सांगली जिल्ह्यात ब्रह्मानंदनगर, बुरुंगवाडी (ता. पलूस) येथील मगदूम- शिंदे कुटुंबीयांतील तीन चुलतभावांची घरे विभक्त असूनही एकमेकांच्या सहकार्याने दुग्ध व्यवसाय केला आहे. भावा-भावांचे स्वतंत्र गोठे शेजारी शेजारी असून, एकमेकांच्या अडचणीला ते नेहमी धावून जातात. त्यातूनच हा व्यवसाय किफायतशीर केला आहे. विशेष म्हणजे या तिघा भावांच्या गोठ्यांत जनावरांची संख्या चांगली असूनही एकही मजूर गोठ्यात दिसत नाही. घरातील सर्व सदस्यच व्यवसायात राबतात. एकीमुळेच त्यांनी कौटुंबिक स्थैर्य टिकवले आहे.
सांगली जिल्ह्यातील भिलवडी स्टेशनपासून केवळ दोन किलोमीटरवर ब्रह्मानंदनगर बुरुंगवाडी हे छोटे गाव आहे. भिलवडी परिसर हा दुग्ध व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. या भागात नामवंत दुग्ध संस्था आहेत. साहजिकच दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही या भागात मोठ्या प्रमाणात आहे. ब्रह्मानंदनगर बुरुंगवाडी गावच्या मळा भागात रामचंद्र, त्यांचे चुलतभाऊ शहाजी व बजरंग यांची घरे व गोठेही शेजारी शेजारी आहेत. रामचंद्र हे तीनही भावांत धाकटे आहेत. शहाजींकडे गायी-म्हशी मिळून एकूण सुमारे 35, बजरंग यांच्याकडे एकूण 22, तर रामचंद्र यांच्याकडे 18 जनावरे आहेत.
सन 2002 पर्यंत खासगी नोकरीत असलेले रामचंद्र यांनी दुग्ध व्यवसाय करण्याचे ठरविले खरे, परंतु हा व्यवसाय करण्यामागे वेगळेच कारण होते. त्यांची सहा एकर शेती आहे. जवळून एक पाणीपुरवठा योजना गेल्याने त्याचे पाणी या ठिकाणी साठते. पाण्याचा निचरा होत नसल्याने शेती खराब होत होती. शेती सुपीक ठेवायची असेल तर शेणखताचा वापर करण्याची गरज होती. दुग्ध व्यवसायातून दुधासोबत शेणखत उपलब्धताही साध्य होणार होती. सन 2006 च्या सुमारास तीन लाख रुपयांचे कर्ज घेऊन त्यांनी जनावरे घेतली. त्यांच्याकडे सुमारे सहा होलिस्टिन फ्रिजियन (एचएफ) जातीच्या सहा गाई, तर चार मेहसाणा, दोन मुऱ्हा, दोन दुग्गल म्हशी आहेत. दुग्गल ही मेहसाणा व देशी जात यांचा संकर असल्याचे ते म्हणाले. कुटुंब विभक्त झाल्यानंतर त्यांनी अन्य भावांनाही जनावरे घेण्यासाठी व दुग्ध व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले.
तिघा भावांच्या कुटुंबात गोठ्याचे व्यवस्थापन प्रामुख्याने महिला सदस्यांकडूनच होते. सकाळी पाचच्या दरम्यान दिनक्रम सुरू होतो. शेण काढणे, जनावरे धुऊन घेणे, धारा काढणे आदी कामे केली जातात. एका वेळी एका म्हशीला दोन किलो कडब्याची कुट्टी, चार किलो गव्हाचा भुस्सा दिला जातो. धारा काढल्यानंतर गव्हाणीत पाणी भरले जाते. संध्याकाळपर्यंत जनावरांना विश्रांती दिली जाते. तिघांच्याही गोठ्यात एकही मजूर नाही. मजुरांकडून व्यवस्थापन करणे परवडत नसल्याने मगदूम- शिंदे कुटुंबीयांनी घरच्या सदस्यांच्या श्रमांवरच गोठ्याचा भार पेलला आहे. दररोजचे कालबद्ध नियोजन होते. दूध काढणीही घरचे सदस्यच करतात.
तिन्ही कुटुंबीयांनी दुग्ध व्यवसायातून मिळणाऱ्या शेणाचा उपयोग गोबरगॅस युनिटसाठी करून घेतला आहे. त्यापासून मिळणाऱ्या इंधनामुळे या कुटुंबांना गॅस सिलिंडर विकत आणावा लागत नाही. ही मोठी बचत असल्याचे रामचंद्र म्हणतात. घरचा दोन्ही वेळचा स्वयंपाक गोबरगॅसवरच होतो.
- रोजचे सरासरी दूध संकलन - 150 लिटर
पशुखाद्य व अन्य खर्च - 60 हजार (प्रति महिना)
महिन्याला सुमारे सात ट्रॉली शेणखत
रामचंद्र, तसेच शहाजी यांनी गाईंसाठी मुक्त गोठा पद्धतीचा वापर करण्यास सुरवात केली आहे. व्यवसायात अद्याप पारंपरिक पद्धतीचा वापर अधिक असला तरी नवनवीन येणाऱ्या संकल्पनाही स्वीकारत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आता कडबाकुट्टीसाठी यंत्रही घेतले आहे. सध्या शेपटी ते शेपटी अशी गोठ्याची रचना रामचंद्र यांनी केली आहे. आपले दोन एकर क्षेत्र केवळ चारा पिकांसाठी राखीव ठेवले असून, त्यात हत्ती गवत, कडवळ, मका आदींची लागवड आहे. शेणखताच्या वापराने पीक उत्पादनात 40 टक्क्यांची वाढ झाल्याचे रामचंद्र यांनी सांगितले. रामचंद्र हे ऍग्रोवनचे नियमित वाचकदेखील आहेत.
1) मगदूम- शिंदे ही तिन्ही कुटुंबे शेजारी शेजारी रहातात. प्रत्येकाचा जनावर व्यवस्थापनाचा दिनक्रम जवळपास समान आहे. प्रत्येक जण आपापला गोठा सांभाळतात. मात्र कुटुंबामध्ये सख्य टिकून आहे. तिघाही कुटुंबांत एकूण 18 सदस्य आहेत. एकाला दुसऱ्याचा आधार आहे.
2) प्रत्येक जण एकमेकाच्या अडचणीला धावतो, असे या कुटुंबातील सदस्य अभिमानाने सांगतात. प्रत्येकाचे दूध वेगवेगळ्या दुग्ध संस्थांना जाते. यामुळे बिले येण्याच्या तारखा मागे-पुढे होऊ शकतात. परिणामी, पैशांची गरज एकमेकांना अचानक लागू शकते. अशा वेळी ज्याचे बिल अगोदर जमा झाले आहे तो सदस्य अन्य भावांना आर्थिक मदत करतो. ज्या वेळी बिल जमा होईल त्या वेळी ती रक्कम परत केली जाते. हे केवळ आर्थिक बाबतीतच होते असे नाही, अन्य बाबतींतही सहकार्याची भावना असते.
3) जनावरांसाठीची पेंड प्रत्येक जण वेगवेगळी न आणता एकाच गाडीतून ती आणली जाते. त्यामुळे त्यावरील वाहतूक खर्चात बचत होते.
4) तिघा भावांकडील जनावरांची तपासणी करणारा सामाईक पशुवैद्यक आहे. लसीकरण असो किंवा जनावरे आजारी पडल्याची बाब असो, वैद्यकीय उपचारही एकमेकांच्या समन्वयानेच केले जातात.
5) तिघा भावांची मिळून संयुक्त विहीर आहे. त्याचे बिलही तिघांत वाटून घेतले जाते.
6) एखाद्याला जनावरे खरेदी करायची असतील तर त्यासाठी हाताशी भांडवल असतेच असे नाही. अशा वेळी एक भाऊ दुसऱ्याला ते उपलब्ध करून देतो.
दुग्ध व्यवसायात स्वतः राबत असल्यास त्यात तोटा येत नाही, असा माझा अनुभव आहे. तिघा भावांत सामंजस्य टिकून असल्याने कोणत्याही अडीअडचणी वेळेवर दूर होतात.
रामचंद्र मगदूम - शिंदे - ९९६००९३०१९
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
गणेश घोरपडे यांनी जिल्ह्यातील सातारा, वाई आणि खंडा...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...