অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

म्हैसपालन केले फायदेशीर

आवड, जिद्द आणि चिकाटी असेल तर कुठल्याही व्यवसायात यश आपसुकच मिळते. शेती आणि दुग्ध व्यवसायास हीच सूत्रे लागू पडतात. अशाच प्रयोगशील पशुपालकांपैकी एक आहेत सांगवी (बोरगाव, ता. देगलूर, जि. नांदेड) येथील माधव गुंडुरे. मुक्त संचार गोठा व्यवस्थापनामुळे म्हशींचे आरोग्यही चांगले राहिले; दुग्धोत्पादनात वाढ मिळाली आणि म्हशींच्या व्यवस्थापन खर्चात बचत झाली.

सांगवी (बोरगाव, ता. देगलूर, जि. नांदेड) येथील माधव गंगाधरराव गुंडुरे यांची अवघी वीस गुंठे शेती. जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण असल्याने नोकरीची संधीही नाही. क्षेत्र कमी असल्याने त्यांनी उपजीविकेसाठी गावातच छोटेसे किराणा दुकान सुरू केले. उपलब्ध वीस गुंठे क्षेत्रावर पीक लागवड करण्यापेक्षा चार वर्षांपूर्वी गुंडुरे यांनी म्हैस पालन करण्याचे ठरविले. यासाठी कमी खर्चात चार म्हशींसाठी गोठा बांधला. नगर जिल्ह्यातील घोडेगाव बाजारातून त्यांनी एक जाफराबादी आणि एक मुऱ्हा म्हैस खरेदी केली. दुकान सांभाळतच म्हैसपालन सुरू केले. उर्वरित क्षेत्रात चारा पिकांची लागवड केली. त्यांच्या गावापासून दहा किलोमीटरवर देगलूर हे गाव आहे. तेथील लोकांशी संपर्क साधून दररोज 10 लिटर दुधाचे रतीब सुरू केले. दुधाच्या चांगल्या गुणवत्तेमुळे दरही चांगला मिळाला. दुधाला मागणी वाढू लागली. नफाही चांगला मिळू लागला. म्हशींचे व्यवस्थापन गुंडुरे स्वतः आणि त्यांचा मुलगा कृष्णार्जुन करू लागले. गेल्या चार वर्षांत हळूहळू पैसे जमवत गुंडुरे यांनी म्हशींची संख्या वाढविली. म्हशींची संख्या वाढू लागल्याने त्यांनी सगरोळी (जि. नांदेड) येथील कृषी विज्ञान केंद्रातील पशुतज्ज्ञांशी संपर्क साधून शास्त्रीय पद्धतीने मुक्त संचार गोठा बांधला.

मुक्त संचार पद्धतीने म्हशींचे व्यवस्थापन

1) सध्या गुंडुरे यांच्याकडे तीन मुऱ्हा, एक जाफराबादी, एक पंढरपुरी व दोन मराठवाडी अशा एकूण सात म्हशी आहेत. 
2) पूर्वी बांधलेल्या गोठ्याचा पुरेपूर उपयोग करीत गुंडुरे यांनी 25 फूट x 30 फूट जागेभोवती गॅबियन जाळी व लोखंडी अँगलचा उपयोग करून साडेचार फूट उंचीचे कुंपण तयार केले. 
3) वैरणीसाठी लागणारी गव्हाण व पिण्याच्या पाण्याची टाकी मुक्त संचार गोठ्यात बांधली. हौदास नॉन रिटर्निंग व्हॉल्व्ह बसविला आहे, यामुळे टाकीत पाणी सतत उपलब्ध राहते. म्हशी गरजेनुसार पाणी पितात. 
4) दूध काढण्याच्या वेळा (सकाळी व सायंकाळी) वगळता म्हशी गोठ्यात मोकळ्या फिरत असतात. 
5) पहाटे पाच वाजता गोठ्यातील कामकाज सुरू होते. म्हशींना धुवून, गोठा साफ केला जातो. त्यानंतर दूधदोहन करताना म्हशींना खुराक दिला जातो. प्रति लिटर दुधामागे अर्धा किलो खुराक दिला जातो. खुराकामध्ये शेंगदाण्याची पेंड, सरकीची पेंड, मका, ज्वारी, हरभरा कुटार दिले जाते. दूध काढल्यानंतर म्हशी परत मुक्त गोठ्यात सोडल्या जातात. 
6) एका म्हशीला दिवसभरासाठी सुमारे 30 किलो हिरवा चारा, सहा किलो वाळलेला चारा कुट्टी करून गव्हाणीत दिला जातो. त्यामुळे चारा वाया जात नाही, म्हशी गरजेनुसार चारा खातात. 
7) म्हशींना मुक्त संचार गोठ्यात फिरण्यासाठी, पाणी पिणे, वैरण खाण्यासाठी आणि रवंथ करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जातो. म्हशी शांत राहून जास्तीत जास्त रवंथ करतात. दिवसभर गोठ्याकडे कुणी जात नाही. जेवढ्या म्हशी शांतपणे रवंथ करतील, तेवढे दुधाचे उत्पादन चांगले मिळते. पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने म्हशींना लसीकरण आणि रेतन केले जाते. 
8) सायंकाळी सहानंतर पुन्हा म्हशी गोठ्यात घेऊन दूध काढले जाते. गुंडुरे म्हशींचे दूध काढताना गोठ्यात बासरीवादन, शहनाईवादन लावतात. त्यामुळे म्हशी शांत राहतात, दूध काढताना त्रास देत नाहीत, असा त्यांचा अनुभव आहे. 
9) सध्या सात पैकी तीन म्हशी दुधात आहेत. बाकीच्या गाभण आहेत. एक जाफराबादी म्हैस दिवसाला 11 लिटर, मुऱ्हा म्हैस 12 लिटर आणि मराठवाडी म्हैस सात लिटर दूध देते. गुंडुरे यांचा मुलगा कृष्णार्जुन रोज सकाळी गाडीवरून देगलूर गावात तीस लिटर दुधाचे रतीब घालतो. 
10) प्रति लिटर 50 रुपये दराने दूध विक्री केली जाते. दुधाची गुणवत्ता चांगली असल्याने ग्राहकांकडून दुधाला कायम मागणी आहे. प्रति दिन दूध विक्रीतून त्यांना 1500 रुपये मिळतात. त्यातून चाऱ्याचा खर्च, गाडीसाठी पेट्रोल, स्वतःची मजुरी आणि इतर व्यवस्थापन खर्च साधारणपणे 700 रुपये होतो. खर्च वगळता रोज 800 रुपये नफा राहतो. 
11) गुंडुरे दरवर्षी 10 ट्रॉली शेणखत विकतात. एक ट्रॉली 1400 रुपयाने विकली जाते. यंदाच्या वर्षी गुंडुरे यांनी गांडूळ खत उत्पादनाला सुरवात केली आहे.


पशुखाद्यात ऍझोलाचा केला समावेश

म्हशींच्या खुराकाचा खर्च कमी करण्यासाठी गुंडुरे यांनी ऍझोला उत्पादनास सुरवात केली आहे. त्यासाठी योग्य आकाराचे सहा वाफे तयार करून ऍझोलाचे उत्पादन घेतले जाते. याची तांत्रिक माहिती कृषी विज्ञान केंद्राकडून मिळाली. प्रत्येक म्हशीस रोज दोन किलो ऍझोला सकाळी खाद्यात मिसळून दिला जातो. यामुळे खनिज मिश्रणे व अंबोणावरील खर्च 25 टक्‍क्‍यांनी कमी झाला. तसेच दूध उत्पादनातही वाढ झाली.

चारा लागवडीचे नियोजन

म्हशींना पौष्टिक हिरवा चारा वर्षभर उपलब्ध होण्यासाठी गुंडुरे यांनी 18 गुंठे क्षेत्रात फुले यशवंत व फुले जयवंत या चारा पिकाची लागवड केली. गोठा धुतल्यानंतर वाहून जाणारे पाणी व मलमूत्र हे चारा पिकास दिले जाते. यामुळे चारा पिकाची चांगली वाढ होते. हिरव्या चाऱ्यामुळे म्हशींचे आरोग्य चांगले राहिले, दुग्धोत्पादन वाढले.

गोठ्याबाहेर दररोजचा कृषी सल्ला

कृषी विज्ञान केंद्राद्वारे मोबाईलवरून पाठविण्यात येणाऱ्या कृषी सल्ल्याचा उपयोग परिसरातील शेतकऱ्यांना व्हावा यासाठी गुंडुरे यांनी गोठ्याबाहेर "कृषी सल्ला' फलक लावला आहे. कृषी विज्ञान केंद्राचा कृषी व पशुपालनविषयक संदेश दररोज फलकावर लिहिला जातो.

मुक्त संचार गोठा फायद्याचा...

1) मुक्त संचार गोठ्यामुळे जनावरांना व्यायाम मिळतो. जनावरे मोकळी असल्याने गरजेनुसार चारा खातात, पाणी पितात. मजूर कमी लागतात. गोठा बांधणीचा खर्च कमी आहे. 
2) या पद्धतीमुळे जनावरांना कासदाह, गोचिडांचा त्रास, खुरांच्या जखमा होत नाहीत. दुग्धोत्पादनात 10 टक्‍क्‍यांनी वाढ दिसून येते. 
3) व्यायाम मिळाल्याने जनावरे नियमित माजावर येतात. गाभण राहतात. त्यांचे आरोग्य चांगले राहाते. 

संपर्क - 
माधव गुंडुरे - 9096424668. 
डॉ. गजानन ढगे (पशुतज्ज्ञ) - 9423139923. 
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी, जि. नांदेड येथे विषय विशेषज्ञ,(पशुवैद्यक शास्त्र) म्हणून कार्यरत आहेत)

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate