অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रस्ता सुरक्षा

रस्ते अपघात - काही उदाहरणे

उदाहरण -1

जा रे बंटी... चौकातल्या गवळ्याकडून दोन लीटर दूध, अर्धा किलो दही आणि पाव किलो पनीर घेऊन ये... आईची स्वयंपाक घरातून अशी सूचना येताच बंटी बाईकची चावी घेऊन घराबाहेर फरार...

हो गं आई आणतो.. निघालोच.. झिकझ्याक बाईक चालवत बंटी चौकातल्या गवळ्याच्या दुकानात. तितक्याच वेगाने परतताना गाडी घसरली. बंटी एकीकडे, बाईक दुसरीकडे, दूध आणि दही तिसरीकडे... बंटी अपघातात जखमी. घरी निरोप येईपर्यंत लोकांच्या मदतीने बंटी रुग्णालयात....

का घडतात आपल्याकडे अशी अपघाताची उदाहरणे ? याचा कधी आपण विचार केलाय ? हाकेच्या अंतरावर असलेल्या चौकातल्या गवळ्याच्या दुकानात जाण्यासाठी लहानग्या बंटीला बाईक कशाला हवी ? खरं तर पायी जाऊनही बंटी दूध आणु शकला असता. पण आईनेच सवय लावलेली... जा रे, बाबांची गाडी घेऊन जा... म्हणजे लवकर येशील... आईनं पहिल्यांदा सांगितलेली ही गोष्ट बंटीने व्रत म्हणून स्वीकारलेली...

पण बंटीच्या हातात गाडी देताना आईने त्याच्या सुरक्षेसाठी त्याला काय सांगितले ? सावकाश जा म्हणाली, सिग्नल व्यवस्थित पहा आणि पळ म्हणाली की आणखी काही सूचना दिल्या... आईनं जर असे सुरक्षेचे संस्कार बंटीवर त्या त्या संवेदनशील वेळेत केले असते तर बंटी रुग्णालयात पोहोचलाच नसता.

इथं दोष कुणाचा?

उदाहरण 2

एक उच्च मध्यमवर्गीय चौकोनी कुटुंब. आई-वडील-मुलगा-मुलगी... चार माणसं, चार गाड्या... चार माणसांपैकी दोघांची कामकाजाची कार्यालये एकाच बाजूला... आणि मुलांच्या शैक्षणिक संस्था ही एका बाजुला. म्हणजे तसं पाहिलं तर चार माणसात दोन गाड्यांची किंवा वाहनांची गरज. पण चार गाड्या... प्रत्येकजण आपापली गाडी घेऊन उद्दिष्टस्थळापर्यंत जाणार. म्हणजे एकाच कुटुंबाच्या चार गाड्या रस्त्यावर. इंधनाचा अधिक वापर, ट्रॅफिक जॅमचे एक कारण आणि सुरक्षेचा विषय महत्त्वाचा.
इथं दोष कुणाचा?

उदाहरण 3

जामकर, खेडकर, पाटील, गव्हाणे सगळे एकाच ऑफीसमध्ये... चौघे एकमेकांचे शेजारी... पण प्रत्येकजण आपली कार घेऊन ऑफीसला जातो...
खरं तर त्यांना परस्पर समन्वयातून “कार पुलिंग” ही करता आलं असतं...

पण हा विचार कोण आणि कधी करणार?

रस्ते अपघात - वस्तुस्थिती

चला, थोडी वस्तुस्थिती जाणून घेऊ या.
राज्यात 1 जानेवारी 2015 रोजी एकूण 2.5 कोटी मोटार वाहने वापरात होती. हे प्रमाण दर लाख लोकसंख्येमागे 21,152 वाहने इतकी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ 9.1 टक्के इतकी आहे. राज्यातील एकूण वाहनांपैकी 24.5 लाख वाहने म्हणजे 9.8 टक्के वाहने बृहन्मुंबईत होती. राज्यात प्रती कि.मी रस्त्यावरील वाहनांची सरासरी संख्या 95 आहे.

मार्च 2014 अखेर मोटार वाहने चालविण्याचा वैध परवान्यांची संख्या 2.77 कोटी होती. जी त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत 6.9 टक्क्यांनी जास्त आहे. राज्यात 2013-14 मध्ये 25.6 लाख शिकाऊ परवाने देण्यात आले.

ही सगळी आकडेवारी रस्ते, रस्त्यावरील वाहतूक आणि सुरक्षितता हा विषय आपल्या सर्वांच्या आयुष्यात दिवसेंदिवस किती महत्त्वाचा ठरत आहे हे सांगण्यासाठी पुरेसी आहे.

यावर्षी शासनानं ‘सुरक्षा हे केवळ घोषवाक्य नसून तो जीवन जगण्याचा एक मार्ग आहे’ या संकल्पनेवर आधारित सुरक्षा पंधरवडा साजरा केला. खरं तर सुरक्षा हा केवळ पंधरा दिवसांचा नाही तर आयुष्यभराचा विषय आहे. त्यामुळे हा विचार फक्त रस्ता सुरक्षा पंधरवड्यापुरता मर्यादित न ठेवता तो आयुष्यभरासाठी लक्षात ठेवला तर रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईलच परंतू त्याचबरोबर अनेक अपघातांपासूनही कुटुंबांचे संरक्षण होईल.

राज्यात 2014 मध्ये झालेल्या अपघातांची संख्या 61,511 इतकी होती. हीच संख्या बृहन्मुंबईत 22,554 इतकी होती अपघातांच्या 36.7 टक्क्यांच्या तुलनेत मृत व्यक्तींची टक्केवारी 4.2 तर जखमी व्यक्तींची टक्केवारी 9.8 इतकी होती.

रस्त्यांवर वाढत जाणारी वाहनांची संख्या आणि होणारे अपघात या दोन्ही गोष्टींचा विचार केला तर सार्वजनिक वाहन व्यवस्थेचे सक्षमीकरण, सुरक्षित वाहतूक व्यवस्था आणि समाजाचं मानसिक परिवर्तन या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.

मुंबईत पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेसारखे लोकल ट्रेनचे जाळे आहे. मोनो-मेट्रोसारखा पर्याय आहे. बेस्टच्या तसेच एमएमआरडीएच्या बसेस आहेत. शिवाय राज्यभर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची सेवाही आहे. येथे परिवहन व्यवस्थेचे एक उत्तम जाळे निर्माण होत आहे.

एमयुटीपी, एमयुआयपी अंतर्गत अनेक प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. जलवाहतुकीचा शासन प्राधान्याने विचार करत आहे. मल्टी मोडल कॉरिडोर विरार ते अलिबाग, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक यासारखे अनेक वाहतूक प्रकल्प मुंबईत होत आहेत. नागपूर, पुण्यासारख्या महत्वाच्या शहरांमध्ये मेट्रो रेल्वे प्रस्तावित आहे. या अर्थसंकल्पात मुंबई मेट्रो लाईन 3 प्रकल्पासाठी 109.60 कोटी, नागपूर मेट्रो रेल्वेसाठी 197.65 कोटी आणि पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी 174.99 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.

म्हणजेच लोकांना उत्तम प्रकारची आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी शासन आग्रही आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जितकी सक्षम आणि सुरक्षित होईल तितका रस्त्यांवरील खाजगी वाहनांचा ताण कमी होईल असं म्हटलं जातं आणि ते एकदम खरं ही आहे. पण मित्रांनो याबरोबरच आणखी एका गोष्टीची गरज आहे ती म्हणजे समाजाचं मानसिक परिवर्तन.

अपघात झाला की आपण सगळे हळहळतो. कधी कधी तर अपघात आपल्याच कुणाच्यातरी घरात मानसिक आघात ही पोहोचतो. पण अपघात टाळायचा असेल तर वाहतूक सुरक्षेचा, रस्ता सुरक्षेचा विचार हा एक संस्कार म्हणून बालवयातच मुलांवर बिंबवणे जितके गरजेचे आहे तितकेच भविष्यात आयुष्यभर त्याचे पालन करणेही.

अपघात झाल्यावर बोलण्यापेक्षा चला मित्रांनो, अपघात होऊ नये म्हणून काळजी घेऊ या. वाहतूक नियमांचे पालन करू या आणि दुर्देवाने अपघात झालाच तर एका सुजाण नागरिकाचे कर्तव्य बजावू या... अपघात पाहून पुढे न जाता जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून...


चला, आपणही थोडं बदलू या... -डॉ. सुरेखा म. मुळे

-माहिती स्रोत: महान्यूज, गुरुवार, १६ एप्रिल, २०१५.

अंतिम सुधारित : 4/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate