অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रास्ना

रास्ना : (हिं. बांदा, वांदा; गु. रास्नो; क. वंदकीगिड, बंदनिके; सं. भुजंगाक्षी, रास्नाह, वृक्षरुहा; लॅ. व्हँडा रॉक्सबर्वाय, व्हँ. टेसेलॅटा; कुल-ऑर्किडेसी). फुलझाडांपैकी वनस्पति, आवृतबीज उपविभाग ही अपिवनस्पती (दुसऱ्या झाडावर फक्त आधार घेऊन वाढणारी) श्रीलंकेत व भारतात जवळजवळ सर्वत्र (उ. प्रदेश ते प. बंगाल व दक्षिणेस केरळपर्यंत) आढळते. व्हॅंडा ह्या हिच्या प्रजातीत एकूण सु. ६० जाती असून त्यांपैकी भारतात फक्त १०−१२ आढळतात. हिचे खोड सु. ३०−६० सेंमी. लांब व बळकट असून त्यावर साधी किंवा शाखायुक्त मुळे येतात व आधाराला चिकटून व वेढून खोडाला आधार देतात; काही मुळे हवेतून पाणी शोषून घेतात व त्यावर ती ओषधी जगते.

पाने साधी, एकाआड एक, परस्परांच्या फार जवळजवळ आढळणारी, लांबट (१५−२०×१·३−२ सेंमी.), चिवट, मांसल, काहीशा बाहेर वळलेल्या किनारींची व छिन्नाग्र (टोकास दातांनी तोडल्याप्रमाणे) असून प्रत्येक पानाचे दोन्ही अर्ध मध्यशिरेवर खोबणीप्रमाणे (पन्हाळीप्रमाणे) राहतात. जुलै महिन्यात ६−१० फुलांच्या सु. १५−२५ सेंमी. लांब मंजऱ्या येतात. संदले व प्रदले अथवा दोन्ही प्रकारची परिदले पिवळी असून त्यांवर पिंगट रेषा असतात; ओठाची पाकळी (पुष्पोष्ठ) निळी व तीवर जांभळे ठिपके असून शुंडिका (सोंडेसारखा परिदलाचा भाग) सरळ बोथट असते. स्तंभ (किंजकेसराक्ष; किंजल्क व केसरदले जुळून बनलेला भाग) फार आखूड असतो फूल. फळ (बोंड) ७·५−९ सेंमी. लांब व अरुंद गदेप्रमाणे असून त्यावर तीक्ष्ण कंगोरे असतात. इतर सामान्य शारिरिक लक्षणे ऑर्किडेसी अथवा आमर कुलात ऑर्किडेलीझ वर्णन केल्याप्रमाणे असतात.

रास्न्याची मुळे सुगंधी व कडू असून अग्निमांद्य (भूक नसणे), संधिवात व तत्सम इतर विकारांवर गुणकारी असतात; अनेक औषधी तेलांत त्यांचा रस मिसळून ते तेल तंत्रिका तंत्राच्या विकारांवर व संधिवातावर लावतात. छोटा नागपूर येथे पाने कुटून त्यांचा लेप तापात सर्वांगास लावतात. मुळांचा काढा अर्धांगवायूवर देतात.

कडू रास्ना

(लॅ. ॲकँपे वाइटियाना, ॲ. प्रीमोर्सा; कुल-ऑर्किडेसी). ही अपिवनस्पती रास्न्याच्या कुलातील परंतु भिन्न प्रजातीतील असून हिला लांबट व मजबूत खोडे असतात; हिच्या प्रजातीत (ॲकँपेमध्ये) एकूण १२ जाती असून त्यांचा प्रसार भारत मलाया, चीन व अफ्रिका येथे आहे. कडू रास्ना बंगाल, प. द्विपकल्प व श्रीलंका या ठिकाणी आढळते. महाराष्ट्रात कोकणात व बेळगावकडेही हिचा प्रसार आहे. हिचे खोड ३०−४५ सेंमी. लांब व सु. १·५ सेंमी. जाड असते. मुळे लांब व जाडजूड असून पाने साधी, १०−२०× १·६−३·२ सेंमी., जिव्हिकावंत (पानाच्या वरच्या बाजूस पण तळाशी उपांग असलेली), जाड, चिवट, सपाट व टोकास दुभंगलेली असतात. फुलोरा ३·८-६·३ सेंमी. लांबीची परिमंजरी असून त्यावर गुलुच्छ प्रकारचे लहान फुलोरे पुष्पबंध असतात. फुलातील परिदले पिवळी व त्यांवर लाल रेषा असतात. पुष्पोष्ठ पांढरा व त्यावर आडवे लाल पट्टे असतात; शुंडिका एक, लहान, आखूड व गोलसर पिशवी सारखी असते. फळ (बोंड) ३·८−७·५ सेंमी. लांब, गदेसारखे, आयत किंवा लाटण्यासारखे असून त्यावर अनेक कंगोरे असतात. ही वनस्पती कडू व पौष्टिक असून संधिवातावर देतात.

 

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Meterials, Vol. X, New Delhi, 1976.

2. Kirtikar, k.R.; Basu, B. D. Indian Medicinal Plants, Vol. IV, Delhi, 1975.

लेखक - ज. वि. जमदाडे / शं. आ. परांडेकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/15/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate