অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विजेची बचत काळाची गरज

विजेची बचत काळाची गरज

आजच्या आधुनिक युगात विजेचा वापर हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. तसेच लोकसंख्या वाढीचे प्रमाण जास्त असल्यामुळे आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक व्यक्तिच्या मागे किती वीज वापर लागतो याचा अंदाज आजपर्यंत आपण काढू शकलेलो नाही. तसेच वरील अनुषंगाने आपण विजेच्या निर्मितीचे स्त्रोत आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात वापरू शकलो नाही. कारण विजेचे स्त्रोत हे काही नैसर्गिकरित्या मुबलक प्रमाणात मोफत मिळतात. जसे सूर्यप्रकाश, पाणी, वारा, समुद्री लाटा यापैकी सूर्यप्रकाशाची ऊर्जा विद्युत उर्जेमध्ये रूपांतर करताना मोठ्या प्रमाणात पैसा व तांत्रिकदृष्ट्या अडचणी निर्माण होतात.


वारा व समुद्री लाटा यांचे रूपांतर विद्युत उर्जेमध्ये करत असताना भौगोलिक अडचणी असतात. कारण ही गोष्ट प्रत्येक ठिकाणी मुबलक प्रमाणात मिळत नाही. पाण्याचा विचार केला असता. आजपर्यंत आपण फक्त काही प्रमाणात धरणे बांधून त्या पाण्यापासून विजेचे निर्माण करीत आहोत. ज्या ऊर्जा आपल्याला मोफत मिळतात त्याचा उपयोग विजेचे रूपांतर करण्यासाठी आजपर्यंत फक्त तीन ते पाच टक्के आपण उपयोग करून घेतलेला आहे. कृत्रिमरित्या वीज निर्मिती आपण कोळसा व रासायनिक स्त्रोतापासून तयार करून विजेचा वापर करतो. परंतु भौगोलिक पाहणीनुसार आपल्या देशातला कोळसा समोर अंदाजे 40 ते 50 वर्ष पुरतील या प्रमाणात साठा आहे असे लक्षात येते. तसेच कोळश्यापासून विजेचे निर्माण करताना क्षमता 29 ते 30 टक्के आहे. तसेच रासायनिक स्त्रोताचा विचार केला असता आपल्या देशामध्ये रासायनिक स्त्रोत हे दुसऱ्या देशापासून घ्यावे लागतात. तसेच तंत्रज्ञानसुद्धा बाहेर देशाचे वापरणे हे मानवीदृष्ट्या योग्य आहे असे लक्षात येते. कोळसा आणि रासायनिक स्त्रोत या दोन्ही गोष्टींचा वापर करून आज आपण आपल्या वापरात असलेली जवळपास 65 ते 70 टक्के वीज निर्माण करतो.

वरील सर्व बाबींचा विचार करताना असे लक्षात येते की, आजपासूनच आपण विजेची बचत करणे आवश्यक आहे. आज प्रत्येक व्यक्तिला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेतसुद्धा विजेची आवश्यकता असते व समोरच्या दृष्टीने विचार केला असता आपल्या देशातील विजेचे स्त्रोत व लागणारी वीज यामध्ये समोरच्या 25 वर्षांनंतर फार तफावत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने आजपासूनच विजेची बचत करणे हे अत्यंत आवश्यक व काळाची गरज आहे.

वरील बाब लक्षात घेवून केंद्रीय ऊर्जा विभागाने विजेची बचत करण्यासाठी उच्चतम तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येकानी करावा. त्यासाठी नवीन तंत्रज्ञानानुसार ट्युबलाईटच्याऐवजी सी.एफ.एल. व आता नंतर एल.ई.डी. लाईटचा वापर करावा. जेणेकरून विजेची बचत होईल. कारण एल.ई.डी. बल्बचा प्रकाश विस्तारण क्षमता ही प्रत्येक व्हॅटच्या प्रमाणात उत्सर्जित करते. तसेच प्रत्येक व्हॅटला लागणारा विद्युत प्रवाह दोन्ही गोष्टीच्या (सी.एफ.एल. आणि ट्युब लाईट) प्रमाणात फारच कमी लागते. त्यामुळे वीज वितरण क्षमता कमी होईल व प्रत्येकाला वीज बिलामध्येही फायदा होईल. त्याचप्रमाणे महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाद्वारेही नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या उर्जेचा वापर करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करीत आहे. त्यांच्या योजनेद्वारे लोकांना सूर्यप्रकाशाची ऊर्जा आपण दैनंदिन वापरात कशाप्रकारे करता येईल याची जाणीव लोकांना करून देते.

त्यामध्ये सौरऊर्जा लाईट तसेच सौरऊर्जा हिटरचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनात केल्यास आपण जागरूक नागरिक म्हणून आपल्या देशाला वीज बचत करण्यासाठी अप्रत्यक्षरित्या मदत करू शकतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या दैनंदिन वापरात लागणाऱ्या विजेच्या वस्तुंचा सदुपयोग आवश्यकतेनुसार करून घेतल्यास वीज बचत करू शकतो. कारण आवश्यकता नसल्यास ताबडतोब वीज उपकरणे फॅन, लाईट बंद करून घेणे. तसेच ए.सी. चा वापरही इकॉनॉमिक मोडमध्ये केल्यास वीज बचत होईल व त्याचबरोबर क्लोरोफ्लोरो कार्बनसुद्धा कमी प्रमाणात उत्सर्जित होईल. त्यामुळे पृथ्वीच्या परिमंडलामधील जी ओझोन लेअर कमी होत आहे, ती कमी प्रमाणात होईल.

तसेच नैसर्गिक सूर्यप्रकाशाचा वापर आपल्या दैनंदिन घरगुती व कार्यालयामध्ये करून घेतल्यास लागणारी वीज ही कमी होऊ शकते.

सी.एफ.एल. व सौरउर्जेचा वापर प्रत्येकाने काळाची गरज ओळखून दैनंदिन जीवनात वापर करण्यास सुरूवात केली तर देशातील वीज वितरण क्षमता काही प्रमाणात कमी होईल. त्याचबरोबर वीज वितरणमध्ये भार कमी झाल्यामुळे वीजहानीसुद्धा आपण अप्रत्यक्षरित्या कमी करू शकतो व ही वाचणारी वीज आपल्या पुढील आयुष्यात उपयोगी पडू शकते.

लेखक - प्रशांतकुमार विठ्ठलराव ढवस,
सहाय्यक अभियंता, श्रेणी-२

 

माहिती स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 4/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate