ऐका हो ऐकाSSSSSSS
शाळकरी. . . गावकरी. . .
मानाचे मानकरी. . .
लहानग्यानो ऐका. . . मोठ्यांनो ऐका. . .
गावाच्या भल्याची एक चांगली गोष्ट ऐका. . .
झाडाचा उपयोग काय ?
आपल्या जगण्याला ऑक्सीजन देतं
आपल्याला शुद्ध हवा देतं
जमीनीत पाणी जिरवायला मदत करतं
उन्हा-तान्हात सावली देतं
आपल्याला, मुला-बाळांना फळ-फुल देतं
मग झाडं लावायची का तोडायची ?
लावायची SSSSS. .. लावायची . . .SSSSS
तर मग मित्रानो, आता आपल्या गावातल्या लोकांएवढी झाडं लावायची. . नुसतीच लावायची नाही तर ती जगवायची. . .
गावातील लोकांएवढी झाडं ?
अरे म्हणजे गावात जेवढे लोक तेवढी झाडं. . .
अस्स. . . अस्स. . . मग हे कवा सांगणार. . . .
तु पुर्ण ऐकशील तर नं. . . यामुळं काय होईल गावकऱ्यांनो, आपला गाव हिरवगार होऊन सुंदर दिस्सल अन् योजनेत भाग घेऊन , चांगलं काम केलं तर
तर काय?
अरे हो हो. . . किती घाई करशील?
बरं . . . . बरं. . .
तर आपल्या गावाला ईकासासाठी पैसा देखील मिळलं. . .
तर मग राबवायची ही योजना आपल्या गावात ?
व्हय. . . पण योजनेचं नाव तरी काय
पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना. . .
म्हणजी " इको व्हिलेज" म्हण की. . .
अरे वा. . . तुला तर योजनेचं इंग्रजी नाव बी माहितीय. .
मग, ती योजना हायच तशी झक्कास SSSSS गाव ईकासाची इतकी चांगली योजना दुसरी कुठलीच नसल बघ. . .
मग ठरलं तर. . . गावात ही योजना राबवायची, कर गोळा करायचा, प्लॅस्टिक बंदी करायची, गावातला कचरा साफ करून गाव स्वच्छ करायचे अन् गावातील सांडपाण्याचा पुनर्वापर करीत गाव हिरवगार करायचं. . . करणार नं. . . .
व्हय . . . व्हय करणार म्हणजे करणारच . . .
तर मग बायानों, बाबानो, शाळेतल्या मुलांनो,
इको व्हिलेज योजना गावात राबविण्याचा इचार करूया पक्का. . .अन् गावाच्या ईकासावर मारू या शिक्का. . . ऐका हो ऐका.SSSSSS
नशिरपूर गावात अशी मुनादी (दवंडी) झाली अन् सगळा गाव एक होऊन कामाला लागला. अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी तालुक्यातील नशिरपूर हे 110 उंबऱ्यांचं 382 लोकसंख्या असलेलं गाव. केंद्र शासनाची असो की राज्य शासनाची. गाव विकासाची कुठलीही योजना आली की, अशी मुनादी देऊन गावकऱ्यांना तिची सविस्तर माहिती दिली जाते. मग योजनेचा लाभ घेण्यासाठी, अभियानात आणि स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ग्रामसभेत चर्चा होते. अख्खा गाव एकत्र बसून गाव विकासाची दिशा ठरवतो.
अपर वर्धा धरणाच्या डाव्या- उजव्या कालव्याच्या मध्यभागी वसलेलं, स्वच्छ, समृद्ध आणि हिरवाईने नटलेलं गाव नशिरपूर.
उघड्यावर वाहणारी गटारे, अस्वच्छता आणि जागोजाग दिसून येणारा कचरा हे गावाचं चित्र पालटलं ते संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानाने. गावानं श्रमदानातून, विविध योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीतून सुधारणा घडवून आणली आणि गावाचं रुपच बदललं. आज गावात चांगली आरोग्य सेवा उपलब्ध असून पक्के रस्ते, पथदिवे आणि पाण्याची उत्तम सोय आहे. गावात स्वच्छता आहे म्हणून आरोग्य आहे. मागच्या 10 ते 12 वर्षात गावात एकाही साथीच्या रोगाची लागण झालेली नाही असं सांगतांना गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येणारा आनंद काही वेगळाच आहे.
गावात चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. एक अंगणवाडी आणि एक ग्रंथालयही आहे. स्वच्छता अभियानाने गावाला वैयक्तिक स्वच्छतेबरोबर परिसर आणि गाव स्वच्छतेचे संस्कार दिल्याने गाव एकदम स्वच्छ असून हिरवाईने नटलेला आहे.
पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत गावाने 600 झाडं लावली. त्यातली 450 झाडं जगली. सगळ्या झाडांना क्रमांक देण्यात आले असून 80 टक्के झाडांना ट्रीगार्ड आहे तर 20 टक्के झाडांना काटेरी कुंपण लावून त्यांचे रक्षण करण्यात आले आहे. गावात उत्तम कोंडवाडा आहे. गावच्या सभोवती, ग्रामपंचायतीच्या जागेत ही वृक्ष लागवड करण्यात आली आहे. शेतीविकासासाठी शाश्वत पाणी गरजेचे आहे हे लक्षात घेऊन सहकारी सोसायटीमार्फत कालव्यातून शेतीला पाणी पुरवठा केला जातो.
गावातील गाळ, कचरा गावाबाहेर एका खड्डयात जमा करण्यात येतो. त्याद्वारे गावातील शेतीसाठी कंपोस्ट खताची निर्मिती करण्यात येते. गावातील कर वसुली योजनेतील निकषानुसार असून ती 80 टक्के एवढी आहे. नशिरपूर गावाला कुपनलिकेद्वारे पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यासाठी हे पाणी एका टाकीत टाकून तेथून पाईपलाईन द्वारे पाणी घरापर्यंत पोहोचवले जाते. गावात एक दिवसाआड साधारणत: तीन हजार लिटरपर्यंत सांडपाण्याची निर्मिती होते. हे पाणी भूमीगत गटारातून गावाबाहेरील एका शेतात सोडण्यात आलं असून एका शेतकऱ्याची जमीन त्याद्वारे ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
चांगलं काम करायचं, योजनेत सहभागी व्हायचं आणि बक्षीस मिळवायचं ही आता गावची परंपरा झाली असून त्यासाठी प्रत्येक गावकरी प्रयत्नशील असतो. आतापर्यंत गावाला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम अभियान आणि तंटामुक्त ग्राम अभियानात, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत पुरस्कार मिळाले आहेत. कुटुंब कल्याण कार्यक्रमात चांगले काम केल्याबद्दल गावाला आबासाहेब खेडकर पुरस्कार देखील मिळाला आहे. गावात नावाला तंटा नाही. उदबत्ती, मेणबत्ती आणि शेळी उद्योगातून गावातील बचतगटांना स्वावलंबनाचा आर्थिक सुंगध लाभला आहे.
" एक गाव एक गणपती" परंपरेचा पुजक असलेल्या या गावात व्यसनाला प्रवेश नाही. गावकऱ्यांच्या मदतीने ग्रामपंचायत आवारात परसबाग तयार करण्यात आली असून आमच्या ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार संगणकावर केला जात असल्याचा अभिमान ग्रामसेवक श्री. वानखेडे आणि सरपंच श्रीमती संगीता ठाकरे यांच्या शब्दा शब्दांमधून डोकावत राहतो.
संगणकीकृत ग्रामपंचायतीचे फायदे आज गावातील लोकांना होत असून गावकऱ्यांना गावातच 3 ते 4 प्रकारचे दाखले उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम याची बचत होत आहे. ही संख्या आम्ही लवकरच वाढवणार असल्याचा विश्वास ग्रामसेवक श्री. वानखेडे यांनी व्यक्त केला आहे. गावात 10 सौरउर्जा प्रकल्प आणि 3 बायोगॅस आहेत. पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत गावाने सर्व निकषांची पुर्तता करून विकास कामांसाठी अनुदान मिळवले आहे.गावातील शेती चांगली आणि ओलिताखाली असल्याने मजुरांना गावातच बारमाही रोजगार मिळतो त्यामुळे गावातून कामासाठी इतरत्र स्थालांतर होत नाही.
खेडंगाव स्वंयपूर्ण होण्यासाठी गावांचा विकास कसा व्हायला हवा हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेत खुप चांगल्या पद्धतीने सांगितले आहे. गाव सुशिक्षित व्हावं, सुसंस्कृत व्हावं, ग्रामोद्योगांनी संपन्न व्हावं, गावानं देशाच्या गरजा भागवाव्यात आणि एक आदर्श गाव म्हणून प्रचारकाच्या रुपानं गावानं देशाच्या विकासाचे नेतृत्व करावी ही त्यामागची धारणा होती.महाराष्ट्रातील काही गाव राष्ट्रसंतांची हीच शिकवण समोर ठेऊन पुढे जात आहेत. म्हणूनच राज्य गेल्या दोन वर्षांपासून ग्रामविकासात देशात पहिल्या स्थानावर येत आहे, प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवत आहे. नशिरपूर ही अस्सच महाराष्ट्रातील एक सुंदर, समृद्ध आणि हिरवं गाव. . .
लेखिका :डॉ. सुरेखा मुळे
स्त्रोत: महान्यूज
अंतिम सुधारित : 11/1/2019
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे प्रमुख पर्यटनस्थळ आ...
प्राचीन इतिहासात अमरावती शहराचा उल्लेख महाभारतात आ...
शेतशिवारात उपलब्ध असलेल्या झाडांचा, वनस्पतींचा वाप...
अमरावती हा महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील एक जिल्ह...