অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

खनिज तेलाच्या नैसर्गिक साठ्यातून तेलप्राप्ती

खनिज तेल मिळविण्यासाठी

खनिज तेल मिळविण्यासाठी विहीर खणून पूर्ण झाल्यावर तिच्यात असणारे खडक उघडे पडतात. या खडकांच्या काही थरांत भूमिजल, काहींत खनिज तेल व काहींत नैसर्गिक वायू असतो; तर काहींत खनिज तेल व वायू ही दोन्ही असतात. विहिरीतून तेलाचे उत्पादन सुरू करण्यापूर्वी भूमिजल असणारे थर झाकावे लागतात. नाही तर विहिरीत तेल व पाणी यांचे मिश्रण होते. केवळ तेलाचेच उत्पादन करता यावे आणि विहीर मजबून व्हावी म्हणून विहिरीत तिच्या व्यासापेक्षा थोडा कमी व्यास असलेले धातूचे एक नळकांडे बसवितात. त्यास कवच असे म्हणतात. कवचाची लांबी किती असावी हे आशय शैलाच्या खोलीवर अवलंबून असते.कवच म्हणून वापरण्यात येणारे धातूचे नळकांडे भूपृष्ठावरून प्रथम विहिरीत खाली सोडतात व नंतर ते सिमेंटने पक्के बसवितात. या कामास कवचाचे संयोजनीकरण म्हणतात. हे काम विशिष्ट प्रकारानेच करावे लागते. सिमेंट, पाणी व काही रसायने यांचे पातळ मिश्रण कवचामधील पोकळीतून पंपाच्या साहाय्याने खाली ढकलण्यात येते. कवचाच्या तळाशी उघडे भोक असते. त्यातून हे मिश्रण बाहेर पडून कवच व विहिरीची भिंत यांमधील कंकणाकृती रिकाम्या जागेत ढकलले जाते. या कामामध्ये वापरले जाणारे सिमेंटचे मिश्रण सु. अर्ध्या-पाऊण तासात घट्ट होते म्हणून संयोजनीकरणाचे संपूर्ण काम या कालावधीतच उरकावे लागते. नाही तर सिमेंट कवचामध्ये ठिकठिकाणी घट्ट होऊन उत्पादनाच्या कामात अडथळे निर्माण होतात. संयोजनीकरण योग्य रीतीने झाल्याची खात्री केल्यानंतरच आशय शैलाच्या समोर असणाऱ्या कवचाच्या भागातून कवचास व आशय शैलास भोके पाडण्यात येतात. यासाठी सुरुंगाची दारू भरलेली बंदूक छिद्रणाच्या चिखलाने भरलेल्या विहिरीत तारेच्या साहाय्याने सोडतात. बंदूक विहिरीत ठराविक खोल जागी म्हणजे आशय शैलासमोर पोहोचल्यावर पृष्ठभागावर असलेली कळ दाबून तिच्यातील गोळ्या झाडतात. या गोळ्या कवचाला भोके पाडून आशय शैलात घुसतात. त्यामुळे आशय शैलास भोके पडून त्यातून खनिज तेलास व नैसर्गिक वायूस बाहेर पडण्यास मार्ग तयार होतो. या कार्यास रंध्रीकरण म्हणतात. कवच विहिरीत बसविणे, कवचाचे संयोजनीकरण आणि रंध्रीकरण ही तिन्ही कामे निर्दोष झाली, तरच विहिरीतून खनिज तेलाचे उत्पादन अडथळे न येता व समाधानकारक होऊ शकते.

खनिज तेलाचे उत्पादन

यानंतरचा टप्पा म्हणजे खनिज तेलाचे उत्पादन सुरू करणे हा होय.खनिज तेलाचे साठे भूमिगत जागी सापळ्यात कोंडलेल्या स्थितीत व मोठ्या दाबाने युक्त असे असतात. या अवस्थेतील दाबास मूळ संचय दाब असे म्हणतात. हा दाब पुढील कारणांनी निर्माण होतो.

(१) तेलाबरोबर साठ्यात कोंडून असणाऱ्या वायूमुळे. दाबामुळे नैसर्गिक वायू एकतर तेलात विरघळलेला असतो किंवा वायुरूपात स्वतंत्रपणे तेलाच्या पृष्ठभागावर साचलेला असतो वा तेलात विरघळलेला व स्वतंत्र वायुरूपात अशा दोन्ही प्रकारचा असतो. तेलाच्या वर वायू साचून त्याचे आवरण तयार झालेले असल्यास त्यास वायूची टोपी असे म्हणतात. (२) मूळ दाब तैलाशयाच्या तळावर व बाजूंवर असलेल्या पाण्यामुळेही असतो किंवा (३) तो वायू व पाणी या दोहोंमुळे तयार झालेला असतो. मूळ संचय दाब सामान्यत: वातावरणाच्या दाबापेक्षा बराच जास्त असतो. तेल व वायू यांचे मिश्रण साठ्यात असल्यास दाबामुळे काही वायू तेलात विरघळतो. अशा साठ्यात विहीर खणल्यावर त्यास असणाऱ्या द्रायूंना प्रसरण पावण्यास जागा मिळते व ते प्रसरण पावताच त्यांच्यावरील दाब कमी होतो. अशा वेळी ज्याप्रमाणे वायुयुक्त पेयाच्या बाटलीचे झाकण काढल्यावर पेयातील विरघळलेला वायू फसफसून बाहेर येतो त्याप्रमाणे विहिरीतून तेल जेव्हा भूपृष्ठाकडे वर वर येऊ लागते तेव्हा त्यात विरघळलेला नैसर्गिक वायू वेगळा होतो. संचयातील मूळ दाब भरपूर असल्यासच विहीर खणल्यावर तेल आपोआप वर येते. केवळ मूळ दाबाच्या बळावर तेलाचे बरेच उत्पादन झाल्याची उदाहरणे आहेत. निव्वळ मूळ दाबाच्या बळावर तेलाचे उत्पादन करण्याच्या पद्धतीला तेलप्राप्तीची प्राथमिक पद्धत असे म्हणतात. मात्र एकदा का संचयातील मूळ दाब ठराविक मर्यादेच्या खाली गेला म्हणजे उरलेले तेल आपोआप वर येऊ शकत नाही. हा दाब टिकवून धरण्यासाठी तेलाच्या उत्पादनाच्या गतीवर तसेच तेल बाहेर काढण्याच्या पद्धतीवर योग्य असे नियंत्रण ठेवावे लागते. तेल योग्य अशा संथ गतीने बाहेर काढले, तर खडकातील आजूबाजूच्या पोकळ्यांत असणाऱ्या पाण्यास तेल बाहेर पडल्यामुळे रिकाम्या झालेल्या जागांत वाहत येऊन पडण्यास वेळ मिळतो व पोकळी भरून निघाल्यामुळे दाब पूर्ववत होतो.

तेलाच्या साठ्यातील मूळ दाब हा साठ्यातून तेल भूपृष्ठावर बाहेर काढण्यासाठी लागणारी ऊर्जा असल्यामुळे तेलाची विहीर एकदा उत्पादन करण्यासाठी तयार झाली म्हणजे हा दाब अगदी शेवटपर्यंत त्यात काहीही घट पडू न देता जसाचा तसा कायम राखणे, ही सर्वांत महत्त्वाची व अत्यंत आवश्यक गोष्ट असते.हा दाब कमी होऊ देऊन तो कमी झाल्यावर इतर काही व्यवस्था करून परत पूर्वीइतका प्रस्थापित करण्यापेक्षा तो नेहमी जसाच्या तसा टिकवून धरण्याची व्यवस्था करणे अधिक फायद्याचे व योग्य असते. योग्य अशा संथ गतीने तेल बाहेर काढूनसुद्धा प्राथमिक तेलप्राप्तीच्या पद्धतीने जर मूळ दाब कमी कमी होत असेल, तर बाहेरून ऊर्जा पुरवून उत्पादन करावे लागते. या क्रियेस द्वितीयक तेलप्राप्ती असे म्हणतात. द्वितीयक तेलप्राप्तीच्या पद्धतींमध्ये प्राथमिक ऊर्जेला जोड देण्यासाठी दाबाखाली असणारा वायू किंवा पाणी तेलाच्या नैसर्गिक साठ्यात पंपाच्या साहाय्याने ढकलतात. दाबयुक्त अंत:क्षेपित (आत सोडलेला) द्रायू तेलाच्या साठ्यात उरलेले तेल उत्पादक विहिरीमध्ये ढकलतात.अगदी अलीकडील तंत्राप्रमाणे साठ्यात असणाऱ्या मूळच्या ऊर्जेला कधीच कमी न होऊ देता सुरुवातीपासून बाहेरील ऊर्जेची जोड देऊन तिची पातळी कायम ठेवण्यात येते. म्हणजेच प्राथमिक व द्वितीयक तेलप्राप्तीच्या पद्धती सुरुवातीपासूनच एकत्र करून वापरतात. मात्र पूर्वी द्वितीयक ऊर्जा पुरविली न गेल्यामुळे ज्यातील मूळची ऊर्जा केव्हाच कमी होऊन गेली आहे, असे कित्येक साठे आजही आहेत. अशा व्यय पावलेल्या साठ्यांच्या विकासासाठी द्वितीयक तेलप्राप्तीच्या पद्धतीच वापराव्या लागतात.

तेलप्राप्तीची द्वितीयक पद्धती

तेलप्राप्तीच्या द्वितीयक पद्धतींमध्ये बाहेरून वायू किंवा पाणी किती प्रमाणात व किती दाबाने पुरवायचे हे ठरविण्यासाठी विहिरीतील द्रायूंचे रासायनिक संघटन, त्यांची श्यानता, नैसर्गिक दाब व तापमान, खडकांमधील त्यांच्या वाटपाचा प्रकार; तेल, वायू व पाणी यांची खडकांतील सापेक्ष पार्यता तसेच या तिन्हींची सापेक्ष श्यानता इत्यादींबद्दल माहिती असणे आवश्यक असते. तेलप्राप्तीची अगदी सर्वसामान्य द्वितीयक पद्धत म्हणजे तैलाशयाच्या खडकांत पंपाच्या साहाय्याने दाबाने पाणी ढकलणे व पाण्याचा पूर निर्माण करणे ही होय. या कामासाठी वापरण्यात येणारे पाणी शुद्ध व निर्मळ असावे लागते कारण त्यात काही अम्ले वगैरे असली, तर अविद्राव्य पदार्थाचे अवक्षेपण (साका तयार होणे) होते. छिद्रणासाठी वापरलेली बेंटोनाइट मृत्तिका फुगते व फुगून हलकी झाल्यामुळे ती इकडे तिकडे वाटेल तशी वाहत जाऊन आशय शैलातील छिद्रांत अडकून बसते आणि त्यामुळे तेलाच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो. तसेच पाण्यामध्ये सूक्ष्मजंतू असणे देखील अनिष्ट असते. पाण्यामध्ये इतर काही योग्य असे संभाव्य कारक वापरून तेलप्राप्तीत सुधारणा करण्याचे प्रयत्न करण्यात आले, पण त्यांना यश आले नाही. पाण्यात विरघळणारे व विशेषत: आयनरहित (विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट नसलेले) अपक्षालक (ज्यात घन पदार्थ विरघळवून वेगळे करता येतो असा द्रव) वापरल्यावर मात्र तेलप्राप्तीत सुधारणा झाल्याचे समजते. वायूचे अंत:क्षेपण करून द्वितीयक पद्धतीने तेलप्राप्ती करताना सामान्यत: ज्यातून द्रवरूप हायड्रोकार्बन बाहेर काढून घेतलेले असतात, तो साठ्यातूनच बाहेर आलेला वायू परत वापरतात. या प्रकाराला पुनरावर्तनाची पद्धत म्हणतात.

अगदी अलीकडच्या काळात मोठ्या दाबाखाली व उच्च तापमानास असलेल्या बऱ्याच खोल थरांपर्यंत विहिरी खणल्या गेल्यामुळे काही विशेष भौतिक गुणधर्म असलेल्या अवस्थेतील तेलाचे साठे सापडले आहेत. अशा साठ्यांतून केवळ एकाच प्रावस्थेत असणारा द्रायू बाहेर काढणे शक्य होते. या प्रावस्थेमध्ये सामान्यत: वायुरूप असणाऱ्या हायड्रोकार्बनांचे प्रमाण उच्च असते व फार हलके असणारे कच्चे तेल अगदी कमी प्रमाणात असते. असे कच्चे तेल सु. दीड हजार लिटरांपेक्षा एक लिटर या प्रमाणात असते.या प्रावस्थेतील वायू हा सामान्य वायूच्या टोपीहून भिन्न प्रकारचा असतो कारण वायुरूप प्रावस्थेतील हलके कच्चे तेल प्रावस्थेतील दाब कमी होताच संद्रवण (द्रवात रूपांतर) होऊन मिळते. ही क्रिया वाफ व वायू यांच्या समांग (एकजिनसी) मिश्रणातून द्रव मिळविण्याच्या नेहमीच्या पद्धतीहून भिन्न प्रकारची म्हणजे उलट्या प्रकारची असते. वाफ व वायू यांच्या समांग मिश्रणातून द्रव मिळविण्याकरिता दाब वाढवावा लागतो. ज्या साठ्यांतून वायू बाहेर काढल्यावर दाब कमी झाल्यामुळे त्यातील हलके तेल संद्रवण होऊन द्रवरूपात मिळते, त्यांना संद्रावित साठे म्हणतात. काही खोल विहिरींत खनिज तेल वरच्या बाजूस असणाऱ्या वायूच्या टोपीखाली आणि इतक्या उच्च दाब व तापमानास असते की, वायूच्या टोपीवरील दाब कमी केला असता द्रवरूप हायड्रोकार्बनांचे संघनन (घनरूपात रूपांतर) होते. दुसऱ्या काही साठ्यांमध्ये वायूच्या टोप्या तेलापासून अगदी वेगळ्या झालेल्या स्वतंत्र अशा असतात, तर काही साठे हलक्या कच्च्या तेलाचे बाष्पीभवन होऊन अगदी अनपेक्षित रीतीने पूर्णपणे वायुरूप हायड्रोकार्बनांनी भरलले असतात. या सर्व प्रकारांमध्ये एक परिस्थिती समाईक असते, ती म्हणजे उच्च दाब व तापमान ही होय. तिच्यामुळे केवळ एकच प्रावस्था निर्माण होऊ शकते. या प्रावस्थेत दाब कमी झाला असताना द्रवरूप होणारी व सामान्यत: बाष्पनशील नसलेली हायड्रोकार्बने असतात. या परिस्थितीत दाब कमी झाल्यामुळे संद्रवण होत असल्यामुळे उत्पादन चालू असताना दाब कायम टिकवून धरणे महत्त्वाचे व अगदी आवश्यक असते. यासाठी वर वर्णन केलेली वायूच्या पुनरावर्तनाची पद्धती वापरतात.

एखाद्या साठ्यात जर मेणयुक्त खनिज तेल असेल, तर विहिरीतून ते बाहेर काढले जात असताना मेणाच्या निक्षेपणामुळे (साचण्यामुळे) विहिरीचे नळ तुंबण्याची शक्यता असते. अशा तेलातील हलक्या घटकांचे बाष्पीभवन होऊन उरलेल्या मेणयुक्त घटकांचे तेलातील प्रमाण वाढल्यामुळे तसेच बाष्पीभवन होताना तापमान कमी होण्यामुळे मेणाचे अवक्षेपण होते.तेलामध्ये असणारा गाळ व त्यात तरंगत असणारे इतर घन पदार्थ निक्षेपित होणाऱ्या मेणाबरोबर बाहेर पडतात. तसेच या निक्षेपात रेझिनयुक्त व अस्फाल्टी पदार्थही बरेच असण्याची शक्यता असते. अशा रीतीने निक्षेपित झालेले मेण खरडून काढणे, विद्रावक वापरून ते विरघळवून अथवा उष्णतेचा उपयोग करून वितळवून बाजूला करणे हे उपाय तुंबलेल्या विहिरी मोकळ्या करण्यासाठी करतात. तेलातील मेणाचे प्रमाण निरनिराळ्या ठिकाणी भिन्न असल्यामुळे विहिरी तुंबण्याचा अडथळा काहींमध्ये फार मोठा व गंभीर स्वरूपाचा असतो, तर काहींत तो अजिबात नसतो.

दाब, तापमान व रासायनिक संघटन यांची अगदी योग्य अशी मोक्याची परिस्थिती असताना सामान्यत: निर्माण होणारा अडथळा हा हायड्रोकार्बनांच्या हायड्रेटांमुळे होतो. हायड्रोकार्बनांची हायड्रेटे ही पाणी व ब्युटेनापर्यंत असणारी खालची पॅराफिने यांच्या मधल्या अवस्थेत आणि जालकासारखी असणारी जटिल (गुंतागुंतीची) संयुगे असतात.ती कमी तापमानास आणि उच्च दाबास स्थिर असतात. निर्जलीकरण, खालच्या गटातील अल्कोहॉलांसारख्या पदार्थांचे अंत:क्षेपण किंवा ती गोळा होण्याच्या जागी त्यांना तापविणे या क्रिया हायड्रोकार्बनांच्या हायड्रेटांचा अडथळा दूर करण्यासाठी करतात.

काही जड व अतिशय श्यान खनिज तेले, तसेच तेलाचा बराच भाग काढून घेतल्यावर साठ्यात खाली उरलेला तेलाचा भाग मिळविण्यासाठी उष्णतेचा उपयोग करतात.साठ्यात असणाऱ्या तेलाचाच काही भाग जागोजागी जाळतात. त्यामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे तेलाची श्यानता कमी होऊन ते वाहू लागते. उत्पादन होत असलेल्या विहिरीकडे हळूहळू प्रगत होत जाणारी जळणारी उष्णतेची लाट कायम राखण्यासाठी काही विहिरींत सतत ऑक्सिजन किंवा हवा आत भरत राहतात. विहिरीत असणाऱ्या तेलाच्या १५ टक्क्यांपेक्षा कमी तेल या कामासाठी जाळले, तरी उरलेल्या तेलाचे उत्पादन करण्यास ते पुरेसे होते.

द्वितीयक तेलप्राप्तीच्या पद्धती सुरुवातीला अमेरिकेतील जुन्या व उथळ अशा अ‍ॅपालॅचियन तेलाच्या साठ्यासाठी वापरण्यात आल्या, नंतर त्या सर्व जगभर वापरण्यात येऊ लागल्या त्यामुळे काही विहिरींचे आयुष्य दुप्पट झाले. विहिरी खोल असल्यास द्वितीयक तेलप्राप्तीचे तंत्र प्राथमिक तंत्राशी जोडून वापरतात. जर अगोदरच दाब कमी झालेल्या विहिरी असतील, तर सु.१,००० मी. खोलीपर्यंतच्या विहिरींसाठीच द्वितीयक तेलप्राप्तीचे तंत्र वापरणे आर्थिक दृष्ट्या योग्य असते.

या पद्धतीने तेल मिळविण्यासाठी अंत:क्षेपक व उत्पादक अशा दोन प्रकारच्या विहिरी लागतात. या विहिरींची कुठे आणि कशा प्रकारची मांडणी असावी यासाठी प्रमाणभूत अशा रचना आहेत. ठराविक प्रकारांनी विहिरींची मांडणी केल्यामुळे एखाद्या तेलक्षेत्राचा विस्तृतपणे आणि संपूर्ण विकास करता येतो. तसेच साठ्याच्या सर्व भागांत अंत:क्षेपित वायू वा पाणी जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचविता येतात. हे तंत्र सुरुवातीला वापरले गेले तेव्हा एकाच अंत:क्षेपक विहिरीच्या सभोवार अनेक उत्पादक विहिरी असत. अशा प्रकारची विहिरींची वर्तुळाकार रचना, सामान्यत: जेथे वायू अंत:क्षेपित करतात, तेथे वापरण्यात येते. दुसऱ्या प्रकारच्या मांडणीत उत्पादक विहिरी एका रेषेत आणि शेजारी असणाऱ्या दुसऱ्या रेषेत अंत:क्षेपक विहिरी खणतात.अगदी सामान्य प्रचारात असणारी मांडणी पाच पाच विहिरींची असते. प्रत्येक चौरसाच्या कोपऱ्यांवर अंत:क्षेपणाच्या व उत्पादनाच्या विहिरी असतात म्हणजेच या विहिरी अशा रीतीने खणलेल्या असतात की, काही चौरसांच्या कोपऱ्यांवर अंत:क्षेपक विहिरी आणि त्यांच्या मध्यावर उत्पादक विहिरी, तसेच काही चौरसांच्या कोपऱ्यांवर उत्पादक विहिरी तर त्यांच्या मध्यावर अंत:क्षेपक विहिरी असतात. दुसऱ्या प्रकारची मांडणी सात सात विहिरींची असते. तिच्यामध्ये षट्‌कोणाच्या कोपऱ्यांवर अंत:क्षेपक विहिरी व मध्यावर उत्पादक विहीर असते.सात विहिरींच्या मांडणीतील उत्पादक व अंत:क्षेपक विहिरींची अदलाबदल करून चार बिंदूंची मांडणी तयार होते. नऊ बिंदूंची मांडणी म्हणजे पाच बिंदूंच्या मांडणीसारखी असते. मात्र चौरसांच्या कडांवर, चौरसांच्या कोपऱ्यांवर असणाऱ्या अंत:क्षेपक विहिरींच्या मध्यावर आणखी एक एक अंत:क्षेपक विहीर खणतात. अंत:क्षेपक आणि उत्पादक विहिरींत किती अंतर ठेवावे, हे साठ्याच्या स्थानिक गुणधर्मांवर व आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असते.सु.अर्ध्या हेक्टरामध्ये एक ते चाळीस विहिरी असू शकतात. प्रत्येक अंत:क्षेपक विहीर किती वायू किंवा पाणी हाताळणार आहे हे माहीत असणे, हे द्वितीयक तेलप्राप्तीचा प्रकल्प ठरविण्यासाठी महत्त्वाचे असते.तैलाशयाची पार्यता साठ्यातील तेलाची श्यानता, साठ्यातील किती पोकळी तेलाने भरलेली आहे, आशय शैलाची जाडी, साठ्यातील मूळ दाब व पृष्ठभागावर पडत असणारा दाब यांवर प्रत्येक विहीर किती वायू अथवा पाणी हाताळू शकेल, हे अवलंबून असते.अंकलेश्वर व दिग्बोई क्षेत्रांत तेलाच्या उत्पादनासाठी अनुक्रमे जल अंत:क्षेपण आणि वायू अंत:क्षेपण या पद्धतींचा उपयोग करण्यात येत आहे. कित्येकदा पाणी किंवा वायू यांचे अंत:क्षेपण करूनही तेलाच्या उत्पादनात सुधारणा होत नाही. अशा वेळी विहिरीवर पंप बसवून तेल उपसून बाहेर काढतात. ही पद्धत अमेरिकेत बऱ्याच ठिकाणी वापरात आहे, परंतु ती महाग असल्यामुळे कित्येकदा फायदेशीर ठरत नाही. वरील सर्व पद्धती वापरूनसुद्धा उत्पादनात सुधारणा झाली नाही, तर काही क्षेत्रांत खाणकाम करून तेल बाहेर काढतात.द्वितीयक तेलप्राप्तीच्या पद्धती वापरल्यामुळे दिग्बोई तेलक्षेत्रात उत्पादन सुरू होऊन शंभर वर्षे उलटून गेली, तरीही अद्याप अल्प प्रमाणात उत्पादन चालू आहे.

विहिरी खणून झाल्यानंतरचा टप्पा म्हणजे प्रत्यक्ष उत्पादनाची सुरुवात हा होय.रंध्रित विहिरीत सु.६ सेमीं.व्यासाची नळी सोडतात व तिच्यातून पंपाने पाणी सोडतात.यामुळे विहिरीत असलेला चिखल बाहेर पडतो.त्यामुळे रंध्रित खडकांच्याजवळ दाब कमी होतो व खनिज तेल बाहेर पडू लागते. या क्रियेस विस्थापन असे म्हणतात. विस्थापन करूनसुद्धा विहिरीतून तेलाचा प्रवाह सुरू झाला नाही, तर विहिरीचे उद्दीपन करावे लागते. उद्दीपनाचे वातन (हवा भरणे), डीझेलाचे अंत:क्षेपण, अम्लीकरण, जलभंजन (पाण्याने विभाजन करणे), वालुकाभंजन, (सुरुंगाचा) स्फोट करणे इ. अनेक प्रकार असून त्यांचा प्रमुख उद्देश आशय शैलांची पार्यता वाढवून त्यांतून वाहणाऱ्या तेलाच्या प्रवाहात सुधारणा करणे हा असतो. उद्दीपित विहिरीतून तेल व वायू यांचे मिश्रण वाहू लागते. हा प्रवाह प्रथम अनियमित असतो व पुढे काही वेळाने नियमित व एकसारखा असा स्थिर होतो. विहिरीच्या तोंडाजवळ दाबमापक बसविलेले असतात. त्यावरून दाब व अर्थातच तेलाचा प्रवाह नियमित व स्थिर आहे किंवा नाही ते समजते. भूपृष्ठावर वायू व तेल यांच्या मिश्रणातून पृथ:कारकाच्या साहाय्याने तेल वेगळे करण्यात येते. तेल टाक्यांत साठविले जाते व वायू कित्येक ठिकाणी पेटविण्यात येतो. तेल व वायूचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी विहिरीवर अनेक झडपा बसविलेल्या असतात.विहिरीतून बाहेर पडणाऱ्या तेल व वायू यांची स्वतंत्र मोजणी करण्यात येते आणि त्यावरून विहिरीची उत्पादनक्षमता ठरविण्यात येते.याबरोबर दाबावरही लक्ष ठेवणे आवश्यक असते. कारण विहिरीतील दाब व भूपृष्ठाखालील तेलाचा एकूण साठा म्हणजे त्याचे घनफळ यांचा परस्पर संबंध असतो. विहिरीतून बराच काळ तेलाचे उत्पादन केल्यानंतरही दाबात फारसा फरक पडला नाही, तर तेलाचा साठा मोठा आहे आणि याउलट उत्पादन होत असताना तेलाचा दाब झपाट्याने कमी होऊ लागला, तर भूपृष्ठाखालील तेलाचा साठा मर्यादित स्वरूपाचा आहे, असे सामान्यत: अनुमान काढण्यात येते.दाब कमी पडू न देण्यासाठी अर्थातच द्वितीयक तेलप्राप्तीच्या पद्धती वापरतात.

लेखक : र.पां.आगस्ते ; दि.रा.गाडेकर ; चं.स.टोणगावकर ;अ.ना.ठाकूर ; र.वि.जोशी, ;ह.कृ.जोशी

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate