जलयुक्त शिवार योजनेला प्रशासन व अधिकारी, नागरिकांची दमदार साथ मिळाल्याने जलयुक्त शिवार योजनेची फलश्रुती राज्यात सर्वत्र दिसू लागली आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील गावांसाठी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत लघुसिंचन विभागाच्या वतीने गावपातळीवर जलसंधारणाची विविध कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली. तालुक्यात यावर्षी शासनाच्या जलयुक्त शिवाराच्या कामासाठी 105 गावांची निवड करण्यात आली होती. जलयुक्त शिवार योजनेच्या कामात बंधारे, गाळ काढणे, नाला खोलीकरण आदी कामे झालीत. आतापर्यत 65 गावांमध्ये ही कामे पूर्ण करण्यात आली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत.
जलस्त्रोताचा अभ्यास करत तालुक्यात 25 नवीन साठवण बंधाऱ्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील उपलब्ध पाझर तलावांमधील गाळ काढण्यात आले असून त्यांची दुरुस्ती देखील करण्यात आली आहे. मोसमी व परतीचा पाऊस चांगला बरसल्याने तालुक्यातील जवळपास सर्वच जलसाठ्यांमध्ये मुबलक पाणीसाठा निर्माण झाल्याचे सुखद चित्र पाहायला मिळत आहे.
जलसाठे भरल्याने पिण्याचे पाणी, शेती, सिंचनाचा तर प्रश्न मार्गी लागणारच आहे पण त्यासोबत तालुक्यातील मत्स्य व्यवसायातही मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे रोजगार वाढण्यासही मदत होणार आहे. चाळीसगाव तालुका कार्यक्षेत्रात सात मच्छीमार सहकारी सोसायट्या असून एक खाजगी संस्था कार्यरत आहे. सिंचन विभागामार्फत बीज संवर्धन कार्यक्रम घेऊन या पाझर तलावांचा लिलाव करण्यात येतो. त्यात विविध प्रकारच्या मत्स्य बीजांचा समावेश केला जातो. या वर्षी मुबलक पाणीसाठा ह्या पाझर तलांवामध्ये निर्माण झाल्यामुळे मत्स्यव्यवसायाला गती मिळाली आहे. गेल्या दोन वर्षापासून असलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे ह्या पाझर तलावामध्ये पाणीसाठा नव्हता.
दुष्काळी परिस्थितीने होरपळून निघणाऱ्या इतर व्यवसायाप्रमाणे मत्स्य व्यवसायाला घरघर लागली होती. या व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुबियांवर उपासमारीची वेळ आली होती. मात्र जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पावसाळ्यापूर्वी या पाझर तलावांमधील गाळ काढण्यात आला व त्यांची दुरुस्ती करण्यात आली. त्याला निर्सगाचीही चांगली साथ मिळाल्यामुळे सर्व पाझर तलावामध्ये जवळपास 80 ते 100 टक्के पाणीसाठा निर्माण झाला असून 2 ते 4 टीसीएम पाणीसाठा साठविण्यात लघुसिंचन विभागाला यश प्राप्त झाल्याची माहिती शाखा अभियंता आर.डी.पाटील यांनी दिली.
मुबलक पाणीसाठा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मत्स्य बीज संवर्धन चांगले प्रकारे करता येणे शक्य झाले. त्यामुळे तालुक्यातील मच्छीमार सोसायट्यांनी ह्या वर्षीच्या पाझर तलावातील मत्स्यांसाठी असलेल्या लिलाव प्रक्रियेत उत्स्फुर्त सहभागी होत चांगला प्रतिसाद दिला. साहजिकच शासनाच्या तिजोरीतही दोन पैसे जास्तीचे जमा झाले. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेमुळे मत्स्य व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. मासे पकडणाऱ्या मजुंराना किलोच्या दराने आकर्षक रोजदारी सोसायटीकडून मिळत असल्याने त्यांचा रोजगाराचा प्रश्न मिटला आहे. त्याचप्रमाणे मासे विक्रीच्या माध्यामातून अनेक कुटुबियांना आर्थिक सुबत्ता प्राप्त झाली असून मासे खाणाऱ्या खवय्यांना देखील माफक दरात दर्जेदार मासे खायला मिळत असल्याची माहिती मच्छीमार सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. दुष्काळामुळे लयास गेलेल्या मत्स्यव्यवसायास जलयुक्त शिवार योजनेमुळे उभारी मिळाली आहे. हे जलयुक्त शिवार योजनेचे यशच मानले पाहिजे.
लेखक - निलेश किसन परदेशी
चाळीसगाव जि.जळगाव
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 8/11/2023
ज्या समुद्राकडून सतत काहीतरी घेतले जाते, त्या समुद...
योग्य सुव्यवस्थापन केल्यास ८ महिन्यांचा मरळ संवर्ध...
मासेमारी हा भारतातील पारंपरिक व्यवसाय. या व्यवसाया...
शोभेचे/अलंकारिक मासे पाळणे हा अनेकांचा छंद आहे. हा...