অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भात पिकासाठी जिवाणू खत

भात पिकाच्या अधिक उत्पादनासाठी निळे - हिरवे शेवाळ (जिवाणू खत)

प्रस्तावना

पिकांना नत्र खत दिल्यामुळे उत्पादनात बरीच वाढ होते. रासायनिक नत्र खतांच्या किंमती दरवर्षी वाढतच आहेत, तसेच शेतकयांच्या आर्थिक अडचणीमुळे अनेकदा रासायनिक व सेंद्रीय खते देणे आवाक्याबाहेरचे झाले आहे. भात पिकास नत्र खताची अत्यंत आवश्यकता असते, परंतु भात पिकास दिलेल्या नत्राच्या मात्रेपैकी फक्त ३५ टक्के नत्रच भात पिकाला मिळते आणि उरलेला नत्र पाण्यावाटे खाली झिरपून, पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून किंवा हवेत उडून जातो. अशावेळी भात पिकास खत देण्याचे असे तंत्रज्ञान हवे की, ज्यामुळे जास्तीत जास्त नत्र पिकाला मिळू शकेल. हवेतील मुक्त नत्र स्थिर करणाया निळया-हिरव्या शेवाळाच्या वापरामुळे वरील दोन्हीही उद्दिष्टये साध्य होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकेल. या अपरिहार्य परिस्थितीवर तोडगा म्हणून गेल्या दशकात जिवाणू खतांचा वापर सुरु झाला. जिवाणू खतातील सजीव सूक्ष्म जंतू हवेतील नत्राचे पिकांना उपलब्ध होणाया नत्राच्या स्वरुपात रुपांतर करतात. या कारणामुळे खत दुर्मीळतेच्या काळात या जिवाणू खतांचा वापर प्रचलित होऊ लागलेला आहे. महाराष्ट्र राज्यात एकूण १.४२ दशलक्ष हेक्टर क्षेत्र भात लागवडीखाली आहे. बहुतांश शेतकरी अल्प भूधारक असल्यामुळे त्यांना महाग रासायनिक किंवा अन्य खते वापरणे आर्थिकदृष्टया परवडत नाही.

निळे-हिरवे शेवाळ

फांद्याविरहित लांबच लांब तंतूमय असणारी ही एकपेशीय पाणवनस्पती आहे. त्यांच्या पेशींमध्ये हरितद्रव्य असल्यामुळे सूर्यप्रकाशात या पेशी कर्बोदके तयार करतात व प्राणवायू पाण्यात सोडतात. या शेवाळाच्या शरीर रचनेत एक विशिष्ट कठीण व पोकळ अशी पेशी असते. त्यास हेटरोसिस्ट पेशी असे म्हणतात. या पेशीमध्ये मुक्त नत्र कार्यक्षमरित्या स्थिर केला जातो व तो नत्र नंतर भात पिकाला पुरविला जातो. त्यामुळे भात पिकाची वाढ चांगली होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ होते. नदीच्या पाण्यात किंवा साठलेल्या पाण्याच्या डबक्यात आपण अनेक प्रकारची शेवाळे वाढताना पाहतो, परंतु या सर्वच शेवाळात हेटरोसिस्ट पेशी नसतात. त्यामुळे नत्र स्थिरीकरणाचे कार्य ते शेवाळ करु शकत नाहीत. भात शेतीमध्ये बयाच वेळा निळया-हिरव्या शेवाळांच्या जातींबरोबर इतरही काही हिरव्या शेवाळांची वाढ झालेली दिसून येते. अशा प्रकारची शेवाळे भात पिकास हानिकारक ठरतात. त्यांच्या तंतुची लांबीही खूप मोठी असते.

निळे - हिरवे शेवाळ सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न तयार करते, तसेच हवेतील नत्र स्थिर करुन मुक्त नत्र पिकांना उपलब्क्ध करुन देऊ शकते. निळया-हिरव्या शेवाळाच्या वाढीसाठी व नत्र स्थिर करण्यासाठी योग्य परिस्थिती उपलब्ध असेल, तर सर्वसाधारणतः (निळे-हिरवे शेवाळ ) ३० किलो नत्र एका हंगामात दर हेक्टरी स्थिर करु शकते. त्याचप्रमाणे जमिनीत सेंद्रीय द्रव्यांची भर पडते व जमिनीचा पोत सुधारतो. जमिनीची धूप कमी होते, न विरघळणारा स्फुरद जास्तीत जास्त प्रमाणात विरघळविला जातो व पिकाच्या वाढीस उपयुक्त अशा वृध्दीसंप्रेरकांचा पुरवठाही केला जातो. रासायनिक, नत्र खत एकदा पिकाला वापरल्यानंतर पीक वाढीसाठी नत्राचा उपयोग करुन घेते. त्यामुळे नत्राचे जमिनीतील प्रमाण कमी कमी होऊन नष्ट होते, परंतु निळया-हिरव्या शेवाळाच्या बाबतीत वेगळेच आहे. पीक फक्त निळया-हिरव्या शेवाळाने जमिनीत स्थिर केलेला नत्र, वृध्दीसंप्रेरके व पाण्यात सोडलेला प्राणवायू यांचाच वाढीसाठी व उत्पादनासाठी उपयोग करुन घेते. परंतु शेवाळ नष्ट किंवा कमी न होता वाढतच राहते. ज्या ठिकाणी भात हे सलग पीक घेतले जाते, त्या ठिकाणी अशा उपयुक्त शेवाळाचा सतत वापर केल्यास उपयुक्त नसणाया शेवाळांची वाढ कमी होऊन वापरलेल्या शेवाळाची वाढ भरपूर होते व नत्र स्थिरीकरणाचे कार्य कार्यक्षमरित्या होऊ शेकते.

निळे-हिरवे शेवाळ पिकाला अन्नद्रव्यांचा नियमित पुरवठा करते. त्याचप्रमाणे जी घटकद्रव्ये पिकांना उपलब्ध होत नाहीत, ती सुध्दा थोडया प्रमाणात उवलब्ध करुन देऊन पिकांची अन्नद्रव्यांची (मूळ व सूक्ष्म) भूक भागविली जाते. त्यामुळे पिकांची सर्वांगीण वाढ होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ दिसून येते. वरील सर्व फायदे विचारात घ्ेाता, भात पिकास निळया-हिरव्या शेवाळाच्या वापरामुळे दर हेक्टरी ३०० ते ४०० रुपयांचा निव्वळ नफा होतो.

विविध निळे-हिरवे शेवाळ

१) ऍनाबिना

६) ऑसिलॅटोरिया

२) नोस्टॉक

७) रेव्हूलारिया

३) ऍलोसिरा

८) वेस्टीलॉपसिस

४) टॉलीपोथ्रिक्स

९) सिलेंड्रोपरमम

५) प्लेक्टोनिमा

१०) कॅलोथ्रिक्स

निळे-हिरवे शेवाळ वापरण्याची पद्धत

शेताची चिखलणी करुन नत्र खताचा पहिला हप्ता देऊन झाल्यावर सदृढ व जोमदार रोपांची पुनर्लागण करावी. भाताच्या पुनर्लागणीच्यावेळी खाचरातील पाणी माती मिश्रित गढूळ झालेले असते. ते पाणी स्वच्छ झाल्यावर व मातीचे कण खाली बसल्यावर म्हणजे पुनर्लागणीनंतर ८ ते १० दिवसांनी २० किलो निळे-हिरवे शेवाळ प्रती हेक्टर संपूर्ण शेतावर सारखे पडेल या पध्दतीने फोकून टाकावे. नंतर पाणी ढवळू नये. म्हणजे टाकलेल्या निळया हिरव्या शेवाळावर मातीचे कण बसणार नाहीत. शेवाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारा सूर्यप्रकाश पाण्यामधून जमिनीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचेल व शेवाळाची वाढ स्वच्छ पाण्यात सूर्यप्रकाशात भरपूर होईल. साधारणतः तीन आठवडयात शेवाळाची वाढ जमिनीच्या पृष्ठभागावर झालेली दिसेल, तसेच ही वाढ पाण्यावरसुध्दा तरंगताना दिसून येईल. अशा पध्दतीने तयार झालेले शेवाळ पेशीमध्ये स्थिर केलेला नत्र रोपाला पुरविला जातो त्यामुळे भात रोपांची वाढ जोमदार होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ होते. त्याचप्रमाणे जवळ जवळ २५ टक्के नत्र खताची बचत होते.

निळे-हिरवे शेवाळ व नत्र खत या दोहोंच्या वापरामुळे उत्पादनात निव्वळ नत्र खतांच्या वापराने येणाया उत्पादनापेक्षा लक्षणीय वाढ होते. ही वाढ सरासरी २०० किलोपासून २५० किलोपर्यंत प्रती हेक्टर असते. निव्वळ नत्र खत वापरण्याऐवजी नत्र खत व निळे-हिरवे शेवाळ वापरणे हे उत्पादन वाढीचे दृष्टिने अत्यंत फायदेशीर ठरले आहे. भात शेतीपासून जास्तीत जास्त उत्पादन हवे असल्यास नत्र खताच्या प्रमाणित मात्रेबरोबरच २० किलो शेवाळ प्रती हेक्टर वापरणे आवश्यक आहे. २० किलो शेवाळाची किंमत फक्त ४०/- रुपये असल्याने उत्पादन खर्चातही फारशी वाढ होत नाही, परंतु भात उत्पादनात २ ते ३ क्विंटलची वाढ होते. शेवाळामुळे जमिनीतील सेंद्रीय कर्ब ०.२ ते ०.३ टक्के वाढतो. तसेच एकूण नत्र ०.०१ ते ०.०२ टक्के वाढतो. त्यामुळे जमिनीचा पेात सुधारतो. त्याचा फायदा पुढील पिकाला चांगला मिळून उत्पादनात वाढ होते.

भाताच्या भरघोस उत्पादनासाठी नत्र खताची प्रमाणित मात्रा द्यावी. पुनर्लागण केल्यानंतर ८ ते १० दिवसांनी २० किलो शेवाळ प्रती हेक्टर फोकून द्यावे, म्हणजे हे शेवाळ पाण्यात जमिनीच्या पृष्ठभागावर सूर्यप्रकाशात चांगले वाढून कार्यक्षमपणे नत्र स्थिरीकरणाचे कार्य करेल, त्यायोगे उत्पादनात निव्वळ नत्र खतापेक्षा लक्षणीय वाढ दिसून येईल.

निळे हिरवे शेवाळ वाढविण्याची पध्दत

सर्वसाधाराणपणे २ x १ x ०.२ मी. आकाराचे वाफे तयार करुन त्यावर २०० मायक्रॉन जाडीचा पॉलीथिन पेपर टाकावा. पॉलिथिन पेपरवर साधारणतः ८ ते १० किलो बारीक माती पसरावी. त्यामध्ये २५ ग्रॅम कार्बोफ्युरॉन मिसळावे. तसेच ७ ते १० सें.मी. पाण्याची पातळी ठेवून त्यामध्ये २०० ग्रॅम सुपर फॉस्फेट, २ ग्रॅम सोडियम मॉलीबडेट, ४० ग्रॅम फेरस सल्फेट, ५० ग्रॅम पोटॅशियम क्लोराईड यांचे मिश्रण टाकून आतील माती ढवळावी. माती तळाशी बसल्यावर शांत पाण्यात निळे हिरवे शेवाळाचे परीक्षा नळीतील किंवा प्रयोगशाळा/मध्यवर्ती केंद्र यांनी पुरविलेले मूलभूत बियाणे छिडकावे. साधारणपणे ८ ते १० दिवसात शेवाळाची भरपूर वाढ होते व त्याचा पाण्यावर चांगला थर जमते. भरपूर वाढ झाल्यावर पाणी आटू द्यावे. सुकलेली माती गोळा करुन ती सावलीत वाळवावी. सुकलेली शेवाळ पापडी/शेवाळ मिश्रित माती प्लॅस्टिक पिशवी किंवा कापडी पिशव्यामंध्ये गोळा करावी. या शेवाळ पापडीचा / शेवाळ मिश्रित मातीचा पुढील पिकासाठी शेवाळाचे बियाणे म्हणून उपयोग करता येतो. हे बियाणे भात लावणीनंतर ८ ते १० दिवसांनी भात खाचरामध्ये २० किलो या प्रमाणात दर हेक्टरी वापरावे.

वरील पध्दती व्यतिरिक्त शेतकयांच्या सोयीनुसार पत्र्याच्या ट्रेमध्ये (चौकोनी आकाराच्या) किंवा सिमेंटच्या स्लॅबवर वरील पध्दत वापरुन शेवाळाचे बियाणे तयार करता येते. शेवाळ वाढविताना डासांचा किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास बंदोबस्तासाठी कीटकनाशकांचा वापर करावा.

महत्वाचे

  1. निळे-हिरवे शेवाळ वापरल्याने रासायनिक खतांची उणीव संपूर्णपणे भरुन काढता येत नाही, म्हणून शेवाळ हे रासायनिक खतांना पूरक खत म्हणून वापरावे.
  2. भाताच्या जास्तीत जास्त उत्पादनासाठी रासायनिक नत्र खतांची प्रमाणित मात्रा व २० किलो शेवाळाचे बियाणे प्रती हेक्टर वापरावे.
  3. रासायनिक खते, औषधे व शेवाळ एकत्र मिसळून वापरु नये, त्यांचा स्वतंत्रपणे उपयोग करावा.
  4. रासायनिक खतांच्या संपर्कात किंवा रिकाम्या झालेल्या रासायनिक खतांच्या पिशव्यांमध्ये शेवाळाचे बियाणे साठवू नये.
  5. शेवाळाची मात्रा भाताच्या पुनर्लागणीनंतर ८ ते १० दिवसांनी पाणी स्वच्छ झाल्यानंतर शेतात फोकून/पसरवून द्यावी व त्यानंतर पाणी ढवळू नये.
  6. शेवाळाच्या वाढीसाठी भात शेतात पाणी साठवून ठेवणे आवश्यक आहे.
  7. भात शेतात कीटकनाशके, बुरशीनाशके किंवा तणनाशकांच्या प्रमाणित वापराचा शेवाळावर अनिष्ट परिणाम होत नाही.

उपलब्धता

निळे-हिरवे शेवाळाच्या मूलभूत बियाण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर संपर्क साधावा.

  1. कृषि अणुजीव शास्त्रज्ञ, कृषि महाविद्यालय,  शिवाजीनगर, पुणे-५
  2. विभागीय कृषि सहसंचालक (विस्तार) कोकण विभाग, ठाणे-४
  3. विभागीय कृषि सहसंचालक (विस्तार) नागपूर विभाग, नागपूर

 

स्त्रोत : ग्रामराज्याकडून रामराज्याकडे

अंतिम सुधारित : 12/29/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate