पर्यावरणात कोणकोणते बदल होतात यांचे मापन ज्या घटकांवरून किंवा घटनांवरून केले जाते, त्यांना पर्यावरणीय दर्शके म्हणतात. पर्यावरण हे अतिशय गुंतागुंतीचे असल्याने पर्यावरणाच्या स्थितीचा मागोवा घेताना पर्यावरणातील प्रत्येक चलासंबंधी बारीकसारीक माहिती नोंदवून ठेवण्याऐवजी दर्शक ही सोपी, व्यावहारिक आणि कमी खर्चिक पद्धत आहे. उदा., ओझोनाचा थर कमी झाल्यामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करताना, पर्यावरणात ज्या पदार्थांमुळे ओझोन कमी होतो त्या पदार्थांचे कालानुरूप वाढलेले प्रमाण हे एका दर्शकासारखे असते. पर्यावरण स्थिती दर्शविण्यासाठी अनेक दर्शकांचा वापर केला जातो.
हवा, पाणी, भूमी आणि पारिस्थितिकी प्रणाली यांची स्थिती आणि गुणवत्ता यांत झालेले बदल दर्शविण्यासाठी पर्यावरण दर्शके विकसित व प्रमाणित केले जातात. ही दर्शके विशिष्ट कालातील व क्षेत्रातील पर्यावरण घटकांच्या संख्यात्मक अथवा सांख्यिकी मापनावर आधारित असतात. त्यामुळे ती विज्ञाननिष्ठ असतात. पर्यावरण दर्शकांचा सर्वमान्य किंवा सर्वव्यापी असा संच आढळत नाही. तथापि, अनेक दर्शकांच्या संचांत साम्य आढळते. बहुतांश दर्शके विशिष्ट गरजेनुसार आणि विशिष्ट हेतूनुसार विकसित केलेली असतात. पर्यावरण दर्शकांचे काही प्रमुख संच आहेत.
हा एक संच आहे. यात भौतिक, जैविक आणि रासायनिक मापनांचा समावेश होतो. यात पर्यावरण स्थिती व पर्यावरण अवस्था यांवर भर दिलेला असतो. ही दर्शके वर्णनात्मक दर्शके किंवा पर्यावरण स्थिती दर्शके म्हणूनही ओळखली जातात.
शाश्वत विकासाशी संबंधित घटकांनुसार दर्शके पर्यावरणीय व सामाजिक स्थिती, आर्थिक एकात्मता तसेच आरोग्य या संदर्भात असून सामाजिक शाश्वततेशी निगडित असतात. शाश्वत समाजासाठी या दर्शकांचा उपयोग शासन, अशासकीय संस्था, समाजगट व संशोधन संस्था यांच्याकडून केला जातो. पर्यावरण उद्दिष्टांची पूर्तता होते किंवा नाही, हे तपासण्यासाठी शाश्वतता दर्शके उपयुक्त ठरतात.
हा संचही महत्त्वाचा आहे. व्यापारी, शासकीय संस्था व अशासकीय संघटना या दर्शकांचा उपयोग करतात. पर्यावरणविषयक समस्या निर्मूलनासाठी काही ध्येये व साध्ये ठरविलेली असतात. त्या अनुषंगाने प्रत्यक्ष कार्य करणे व योजनांची वा प्रकल्पांची योग्य अंमलबजावणी करणे यांसाठी कार्यमान दर्शके उपयोगी पडतात.
पर्यावरण दर्शकांचा वापर करणाऱ्यांचे प्रामुख्याने तीन वर्ग केले जातात. पहिला वर्ग हा तंत्रज्ञ, वैज्ञानिक आणि संशोधकांचा आहे. दुसऱ्या वर्गात धोरण ठरविणारे योजनाकार, प्रकल्पक, निर्णय घेणारे व संसाधन व्यवस्थापक यांचा समावेश होतो, तर तिसरा वर्ग हा सर्वसामान्य नागरिक आणि प्रसारमाध्यमे यांचा आहे. पर्यावरण दर्शकांचा वापर स्वतंत्रपणे एखादी विशिष्ट घटना आकलन सहजपणे व संक्षिप्तपणे होण्याकरिता तसेच पर्यावरणाच्या संकीर्ण माहितीचा आराखडा सादर करण्यासाठी होतो. विशिष्ट परिसंस्थेच्या अंतर्गत माहितीसाठीसुद्धा पर्यावरण दर्शके विकसित करता येतात.
भारतात सर्व राज्यांसाठी पर्यावरण शाश्वतता दर्शकांक तयार केले गेले असून त्यासाठी पुढील दर्शके विचारात घेतली आहेत : लोकसंख्या, हवेची गुणवत्ता व प्रदूषण, पाण्याची गुणवत्ता व उपलब्धता, भूमिवापर व शेती, वने व जैवविविधता, ऊर्जा व्यवस्थापन, पर्यावरण अंदाजपत्रक, अपशिष्टांची निर्मिती, मानवी आरोग्य व आपत्ती प्रभाव इत्यादी. या दर्शकांनुसार सर्व राज्यांची क्रमवारी केली गेली आहे.
लेखक : जयकुमार मगर
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/21/2020
औद्योगिक वातावरणविज्ञान हि वातावरण विज्ञानाची एक श...
बेभरवशाचा नि बेमोसमी पाऊस... पर्यावरणाचा बिघडत चाल...
जगातलं अर्धं कार्बन उत्सर्जन हे आजच्या औद्योगिक शे...
जलस्वराज्य आणि इतर वन्यप्राण्यांचा वाटा काढणारे र...