অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

निर्मिती सेंद्रिय रेशीम कापडाची...

पर्यावरणाच्या बाबतची जागृती आणि विविध रसायनाचा मानवाच्या आरोग्यावर होणारा परिणाम पाहता सेंद्रिय धाग्यांची मागणी जगभर मागणी वाढत आहे. शुद्ध आणि संमिश्र रेशीम कापड निर्मितीत विविध रसायनांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे वापर करावा लागतो. सेंद्रिय रेशीम कापड निर्मितीत कोणती रसायने वापरता येतात किंवा त्यांचा वापर टाळता येणे शक्‍य आहे. याबाबतची माहिती आजच्या लेखात घेत आहोत.
अलीकडे जगभरातील ग्राहकांची सेंद्रिय मालाबाबतची मागणी पाहता पर्यावरण आणि आरोग्यवर्धक सेंद्रिय रेशीम वस्त्रांची मागणी वाढत आहे. भारतातून जगभर शुद्ध व नैसर्गिक रेशीम वस्त्राची निर्यात 4150 कोटी इतकी आहे. त्यामुळे येत्या काळात सेंद्रिय कापडाची आणि रेशमाची निर्मिती पद्धतशीरपणे केल्यास फायदेशीर ठरू शकते. सेंद्रिय कापडांची मागणी दरवर्षी 25 टक्‍क्‍यांनी वाढत आहे.सेंद्रिय वस्त्रांच्या निर्मितीचे प्रमाणीकरण (कॉटन आणि लोकर) "इटालियन असोसिएशन ऑफ ऑरगॅनिक ऍग्रिकल्चर या संस्थेने इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑरगॅनिक ऍग्रिकल्चर मूव्हमेंट आणि युरोपियन रेग्युलेशन ऑन इको-लेबल आणि एनव्हायरामेंटल मॅनेजमेंट अँड ऑडिट सिस्टिम यांच्या प्रमाणीकरणानुसार सेंद्रिय पदार्थांसाठी नवीन प्रमाणीकरण ठरविले आहे. कोचीन येथील "इन्डोसर्ट' संस्था इटलीमधील सेंद्रिय संघटनेच्या सहकार्याने रेशीमसाठी सेंद्रिय प्रमाणीकरणाची नियमावली बनवीत आहे.

सेंद्रिय रेशीमनिर्मिती करताना


रेशीम निर्मिती मुळातच शेतीपूरक व्यवसाय आहे. रेशीम अळ्यांचे संगोपन तुतीच्या झाडांचा पाला वापरून करावे लागते. त्यातून निर्माण होणाऱ्या रेशीम कोषापासून धागानिर्मिती आणि पुढे कापडनिर्मिती होते. म्हणजेच सेंद्रिय रेशीमनिर्मितीसाठी तुती लागवड, त्याची जोपासना आणि रेशीम अळ्यांचे संगोपन पद्धतीमध्ये सेंद्रिय प्रमाणीकरणाचा विचार करावा लागणार आहे. अन्यथा, नुसते कापडनिर्मितीत सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून काहीही उपयोग होणार नाही. इतर सेंद्रिय कृषी उत्पादनांनुसार मालांचे निर्मितीप्रमाणेच तुतीची जोपासना सेंद्रिय पद्धतीने प्रथमपासूनच करावी लागेल, त्यासाठी तसे पूर्वनियोजनही करावे लागेल. यासाठी फॉरमालडीहाईड, फॉरमॅलिनयुक्त निर्जंतुकीकरण करता येणार नाही. त्याचा वापरावर प्रतिबंध आवश्‍यक आहे. हे लक्षात घेऊन सुरक्षित रसायनांचा आणि रंगांचा वापर करावा. विविध प्रक्रियांमध्ये तयार होणाऱ्या विविध पदार्थांवर वेळोवेळी प्रक्रिया केली गेली पाहिजे. तुती रेशीम कापड वस्त्रनिर्मितीत सेंद्रिय निर्मितीसाठी विविध उपाययोजना आवश्‍यक आहेत. भारतात तयार होणाऱ्या मुगा, टसर रेशीमला वन्य रेशीम म्हटले जाते. हे रेशीम वनामध्येच तयार होत असल्याने रेशीम अळ्यांचे खाद्य उपलब्ध झाडपाला असते आणि नैसर्गिक रंगाचा धागा कापडासाठी वापरला जात असल्याने या रेशमाला सरळ सरळ सेंद्रिय रेशीम म्हणून प्रमाणित करणे शक्‍य आहे.

सेंद्रिय प्रमाणीकरणासाठी पदार्थाचे घटक


जेव्हा 95 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त धागे इतर वस्तू व्यतिरिक्त सेंद्रिय म्हणून प्रमाणित (रेग्युलेशन 2092-91 नुसार) केले जातात. तेव्हा इतर पाच टक्के अकार्बनी नैसर्गिक किंवा कृत्रिम धाग्यांचा वापर चालू शकतो. पारंपरिक नैसर्गिक रेशीम धागे सेंद्रिय नैसर्गिक रेशीम धाग्यांसारखे नसावेत. संमिश्र वस्त्र 70 ते 90 टक्के सेंद्रिय धागे आणि उर्वरित इतर पदार्थ असल्यास देखील त्याचे सेंद्रिय प्रमाणीकरण (रेग्युलेशन 2092/91 नुसार) केले जाऊ शकते. उर्वरित 30 टक्‍क्‍यांमध्ये असेंद्रिय नैसर्गिक धाग्यांचा किंवा कृत्रिम किंवा बनावट धाग्यांचा वापर करता येतो.मात्र कृत्रिम धाग्यांचा सहभाग दहा टक्केपेक्षा जास्त नसावा. त्याचा वापर संबंधित प्रकारासाठी आवश्‍यक असेल तेव्हाच करावा.

कच्या मालाची उपलब्धता


नैसर्गिक तंतूंना विशिष्ट सेंद्रिय प्रमाणीकरण संस्था/गटाकडून प्रमाणित केले असले पाहिजे. आवश्‍यक कृत्रिम धागे म्हणजेच व्हीसकोज ट्रेनसेल आणि लायोसेल याचा वापर करण्यास परवानगी आहे. तसेच इतर धागे जसे स्पानडेक्‍स, पॉलिस्टर आणि नायलॉन यांचाही वापर होऊ शकतो. अवस्त्रीय वस्तू जसे इलॅस्टिक आणि इतर धागे, बटन्स स्नॅप फास्टनर्स नारळापासून बनविले जाते. लाकूड, मोती, पेपर आणि काचेचा वापर करण्यास परवानगी आहे. इतर वस्तू जसे धातूची बटन्स स्नॅप, फास्टनर्स, चेन, बकल्स इत्यादी निकेल आणि क्रोमियमयुक्त असावेत.

उत्पादन पद्धत


सेंद्रिय रेशीम उत्पादनाच्या सर्व टप्प्यातच सध्या अस्तित्वात असलेले कायदे, मापदंडाचा अभ्यास असणे आवश्‍यक आहे. उत्पादनासाठी आवश्‍यक उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि पद्धतीचा वापर केला गेला पाहिजे. सेंद्रिय धागे निर्मिती पारंपरिक धाग्यांच्या निर्मितीपासून वेगळ्या पद्धतीने किंवा दोन्ही पद्धतीत साहित्य, पदार्थांचा वापर योग्य गुणवत्तेनुसारच करावा. सेंद्रिय पद्धतीने उत्पादनासाठी पूर्व स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे. सेंद्रिय धागे कापड निर्मितीत सेंद्रिय धाग्यांची योग्य ओळख सर्व टप्प्यांमध्ये करावी. यामध्ये प्रक्रिया, जोडणी, साठवणूक आणि वाहतुकीमध्ये काळजी आवश्‍यक आहे. या व्यतिरिक्त सेंद्रिय धाग्यांमध्ये पारंपरिक धागे समाविष्ट नसावेत. शिवाय ज्यांचा वापर प्रतिबंधात्मक आहे अशा पदार्थांना दूर ठेवले पाहिजे.

टाकाऊ पाणी


विविध सेंद्रिय धागे निर्मितीतील टाकाऊ पाणी प्रक्रियानंतर बाहेर सोडल्यानंतर त्यामध्ये केमिकल ऑक्‍सिजन डिमांड आणि एकत्रित सेंद्रिय कार्बनचे ( टोटल ऑरगॅनिक कार्बन) प्रमाण 25 मि. ग्रॅम प्रति किलो आणि 6.0 ते 9.0 सामू तसेच आणि तापमान 40 अंश सेल्सिअस पेक्षा कमी पाहिजे.

सहायक रसायने


सहायक रसायने म्हणजे अल्कली फिनोलीथॉक्‍सीलेट, लिनियर अल्कली बेन्झीन सल्फोनेट, डायमिथील, अमोनिअम क्‍लोराईड, डिस्टिरील डायमिथील अमोनिअम क्‍लोराईड या रसायनांनी स्वच्छता करू नये किंवा कपड्याच्या प्रक्रियेसाठी निर्मित होणाऱ्या रसायनांचा घटक नसावा.
स्वच्छता, धाग्यातील चिकट पदार्थ काढण्यासाठी पाणी प्रक्रियेसाठी जैवविघटन होणारे घटक, साबण, हायड्रोजन पेरॉक्‍साईड आणि विविध विकरांचा वापर करावा. जीएमओ याचे देखील हायड्रोजन पेरॉक्‍साईड ब्लिचिंग करता येते.

रंग आणि छपाईसाठी घटक


अ) ऍझो-डाइज आणि अझोईक डाइज जे नुकसानकारक अरोमैटिक अमाईन्समध्ये रूपांतरित होतात,त्यांना वस्त्र रंगाई आणि छपाईसाठी वापरता येत नाहीत.
2,4,5 - ट्रायमिथाईलानीलीन,
2,4 - डायमिनोटोरूईन
2, 4 - डायअमीनो अनीसॉल
2, 4 - झायलीडाईन
2, 6 - झायलीडाईन
2 - अमायनो - 4 -नायट्रोलूरीन (झायलीडाईन)
ब) - धातुमिश्रित डाइज
क ) - मॉरडन्ट (क्रोम डाइज), इतर काही डाईड रेड - 26 बेसिक रेड-9, व्हायलेट 14 आणि बेसिक यलो-1, ज्याच्यामुळे कॅन्सर, आनुवंशिक किंवा प्रजनन संस्थेसाठी विषारी घटक ठरू शकतात. अशांचा वापर कपड्याच्या रंगकामासाठी होता कामा नये.

वापरण्यायोग्य डाइज


यामध्ये कृत्रिम डाईजचा समावेश होतो. ज्यामध्ये धोकादायक आरोग्याला अपायकारक घटक नाहीत. तसेच वनस्पतीपासून तयार झालेले डाइज (नैसर्गिक) सी आय 75.000-75.990), अन्न पदार्थांत वापरले जाणारे मिनरल डाइज ऍल्युमिनिअम (अ 1) कॅल्शिअम (उर) आर्यन (ऋश) मॅग्नेशिअम (चर) आणि मॅन्मॉनी (चप) इ. यांचा वापर करावा.

रंगकाम आणि छपाईसाठी मॉरडन्टस

मान्यता प्राप्त मॉरडन्टस, जैवविघटन होणारे रेझीन नैसर्गिक रेझीनस, ऍसिड पोटॅशिअम टारटरेट तसेच वनस्पतिजन्य टॅनीनस धातूयुक्त आर्यन सॉल्ट, टायटॅनियम झिस्कोनियम किंवा ऍल्युमिनिअम इत्यादींचा वापर रंगकाम आणि छपाईसाठी होऊ शकतो.
ः डॉ. जाधव : 9822701925
(लेखक रेशीम संचालनालय, नागपूर येथे कार्यरत आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate