অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चाळीसगावातील तरुणांनी उभारली मानवतेची भिंत

चाळीसगावातील तरुणांनी उभारली मानवतेची भिंत

आजची तरुणाई ही असंवेदनशील, व्यक्तीकेंद्रीत अशी हेटाळणी होत असतांना चाळीसगाव शहरातील प्रबुद्ध नगर येथील समविचारी तरुणांनी एकत्र येऊन मानवतेची भिंत हा अभिनव उपक्रम राबवून या टिकेला चोख उत्तर दिले आहे.

आपल्यासाठी तर सर्वच जण जीवन जगतात. पण दुसऱ्याबद्दल विचार करणारी माणसे समाजात तुरळकच. दुसऱ्याच्या दु:खात आपले दु:ख मानणाऱ्या, दुसऱ्याबद्दल सहानुभुती दाखवणाऱ्या माणसांमध्ये मानवता शिल्लक आहे असे म्हटले जाते. समाजऋण फेडणे ही कल्पना मनात येणे छानच पण प्रत्यक्ष कृती करणे हे अत्यंत अवघड. विचाराला कृतीची जोड मिळाली तर अशक्य असे कोणतेही काम राहत नाही. जात-पात, धर्माच्या पलिकडे जात मानवता हाच खरा धर्म मानून मानवतेच्या भिंतीची निर्मिती चाळीसगावातील तरुणांनी केली आहे.

मानवतेची भिंत या उपक्रमांतर्गत जुने नवे कपडे गोळा करुन गरजूंना ते मोफत देण्यात येत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या आदर्श उपक्रमाची माहिती त्यांना मिळाली. महानगरामध्ये राबविला जात असलेला हा उपक्रम आपण राहत असलेल्या गावात राबविणे गरजेचे आहे, हा समाजशील विचार ह्या तरुणांच्या मनात निर्माण झाला. त्याला प्रत्यक्ष कृतीची जोड देत ही भिंत उभारण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांच्या ह्या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

‘गरज असेल तर घेऊन जा, आणि नसेल तर देऊन जा’ तरुणांनी उभारलेल्या मानवतेच्या भिंतीवरील ही ओळ शहरवासियांचे लक्ष वेधून घेत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात सिग्नल चौकाजवळ हा समाजपयोगी उपक्रम राबविला जात आहे. कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी न करता हा उपक्रम गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. त्याला समाजशील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून शहरातील गल्ली, वस्त्यांवर फिरुन अडगळीत पडलेल्या कपड्यांचे ह्या तरुणांनी संकलन केले. जमा झालेल्या कपड्यांचे गरजू लोकांना मोफत वाटप करण्यात येत आहे. ह्या चांगल्या उपक्रमाला मदत म्हणून इतरही हात पुढे येत आहेत. आतापर्यंत शेकडो लोकांना थंडीपासून बचाव व्हावा म्हणून उबदार कपडे देण्यात आले आहेत. हा उपक्रम सुरु करण्यापूर्वी शहरातील नागरिकांना ह्या अभिनव उपक्रमाची माहिती देऊन अडगळीत पडलेले कपडे देऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला अनेकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळेच ह्या उपक्रमाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली.

गेल्या तीन महिन्यांपासून कपड्यांचे संकलन सुरु होते. कपडे मुबलक प्रमाणात जमा झाल्यानंतर ते कपडे घेऊन शहरातील मध्यवर्ती भागात मानवतेची भिंत उभारण्यात आल्याची माहिती या उपक्रमात सहभागी तरुणांनी दिली. ही मानवतेची भिंत गोर-गरीब, गरजू घरातील कुटुंबांतील नागरिकांसाठी मोठा आसरा ठरत आहे. ह्या समाजपयोगी उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून इतरही सामाजिक संघटनांनी सहकार्यासाठी पुढे येण्याचे आवाहन ह्या तरुणांनी केले आहे.

आजची तरुण पिढी ही आत्मकेंद्रीत असल्याचा नकारात्मक सूर समाजात उमटत असताना तरुण काय करु शकतात हे मानवतेची भिंत या उपक्रमातून दाखवून दिले आहे. मानवतेची भिंत ह्या फलकावर असलेले छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानवांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. महापुरुषांचे विचार फक्त डोक्यावर घेण्यासाठी नसून ते डोक्यात घेणे महत्त्वाचे आहे, ह्या महापुरुषांना अभिप्रेत असलेल्या समाज निर्मितीसाठी असे उपक्रम राबविणे गरजेचे आहे, असा संदेश प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून समाजाला देण्यात हे तरुण यशस्वी ठरले आहेत. राहुल चव्हाण, विवेक बागुल, वसिम पठाण, पिंटु राजपूत, युवराज पगारे, हर्षल जगताप, प्रतीक गाढे, मृणाल जगधने, प्रशांत बागुल हे तरुण या उपक्रमात सहभागी झाले असून त्याच्या यशस्वीतेसाठी झटत आहेत. ह्या उपक्रमा कडे बघता प्रसिद्ध कवी विं.दा करंदीकर यांच्या काव्य पंक्ती अत्यंत समर्पक ठरतात.
देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे..
घेता-घेता एक दिवस
देणाऱ्याचे हात घ्यावे...

ह्या उपक्रमशील तरुणांनी माणुसकीचा खरा वसा जपत प्रामाणिक प्रयत्नातून राबविलेला हा समाजपयोगी उपक्रम नक्कीच कौतुकास पात्र आहे.

लेखक - निलेश परदेशी
चाळीसगाव जि.जळगाव
स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 7/21/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate