रेवंदचिनी : (१) खोडावरील पेरे व उपपर्णासह पान, (२) फुलोरा, (३) फूल, (४) फळ.
रेवंदचिनी : (हिं. हिंदी रेवंदचिनी; क. रेवुचिन्नी; गु. गामनी रेवनचिनी; सं. गंधिनी, पीतमूली; इं. हिमालयन वा इंडियन ऱ्हूबर्ब; लॅ. ऱ्हीयम हमोदी; कुल-पॉलिगोनेसी). फुलझाडांपैकी वनस्पति, आवृतबीज उपविभाग ह्या बहुवर्षायू (अनेक वर्ष जगणाऱ्या) ओषधीचा प्रसार आल्पीय व उपाल्पीय हिमालयात (३,०००-४,००० मी. उंचीपर्यंत) आहे हिच्या ऱ्हीयम या प्रजातीत एकूण सु. ५० जाती असून भारतात सु. १० आढळतात. पंजाब, उत्तर प्रदेश, काश्मीर ते सिक्कीम येथे ३,३००-५,२०० मी. उंचीपर्यंत प्रदेशांतरेवंदचिनी आढळते. आसामात पानांच्या भाजीकरिता लागवडीत आहे. मुळे फार जाडजूड असतात. खोड १.५-३ मी. उंच व त्यावर भरपूर मोठी पाने असतात. देठ अर्धशूलाकृती, वर थोडे खोलगट व कडा गोलसर असतात. पानांची पाती मोठी, अंडाकृती, हृदयाकृती, विशालकोनी (टोकास गोलसर), किनार काहीशी तरंगित (नागमोडी) आणि कडांवर व खालच्या बाजूस लवदार असतात. शिरा ५-७; फुले लहान, गर्द जांभळी किंवा फिकट लाल असून ती उभ्या आणि काहीशा समांतर फांद्यांच्या परिमंजरीवर पानांच्या बगलेत येतात. पानांवर ताम्रवर्णी छटा असते. कृत्स्नफल मोठे व लंबगोल असते. मूलक्षोड (भूमिगत जाड खोड) व मुळे स्तंभक (आकुंचन करणारी), रेचक व पौष्टिक असतात. पानांतील १.३४ टक्के ऑक्झॅलिक अम्लाने विषबाधा होते.
ऱ्हीयम या प्रजातीतील सर्वच जातींना ऱ्हूबर्ब असे इंग्रजीत म्हणतात. ऱ्ही. ऱ्हेपोंटिकम (गार्डन ऱ्हूबर्ब) बागेत लावतात. एकोणिसाव्या शतकाच्या आरंभापासून याच्या पानांचे लाल रंगी देठ उकडून खाण्याची पद्धत आहे. याच्या मुळांचे पीठ रेचक म्हणून उपयोगात आहे. इतर काही जाती (ऱ्ही. ऑफिसिनेल व ऱ्ही. पामेटन) चीन व तिबेटमधल्या असून वरच्यापेक्षा मोठ्या असतात व औषधांकरिता मोठ्या प्रमाणावर चीनमध्ये पिकवल्या जातात.
लेखक - ज. वी. जमदाडे
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
फुलझाडांपैकी वनस्पति, आवृतबीज उपविभाग द्विदलिकित व...
फुलझाडांच्या ह्या वंशाचा समावेश कंपॉझिटी कुलात केल...
आर्कीयन म्हणजे प्राचीन किंवा आर्ष.
खसखस व अफूकरिता करतात.