सीताफळाच्या गरापासून पावडर, जॅम, पेये, सिरप, मिल्कशेक, रबडी, आइस्क्रीम, श्रीखंड हे पदार्थ तयार करता येतात. गराचा वापर विविध मिठाई, बेकरी व कन्फेक्शनरीमध्ये केला जातो. बाजारपेठेतील मागणीनुसार विविध पदार्थ तयार करणे शक्य आहे.
1) प्रथम पिकलेली निरोगी चांगली सीताफळे निवडून घेऊन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत. नंतर फळांचे दोन भाग करावेत. बियांसहित गर अलगदपणे चमच्याने काढून घ्यावा.
2) हा काढलेला गर मिक्सरला लावून 1 मि.मी. स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात घ्यावा. त्यामध्ये 500 पीपीएम ऍस्कॉर्बिक आम्ल व 700 पीपीएम पोटॅशियम मेटाबायसल्फाईट मिसळून गरम करावा. हा गर निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये किंवा रिटॉर्टेबल पाऊचेसमध्ये भरून हवाबंद करावा. परत पाश्चराईज करून, थंड करून, लेबल लावून, थंड ठिकाणी (शीतगृहात) साठवून ठेवाव्यात.
3) गर साठवण कालावधीमध्ये काळा पडण्याची शक्यता असते म्हणून तो थंड तापमानाला ठेवावा.
4) या पद्धतीशिवाय त्या काढलेल्या गरामध्ये 500 पीपीएम ऍस्कॉर्बिक आम्ल व 700 पीपीएम केएमएस मिसळून तो उणे 20 अंश सेल्सिअस तापमानास गोठवून ठेवल्यास एक वर्षापर्यंत चांगला राहतो.
5) हा गर आपणास विविध पदार्थ तयार करण्यासाठी वर्षभर वापरता येतो. या गोठविलेल्या सीताफळाच्या गरास स्थानिक तसेच परदेशी बाजारपेठांत चांगली मागणी आहे.
1) फळाचा काढलेला गर घेऊन त्यामध्ये 500 पीपीएम ऍस्कॉर्बिक आम्ल व 700 पीपीएम पोटॅशियम मेटाबायसल्फाईट व 2 ते 3 टक्के माल्टो डेक्स्ट्रीन मिसळून स्प्रे ड्रायरमध्ये किंवा ड्रम ड्रायरमध्ये 5 ते 8 टक्के पाण्याचा अंश येईपर्यंत वाळवावा.
2) यानंतर तयार झालेली पावडर निर्वात केलेल्या पिशवीमध्ये भरून, थंड ठिकाणी साठवून ठेवावी. 3) अशा प्रकारे तयार केलेली पावडर आइस्क्रीम, कन्फेक्शनरी तसेच श्रीखंड, मिल्कशेक, टॉफी इत्यादी पदार्थ तयार करताना वापरता येते. या पावडरला परदेशी बाजारपेठांमध्ये चांगली मागणी आहे.
1) गराच्या वजनाएवढी साखर मिसळून तो गरम करावा, सतत ढवळत राहावे. नंतर यामध्ये 2 ते 5 ग्रॅम प्रतिकिलो गर या प्रमाणात सायट्रिक आम्ल मिसळून ते मिश्रण घट्ट होईपर्यंत म्हणजेच तुकड्यांत पडेपर्यंत शिजवावे.
2) या वेळी मिश्रणाचा टीएसएस 68 ते 69 टक्के असतो.
3) तयार झालेला जॅम निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरून, बाटल्या थंड करून, त्यावर मेणाचा थर देऊन किंवा ऍल्युमिनियम फॉईल लावून, हवाबंद करून झाकण लावावे. बाटल्या थंड आणि कोरड्या जागी साठवाव्यात.
1) गर 15 टक्के, साखर 15 टक्के व सायट्रिक आम्ल 0.25 टक्के घेऊन उत्तम प्रकारे सरबत करता येते. प्रथम गर घेऊन त्यामध्ये प्रमाणात मोजून घेतलेली साखर, सायट्रिक आम्ल व पाणी मिसळून ते चांगले ढवळून घ्यावे. हे मिश्रण मलमलच्या कापडातून गाळावे. थंड झाल्यावर त्याचा आस्वाद घ्यावा.
2) जर हे सरबत जास्त काळ साठवून ठेवायचे असल्यास ते गरम करून त्यामध्ये 100 पीपीएम पोटॅशियम मेटाबायसल्फाईट मिसळून निर्जंतुक केलेल्या 200 मि.ली.च्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरून, झाकण लावून ठेवावे. परत पाश्चराईज करून, थंड करून, लेबल लावून, थंड ठिकाणी बाटल्या साठवून ठेवाव्यात. अशा तऱ्हेने तयार केलेले सरबत 1 ते 2 महिने टिकवून ठेवता येते.
1) रबडी तयार करण्यासाठी गर एक किलो घेऊन त्यामध्ये 900 मि.ली. दूध आणि 100 ग्रॅम साखर मिसळून चांगले ढवळून गाळून घ्यावे. हे मिश्रण 15 ते 20 मिनिटे गरम करावे.
2) थंड झाल्यावर फ्रिजमध्ये ठेवून त्याचा आस्वाद घ्यावा.
1) सीताफळाचा गर किंवा पावडर वापरून उत्तम प्रतीचे श्रीखंड तयार करता येते. या श्रीखंडास चांगली चव असते.
2) गर 100 ग्रॅम, साखर 500 ग्रॅम व 400 ग्रॅम चक्का मिसळून मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. त्यामध्ये ड्रायफ्रूट्स मिसळून फ्रिजमध्ये ठेवून थंड झाल्यावर त्याचा आस्वाद घ्यावा.
1) सीताफळाचा गर किंवा पावडर वापरून उत्कृष्ट प्रतीचा मिल्कशेक तयार करता येतो.
2) यासाठी गाईचे किंवा म्हशीचे स्वच्छ दूध गाळून घेऊन गरम करून ते प्रमाणित करावे. नंतर ते 70 अंश सेल्सिअस तापमानास 15 मिनिटे गरम करावे. त्यामध्ये 0.40 टक्के सोडियम ऍल्जिनेट मिसळून 10 टक्के साखर आणि 10 टक्के गर किंवा पावडर मिसळून हे मिश्रण चांगले गाळून घ्यावे. त्यानंतर 70 अंश सेल्सिअस तापमानास 30 मिनिटे गरम करावे. नंतर ते 10 अंश सेल्सिअस तापमानास तीन तास थंड करून घ्यावे. परत ते -2 अंश सेल्सिअस ते -4 अंश सेल्सिअस तापमानाला सात मिनिटे थंड करून मिक्सरला घुसळवून त्याचा आस्वाद घ्यावा.
1) फळे तयार होण्यास फलधारणेपासून जातीपरत्वे 135 ते 150 दिवस लागतात. हे फळ झाडावरून काढल्यानंतर पिकते. म्हणून त्याची काढणी पूर्ण वाढीच्या वेळी करतात.
2) डोळा पडलेली सीताफळे काढल्यास दोन-तीन दिवसांत पिकून खाण्यास तयार होतात.
3) हे अत्यंत नाशवंत फळ आहे. पिकल्यानंतर एक-दोन दिवसांपेक्षा जास्त काळ साठविता येत नाही.
4) फळांचा हंगाम सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत असतो. पिकलेल्या सीताफळामध्ये सर्वसाधारणपणे 50 टक्के गर, 20 टक्के टीएसएस व 0.30 टक्के आम्लता असते. 5) फळे अत्यंत नाशवंत असल्याने त्यांची दोन-तीन दिवसांपेक्षा जास्त काळ साठवण करता येत नाही. गरामध्ये पोषणमूल्य चांगले असते.
6) पिकलेल्या सीताफळामध्ये शर्करा, प्रथिने व लोह यांचे प्रमाण भरपूर असते.
7) सीताफळाच्या पानांमध्ये ऍकोरिन आणि अनोनिन ही अल्कालॉईड्स असतात, त्यामुळे कोणताही प्राणी याची पाने खात नाही.
8) पानांचा लेप डोकेदुखीवर गुणकारी आहे.
9) झाडामध्ये हायड्रोसायनिक आम्ल असल्याने त्या झाडास वाळवी लागत नाही.
10) सीताफळाच्या बियांपासून काढलेल्या तेलाचा उपयोग साबण तयार करण्यासाठी होतो, तसेच पेंडीचा उपयोग खत म्हणून केला जातो.
घटक +प्रमाण +घटक +प्रमाण +घटक +प्रमाण
पाणी (टक्के) +71.00 +कर्बोदके (टक्के) +24.00 +प्रथिने (टक्के) +1.60
मेद (टक्के) +0.40 +तंतूमय पदार्थ (टक्के) +3.10 +कॅल्शिअम (मि.ग्रॅ.) +20
स्फुरद (मि.ग्रॅ.) +5.00 +लोह (मि.ग्रॅ.) +0.20 +जीवनसत्त्व "क' +22.43
उष्मांक (किलो कॅलरी) +104 +कॉपर +2.4 +आम्लता +0.40
1) गर आइस्क्रीमसाठी मोठ्या प्रमाणावर वापरतात. गरापासून जॅम, जेली, पावडर, टॉफी, श्रीखंड, रबडी, मिल्कशेक इत्यादी पदार्थ तयार करता येतात.
2) गर नियमित सेवन केल्याने अशक्तपणा दूर होतो.
3) पिकलेल्या फळाच्या सालीचा उपयोग जखमा बऱ्या करण्यासाठी होतो. बियांचा लेप जनावरांच्या जखमा बऱ्या करण्यासाठी केला जातो.
4) फळाचा गर शुक्राणूवर्धक, तृष्णावर्धक, बलवर्धक, उत्साहवर्धक, पचनशक्ती वाढविणारा व पित्ताविकार कमी करणारा आहे. हाडांच्या व दातांच्या मजबुतीसाठी उपयोगी. हृदयाची कार्यक्षमता वाढते, रोगप्रतिकारशक्ती वाढते.
संपर्क - डॉ. विष्णू गरंडे - 9850028986
(लेखक शाहू कृषी तंत्र विद्यालय, कसबा बावडा, कोल्हापूर येथे प्राचार्य आहेत)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
कवठाला चांगला स्वाद असतो. कवठापासून घरच्या घरी चां...
बोराच्या किसामध्ये साखर आणि मीठ मिसळून ते मिश्रण ग...
चिकूच्या पाकविलेल्या फोडी, जॅम, स्क्वॅश, फोडी हवाब...
फणसातील महत्त्वाचा खाद्य भाग म्हणजे पिकलेले गरे. ह...