অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सरपंच आपल्या दारी

सरपंच आपल्या दारी

विकासाच्या ध्येयाने झपाटलेली माणसं ही गाव विकासाची खरी प्रेरणास्थानं असून असाच एक नाविन्यपूर्ण उपक्रम जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील ऐनपूर गावानं राबविला आहे. “सरपंच आपल्या दारी, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी” असं या उपक्रमाचं नाव असून यादिवशी सरपंचासह सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन तेथील लोकांच्या समस्या समजून घेतात आणि तिथल्या तिथे त्या समस्यांचे निराकरण करतात. गाव विकासाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोंचवतात.

ऐनपूर ग्रामपंचायतीची स्थापना २४ ऑक्टोबर १९४२ रोजी झाली. गावची लोकसंख्या ७६१९. गावात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहातात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं ऐनापूर हे गाव सातपुडा पर्वतापासून हाकेच्या अंतरावर तापी नदीकाठी वसलं आहे. निसर्गसंपन्न अशा या गावाचा शेती हा प्रमुख व्यवसाय. गावात केळी उत्पादनही मोठ्याप्रमाणात होते.

गाव संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान, निर्मलग्राम आणि तंटामुक्त ग्राम अभियानात पुरस्काराने सन्मानित. लेक वाचवा मोहीमेअंतर्गत गावानं मुलीला जन्म देणाऱ्या मातेचा सत्कार करीत मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याची पद्धत गावात रुढ केली.
लोकसंख्येएवढी वृक्षलागवड, प्लास्टिक बंदी, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, सौरपथदिवे, करवसुली अशा पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेतील निकषांची पुर्तता करून गावाचा शाश्वत आणि पर्यावरणपूरक विकास करण्याचे गावाने निश्चित केले आणि गावात जनजागृती करण्यात आली.

गावात १०० टक्के कुटुंबाकडे शौचालये आहेत.. गावाची लोकसंख्या ७६१९ आणि गावानं झाडं लावली १४,५००. त्यातील ९६०० झाडं जगवण्यात गावाला यश आलं. या योजनेनं ग्रामपंचायतीची करवसुली ८५ ते ९० टक्के एवढी वाढली. गावातील प्रत्येक घराच्या सांडपाण्यावर परसबाग फुलवण्यात आली आहे. गावात १२० बायोगॅस आहेत. गावातील एकूण कुटुंबापैकी १० ते १२ टक्के कुटुंबाकडे सौर उर्जा उपकरणे आहेत. पहिल्या दोनवर्षीचे निकष गावानं यशस्वीरित्या पूर्ण केले असून यावर्षी ग्रामपंचायतीचे नाव पर्यावरण विकासरत्न पुरस्कारासाठी प्रस्तावित आहे.

गावात उत्सवमुर्तीचे विसर्जन पर्यावरणपुरक पद्धतीने करण्यात येते. यात जिल्हा परिषद मतदारसंघ निहाय तपासणीत गावाने प्रथम क्रमांक मिळवला असून यशवंत पंचायतराज अभियानात देखील गावाला पुरस्कार मिळाला आहे. गावात १५ टक्के कुटुंबाकडे तर गावातील १०० टक्के पथदिवे सी.एफ.एलचे आहेत.

शाहु-फुले- आंबेडकर दलित वस्ती विकास सुधारणा अभियानात गावाने जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवलातर यशवंत पंचायत राज अभियानात जिल्ह्यात दुसरा.

पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेनं गावात पर्यावरणस्नेही आणि शाश्वत विकासाच्या कामांना वेग येत असून त्यामुळे गावातील लोकांचीही निसर्गाशी आणि पर्यावरणाशी मैत्री होतांना दिसत आहे.
गावात पूर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयाच्या माध्यमातून शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. लोकसहभागातून गावात वाचनालयाचे बांधकाम करण्यात आले आहे.

लोकसहभाग ही गाव विकासाची गुरुकिल्ली आहे. याचा आधार घेत विकासाला लागलेले ताळे उघडून गावाला विकासाकडे घेऊन जाता येते हा मंत्र गावाने आत्मसात केल्याने प्रत्येक योजनेत, अभियानाच्या अंमलबजावणीत गावातील लोकांचा सहभाग हा खुप महत्वाचा ठरतो हा स्वानुभव सरपंच विकास अवसरमल आणि ग्रामविकास अधिकारी प्रितम शिरतुरे यांनी सांगितला आहे. पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना गावाच्या आणि आपल्या पुढच्या पिढीच्या आरोग्यसंपन्न आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे हे समजल्यामुळे गावाने या योजनेला भरभरून प्रतिसाद दिला आहे.

लेखिका : डॉ. सुरेखा म. मुळे

स्त्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 1/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate