অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मुलांबाबत रत्नपारखी व्हा...

मुलांबाबत रत्नपारखी व्हा...

प्रत्येक व्यक्तीच्या अंगी काही उपजत गुण असतात. पण त्या गुणांकडे दुर्लक्ष करुन स्पर्धेच्या या जगामध्ये त्याला पालक वेगळ्याच करिअरमागे धावायला लावतात आणि यामुळे मुलांसाठी सर्व उपजत कलागुण हे स्वप्नच राहतं. मुलांमधील हे अंगभूत गुण कोणते आहेत, हे जाणून घेऊन त्यामध्ये त्याला शिक्षण दिले तर त्यातून देखील त्याचे करिअर निश्चितपणे घडत असते.यश मिळविण्यात जे प्रयत्न लागतात त्यात अभ्यास, जिद्द, चिकाटी आणि वक्तशीरपणा यासारखे अनेक गुण अंगी असावे लागतात. परंतु त्याहीपेक्षा अधिक महत्व कशाला असेल तर आपला छंद, आपली आवड याला आपला व्यवसाय बनवला तर यश लवकर आणि हमखास प्राप्त होत असते. खऱ्या अर्थाने हीच यशाची गुरुकिल्ली आहे. आपल्यातील उपजत गुणांच्या ओळखीपासून त्याला आपला उपजीविकेचा मार्ग बनविण्याचा प्रयत्न म्हणजेच कौशल्य विकास होय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो कौशल्य विकासाचा नारा दिला आहे. त्यामागील भूमिका साऱ्या जणांनी उपजीविकेसाठी नोकरीमागे धावून चालणार नाही हाच संदेश आहे.
कौशल्याच्या आधारावर आपल्या देशाने जगातील सात आश्चर्यांपैकी एक अशी मान्यता मिळविणारी ताजमहलसारखी अतुलनीय इमारत घडविलेली आहे. अभियांत्रिकी आणि रचनाशास्त्र अभ्यासकांना धक्का देणारं कैलास लेणं कळसापासून पायथ्यापर्यंत अचूकपणे दगडातून कोरुन घडवलेले आहे. आपला हा सृजनाचा प्रवास ब्रिटीश राजवटीत देखील सुरु होता आणि आजही सुरु आहे. सृजनशील चित्रपट, गाणी यांच्या रुपातून आपणास हा प्रवास बघायला मिळतो. मात्र शिक्षणाने ज्ञान वाढते, यापेक्षा शिक्षणाने अपेक्षा वाढतात. या उक्तीप्रमाणे आजच्या पिढीत आपल्या मुलाकडे बघताना तो किंवा ती फक्त डॉक्टर अथवा इंजिनिअर व्हावेत या अपेक्षेनेच मुलांकडे बघणारी आणि त्यांना स्पर्धेत धावायला लावणारी पिढी बघून जराशी खंत वाटते.
लहानपणी ‘आमचा चिंटू छान गाणं म्हणतो’ अथवा ‘आमची पिंकी छान चित्र काढते’ असं म्हणणारे पालक मुलांच्या वाढत्या वयासोबत आपल्या स्वप्नांमधील अपेक्षा मुलांवर थोपायला सुरुवात करतात. हे वास्तव आहे. पालकांना याबाबत आवर्जून सांगावं लागेल की मुलांना स्वत:चं असं वेगळं व्यक्तीमत्व आहे. ते ओळखा त्याचा आदर करा. त्या व्यक्तीमत्वाला काय महत्वाकांक्षा आहेत, त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करा. त्याचा कल जाणून घ्या आणि त्यानुसार त्याच्या अंगभूत गुणांच्या आधारे प्रशिक्षण द्या.
पालकांनी किमान लक्षात ठेवावं आज या अंगभूत गुणांची ओळख करुन देणाऱ्या चाचण्या ऑनलाईन उपलब्ध आहेत. या माध्यमातून मुलांचा कल ओळखता येतो. कृपया आपली स्वप्ने मुलांवर थोपवू नका. उद्या त्यामुळे मुलांचे आयुष्य संकटात येवू शकते याची जाणिव ठेवा.
सचिन तेंडूलकर, लता मंगेशकर यांना अभियांत्रिकीत प्रवेशाचा हट्ट पालकांनी धरला असता तर...भारतरत्न तुमच्या -आमच्या घरात असू शकतो तुम्ही रत्नपारखी होण्याची गरज आहे.

 

 

लेखक - प्रशांत अनंतराव दैठणकर

जिल्हा माहिती अधिकारी, गडचिरोली.

स्त्रोत : महान्युज

 

 

अंतिम सुधारित : 4/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate