भूजल पुनर्भरणाच्या पद्धती सरकारी योजनांद्वारे गावपातळीवर, संघटितरीत्या व वैयक्तिकरीत्याही राबविता येतात. विविध मृद् व जलसंधारणाच्या उपचार पद्धतींमध्ये पाझर तलाव, भूमिगत बंधारे, माती व सिमेंट नाला बांध भूजलसाठा वाढविण्यासाठी उपयुक्त आहेत.
जलस्रोत आपल्या देशात भरपूर आहेत, पर्जन्यमानही चांगले आहे; परंतु आज आपण पावसाचे फक्त 29 टक्के पाणी वापरतो, 71 टक्के पाणी समुद्रात जाते. 29 टक्क्यांपैकी शेतीला 40 टक्के पाणी मिळते. आणि 60 टक्के पाणी वाया जाते. आजही आपण पावसाचे पाणी साठवून, पर्जन्यशेती आणि उपलब्ध पाणीसाठ्यात भर घालून, हे पावसाचे पाणी विहिरी - कूपनलिकांमध्ये सोडून त्यांचे पुनर्भरण करू शकतो. सध्याच्या काळात ओलित पिकांसाठी, तसेच पिण्याच्या पाण्यासाठी सतत उपसा होत असताना जल पुनर्भरण मात्र फक्त थोड्याच प्रमाणात होते असे दिसून येते.
शोषखड्डा : शेतातील वाहून जाणारे पावसाचे पाणी विशिष्ट पद्धतीचा वापर करून विहिरीत सोडून विहिरींचे पुनर्भरण करता येते. यासाठी शेतातून वाहत येणारे पाणी विहिरीच्या बाजूला काही अंतरावर 6 x 6 x 6 फूट आकाराचा शोष खड्डा करून साठवावे. या खड्ड्यात विहिरीच्या दिशेने एक लहान खड्डा 4 4 x 4 x 4फूट आकाराचा खोदावा. या खड्ड्यातून विहिरीत जोडणारा पाइप विहिरीच्या भिंतीपासून एक फूट पुढे राहील असा विहिरीत सोडावा. पाइपच्या आतील बाजूस लोखंडी जाळी लावावी. खड्डा प्रथम मोठ्या दगडांनी भरावा. वरच्या भागात लहान दगड, वाळू, कोळसा यांचे थर देऊन खड्डा भरावा. उतारामुळे वाहत येणारे पाणी मोठ्या खड्ड्यात जमा होते. पाण्याबरोबर काही प्रमाणात गाळही येतो. हा गाळ या खड्ड्यात जमा होतो. खड्डा पाण्याने भरल्यानंतर ते पाणी विहिरीकडील उताराकडे असलेल्या दुसऱ्या खड्ड्यात येते.
अशा प्रकारचा शोष खड्डा आपण आपल्या घरच्या कूपनलिकेजवळसुद्धा करू शकतो. त्याचप्रमाणे पावसाळ्यापूर्वी छप्पर व पन्हाळे स्वच्छ करून छपरावर पन्हाळीद्वारे पाण्याची साठवण करू शकतो, तसेच छपरावरील पाणी या खड्ड्यात सोडल्यास जमिनीमधील पाण्याची पातळी वाढविण्यास मदत होते.
ज्या भागात विहीर नसेल तेथे रिचार्ज पीट तयार करून छतावरील किंवा इतर ठिकाणचे पाणी जमिनीत मुरविता येते. हे पीट 2.5 मी. ते तीन मीटर खोल तसेच 1.5 ते तीन मीटर लांबी-रुंदीचे असावे. यात मोठे दगड, छोटे दगड, तसेच वाळू/ रेतीचा चाळा भरावा आणि त्याचा पृष्ठभाग कुठल्याही जाळीने झाकावा, जेणेकरून पाण्यासोबत येणारा कचरा यात जाणार नाही.
पाझर तलाव म्हणजे नैसर्गिक नाला अथवा ओढ्यावर आडवा बांधलेला किंवा पाणलोट क्षेत्रातून गोळा होणारा प्रवाह अडवून तो जास्तीत जास्त दिवस साठवून, तो जमिनीत मुरवून, त्या क्षेत्रातून भूजलाची पातळी वेगाने वाढविणाऱ्या बंधाऱ्यामुळे तयार होणारा जलाशय. पाझर तलावाचे बांधकाम करताना अशा पद्धतीने करावे, की पावसाळ्यात तलाव संपूर्ण भरावा आणि हिवाळ्यापर्यंत सर्व पाणी पाझरून आजूबाजूच्या विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत व्हावी. पाझर तलाव हा सच्छिद्र भूभागावर बांधला तरच त्याचे फायदे चांगले दिसून येतात.
जमिनीमध्ये पावसाचे पाणी मुरवून भूगर्भातील पाण्याचा साठा वाढविण्यासाठी प्रत्येकाने गावपातळीवर, शेतपातळीवर, तसेच आपल्या घराभोवती देखील पडणारे पावसाचे पाणी जमिनीमध्ये कसे मुरविता येईल, यासाठी विचार करून आवश्यक ती योजना कार्यान्वित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. साधारणतः जून महिन्यात जमीन सच्छिद्र असते, त्यामुळे सुरवातीला पावसाचे पाणी जमिनीत चांगले मुरते. आज जमिनीत मुरणारे पाणी आणि उपसले जाणारे पाणी यांचा समतोल राखणे गरजेचे आहे. जमिनीतील भूजल पातळी फार खोल गेली आहे. ती पूर्वस्थितीत आणण्यासाठी योग्य उपाय म्हणजे भूजल पुनर्भरण हाच आहे.
पाणलोट क्षेत्रात पावसाचे पाणी अडवून जमिनीत पाणी पुनर्भरणाची प्रक्रिया वेगाने व्हावी यासाठी पुनर्भरण चर हा एक महत्त्वाचा उपाय आहे. पुनर्भरण चरामुळे पाण्याचे स्रोत कायम होण्यासाठी मदत होते, शिवाय पाणी जमिनीच्या आत साठून राहिल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. ज्या पाणलोटात नाला, विहीर आहे, त्या नाल्याखाली पुनर्भरण चर खोदावयाचे असल्यामुळे नाल्याचा तळ चार ते पाच सें.मी.पर्यंत कच्च्या मुरमाचा असणे आवश्यक आहे. नाल्याची रुंदी 10 मी. एवढी असेल, तर नाल्यात 10 मी. रुंद आणि चार ते सात मी. खोलीचा खड्डा खोदावा आणि लांबी 20 ते 30 मी. उपलब्धतेनुसार असावी. शक्यतोवर गोल दगड वापरणे सोईचे होते. हे दगड 20 ते 50 सें.मी. व्यासाच्या आकाराचे असावेत. अशाप्रकारे पुनर्भरण चर खोदल्यास जमिनीत पाण्याचे पुनर्भरण जवळजवळ सहा ते आठ महिने सतत होत राहते.
--मदन पेंडके
(लेखक कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, परभणी येथे कार्यरत आहेत.)
-----------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
या वर्षीच्या कमी पावसामुळे सिंचनासाठी पाण्याची उपल...
दूरदर्शन सह्याद्री निर्मित उपलब्ध पाण्याचा कार्यक्...
उस शेतीमध्ये पाण्याचा कार्यक्षम काटेकोरपणे, नियोजन...