विकासाच्या झंझावातामध्ये मानव पर्यावरणाचे महत्व विसरत चालला आहे. पर्यावरणाचे असंतुलन झाल्यामुळे अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. पर्यावरणाचे संतुलन राखून विकासाचा वेगही मंदवायला नको.. या भूमिकेतून शासन विविध प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शतकोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
काही गावांनी या कार्यक्रमातून गावातील ई-क्लास जमिनीवर वृक्ष लागवड करून पर्यावरण समृद्धीचा संदेश दिला आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला गावानेही हाच आदर्श ठेवीत ई-क्लास जमिनीवर शतकोटी वृक्ष लागवड करून व यशस्वीपणे वृक्ष जीवंत ठेवून गावाला पर्यावरण समृद्धीचे नंदनवन केले आहे.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आमला विश्वेश्वर गावाने शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवडीअंतर्गत ई-क्लास जमिनीवर 5 हेक्टर क्षेत्रामध्ये वृक्ष लागवड केली. सन 2011-12, 2013-14 वर्षात एकूण 6 हजार 600 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. हे सर्व काम गट लागवड केली असल्यामुळे त्यामध्ये सन 2011-12 ची वृक्ष लागवड तिसऱ्या वर्षात, 2012-13 ची वृक्ष लागवड दुसऱ्या वर्षात तर 2013-14 ची कामे चालू वर्षात सुरु आहे. तसेच या अंतर्गतच वृक्ष लागवडीचे संगोपनही करणे सुरु आहे.
आमला विश्वेश्वरमध्ये 5 हेक्टर एवढ्या मोठ्या क्षेत्रावर 6 हजार 600 वृक्षांचे संगोपण करतांना ग्रामपंचायतीने एक शक्कल लढविली, ती म्हणजे या वृक्षरोपांना केलेल्या सामुहिक कुंपनाची. पण, त्यासाठी तारेचे कुंपन किंवा कोटेरी कुंपन लागणार होते. कुंपनावरचा होणारा खर्च मोठ्या प्रमाणावर होणार होता. त्याचा विचार करता गट विकास अधिकारी, कनिष्ठ अभियंता व तांत्रिक अधिकारी यांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी केली. त्याठिकाणी वृक्षांचे गुरांपासून संरक्षण करण्याला प्राधान्य देण्यात आले.
वार्षिक आराखडा तयार करतांना त्यामध्ये या कामाचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला. या कामाला ग्रामसभेची मंजूरीही मिळाली. त्यानुसार आराखड्यात प्रस्तावित असलेल्या कामानुसार ग्रामपंचायत आमला यांनी ग्रामपंचायतचा ठराव घेऊन पंचायत समिती स्तरावर कामाचा प्रस्ताव सादर केला. त्यानंतर तांत्रिक अधिकारी यांनी स्थळाची पुन्हा पाहणी करुन शासनाच्या निर्देशानुसार अंदाजपत्रक तयार केले. त्याला कनिष्ठ अभियंत्यांनी तांत्रिक मान्यता दिली. तसेच अंदाजपत्रक ग्रामपंचायतच्या स्वाधीन करण्यात आले.
आमला (वि) येथील मजुरांनी कामाची मागणी केल्यानंतर सेल्फवर असलेले 'गुरे प्रतिबंधक चर' हे काम देण्यात आले. त्यानंतर कामावर मोठ्या प्रमाणावर मजुर उपलब्ध झाले. सुरु झालेले काम एकूण 19 आठवडे चालले. हे काम सुरु असतांना शासनाच्या निर्देशाचे काटेकोर पालनही करण्यात आले.
वृक्षलागवडीला गुरांपासून संरक्षण होण्याच्यादृष्टीने चराची रुंदी 1.90 मि. 1 मि. खोल व तळाची रुंदी 0.60 मि. आकाराचा चर संपूर्ण वृक्षलागवडीभोवती खोदण्यात आला. या संपूर्ण चराची लांबी 1495.35 एवढी आहे. या संपूर्ण कामावर एकूण 882 मनुष्यदिन रोजगार निर्मिती झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मजुरांना काम उपलब्ध झाले. काम करतांना मजुरांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. या कामावर एकूण 3 हजार 528 रुपये एवढा कुशल खर्च करण्यात आला व 1 लाख 42 हजार 844 एवढा अकुशल खर्च करण्यात आला. संपूर्ण कामावर एकूण 1 लाख 46 हजार 372 खर्च करण्यात आला.
ग्रामपंचायत आमला विश्वेश्वर येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेत ई-क्लास पडीत जमिनीवर एकूण 5 हेक्टर क्षेत्रावर 6 हजार 600 वृक्षांची लागवड केली आहे. या वृक्षांचे संगोपन करीत असतांना प्रत्येक झाडाभोवती काटेरी फास लावून त्यांना कुंपण करणे शक्य नव्हते. या लागवड केलेल्या 6600 वृक्षांच्या सभोवताली एकाच वेळी 1495.35 मि. लांबीचे गुरे प्रतिबंधक चर खोदल्यामुळे या वृक्षांचे संगोपन करणे शक्य झाले. परिणामी मोकाट गुरांपासून वृक्षांचे संरक्षण होत आहे.
वृक्ष लागवडीचे मोकाट गुरांपासुन संरक्षण होण्यासाठी खोदण्यात आलेल्या गुरे प्रतिबंधक चरामुळे 2 प्रकारचे उद्दिष्ट साध्य झाले. वृक्ष लागवडीच्या संरक्षणासोबतच जलसंधारण व मृदसंधारणाचा महत्वाचा उद्देश आपसूकच साध्य झाला.
एकंदरीत संपुर्ण वृक्षलागवडीला 1495.35 मि. लांबीचे चर खोदण्यात आले. चराची रुंदी 1.90 मि., खोली 1 मि. व तळाची रुंदी 0.60 मिटर ठेवण्यात आली. चर मोठा असल्यामुळे पावसाचे येणारे पाणी वाहून न जाता त्यामध्ये त्या पाण्याचे संचयन झाले. चरामधून पाणी सलग वाहून न जाता साचत राहिले. यासाठी दर 10 मिटर नंतर सेक्शन तयार करण्यात आले. त्यामुळे पाणी चरातून वाहून न जाता ते त्याच ठिकाणी साचल्या गेले व त्याच ठिकाणी मुरवण्याचे काम मोठ्या प्रमाणात झाले. परिणामी, जलसंधारणाचे महत्वपूर्ण काम होत भूजलाची पातळी वाढली.
ग्रामपंचायतीने 5 हेक्टर क्षेत्रावर केलेल्या वृक्षलागवडीमुळे या क्षेत्रातील वाहून जाणारे पाणी गुरे प्रतिबंधक चरामुळे अडवून पुनर्भरण करण्यात आले. या 5 हेक्टर क्षेत्रातील पाणी जमिनीत मुरवल्या गेल्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. पर्यायाने विहीरीच्या पाण्याच्या पातळीतसुद्धा वाढ झाली.
पाणलोट क्षेत्रातील शेतीच्या सिंचन क्षेत्रात वाढ झाली. वाहून जाणारे पाणी अडविल्याने पाण्यासोबत होणारी मातीची धूप थांबल्यामुळे मृदसंधारण झाले. वाहून जाणाऱ्या सुपीक मातीचे संचयन करण्यात आले. 5 हेक्टर क्षेत्रावरील 6600 झाडांनी संरक्षणाकरीता कुंपण करण्यासाठी काट्यांकरीता होणारी वृक्षतोड थांबली.
अशाप्रकारे शतकोटी वृक्ष लागवड, लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपणासाठी लढविलेली गुरे चराई प्रतिबंधक चर तसेच त्यामधून झालेले जलसंधारण यामुळे आमला विश्वेश्वर अचानक राज्याच्या उल्लेखनिय कार्य करणाऱ्या गावांच्या यादीत आले. आमला गावाने या प्रयत्नांमधून निश्चितच पर्यावरण समृद्धीचा संदेश दिला आहे.
लेखक - निलेश तायडे, प्र. सहाय्यक संचालक,
विभागीय माहिती कार्यालय, अमरावती
स्त्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 7/22/2020