गावानं ठरवलं तर गावं किती चांगलं काम करू शकतात याच चांगलं उदाहरण म्हणजे नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील झरी हे गाव. अवघ्या 870 लोकसंख्येच्या या छोट्याशा गावानं केलेली विकास काम पाहाता “गाव तसं छोटं, विकासात मोठं” असं म्हटल्याशिवाय राहावत नाही.
80 टक्क्यांहून अधिक कर वसुली करून गावानं विकास कामांसाठी लागणारी आर्थिक सक्षमता मिळवली. एवढेच नाही तर संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम अभियान, यशवंत पंचायतराज अभियान, पर्यावरण संरक्षित समृद्ध ग्राम योजना यासारख्या विविध अभियान आणि स्पर्धेत सहभागी होऊन अनेक पुरस्कार मिळवले. पुरस्कारातून मिळवलेल्या रकमेतूनही गावानं विकास कामांना गती दिली.
विसंवादातून सुसंवादाकडे गेलं की सुधारणांची किमया कशी साध्य होऊ शकते हे या गावानं दाखवून दिलं. यासाठी गावात आकाराला आला, तो सार्वजनिक विचार मंच. (ओटा) या मंचावर एकत्र येऊन गावानं आपापसातले मतभेद मिटवले आणि एकत्र येऊन गावाचा चेहरामोहरा बदलून टाकला.नांदेड मुख्यालयापासून 12 कि.मी अंतरावर असलेल्या या गावाला गुरु गोविंदसिंघजी यांचा गुरुद्वारा आहे.
स्वच्छतेत पुढाकार घेतलेल्या या गावानं सांडपाणी वाहून जाण्यासाठी बंद गटारं बांधली, काही ठिकाणी शोषखड्डे केले तर काही ठिकाणी सांडपाण्यावर परसबागा फुलवल्या. गावात सहा सार्वजनिक शौचालये आहेत. शाळां आणि अंगणवाडीतही शौचालयाची व्यवस्था आहे. गावातील 25 टक्के लोकांनी गोबर गॅस चा तर 100 टक्के कुटुंबाने निर्धूर चुलीचा वापर सुरु केला असून गावात सौर तसेच सी.एफ.एल दिवे लावले गेले आहेत. आज गावातील सगळे रस्ते सिमेंट काँक्रीटचे आहेत.
जिल्हा परिषदेने शाळेमध्ये संगणक आणि लॅपटॉपची सोय करून दिली असल्याने गावातील विद्यार्थी पहिलीपासून संगणक शिकत आहेत. ग्रामपंचायतीत देखील संगणकाचा वापर सुरु आहे. ग्रामपंचायतीला जिल्हा पातळीवर शाहु-फुले-आंबेडकर समता पुरस्कार मिळाला आहे. भौतिक विकासाबरोबर गावानं सामाजिक विकासालाही तेवढंच प्राधान्य दिलं आहे.
“चला, मुलीचे स्वागत करूया” असं म्हणत गावानं “लेक वाचवा” मोहीम हाती घेतली. 870 लोकसंख्या असलेल्या झरी गावात आज 418 पुरुष तर 452 महिला आहेत. लेक वाचवा मोहीमेचंच हे फलित म्हणावे लागेल.
बचतगटाच्या माध्यमातून गावातील महिला संघटित झाल्या असून त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तुंच्या विक्रीसाठी गावातच शॉपींग कॉम्लेक्स बांधण्यात आला आहे. गावात महिलांसाठी स्वतंत्र सभागृह आहे. त्यामध्ये महिलांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. गावात गरोदर माता, लहान बालके, किशोरवयीन मुली आणि अपंग व्यक्तीच्या आरोग्याची, त्यांच्या सकस आहाराची विशेष काळजी घेतली जाते.
वीज बचतीप्रमाणे पाणीबचतीत ही गाव अग्रेसर आहे. गावातील सर्व बोअर तसेच विहिरींचे पुनर्भरण करण्यात आले असून गावात, शेतीतील पाण्याच्या नाल्यांवर वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे भुजलाची पातळी वाढण्यास मदत झाली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून गावानं माती नाला बांध, वृक्ष लागवड, समतल चर खोदणे, नाला सरळीकरण यासारखी कामे केली आहेत.
गावाला तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते निर्मलग्राम पुरस्कार (23 मार्च 2006 ) मिळाला आहे. कामात सातत्य ठेवल्याने झरी ग्रामपंचायतीला मिळालेले इतर पुरस्कारही अभिमानास्पद आहेत.
पर्यावरण रक्षणासाठी गावात गायरान जमीनीवर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. श्रमदान आणि लोकसहभागातून पाच दलघमी घनमीटर क्षमतेचा तलाव गावात निर्माण करण्यात आला आहे.
आज सगळीकडे पाणी टंचाई असतांना या तलावात मात्र 3 दलघमी पाणी साठा उपलब्ध आहे. तलावामुळे गावातील अंदाजे 250 हेक्टर जमीन कायमस्वरूपी ओलीताखाली आली आहे.
तलावामुळे आसपासच्या दीड किमी परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत झाली असून बंद पडलेल्या कुपनलिका आणि गावातील विहिरींची पाण्याची पातळी चार ते पाच फुटांनी वाढण्यास मदत झाली आहे.
गावात अभिजित भोसले हे ग्रामसेवक म्हणून तर सौ. सत्यभामा शिवाजी चालगुरगे या सरपंच म्हणून काम पाहात आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विकास हेच ध्येय समोर ठेऊन एकदिलाने काम करणाऱ्या या गावाकडे पाहिलं की “आमचं गावं झरी- विकास गंगा घरोघरी” हा गावकऱ्यांच्या मनातला विश्वास आणि त्यासाठी केलेले प्रयत्न किती सार्थ ठरले आहेत, हे लक्षात येतं.
लेखिका - डॉ. सुरेखा मुळे
स्त्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 8/18/2020
नांदेड.. मराठवाड्यातील एक महत्त्वाचा जिल्हा. ऐतिहा...
बारड (जि. नांदेड) परिसर पूर्वी पानमळ्यासाठी प्रसिद...
नांदेड सेफ सिटी' या प्रोजेक्टद्वारे शहरातील महत्त्...
आवड, जिद्द आणि चिकाटी असेल तर कुठल्याही व्यवसायात ...