অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

निर्धाराने सुटला पाणीप्रश्‍न

गाव झाले टॅंकरमुक्त, विहिरींची पाणीपातळीही वाढली

एकीचे बळ आणि इच्छाशक्तीच्या जोरावर सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्‍यातील विठ्ठलवाडीच्या ग्रामस्थांनी पाणीप्रश्‍न सोडवण्याचा निर्धार केला. गावच्या शिवारात बांधबंदिस्ती, पाणलोट क्षेत्रातील पाणी अडवणे, साठवण तलावातील गाळ काढणे यासारखी कामे केली. आज गाव टॅंकरमुक्त झाले आहे, तर परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीतही लक्षणीय वाढ झाली आहे.
माढा-सोलापूर रस्त्यावर माढ्यापासून सुमारे सहा किलोमीटरवरील विठ्ठलवाडी हे सतराशे लोकवस्तीचे गाव. पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्यासाठी कायम तहानलेले. दर वर्षी फेब्रुवारी-मार्च महिना आला, की गावात हमखास टॅंकर सुरू करावा लागतो. शेतीसाठीही हंगामी पाणी मिळते. खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांत पिके घेतली जातात. सुमारे सातशे हेक्‍टरपर्यंत शेतीक्षेत्र असलेल्या गावात 50 हेक्‍टरवर द्राक्ष आणि उर्वरित क्षेत्रावर सर्वाधिक उसासह अन्य पिके आहेत. उजनी धरणातील पाणी मिळते. मात्र त्याची फारशी शाश्‍वती नाही, त्यामुळे उपलब्ध पाण्यावरच सगळी भिस्त राहते.
ग्रामस्थ सरसावले
पाणीप्रश्‍नावर ग्रामस्थांनी मात करण्याचा निर्धार केला. गावातील पाणीपुरवठा विहिरीनजीक असलेला मस्के तलाव पाण्यासाठी चांगला स्रोत होऊ शकतो हे त्यांनी जाणले. मात्र त्यात गाळ साठला होता. या तलावातील गाळ काढल्यानंतर विहिरीची पाणीपातळी वाढणार हे निश्‍चित होते. त्यासाठी ग्रामस्थांनी श्रमदानाचा निर्णय घेतला. ग्रामपंचायतीनेही पुढाकार घेऊन ग्रामस्थांना त्याचे महत्त्व पटवून दिले. त्यात महिलांचाही लक्षणीय सहभाग राहिला आणि बघता-बघता कामाला सुरवातही झाली. या तलावातील सुमारे 3800 ब्रास गाळ काढण्यात आला. त्यानंतर या तलावात एक कोटी आठ लाख तीस हजार लिटर इतका पाणीसाठा होऊ शकेल एवढी त्याची क्षमता वाढली.

पाच फुटांनी वाढली पाणीपातळी

ग्रामस्थांनी तलावातील गाळ काढलाच शिवाय गावानजीक आणखी एक मोठा साठवण तलाव आहे, त्यातील गाळही काढला. एवढ्यावरच न थांबता, गावाच्या शिवारातील शेतात बांधबंदिस्ती केली. ओढ्यातील गाळ काढला, पाणलोट क्षेत्रातील पाणी अडवले. आज गावच्या पाणीपुरवठा विहिरींची पाणीपातळी वाढली. दर वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये पाच-सहा फुटांवर असलेली पाणीपातळी आज 10 फुटांपर्यंत पोचली आहे. त्याशिवाय या भागातील शेतकऱ्यांच्या विहिरीची पातळीही चार ते पाच फुटांनी वाढली आहे. दर वर्षी एक-दोन तास चालणारे वीजपंप आज चार तासांपर्यंत चालतात.

अद्याप गावाला टॅंकर नाही

दर वर्षी फेब्रुवारी-मार्च आला, की गावात टॅंकर सुरू करावाच लागे; पण आज जुलै महिना आला तरी पाण्याची पातळी स्थिर आहे. अद्यापही गावाला टॅंकर सुरू झालेला नाही. आताच्या कालावधीत पाऊस न झाल्यास मात्र टॅंकर सुरू करण्याची वेळ येणार आहे. मात्र दर वर्षीच्या तुलनेत यंदा चार महिन्यांपर्यंत पाणीपातळी चांगली टिकली आहे.

"सकाळ'चा मदतीचा हात

विठ्ठलवाडीत "सकाळ'च्या तनिष्का सदस्यांची नोंदणी केली होती. या महिलांनीही या कामात हिरिरीने सहभाग घेतला, तेव्हा "सकाळ'सह आर्यन बहुउद्देशिय संस्था आणि विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाने ग्रामस्थांच्या निर्धाराला मदत केली. गेल्या वर्षी उन्हाळ्यात तलावातील गाळ काढण्याचा प्रारंभ आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते झाला. "सकाळ'चे सोलापूर आवृत्तीचे सहयोगी संपादक दयानंद माने, व्यवस्थापक किसन दाडगे, प्रांताधिकारी महेश आव्हाड आदी या वेळी उपस्थित होते. "सकाळ'ने सकाळ रिलीफ फंडातून दोन लाख रुपये आणि विठ्ठलराव शिंदे कारखान्याने एक लाख रुपयांची मदत केली. गाळ काढण्यासाठी कारखान्याची काही वाहने आमदार शिंदे यांनी उपलब्ध केली.

विविध पुरस्कारांवरही विठ्ठलवाडीचे नाव

गावातील ग्रामस्थांच्या एकजुटीने काय होऊ शकते याचे दृश्‍यपरिणाम यंदाच्या वर्षी विठ्ठलवाडीतले ग्रामस्थ अनुभवत आहेत. लोकसहभाग वाढल्याने ग्रामस्थांतील एकजूटही वाढली आहे. गावच्या कोणत्याही प्रश्‍नावर एकी हेच उत्तर आहे हे गावाने सिद्ध केले आहे, त्यामुळेच तंटामुक्त गाव अभियान, पर्यावरण संतुलित गाव अभियान, निर्मलग्राम गाव अभियान यासारखे पुरस्कार विठ्ठलवाडीच्या नावावर झाले आहेत.

अशी आहेत विठ्ठलवाडीची वैशिष्टे

  • पिण्याच्या पाण्यासाठी स्वयंपूर्ण.
  • शेतीसाठीच्या पाण्याचा स्रोत वाढला.
  • गावात प्रत्येक घरात शौचालय.
  • वीजबचतीसाठी 22 सौर पथदिवे.
  • स्वच्छतेसह व्यसनमुक्ती, वृक्षारोपणसारख्या मोहिमेबाबत जागृती

पाच हजार वृक्षांची लागवड
गावचा परिसर मर्यादित असला, तरी वृक्षलागवडीचे महत्त्व सगळ्या गावकऱ्यांना माहीत झाले आहे, त्यामुळे गाव आणि गावच्या शिवारात रस्त्यावर मोकळ्या जागांवर सुमारे पाच हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने वृक्ष उपलब्ध केले. काहींनी स्वतःहून वृक्षलागवड केली.
गावच्या तलावातील गाळ काढल्यामुळे पाणीपातळीत वाढ झाली आहे. गावच्या पाण्याचा प्रश्‍न सुटलाच. शिवाय माझी स्वतःची विहीर या तलावापासून एक हजार फुटांवर आहे. दर वर्षी उन्हाळ्यात पाणी मिळत नव्हते, यंदा मात्र पाणी उपलब्ध झाले आहे.
हनुमंत जाधव, प्रभारी सरपंच, विठ्ठलवाडी, ता. माढा.
तलावातील गाळ काढल्यामुळे पाणीपातळी वाढली. काढलेला गाळ शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात टाकला, त्यामुळे जमिनीचा पोतही चांगला सुधारू लागला आहे. त्याचा अनुभव आम्ही घेतो आहोत.
बालाजी गव्हाणे, सदस्य, ग्रामपंचायत, विठ्ठलवाडी, ता. माढा
ग्रामस्थांच्या एकत्रित येण्याच्या मानसिकतेमुळे आणि सर्वांच्या सहकार्यामुळे आम्ही गावात जलसंधारणाची कामे करू शकलो. आज जून महिना आला, तरी पाण्याची टंचाई गावाला नाही. पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्‍नही सुटला.
रवींद्र अनभुले, आर्यन बहुउद्देशिय संस्था, विठ्ठलवाडी, ता. माढा.
गावतलावातील गाळ काढल्याने विठ्ठलवाडीतला पाण्याचा स्रोत चांगला वाढला. यंदा पाऊस नसल्याने अडचण झाली आहे; पण येत्या आठ-दहा दिवसांत पावसाची वाट पाहून आम्ही कारखान्याच्या वतीने पुन्हा काही गावात गाळ काढण्याची मोहीम सुरू करू.
बबनराव शिंदे, आमदार, माढा.

स्त्रोत: अग्रोवन १३ जुलै २०१४

 © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate