(कुल-पोलेमोनिएसी). फूलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित वर्गातील आणि भोकर गणतील एक वंश; ह्यामध्ये एकूण सु. ६० (जे. सी. विलिस यांच्या मते ६७, एच्. सांतापाव यांच्या मते ७०) जाती असून त्या ⇨ ओषधीय, वर्षायू (एका वर्षात जीवनक्रम पूर्ण करणाऱ्या) किंवा बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या), चिवट, उंच, किंवा खुज्या आणि सरळ किंवा पसरून वाढणाऱ्या लहान वनस्पती आहेत. काहींची पाने तणाव्यात रूपांतरित झाली आहेत. एक ईशान्य आशियाई जाती सोडल्यास बाकी सर्व मूळच्या उ. अमेरिकेतील आहेत. शोभेकरिता अनेक जाती व त्यांचे संकरित प्रकार सर्वत्र बागांत लावलेले आढळतात. पाने साधी, अखंड, बहुधा समोरासमोर, कधी फक्त वरची एकाआड एक असतात. फुले विविध व भडक रंगांची व फाद्यांच्या टोकांस झुबक्यांनी येतात.
संवर्त अरुंद नळीसारखा किंवा घंटेसारखा व पाच संदलांचा; पुष्पमुकुट पाच पाकळ्यांचा व अपछत्राकृती (समईसारखा); केसरदले पाच, भिन्न लांबीची व भिन्न पातळ्यांवर वाढलेली; ऊर्ध्वस्थ किंजपुटात तीन कप्पे व प्रत्येक कप्प्यात एक किंवा दोन बीजके [⟶ फूल]. बोंडाची तीन शकले होऊन सु. तीन ते सहा बिया बाहेर पडतात. याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ बोरॅजिनेलीझमध्ये (भोकर गणात) वर्णिल्याप्रमाणे असतात.फ्लॉक्सच्या जाती हवामानातील फरकाप्रमाणे उन्हाळ्यात व हिवाळ्यात बहरतात. खोल, भारी, चिकट जमीन व थंड ओलसर हवा चांगली; खत व भरपूर पाणीपुरवठा केल्यास अधिक चांगली वाढ होते व भरपूर फुले येतात.
छाट कलमे व बियांपासून नवीन लागवड करतात.फ्लॉक्स स्युब्युलॅटा ही बुटकी जाती व तिचे प्रकार शैलोद्यान व वाफ्याच्या कडेने लावण्यास उत्तम असतात. फ्लॉ. ड्रमाँडी (टेक्सन प्राइड) व तिचे असंख्य वर्षायू प्रकार लहान केसाळ असून ०·५ मी. उंचीपर्यंत वाढतात व उन्हाळ्यात बहरतात. भारतात हिचे काही प्रकार बागेत आढळतात. फ्लॉ. ग्लॅबेरिमा व फ्लॉ. कॅरोलिना यांपासून निघालेल्या उंच जाती लवकर बहरतात. फ्लॉ. मॅक्युलॅटा व फ्लॉ. पॅनिक्युलॅटा यांपासून उशिरा बहरणाऱ्या उंच जाती मिळविल्या आहेत. निवड व संकर करून याचे २०० पेक्षा जास्त बहुवर्षायू उद्यान-प्रकार उपलब्ध झाले आहेत. (चित्रपत्र).
लेखक - ज. वि. जमदाडे / शं. आ. परांडेकर
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
याचे मूलस्थान भारताचा ईशान्य भाग आहे. चीन आणि जपान...
आर्कीयन म्हणजे प्राचीन किंवा आर्ष.
फुलझाडांपैकी वनस्पति, आवृतबीज उपविभाग द्विदलिकित व...
खसखस व अफूकरिता करतात.