घायपात ही वनस्पती एकदलिकित वनस्पतींपैकी लिलिएलीझ गणातील,ॲमारिलिडेसी कुलातील व अगेव्ह वंशातील आहे. या वंशातील वनस्पती इंग्रजी भाषेत ‘अगेव्ह’ या सर्वसामान्य नावाने ओळखल्या जातात. महाराष्ट्रात ही वनस्पती घायपात अगर घायाळ या नावाने ओळखली जाते.
अगेव्ह वंशातील वनस्पती लघुस्तंभीय, अर्धकाष्ठमय असून जमिनीवरील खोडाचा भाग पानांच्या तळांनी गुच्छाप्रमाणे व्यापलेला असतो. पाने लांब, टोकदार,साधी, बिनदेठाची, मांसल, चिवट, किंचित करडी हिरवी, मेणचट असून ती तळाच्या थोडे वर संकुचित आणि मध्यावर अथवा मध्याच्या किंचित वर जास्त रुंद असतात. पानांच्या दोन्ही कडांवर तीक्ष्ण, लहान काटे असतात (काही जातींत कडांवर काटे नसतात).
पानाच्या टोकाला तीक्ष्ण,जाड, बळकट काटा असतो. वनस्पतीच्या आयुष्यात (७-८ वर्षांपासून १५ वर्षांपर्यंत) एकदाच फुलोरा (परिमंजरी) येतो. फुलोऱ्याचा दांडा तलाशी सु. १५ सेंमी. जाड असून ६ ते १० मी. उंच असतो. तो खोडाच्या मध्यातून वर येतो. फुलात ६ परिदलांची आखूड नलिका व त्यांत सहा केसरदले आणि तीन किंजदलांचा अधःस्थ किंजपुट असतो [⟶ फूल]. फळ (बोंड) द्वयावृत प्रकारचे व बीजे अनेक, चपटी, काळी व पातळ असतात. फुलोरा आल्यावर घायपाताची झाडे मरतात. फुलोऱ्यावरील लहान कंदिकांपासून (लहान कंदांपासून) तसेच मूलक्षोडापासून (जमिनीत वाढणाऱ्या आडव्या खोडापासून) आलेल्या अनेक अधश्चरांपासून (मुनव्यांपासून) नवीन वनस्पती येतात.
लोहमार्गाच्या दुतर्फा, रत्याच्या दुतर्फा तसेच शेताच्या कडेने कुंपणासाठी आणि उताराच्या जमिनीची धूप थांबविण्यासाठी घायपाताची लागवड केली जाते. ही फार रूक्षता विरोधक वनस्पती असल्याने या (ॲमारिलिडेसी) कुलातील इतर जाती जेथे वाढू शकत नाहीत अशा मुरमाड व कोरड्या जमिनीत ही वाढू शकते.
पानांपासून उपयुक्त धागा (वाख) मिळतो. हा धागा लांब (१ ते १.७५ मी.), भरभरीत आणि मजबूत असतो आणि दोर व दोरखंडे तयार करण्यासाठी त्याचा मुख्यत्वेकरून उपयोग करतात. घायपातापासून तयार केलेला दोर काथ्या अगर कापसाच्या सुतापासून तयार केलेला दोरापेक्षा मजबूत असून तो जास्त दिवस टिकतो. यामुळे औतांसाठी, मोटेसाठी आणि जनावरे बांधण्यासाठी या दोराला फार मागणी असते. परंतु हा दोर पाण्यात फुगत असल्याने पाण्यात (विशेषतः खाऱ्या पाण्यात) फार दिवस टिकत नाही.
घायपाताचा वाख हा महत्त्वाचा कठीण धागा (हार्ड फायबर). आहे व अमेरिकेत व्यापारी दृष्ट्या त्याला कापसाच्या खालोखाल महत्त्व आहे. दोर आणि दोरखंड यांखेरीज पुढील वस्तूंच्या उत्पादनासाठी घायपाताच्या वाखाचा उपयोग होतो. यंत्राच्या साहाय्याने कापणी केलेल्या पिकाचे गठ्ठे बांधण्यासाठी दोर (बाइंडर ट्वाइन), कटाचा दोरा, मासे पकडण्यासाठी, रेल्वेच्या उघड्या वाघीणींवर (मालावर) घालण्यासाठी, बैलगाडीतून कापूस बाजारात नेण्यासाठी वगैरे कामांसाठी उपयोगी पडणाऱ्या जाळ्या, चटया, पायपोस, झुले, गालिचे, भरभरीत कापड, कागद, कागदी पुठ्ठा, खुर्च्यांसाठी गाद्या, स्वस्त प्रतीचे ब्रश वगैरेंसाठी होतो.
मोठा, ओली व मांसल पाने पोटिसासाठी वापरतात. पानांचा रस सारक, मूत्रल (लघवी साफ करणारा), आर्तवजनक (मासिक पाळी सुरू करणारा) व रक्तपित्तनाशक असून मुळे मूत्रल, स्वदेकारी आणि उपदंशनाशक (गरमीनाशक) असतात. मुळे शिजवून खाण्यासाठी उपयोग करतात. पानांचे तळभाग व फुलोऱ्याचा दांडा दुष्काळात अन्न म्हणून उपयोगी येतो. दांड्यांतील भेंडाच्या फाक्या वाळवून वस्तऱ्यासाठी पलाटणी करतात.
दांड्यातील रसापासून ॲगोव्हेज ही दुर्मिळ साखर आणि शिर्का (व्हिनेगार) तयार करतात. पानांतील रसाचा साबणाच्या ऐवजी उपयोग होतो. घराच्या भिंतींना गिलावा करताना गिलाव्यात पानांचा रस मिसळल्यास वाळवीचा उपद्रव होत नाही. त्याचप्रमाणे पानांतील रस हाताला व पायाला चोळल्यास त्या भागांना विस्तवापासून इजा होत नाही असा समज आहे.
मेक्सिकन लोक घायपाताच्या फुलोऱ्याच्या दांड्यातील रसापासून ‘पुल्के’ नावाचे पेय तयार करतात. ते त्यांचे राष्ट्रीय पेय आहे. त्यातून अन्नांशही मिळतो. यासाठी अगेव्ह अट्रोव्हायरेन्स या जातीची मेक्सिकोमध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येते. या जातीची पाने २.५ मी. लांब असतात व फुलोऱ्याचा दांडा मनुष्याच्या शरीराएवढा जाड आणि १० मी. उंच असतो. तसेच घायपाताच्या अनेक जातींचे फुलोऱ्यावर दांडे आणि पानांचे तळ यांचे बारीक तुकडे आंबवून ऊर्ध्वपातनाने (वाफ करून व मग ती थंड करून पदार्थ अलग करण्याच्या क्रियेने) ‘मेस्कल’ नावाची दारू त्या देशात तयार करण्यात येते.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
एरिओकॉलॉन : (इं. पाइपवर्ट; कुल-एरिओकॉलेसी). एकदलिक...
फुलझाडांपैकी द्विदलिकित वर्गातील सु. ६०–१२० सेमी....
औषधी व विषारी वनस्पती आहे.
ज्वर, पटकी, कुष्ठ, संधिवात इत्यादींवर हे गुणकारी अ...