অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

झुंजूमुंजू : सांगलीतील आधारवड

झुंजूमुंजू : सांगलीतील आधारवड

सांगलीच्या लीलाताई जाधव या स्त्रियांच्या प्रश्नांवर अविरत झगडणार्‍या एक झुंजार कार्यकर्ता. त्यांची आजवरची वाटचाल, आजवरचा संघर्ष प्रेरणादायी आहे. लीलाताईंच्या कार्याचा अल्पपरिचय करून देणारा हा लेख

संथ वाहते कृष्णामाई
तीरावरल्या दुखदु:खाची
जाणीव तिजला नाही

हे गाणे ऐकायला मधुर संगीत आणि तरल आवाजामुळे खूप छान वाटते. कृष्णा नदीच्या तीरावरील लोकांना सुख दु:ख आहेच. विशेषत: महिलांचे मूक आक्रंदन सुरूच आहे. अजूनही कितीतरी हुंदके आतल्या आत गिळले जातात. अपमान सहन केला जातो. दु:ख पचवले जाते. व्यक्तिगत समस्येबरोबर सामाजिक समस्याही आहेतच. कुणाला सासुरवास सहन करावा लागतो, तर कुणी हुंडाबळी ठरतं. कुणाला मनात नसतानाही घटस्फोटाला सामोरं जावं लागतं, तर कोणी अत्याचाराला बळी पडतं.

संथ वाहणार्‍या कृष्णामाईला जरी याची दखल घेता येत नसली, तरी याच कृष्णेच्या काठावर वसलेल्या सांगलीमध्ये अशी एक सात्विक कोमल मनाची माऊली आहे, जी अविरतपणे अशा पीडितांसाठी गेली कित्येक वर्षे धावून जाते आहे. त्यांचे दु:ख कमी करण्यासाठी मदत करते आहे, त्यांच्या दु:खावर फुंकर घालते आहे, त्यांच्यासाठी चंदनासारखी झिजते आहे.

अशी ही माऊली म्हणजे लीलाताई जाधव. लीलाताईंचे पीडित महिलांसाठी, समाजासाठी केलेले कार्य पाहिले की थक्क व्हायला होतं.
लीलाताई जाधव यांनी सांगली जिल्हा श्रमिक महिला संघटना, सांगली जिल्हा कॉंग्रेस महिला आघाडी सावित्रीबाई फुले महिला नागरी सहकारी पतसंस्था, या ठिकाणी ‘अध्यक्ष’ म्हणून काम केले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बँक लि., मुंबई याच्या त्या संचालक आहेत. त्याचप्रमाणे सांगली नगरपालिका असताना नगरसेविका म्हणूनही त्या निवडून आल्या आहेत. विशेष कार्यकारी दंडाधिकारी, सांगली, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि रोजगार हमी योजना महाराष्ट्र राज्य, सांगली जिल्हा ग्राहक न्यायालय आणि दक्षिण मध्य रेल्वे भारत सरकार इ. ठिकाणी माजी सदस्य म्हणूनही त्या कार्यरत राहिल्या आहेत.
एका सर्वसाधारण घरातली एक साधीसुधी गृहिणी, इतक्या मोठ्या पदांपर्यंत कशी काय पोहोचू शकली? हे जाणून घ्यायला सगळ्यांना नक्कीच आवडेल. वर नमूद केलेली एक एक पदं वाचून एकट्या बाईला हे कसं जमलं? असा प्रश्‍न मनामध्ये आल्याशिवाय रहात नाही.

लीलाताईंचे माहेर आणि सासर दोन्ही सांगलीतच. माहेरकडून समाजकार्याचे बाळकडू त्यांना मिळाले. सांगलीतील सावंत घराण्यातील शांतारामांची ही मुलगी. बालपणापासून हुशार आणि चुणचुणीत! वडील शेतीबरोबरच समाजकार्यातही गुंतलेले. त्याकाळी शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) संस्थापक सदस्य. लीलाताईंच्या आई त्या वेळच्या पद्धतीनुसार सदैव घरकामात बुडालेल्या. शिक्षणही नाही, म्हणजे अंगठेबहाद्दरच म्हणा ना! त्यांच्यामध्येसुद्दा ‘संघटक’ हा गुण होता. जे काम करतील, तिथे आपल्या बोलण्याने माणसे गोळा करतील. आयाबायांना एकत्र करतील. आईवडिलांचे हे गुण लीलाताईंच्यात उतरलेले. त्यामुळे समाजकार्य त्यांच्या रक्तातच मुरलेले. बी.ए. पर्यंतचे शिक्षण, त्यानंतर लग्न. सासरही सांगलीतच. त्यामुळे त्यांना आपल्या मनाप्रमाणे काम करण्याचे पोषक वातावरण मिळाले.

लग्नानंतर तिथली जबाबदारी सांभाळत, स्वत:च्या मुलींना मोठं करत, हळूहळू त्यांनी स्वत:ला समाजकार्यात वाहून घेतलं. सांगलीमध्ये पटेल चौक भागात त्या रहातात. सर्व जाती-धर्माच्या लोकांची ती वसाहत. भाग थोडासा मागासलेलाच अशिक्षत, अडाणी आणि त्याचमुळे समस्याग्रस्त लोकांचा वावर. या अशा भागात त्यांचे किराणा दुकान होते. साखर, चहा पावडर, साबण, बिस्किटं, गोळ्या अशा रोजच्या आवश्यक असणार्‍या गोष्टींसाठी असंख्य महिला दुकानात येत असत. माल आणि पैशांची देवाण-घेवाण करता करता, त्यांच्या दु:खाची, समस्यांची, घरच्या कटकटींची देवाण-घेवाण व्हायला लागली. लीलाताईंचे साधे रहाणे, सोज्वळ चेहरा पाहूनच महिला आपोआपच आपले मन मोकळे करायला लागल्या.

पतीची व्यसनाधीनता, सासरच्या लोकांकडून होणारा छळ, हे सगळे या महिला सांगायच्या. दारू, तंबाखू अशांच्या सेवनाने होणारे दुष्परिणाम या महिलांच्या दु:खी चेहर्‍यावर दिसायचे. आज कुणाच्या नवर्‍याने मारझोड केली, शिवीगाळ केली, लहान मुलांसमोर चप्पल फेकून मारलं, अशा शारीरिक आणि मानसिक वेदनांनी विव्हळणार्‍या महिलांचे क्लेश ऐकून लीलाताईंचे मन कळवळायचे. अशा या महिलांसाठी आपण कााहीतरी केलंच पाहिजे असा त्यांनी निश्चय केला.

या निश्चयाला पतीची साथ, मैत्रिणींची संगत आणि मनाचा दृढ निश्चय लाभल्यामुळे कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांचे कार्य जोमाने सुरू झाले.

महिलांवरील अत्याचार, संकट, त्यांच्या मनातील सर्व प्रकारची भीती कमी होण्यासाठी त्या प्रथम निर्भर झाल्या पाहिजेत. त्यासाठी मुलींना शिक्षण तर द्यायलाच हवे, त्याचबरोबर त्यांना त्यांच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे. हे लीलाताईंच्या कार्याच्या सुरुवातीचे ध्येय होते.

महिलांना बचतीची सवय लागावी म्हणून त्यांनी भिशी मंडळ सुरू केले. त्या माध्यमातून संघटन करीत त्यांनी महिला चळवळ सुरू केली. या चळवळीला दिशा कशी द्यायची? याची त्यांना कल्पना येईना. म्हणून त्यांनी सांगलीतील समाजकार्य करणार्‍या प्रभाताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू केले. त्यामुळे त्यांना दिशा मिळाली, अनुभवही आला. त्याच अनुभवाच्या जोरावर अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभारला. हे काम एकटीकडून होणारे नव्हते. त्यामध्ये त्यांना प्रभाताई सूर्यवंशी, प्रा. हेमलताबेन कोठारी, मणिबेन शहा, डॉ. लता देशपांडे या महिला नेत्यांचे सहकार्य आणि बळ मिळाले. यानंतर या सार्‍याजणींनी मिळून जणू काही अन्यायाविरुद्ध बंड पुकारले. सांगलीमध्ये किंवा आसपासच्या कुठल्याही खेडेगावात, महिलांवर कोणत्याही प्रकारच्या संकटाची चाहूल जरी लागली तरी एकवटून, त्या पीडित महिलेल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून लढा दिला. त्या महिलेला सर्वतोपरी मदत केली.

लीलाताईंच्या असे लक्षात आले की नवरा व्यसनी असला की त्या महिलेला जास्त त्रास होतो. सगळ्या कुटुंबालाच वाळवी लागते, संसाराला कीड लागते. सगळ्या घरादाराचे नुकसान होते. त्याचा समाजजीवनावरही परिणाम होतो. त्या घरातील लहान मुलांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यांचे शिक्षण थांबते, वाईट सवयी लागायला वेळ लागत नाही. त्यामुळेच बाल गुन्हेगार, बाल कामगार वाढायला लागतात. अशा परिस्थितीत घरातील महिलेची अवस्था खूप दयनीय होते. दारुड्या नवर्‍यामुळे घरी येणारा तुटपुंजा पगार पुरत नाही, वाढत्या महागाईमुळे पैशाचे नियोजन करण्याचा मोठा प्रश्‍न तिच्यासमोर उभा राहतो. मुले ऐकत नाहीत. त्यामुळे तिचे मन:स्वास्थ्यही बिघडते. घरच्यांना खाऊ घालण्याच्या नादात ती उपाशीपोटी काम करत रहाते.
अशा महिलांच्या नवर्‍यांचे दारूचे व्यसन सुटावे म्हणून नुसता उपदेश उपयोगाचा नाही, हे लीलाताईंना ठाऊक होते. त्यांनी चक्क दारुगुत्त्यांवर छापा टाकून, दारूचे अड्डे उद्ध्वस्त करायचे ठरवले. सांगलीमध्ये न भूतो न भविष्यती असे नाट्य घडले.
सांगलीच्या शिकलगार गल्लीत यल्लाप्पा आणि लाली या हातभट्टी दारूच्या दोन गुत्तेदारांनी दारूविक्री करण्याचा हैदोस घातला होता. त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाल्याच्या तक्रारी या परिसरातील अनेक महिला, महिला न्याय आंदोलन समितीकडे वर्षभर करत होत्या.

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे कार्यक्रमानंतर, समितीच्या महिला गुपचूपपणे, पोलिसांना गुंगारा देऊन, संध्याकाळी मोर्चा काढून शिकलगार गल्लीतील हातभट्टीच्या दारूच्या दोन गुदामावर गेल्या. त्यांनी गुदामावर हल्ला केला. त्या रणरागिणींनी कुलूपे तोडली आणि आतमधील दारूने भरलेले २५फुगे बाहेर काढून दारू रस्त्यावर ओतून टाकली. दारूने भरलेले बॅरलही ओतून टाकले. आपले होत असलेले नुकसान पाहून लालीच्या कुटुंबातील महिलांनी हाणामारी सुरू केली. त्यामध्ये लीलाताई आणि शकुंतला पाटील यांना मुकामार लागला. हा प्रकार सुरू असताना बघ्यांची गर्दी जमली होती. त्यावेळी लीलाताईंनी ‘आज ही आंदोलनाची नांदी असून शहरातील संपूर्ण हातभट्टी दारूचे गुत्ते उद्ध्वस्त करू’ असा कडक इशारा दिला. सांगलीसारख्या शहरात, जिथे ग्रामीण लोकांचे वर्चस्व आहे, अशा ठिकाणी या प्रकारचे आंदोलन करणे म्हणजे मोठे धाडसाचे काम होते.
लीलाताईंनी श्रमिक महिला संघटनेच्या अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. आटपाटीसारख्या लहान गावामध्ये महिलांवर विविध प्रकारचे अत्याचार होत आहेत, हे लक्षात आल्यावर आटपाडी तालुक्यात त्यांनी आणि सहकार्‍यांनी विविध उपक्रम राबविले. पत्रकारांशी या विषयावर संवाद साधताना लीलाताई म्हणाल्या, ‘‘महिलांच्या दुर्बलतेचा गैरफायदा घेऊन त्यांचा शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या छळ करण्याचे प्रकार आटपाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. छळ करणार्‍यांना पाठीशी घालण्याचा राजकीय मंडळींचा प्रयत्न असतो, तर दबावाद्वारे त्या दडपून टाकण्यासाठी पोलीस खाते क्रियाशील असते. अशा पीडित महिलांवर होणारे अत्याचार यापुढे सहन केले जाणार नाहीत.’’ राजकारणी आणि पोलीस यंत्रणा यांच्याबद्दल असे ठामपणे, स्पष्टपणे ठणकावून सांगण्याचे धाडस लीलाताईंमध्ये आहे. त्यातून त्यांची सत्यासाठी आणि अन्यायाविरूद्ध लढण्याची वृत्ती दिसून येते.

डॉ. दाभोळकरांसारख्या, हुशार, विचारी आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणार्‍या थोर व्यक्तीची नुकतीच हत्या झाली. सांगलीमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ बरीच वर्षे सुरू आहे. कितीतरी अघोरी प्रथा अजूनही सुरू आहेत. समाजविघातक गोष्टी घडू नयेत, यासाठी लीलाताई कार्य करत असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने अखंड प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी २५ महिलांसह शंभरावर लोकांनी आंदोलन केले. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या मागणीसाठी सांगली शहरात मोठा मोर्चा काढला. जिल्हाधिकार्‍यांना त्याबाबतचे निवेदन देण्यात आले. समितीने अंधश्रद्धा निर्मूलनाची एक सनद तयार करून शासनाला सादर केली. पण शासनाकडून या सनदेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी खूप टाळाटाळ आणि दुर्लक्ष केले गेले.

अंधश्रद्धा म्हणजे फक्त मांजर आडवे जाणे, काळे मांजर दिसणे, पापणी फडफडणे अशुभ मानणे एवढेच नाही. खेड्यापाड्यांमध्ये महिलांना या बाबतीतही खूप त्रास दिला जातो. त्यांच्यावरच बंधनं लादली जातात. उदाहरण द्यायचे झाले तर काही विशिष्ट कारणासाठी स्त्रियांना जटा ठेवाव्या लागतात. तिचे केस कितीही जरी लांब असले तरी ते स्वच्छ करायचे नाहीत. धुवायचे नाहीत, वेणी घालायची नाही. उलट हळद-कसलासा चीक लावून ते जास्तच कठीण करायचे. त्या तशा विचित्र अवस्थेत तिने तो भार मानेवर आणि डोक्यावर घेऊन वावरायचे, जगायचे, आयुष्य काढायचे. सांगली जिल्हा श्रमिक महिला संघटनेतर्फे २७ सप्टेंबर १९९२ या दिवशी, जटा निर्मूलन कार्यक्रम हाती घेण्यात आला. वडर वसाहतीतील सौ. आक्काताई रामचंद्र कुसाळे आणि शारदा राजाराम नाईक यांचे जटा निर्मूलन झाले. यामध्ये लीलाताई आपल्या महिला सहकार्‍यांसमवेत उपस्थित होत्या.
डॉ. दाभोळकरांनी चालू केलेले अंधश्रद्धा निर्मूलनाचे व्रत लीलाताई आणि त्यांचे सहकारी नेटाने पुढे नेत आहेत.

महिलांच्या हक्कासंदर्भातही लीलाताई आणि त्यांच्या श्रमिक महिला संघटनेतर्फे सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. जिल्ह्यात महिलांवर होणारे अत्याचार, अन्याय, परितक्त्या आणि विधवा महिलांच्या प्रश्नांची लवकरात लवकर सोडवणूक व्हावी अशी निवेदनात मागणी केली होती.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या इतर सदस्यांनी एका मांत्रिकाची बुवाबाजी, महिलांना होत असणारी मारहाण उघडकीस आणली. बडोद्याजवळच्या एका गावातील महावीरदादा नावाचा मांत्रिक सांगलीमध्ये येऊन राहिला होता. होमहवन, पूजा, शांती करणे, भूत उतरवणे असे प्रकार तो करत होता. भूत काढण्याच्या नावाखाली त्याने सांगलीतील गुजराती समाजाच्या तीन महिलांना अमानुष मारहाण केली होती. लीलाताई आणि त्यांच्या साथीदारांनी या भोंदूबाबाची भोंदूगिरी त्या ठिकाणी जाऊन उघडी पाडली. इथून पुढे भूत-पिशाच्च काढण्याच्या फंदात पडणार नाही, कोणालाही अमानुषपणे मारहाण करण्यास उद्युक्त करणार नाही, असे त्याने सर्वांसमक्ष समितीला लिहून दिले. समितीच्या कार्यकर्त्यांनी या प्रकाराची माहिती मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात निरीक्षकांना दिली.
लीलाताईंच्या या संघटनेला कोणाचीही मदत मिळत नाही. सरकारचे अनुदान तर नाहीच नाही. शिवाय मदत मागायला, समस्या घेऊन जी महिला येते ती आधीच त्रस्त असते. तिच्या स्वत:चे असे काही पैसे नसतात. त्यामुळे लीलाताईंनाच तिला सर्वतोपरी मदत करावी लागते. रिक्षात घालून स्वखर्चाने पोलीस स्टेशनला न्यावे लागते. एखाद्या केसमध्ये शंभर ते दोनशे रुपयांची पावती फाडली जाते. अर्थातच तीही लीलाताईंच्या पैशानेच. संपूर्ण केस निस्तरेपर्यंत अशा तर्‍हेने खर्च वाढत वाढत जवळजवळ पाचपट होतो. पण लीलाताई त्याबद्दल तक्रार करत नाहीत. उलट त्या म्हणतात, ‘‘सुदैवाने माझी घरची परिस्थिती चांगली आहे.’’ खरोखर, केवढा हा मनाचा मोठेपणा! अशा नि:स्वार्थीपणाची पावती कुठे ना कुठे मिळतेच या त्यांच्या सामाजिक कामाची पावती म्हणून शासनाकडून त्यांची नियुक्त ग्राहक संरक्षण समितीवर ५ वर्षे, दक्षिण रेल्वे बोर्डावर ५ वर्षे, महिला आर्थिक विकास महामंडळावर ७ वर्षे झाली. दोन वेळा नगरसेविका म्हणूनही त्या निवडून आल्या. मात्र दोन वेळा निवडून येऊनही कोणतेही पद त्यांना दिले गेले नाही याची लीलाताईंना मनस्वी खंत वाटते.

लीलाताईंना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. सावित्रीबाई फुले पुरस्कार, अहिल्याबाई होळकर पुरस्कार, आदर्श महिला रत्न पुरस्कार, सांगली नगरपालिकेचा आदर्श महिला पुरस्कार या सगळ्यामध्ये राजमती अक्काच्या नावाने मिळणारा ‘आदर्श माते’चा पुरस्कार जेव्हा लीलाताईंना मिळाला. तेव्हा त्यांना खूप धन्य वाटले. कारण लीलाताईंच्या शिक्षणाची सुरूवात करणार्‍या, त्यांच्या सामाजिक वाटचालीची सुरूवात करणार्‍या त्या गुरू होत्या. त्यामुळे त्याक्षणी कृतार्थ झाल्याची भावना लीलाताईंची आहे.
समर्थ रामदासांनी संसार करून समाजकार्य करावे, संसार करून परमार्थ साधावा असे सांगितले आहे. लीलाताईंनी तोच आदर्श समोर ठेऊन कार्य केले आहे. ज्ञानदान करणार्‍या आपल्या शिक्षक पतीला संसारामध्ये साथ दिली, आपल्या मुलामुलींवर योग्य संस्कार करून त्यांना त्यांच्या पायावर उभे केले. सांगली परिसरातील सर्व अडल्यानडल्यांचा त्या आधारवड झाल्या आहेत. त्यांच्या कृपाछत्राखाली कितीतरी जणी सुखाने नांदत आहेत. कितीतरी जणींच्या दु:खी चेहर्‍यावर हसू फुलले आहे आणि अनेक संसार मोडकळीला आले असतानाही पुन्हा सावरले आहेत. अशा या मूर्तीने लहान पण कीर्तीने महान असलेल्या सांगलीच्या माऊलीला शतश: प्रणाम! ----

अंजली दिलीप गोखले
चैतन्य अपार्टमेंट, वाटवे गल्ली,
ब्राह्मणपुरी, मिरज - ४१६४१०
चलभाष ः ९२७२४९६३८५

स्त्रोत: मिळून साऱ्याजणी

अंतिम सुधारित : 4/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate