অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बारीपाडाचे चैत्राम पवार यांची झेप

बारीपाडाचे चैत्राम पवार यांची झेप

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दुर्गम असा बारीपाडा हा वनवासीपाडा. या पाडयाची सन 1992 पूर्वीची परिस्थिती म्हणजे उजाड, ओसाड माळरान ,पिण्यासाठी घोटभर पाणी नाही. लांब-लांब पर्यंत हिरव्या पानांचा ठिकाणा नाही, शेतात पीक नाही , निरक्षरता, व्यसनाधिनता यांनी ग्रासलेला हा पाडा. पण 1992 नंतर हे चित्र पार बदल आहे. गांवात मोठया उमेदीने आणि दुर्दम्य आशावादाने एकजण उभा राहिला. ते म्हणजे चैत्राम पवार. त्याला गावातल्या आदिवासी मावळयांनी साथ दिली. अनेकांच्या मार्गदर्शनाने व श्रमदानाने सुरु झाली.

बारीपाडाच्या विकासाची लोकचळवळ. बारीपाडयाने जगातील 78 देशांमध्ये चांगले गाव कसे असावे याविषयी झालेल्या तज्ज्ञांच्या सर्व्हेमधून प्रथम क्रमांक चीनच्या एका गावाला तर व्दितीय पुरस्कार भारताच्या बारीपाडा या पाडयाला मिळाला आहे. त्याचबरोबर बारीपाडा प्रकल्पास अत्यंत मानाचा समजला जाणारा IFAD या आंतरराष्ट्रीय संस्थेचा पुरस्कार मिळालेला आहे. चैत्राम पवार व गावक-यांच्या श्रमदानातून व दैदिप्यमान यथाशक्तीमधून उभे राहिलेल्या बारीपाडा या आदिवासी पाडयाची यशोगाथा.

या चळवळीचा आधारस्तंभ चैत्राम पवार म्हणतात अजुन बारीपाडाचा विकास व्हायंचा आहे, बारीपाडयाच्या विकासासाठी गावक-यांच्या सल्लामसलतीने गावक-यांसाठी काही कडक नियम घालून घेतले. त्यात चराईबंदी, कुराडबंदी, दारुबंदी याचे कोणीही उल्लंघन केले तर त्यांच्याकडून मोठया प्रमाणात दंड वसूल केला जातो. यापूर्वी झालेल्या विकासाविषयी ते म्हणतात की, बारीपाडा हा पाडा 1992 पूर्वी उजाळ माळरान होते.

गावाच्या शेजारी 445 हेक्टर वन जमिनीवर लोकसहभागातून जंगल वनसंवर्धन होत आहे. जैविक विविधता निर्माण करण्यात यश मिळाले. त्यासाठी गावाने गावांसाठी काही कठोर नियम तयार केले. त्यामुळे अनेक प्राण्यांना, पक्षांना हक्काचे जंगल मिळून दुर्मिळ वनौषधी तसेच वनस्पती यांचे संवर्धन झाले.

पाण्याचे दुर्मिक्ष असलेल्या या परिसरात गावक-यांच्या श्रमदानातून 470 पेक्षा जास्त दगडी बंधारे, सलग समतल चर तसेच जंगलातील घनदाट झाडांमुळे पाण्याची पातळी वाढली . त्यामुळे या गावांसह परिसरातील आठ गावांना पाणी पुरवठा होत आहे. ऐकाकाळी बारीपाडयासाठी मांजरी गावांतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असे परंतु आता बारीपाडयातून 8 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. पाण्याच्या मुबलक पुरवठयामुळे बागायती पिकांचे प्रमाण वाढले. यात चारसूत्री भातशेती नागली यांचे विक्रमी उत्पादने होऊ लागले. तसेच ऊस, कांदा, बटाटा यासारख्या नगदी पिकांचेही उत्पादन होऊ लागले आहे.

गेल्या वर्षापासून स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वीपणे सुरु झाला आहे असे अनेकवीध शेतीतील प्रयोग यशस्वीपणे राबवून बारीपाडा परिसरातील शेतक-यांसाठी मार्गदर्शकाची भूमिका वठवत आहे. पशुधनातही मोठया संख्येने वाढ होऊन शेळी पालन, कुकुटपालन ,म्हैसपालन, मत्स्यव्यवसाय यासारख्या शेतीपुरक व्यवसायाची जोड मिळाली आहे. रसायन विहीरीत गुळ तयार करणे, नागली पापड, दोर, पत्रावळी, दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती होऊ लागली त्याच बरोबर सुवासिक उंची बासमती, इंद्रायणी तांदुळ गावातच पॅक करुन मोठया शहरात विक्रीसाठी पाठवले जाऊ लागले.

गावाच्या विकासाचा मुख्य स्त्रोत म्हणजे शैक्षणिक विकास होय. प्रौंढासाठी रात्रशाळा सुरु करुन अक्षर ओळख, अंक ओळख्र केली जाऊ लागली. गावात जवळ जवळ बंद झालेली चौथी पर्यतची शाळा सुरु करण्यात आली शिक्षण न देणा-यास व शिक्षण न घेणा-यास दंड लावण्यात आला शिक्षणात शिस्त आली यामुळे पाडयावरील आदिवासीमुळे प्राध्यापक, डॉक्टर अधिकारी वर्गापर्यत पोहोचले आहेत. विकासाचे दुसरे साधन म्हणजे महिला बचतगट होय . ज्यावेळी महिला बचत गट ही संकल्पना माहित नव्हती त्यावेळी बारीपाडयात दोन महिला बचत गट सुरु झाले. आज ते गट 18 वर्षापेक्षा जास्त काळापासून नियमित सुरु आहेत. त्यासोबत पुरुष बचत गटही सुरु आहेत.

गावात महिला सशक्तीकरण, व्यसनमुक्ती, सकस आहार, स्वच्छता, जलसाक्षरता, शौचालयाचा वापर, आरोग्यासबंधी जागृतीचे उपक्रम राबविले जाऊ लागले. पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण, मुलांचे लसीकरणाचा सातत्याने आग्रह असतो. पुरुषामधील कुटूंबकल्याणाचे प्रमाण 50 टक्के पेक्षा जास्त आहे. गावात देशबंधू मंजू गुप्ता फौंडेशनच्या सहकार्याने गावांत सौर कुकर वापराचा प्रयोग सुरु आहे. आयआयटीचे विवेक काबरा , मुंबई यांनी तयार केलेल्या कुकरचे 50 युनिट गावात आहे. सामुदायिक कार्यासाठी एक मोठे युनिट ज्यात 25 लोकांचे अन्न शिजू शकते तेही अस्तित्वात आहे. बायोगॅस निर्मीतीची 3 सयंत्र कार्यान्वीत असून त्यापासून गावासाठी वीज निर्मितीची प्रक्रिया सुरु आहे.

गावात नाविन्यपूर्ण वनभाजी स्पर्धा, सामुदायिक विवाह यासारखे कार्यक्रम राबवून मुळात अबोल, लाजऱ्‍या असलेल्या आदिवासी महिलांना बोलते केले. त्या पाककलेत निपुण झाल्यात व पाककला स्पर्धेत सहभागी होवू लागल्या. बारीपाडयाचे नाव सात समुद्रापलीकडे गेल्यामुळे आज विदेशातूनही लोक भाजी स्पर्धा पाहण्यासाठी बारीपाडा येथे येतात. काही विदेशी विद्यार्थी व विद्यार्थीनी पीएचडीच्या अभ्यासासाठी बारीपाडा येथे येतात असे अभिमानाने चैत्राम पवार सांगतात. मूर्ती लहान असली तरी किर्ती महान आहे. आपल्या कार्याची दखल घेवून विदेशात 13 पुरस्कार प्राप्त झालेले व वेळोवेळी बारीपाडयात केलेल्या कामाची माहिती विदेशी जनतेला देण्यासाठी व पुरस्कार स्वीकारण्यासाठी अनेक देशात भ्रमण केलेले चैत्राम पवार आजही साधे भोळे असून त्यांचे पाय जमिनीवरच आहेत.

 

लेखक संकलन : जगन्नाथ पाटील, जिल्हा माहिती कार्यालय,  धुळे

स्त्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 3/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate