भारतातील रुढीवादी पुरुषप्रधान अडथळ्यातून वाट काढत सर्वप्रथम स्त्रियांना शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्यात नव संजीवनी, नव दिशा देण्याचे कार्य करणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंच्या शिष्या आज देशभरातील कानाकोपऱ्यात आपल्या क्षेत्रामध्ये यशोशिखरावर पोहोचल्या आहेत. विशेष म्हणजे स्त्री शिक्षणाची गंगोत्री सर्वप्रथम महाराष्ट्रातूनच प्रवाहित झाली आहे. त्याच महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाच्या कार्याबरोबरच इतर क्षेत्रात देखील देशपातळीवर आपल्या कार्याला वाहून घेत आपली वेगळी ओळख निर्माण करीत आहे. परंतु दुर्देव असे की, त्या पडद्यामागेच असतात.
प्रसिद्धीच्या झोतात कधी येतच नाहीत. या लेखाच्या माध्यमातून सावित्रीबाईंच्या अशाच एका शिष्येची ओळख करुन देण्याचा हा प्रपंच आहे. जी राजधानी दिल्लीत गेल्या 28 वर्षांपासून स्वतः शाळा सुरु करुन नि:स्वार्थ भावाने गरीब होतकरु मुलांना शिक्षण देण्याचे कार्य करीत आहे.
देशाच्या संविधानाने सर्वांनाच शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे. परंतु दर्जेदार शिक्षण द्यायचे झाल्यास खाजगी शाळेत प्रवेश द्यायचा म्हटले तर खर्च झेपण्यापलिकडे. अशा विवंचनेत असलेल्या गरीब आणि मध्यवर्गींय पालकांच्या मुलांना श्रीमती शारदा मॅडम त्यांच्या मॉडर्न पब्लिक स्कूलमध्ये सहज प्रवेश देतात. ऐनकेन कारणांनी जर दुसऱ्या शाळांमध्ये प्रवेश नाकारला गेल्यास अशा विद्यार्थ्यांसाठी ही शाळा खुली आहे.
शारदा डोलारे-कांबळे असं त्यांचं नाव आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील म्हळगी या छोट्याशा गावी अनुसूचित जातीत त्यांचा जन्म झाला. शिक्षणाची लहानपणापासून आवड होती. दहावीत असतांना म्हणजे वयाच्या पंधराव्या वर्षी लग्न होऊन दिल्लीत आल्या. मोठ्या भावाने केवळ जावई दिल्लीत सरकारी नोकरी करतो म्हणून लग्न करून दिलं होतं.
जिथे त्या राहत होत्या तिथे तळ मजल्यावर शाळा होती, त्यांचे पती ऑफिसला गेले असता, त्या शाळेतील शिक्षक त्यांना विचारायला आले आपण आमच्या शाळेत शिकवणार का ? त्या सांगतात, मी अवाक झाले. मी थोडी घाबरली, मला नाही जमणार अस उत्तर मी त्यांना दिलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा ते विचारायला आलेत, तुम्हाला 150 रूपये प्रतिमाह पगार देऊ. ते म्हणाले, शिकवणी काही कठीण नसते तुम्हाला जमेल पण शारदा मॅडम म्हणाल्या, मला तर धड हिंदीही बोलता येत नाही मग मी कसं शिकवणार त्यावर ते शिक्षक म्हणाले, येता-येता येऊन जाईल काळजी करू नको, हे सर्व तर त्यांच्यासाठी नवीनच होते. त्यांचे पती कार्यालयातून आल्यावर त्यांना सर्व किस्सा ऐकविला आणि विचारले काय करू त्यांनी प्रोत्साहन दिले. काही दिवस शिकवून बघ जमले तर ठीक आहे. तेव्हापासून त्यांचा शिक्षिका बनण्याचा प्रवास सुरू झाला. सुरूवातीला विद्यार्थ्यांना शिकविणे म्हणजे तारेवरची कसरत वाटत होती, ते काय बोलायचे कळेनासे व्हायचे परंतु जस-जसा वेळ जात गेला तस-तसं सर्व सुरळीत होत गेलं आणि चांगलं जमायलाही लागलं.
त्यांचे शिक्षण जेम-तेम दहावीपर्यंतच होते. आता ते त्यांना फारच अपुरे वाटू लागले. म्हणून मग पुढचे शिक्षण पूर्ण करायचे ठरविले आणि बी.एस.सी. बीएड केले. या दरम्यान त्यांचा मोठा मुलगा पंकज जन्मला. असाच एक दिवस त्यांच्या डोक्यात विचार आला, दुसऱ्यांच्या शाळेत नोकरी करण्याऐवजी स्वत:ची शाळा सुरू करावी. गरीब, हुशार तसेच ज्याला कुठल्याही शाळेत प्रवेश मिळणार नाही. अशा विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश द्यावा आणि सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली करावी.
दक्षिण दिल्लीतील मसुदपूर या वस्तीत सुरूवातीला त्यांनी दोन खोल्यांमध्ये भाडेतत्त्वावर शाळेची 1987 मध्ये मुहुर्तमेढ रोवली. फळा, चॉक्स आणि काही चॉकलेट्स घेऊन त्या शाळेत जायच्या. परिस्थिती हलाखीची होती त्यावेळी बसची तिकीट 50 पैसे होते, ती वाचविण्यासाठी त्या पायी जात असत. सुरूवातीला एक-दोन असे करता-करता आज जवळपास 750 विद्यार्थी त्यांच्या शाळेत आहेत. त्यांचा दुसरा मुलगा चंदन आठ दिवसाचा होता तेव्हापासून त्यांनी शाळेत जाऊन शिकवायला सुरूवात केली. कारण शाळा हे त्यांचे स्वप्न होते. ते प्रत्यक्षात उतरत होते त्यामुळे एक-एक दिवस त्यांच्यासाठी महत्त्वाचा वाटत होता. दिवस-रात्रचा विचार न करता त्या सतत आपल्या ध्येयाप्रती प्रयत्नशील होत्या.
फक्त जास्तीत-जास्त मुलांपर्यंत शिक्षण पोहचले पाहिजे हेच त्यांचे ध्येय होते. दिवसेंदिवस शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढत चाललेली होती. जुनी मसुदपूरची जागा आता अपुरी होत होती. त्यामुळे मोठी जागा असणे गरजेचे वाटत होते. सुरूवातीला नर्सरी ते पाचवीपर्यंत शाळा होती. पालकांची मागणी होती पुढचे वर्गही सुरू करावे. म्हणून नवीन जागा घेणे आता फारच गरजेचे झाले होते. त्यासाठीच जवळच वसंतकुंज मध्ये जागा घेऊन बांधकाम केले. मागच्या सत्रापर्यंत सातवीपर्यंत शाळा होती या सत्रात दहावीपर्यंत होणार आहे. शाळेचे बांधकाम आताही सुरूच आहे.
बांधकाम पूर्ण झाले की नवीन सर्व फर्निचर शाळेकरिता बनवायचे आहे असे शारदा मॅडम सांगतात. आता त्यांचा एकच ध्यास त्यांच्या उराशी आहे. ते म्हणजे शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे त्यासोबत शिक्षणाला पोषक अशा वातावरणाची निर्मिती करणे. आपला अनुभव त्या सांगत होत्या, एक विद्यार्थी असा आला होता जो मादक पदार्थाचे सेवन करायचा. त्याला व्यसनातून मुक्त करविले, आज तो आपल्या पायावर उभा आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. हे सर्व घडतांना आपला खारीचा वाटा या विद्यार्थ्यांचे आयुष्य बनवायला मदत होत आहे. ही सर्वात समाधानाची बाब आहे.
शारदा मॅडमची शाळाही आर्मीचे अधिकारी-कर्मचारी जिथे मोठ्या संख्येने राहतात त्या परिसरात आहे. त्यामुळे सर्वच राज्यातील मुलं-मुली त्यांच्या शाळेत शिक्षण घेतात. शाळेतील शिक्षक-शिक्षिकाही भारतातील विविध राज्यातील आहेत. कुणी काश्मिरी, कुणी पंजाबी तर कुणी महाराष्ट्रीय. शाळेत सीबीएससीचा अभ्यासक्रम शिकविला जातो. जेणेकरून विद्यार्थ्यांना शाळा सोडताना त्रास होणार नाही. विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना माफक दरात ने-आण करण्याकरिता बसची सोयही आहे.
रोज सकाळी पाच वाजता त्यांचा दिवस उजाडतो. घरातील सर्व कामे आटपून सकाळी सातच्या ठोक्याला शाळेत पोहचतात. सकाळी सात ते आठ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसोबत बॅडमिन्टन खेळतात, नंतर शाळेच्या प्रार्थनेला सुरूवात होते. दुपारी 1:30 ला शाळा सुटते मात्र शारदा मॅडमला शाळेतून निघता-निघता पाच सहज वाजतात. असा त्यांचा दिनक्रम असतो. व्यस्त दिनचर्या असूनही त्यांच्या चेहऱ्यावर सतत स्मित हास्य आणि उत्साह दिसतो.
वसंत कुंजमध्ये आज शारदा मॅडमच्या शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींना त्यांच्या शाळेबद्दल अभिमान वाटतो. जीवनाच्या कुठल्याही वाटेवर आपण खंबीर उभे राहू, असा आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर झळकतो.
लेखक - अंजु निमसरकर,
माहिती अधिकारी,
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली
09899114130
anjuykamble15@gmail.काम
माहिती स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 4/15/2020
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
अकोल्यातील मुर्तीजापूर तालुक्याच्या निंभा गावातील ...
राष्ट्रीय संरक्षणासाठी ज्या जवानांनी लष्करी सेवा क...
साक्षरतेच्या राष्ट्रीय प्रमाणापेक्षा स्त्री साक्षर...