळ व मानवी बळ वापरीत. चिनी लोकांना सुरुवातीला पाझरातून तेल मिळे पण, हाताने खणलेल्या विहिरीही आढळतात. इ. स. पू. तिसऱ्या शतकात चिनी लोक दोरखंडी पद्धतीचे यंत्र विहिरी खणण्यासाठी वापरीत.

सोळा ते अठरा या शतकांतील खनिज तेलाच्या सुरुवातीच्या नोंदी मुख्यत्वेकरून पाश्चिमात्य देशांतील आढळतात. व्हेनेझुएलामधून १५३९ साली खनिज तेलाची पहिली निर्यात झाली. त्यावेळी तेथून स्पेनच्या राजाला एक पीप खनिज तेल पाठविण्यात आले होते. १५४२ मध्ये जोन रॉद्रीगेस या स्पॅनिश खलाशाने सँटा बार्बारा येथे तेल असल्याचे निदर्शनास आणले. १५४३ साली दे सोटो सफरीतील लोकांनी टेक्ससमधील पाझरातील तेल जहाजाच्या दुरुस्तीसाठी वापरले. सर वॉल्टर रॅली यांनी १५९५ साली त्रिनिदादमधील अस्फाल्टाच्या सरोवराला भेट दिली. त्यातील घटक जहाजांच्या दोरखंडांना लेप देण्यासाठी उत्कृष्ट असल्याचे आढळले. पीटर द ग्रेट यांनी १७२३ मध्ये बाकू तेलक्षेत्र जिंकून रशियाला मोठा तेलसाठा मिळवून दिला.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून खनिज तेलाचा उद्योग सगळ्या जगाच्या दृष्टीने महत्त्वाचा झाला. या काळापर्यंत दिव्यात जाळण्यासाठी देवमाशाच्या तेलाचा उपयोग करीत. पण या माशांच्या कमतरतेमुळे व त्यांचे तेल मिळणे कठीण व महाग झाल्यामुळे खनिज तेल वापरणे व त्याचे उत्पादन करणे सुरू झाले. १८५४ साली रॉकेलाच्या दिव्याचा शोध लागला व रॉकेलाचे युग सुरू झाले. १८५९ पर्यंत अमेरिकेत दगडी कोळशापासून तेल मिळविणारे ६० पेक्षा अधिक कारखाने चालू होते. ३० डिसेंबर १८५४ रोजी पेनसिल्व्हेनियन रॉक ऑइल कंपनी ही पहिली अमेरिकन तेल कंपनी न्यू हॅवेन येथे स्थापन झाली. यूरोपातील खनिज तेल उद्योगाची सुरुवात १८५७ साली रूमानियात झाली. आधुनिक खनिज तेल उद्योग खऱ्या अर्थाने  २७ ऑगस्ट १८५९ रोजी सुरू झाला. त्या दिवशी एडविन एल्. ड्रेक यांनी सु. २३ मी. खोल खणलेल्या विहिरीत तेल सापडले. ती विहीर त्यांनी वॉटसन फ्लॅटवर ऑइल–क्रीकजवळ टिस्टुव्हिल समीप सीनेका ऑइल कंपनीसाठी खोदली होती. तेलासाठी खणलेली ही पहिलीच विहीर होय. ड्रेक विहिरीपासून सु. १·५ किमी. अंतरावर १८६० मध्ये पहिला तेल परिष्करण कारखाना निघाला. त्यावेळी ५ सेंमी. व्यासाचा सु. ७·५ किमी. लांबीचा नळ तेल वाहून नेण्यासाठी टाकण्यात आला. १८६१ मध्ये अगदी प्रथम लाकडी पिपांतून खनिज तेल अमेरिकेतून लंडनला निर्यात करण्यात आले. अँटवर्प (बेल्जियम) येथील चार्लस ह्या पहिल्या तेलवाहू जहाजाने १८६९–७२ च्या दरम्यान अमेरिकेतून यूरोपात तेल वाहून नेले. १८७० मध्ये जॉन डी. रॉकफेलर यांनी स्टँडर्ड ऑइल कंपनीची स्थापना केली. १८७१ मध्ये प्रथमच आगगाडीचा डबा तेल वाहतुकीसाठी वापरण्यात आला. १८७५ मध्ये पहिली तेलवाहक पोलादी टाकी (टँकर) बांधण्यात आली. व्हेनेझुएलामध्ये १८७० च्या सुमारास एका लहान कंपनीने सु. २० मी. खोलीपर्यंत काही थोड्या विहिरी खणल्या होत्या. रशियात बाकू येथील तेलक्षेत्रात १८७४ साली पहिली विहीर खणण्यात आली. या क्षेत्रातील खनिज तेलाचा उद्योगंधदा रॉबर्ट व लडव्हिग नोबेल यांनी सुरू करून त्याचा विस्तार केला. त्यांनी अमेरिकेतील कंपन्यांप्रमाणे विहिरींचे नियंत्रण केले, तेल वाहुन नेण्यासाठी नळ टाकले, आगगाड्यांवरील तेलाच्या टाक्या बांधल्या, तसेच १८७७ साली लोखंडी जहाज बांधले. झोरोअ‍ॅस्टर नावाचे जहाज १८७९ मध्ये प्रथमच बाकू आणि व्होल्गा यांमधील कॅस्पियन समुद्रात वाहतूक करू लागले. १८८३ सालापूर्वीच कॅस्पियन भागातील जहाजे व रेल्वे एंजिने कोळशाच्या किंवा लाकडाच्या ऐवजी तेलाचा उपयोग इंधन म्हणून करू लागली होती. १८८३ साली रशियन तेल जर्मनीत, १८८८ मध्ये सिंगापूरला व नंतर अतिपूर्वेकडे निर्यात झाले. रॉयल डच शेल कंपनीने १८८४ मध्ये सुमात्रामध्ये पहिली विहीर खणली.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीस अंतर्ज्वलन एंजिनाचा (ज्यातील सिलिंडरामध्येच इंधन जाळून कार्यकारी माध्यमाला उष्णता देण्यात येते व दट्ट्याच्या द्वारे तिचे यांत्रिक कार्यात रूपांतर करण्यात येते अशा एंजिनाचा) शोध लागल्याने पेट्रोलाचे युग सुरू झाले व या उद्योगधंद्याची भरभराट सुरू झाली. यापूर्वीपासून जहाजे, विमाने, आगगाड्या यांत तेल वापरण्यास सुरुवात झाली होती. पुढे मोटारगाड्यांचे उत्पादन व वापर अतिशय मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यामुळे तेलाची गरज वाढली. खनिज तेलापासून मिळणाऱ्या पदार्थांचे उपयोगही वाढले. पहिल्या महायुद्धामुळे तेलास अधिकच महत्त्व आले. १९११–२३ या काळात जागतिक उत्पादन तिप्पट होऊन प्रथमच ते एक अब्ज पिपांपेक्षा अधिक झाले. खनिज तेल व त्यापासून तयार होणाऱ्या द्रव्यांचा उपयोग अनेक मार्गांनी उदा., ऊर्जा, उष्णता व प्रकाश निर्माण करण्याकरिता इंधन म्हणून, वंगणे, विद्रावक (विरघळविणारे पदार्थ), प्लॅस्टिक, कृत्रिम रबर व धागे, खते, तृणनाशके, कीटकनाशके इ. रासायनिक पदार्थ बनविण्यासाठी होऊ लागला. दुसऱ्या महायुद्धानंतर खनिज तेल हे एक युद्धसाहित्य बनले व त्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांचेही महत्त्व अधिकच वाढले. १९४८ पर्यंत खनिज तेलाच्या जागतिक उत्पादनात परत तिपटीने वाढ होऊन ते सु. ३·५ अब्ज पिपे इतके झाले. १८७० साली अमेरिकेत दोन हजारांहून अधिक विहिरी होत्या. १९०२ मध्ये त्यांची संख्या लाखावर गेली, तर १९५४ मध्ये पाच लाख विहिरी होत्या. १९४८ नंतर पुढे १९६६ पर्यंत तेलाच्या जागतिक उत्पादनात परत तिपटीहून अधिक वाढ होऊन ते ११·७ अब्ज पिपे इतके झाले.

अरब राष्ट्रे व इझ्राएल यांच्यात ऑक्टोबर १९७३ मध्ये झालेल्या युद्धानंतर अरब राष्ट्रांनी तेलाचे दर जवळजवळ चौपट केले व जपान, अमेरिका इ. राष्ट्रांना तेलाची निर्यात काही काळ बंद केली. तसेच उत्पादनही १० टक्क्यांनी कमी केले. यामुळे अनेक विकसनशील राष्ट्रांच्या आर्थिक स्थितीवर फार मोठा ताण पडला. परिणामी खनिज तेलाला पर्यायी इंधन शोधण्याचे प्रयत्न अधिक जारीने सुरू झालेले आहेत.

भारतामध्ये १८६५ साली आसाममधील मारघेरिटाच्या माकुम नामदा क्षेत्रात प्रथम तेल सापडले. परंतु दळणवळणाच्या सोयी त्यावेळी उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणावर तेल काढणे शक्य झाले नाही. १८८२ साली रेल्वेमार्ग तयार करताना सध्याच्या दिग्बोईजवळ तेल आढळले. १८९० मध्ये या जागी सु. २२० मी. खोल विहीर खणण्यात आली. १८९९ मध्ये आसाम ऑइल कंपनी स्थापन झाली व या सालापर्यंत चौदा विहिरी खोदण्यात आल्या होत्या. या कंपनीने नंतर ८० विहिरी खणल्या, त्यांपैकी काही सु. ६६० मी. खोल होत्या. १९१७ मध्ये या विहिरींतून दररोज १८,००० गॅलन तेल मिळत असे. १९२१ साली आसाम ऑइल कंपनीची मालकी बर्मा ऑइल कंपनीकडे गेली. या कंपनीने १९३१ पर्यंत दररोज १८,००० गॅलन एवढे उत्पादन केले. याच काळात बर्मा ऑइल कंपनीने बदरपूर तेलक्षेत्रातून १८,६४,००० पिपे तेल काढले होते. कित्येक वर्षे दिग्बोई तेलक्षेत्रातून दरवर्षी फक्त २,७०,००० टन तेलाचे उत्पादन होत असे. परंतु गेल्या काही वर्षांपासून हे उत्पादन दर वर्षी चार लाख टनांपर्यंत वाढले आहे.

उत्तर आसामात नहरकटिया, मोरान व हुग्रीजन भागात अधिक तेलक्षेत्रे असून त्यांतून दरवर्षी २५ ते २६ लाख टन तेल मिळावे अशी अपेक्षा आहे, म्हणजे आसाम तेलक्षेत्रातून दरवर्षी जवळजवळ ३० लाख टन तेल मिळेल. गुजरातमधील खंबायत व अंकलेश्वर भागांत तेल आहे. खंबायत विभागात ३ कोटी टन तेल असावे व दरवर्षी १५ लाख टन काढता यावे असा अंदाज आहे. यांशिवाय मुंबईजवळील ‘बॉम्बे हाय’ या नावाने ओळखण्यात येणाऱ्या समुद्रातील भागात १९७४–७५ मध्ये पाच विहिरी खोदण्यात आल्या असून त्यांतून १९७६ सालापासून प्रत्यक्ष तेल उत्पादन करण्याची योजना आखण्यात आलेली आहे. तसेच पूर्व किनाऱ्यावर तेलक्षेत्रे शोधण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न चालू आहेत. भारतातील तेलाची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे व देशातील उत्पादन अपुरे पडत असल्यामुळे १९६२ मध्ये ९६ कोटी, १९६३ मध्ये ८३ कोटी, तर १९६४ साली १०४·५ कोटी रुपयांचे तेल आयात करण्यात आले.

स्त्रोत : मराठी विश्वकोश(महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ)

अंतिम सुधारित : 6/11/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate