অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लाखेरी

लाखेरी

लाखेरी : (१) पाने व फूल यांसह फांदी, (२) फुलांचा उभा छेद, (३) फश, (४) बी.

लाखेरी : (पालोर, सर्कोली; क. दोड्डनेक्करे, अंकेरकी; सं. कृष्णमुखी; इं. इंडियन ऱ्होडोडेंड्रॉन; लॅ. मेलॅस्टोमा मलबॅथ्रिकम, कुल-मेलॅस्टोमेसी). फुलझाडांपैकी वनस्पति, आवृतबीज उपविभाग एक मोठे झुडूप,मेलॅस्टोमा ह्या त्याच्या प्रजातील एकूण ७० जाती असून त्यांपैकी भारतात फक्त ४ आढळतात. लाखेरीचा प्रसार आशिया खंडातील उष्ण प्रदेश, श्रीलंका, उ. ऑस्ट्रेलिया, पॉलिनीशिया इ. ठिकाणी आहे. भारतात वाळवंटाखेरीज सर्वत्र सु. १,८०० मी. उंचीपर्यंत व अंदमान बेटांत हे आढळते. बहुधा जंगलात, दमट प्रदेशांत, ओढ्यांच्या काठांनी, ओलसर जागी हे सापडते; शोभेकरिता बागेत लावतात. हे साधारणपणे १·५–२·५ मी. उंच असून पाने साधी, समोरासमोर, रूंदट, भाल्यासारखी किंवा आयत, ५–११ X १·६–४·५ सेंमी., राठ व काहीशी केसाळ असतात. खोडावर पातळ व लालसर तपकिरी साल असते. खोडाच्या आणि फांद्यांच्या टोकांस शाखायुक्त गुलुच्छ पुष्पबंध प्रकारचे फुलोरे येतात. फुले सु. २·३ सेंमी. लांब, दिखाऊ, लालसर जांभळट असून त्यांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे  मेलँस्टोमेसी अथवा अंजनी कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. मृदुफळ रूंदट अंडाकृती, सु. १-१·५ सेंमी. लांब, छेदित (टोकाकडे काहीसे सपाट), सतत राहणाऱ्या संवर्ताने वेढलेले फूल व अनियमितपणे फुटणारे असून बिया बारीक, असंख्य व काळ्या असतात.

पाने, फुले व फळे खाद्य आहेत. फळातील मगज गोड व थोडा स्तंभक (आकुंचन करणारा) असून रूची आणि स्वाद यांबाबत ब्‍लॅकबेरीशी तुल्य असतो. फळांपासून काळा व जांभळा रंग मिळतो. पाने व फुले यांपासून लालसर रंग काढतात. अ‍ॅटलस रेशमी किडे या वनस्पतीवर पोसले जाऊन त्यांच्यापासून उत्तम, तलम रेशीम मिळते. ही वनस्पती स्तंभक असल्याने अतिसार, आमांश व श्वेतप्रदर (पांढरी धुपणी) यांवर वापरतात. साल व मुळे जखमांवर आणि कातडीच्या काही रोगांवर उपयुक्त असतात; तसेच गुळण्या करण्यासही त्यांचा उपयोग करतात. कोवळी पाने व थोडी मिरी गोमूत्रात वाटून नाळगूद रोगात देतात; त्यामुळे लघवी व शौच साफ होतात.

 

संदर्भ : Kirtikar. K. R.; Basu, B. D. Indian Medicinal plants Vol. II, New Delhi, 1975.

लेखक - शा. दा. पाटील

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate