डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने हा बंधारा विकसित केला आहे. नालापात्रात उपलब्ध असलेल्या दगडांचा वापर करून कोकण विजय बंधारा बांधता येतो; त्यासाठी कुशल कारागिरांची गरज भासत नाही. बंधारा बांधल्यानंतर त्याच्या वरच्या बाजूस म्हणजेच पाण्याकडील बाजूस प्लॅस्टिक अस्तरित केल्यास दगडांच्या पोकळ्यांतून होणारी पाण्याची गळती कमी करता येते. ज्या नाल्यावर बंधारा बांधावयाचा आहे, त्याचा उतार तीन टक्क्यांपेक्षा कमी असावा. बंधाऱ्याच्या खालच्या व वरच्या बाजूस नाला सरळ असावा. नाल्यास सुस्पष्ट काठ असावेत. नाल्याची उंची एक ते दोन मीटर असावी. लोकसहभागातून अशा प्रकारचे बंधारे साखळी पद्धतीने बांधल्यास प्रभावीपणे जलसंधारण करता येईल.
फायदे
1) नाल्यातून वाहून जाणाऱ्या मातीची धूप थांबते.
2) पाणी अडविलेल्या जलसाठ्याचा वापर रब्बी पिकास सिंचनासाठी करता येतो.
3) भूगर्भात पाण्याचे पुनर्भरण होऊन परिसरातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते.
4) दुबार पिकांखालील क्षेत्रात वाढ होण्यास मदत होईल.
वनराई बंधारा हा एक कच्च्या बंधाऱ्याचा प्रकार आहे. हे बंधारे नदी-ओहोळांवर बांधले जातात. ज्या ठिकाणी पाण्याचा साठा अधिक होऊ शकेल आणि वाहणाऱ्या पाण्याचे कमी रुंदीचे पात्र लक्षात घेऊन हा बंधारा घातला जातो. यासाठी सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यांमध्ये वाळू भरून, पिशव्या शिवून बंधाऱ्यासाठी वापरल्या जातात.
नदीपात्रामध्ये पाण्याच्या प्रवाहास आडव्या अशा रीतीने सांधेमोड पद्धतीने पिशव्या रचल्या जातात. वनराई बंधाऱ्याच्या बांधणीसाठी जागेची निवड हा महत्त्वाचा भाग आहे. प्रथम नालापात्राची पाहणी करून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त जलसाठा करणे शक्य होईल, अशी जागा निवडावी. नालापात्र अरुंद व खोल असावे, जेणेकरून साठवणक्षमता पुरेशी होईल. नालापात्राचा उतार तीन टक्क्यांपेक्षा जास्त नसावा.
नालापात्रास स्पष्ट काठ असणे जरुरीचे आहे. वनराई बंधाऱ्यासाठी निवडलेली जागा वळणालगतची असू नये. गावोगावी श्रमदानातून अत्यंत कमी वेळेत आणि कमी खर्चात वनराई बंधारे बांधून जलसाठे निर्माण करता येतील.
संपर्क - 02358- 280558
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
नालापात्रामध्ये जलसंधारणासाठी बंधारा कसा बांधावा य...
समाधानकारक दर नाही म्हणून हताश होऊन बसण्याऐवजी कोल...
वायु, अग्नी, जल, भूमी आणि आकाश यांना आपण पंचमहाभूत...
वनराई बंधारा हा एक कच्च्या बंधाऱ्याचा प्रकार आहे. ...