शेतीमालाला समाधानकारक दर मिळत नाही ही प्रत्येक शेतकऱ्याचीच समस्या असते. चांदूर (ता. जि. अकोला) येथील जय वळेखण स्वयंसहायता शेतकरी बचत गटाने याच समस्येवर उपाय शोधला. हरभरा, तूर बाजार समितीत न विकता त्यावर प्रक्रिया करीत डाळी तयार करून थेट ग्राहकांना विक्री सुरू केली आणि नफ्याचे मार्जिन वाढवले आहे.
चांदूर (ता. जि. अकोला) येथील अमरदीप डाबेराव बी.एस्सी. ऍग्री. पदवीधारक आहेत. ते पोस्ट खात्यात नोकरी करीत होते. मात्र, शेतीची आवड व त्यातील शिक्षण असल्याने शासकीय नोकरीला रामराम ठोकला, शेतीत पूर्ण लक्ष घातले.
पण, शेतकऱ्यांच्या मालाला व्यापारी समाधानकारक दर देत नाहीत ही समस्या होती, त्यामुळे आपणच प्रक्रिया उद्योगात उतरायचे व नफ्याचे प्रमाण वाढवायचे, असा विचार त्यांनी केला. प्रक्रिया करतानाही परिसरात उत्पादित होणाऱ्या शेतीमालाचा उपयोग होईल, असा व्यवसाय निवडण्याचे ठरले. त्यातूनच गावात जय वळेखण स्वयंसहायता शेतकरी बचत गट समूहाची उभारणी झाली.
समूहात संतोष पदमने अध्यक्ष, तर अमरदीप डाबेराव सचिव आहेत. अन्य सदस्यांत विजयसिंग डाबेराव, केशव राठोड, प्रकाश कटाळकर, आशिष डाबेराव, मंगेश निलखन, चंदूसिंग सोळंके, किसन खिरेकार, रामराव नागे आदी अल्पभूधारक शेतकऱ्यांचा समावेश आहे.
समूहातील सर्व शेतकऱ्यांकडे तूर, हरभरा आदी पिके होती. साहजिकच डाळनिर्मिती व्यवसाय करण्याचे ठरले. कृषी विभागाशी संपर्क साधून कडधान्य प्रकल्पांतर्गत योजनांची चौकशी झाली, त्यातून मिनी डाळ मिलसाठी 50 टक्के अनुदान असल्याचे समजले. अडीच लाख रुपयांचे यंत्र खरेदीही केले.
सुरवातीला पन्नास टक्के रक्कम गटातील सदस्य व उर्वरित 50 टक्के अध्यक्ष व सचिव यांनी वैयक्तिकरीत्या उभी केली. त्यासोबतच वीजजोडणी, यंत्रसामग्री ठेवण्यासाठी शेड उभारण्यात आले. यावर सुमारे एक लाख रुपयांचा खर्च झाला. समूहाची मासिक बचत प्रति सदस्य दोनशे रुपये आहे. त्यात तीन वर्षांपासून सातत्य होते. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या खडकी शाखेत समूहाचे खाते आहे. सन 2012 मध्ये युवकांचा उद्योग सुरू झाला.
क्विंटलला 100 रुपयांप्रमाणे
2000 क्विंटल
यंदा
1500 क्विंटल
मालाचे पॅकिंग करूनच विक्री केली जाते. मागील वर्षी अकोला येथे भरलेल्या धान्य महोत्सवातून व ग्राहकांना थेट विक्रीतून ही सर्व विक्री झाली. अर्थात, अकरा सदस्यांबरोबर गावातील अन्य शेतकऱ्यांकडूनही माल खरेदी करावा लागला. बाजारात तुरीला चार हजार रुपये दर प्रति क्विंटल असेल, तर शेतकऱ्याला 50 रुपये अधिक दर गटाने दिला.
डाबेराव म्हणाले, की तुरीची विक्री आम्ही बाजार समितीत केली असती, तर तीन ते चार हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला असता. मात्र, क्विंटलला सात हजार रुपये दराने डाळीची विक्री केली. त्यातील फरक हा तीन हजार रुपयांचा आहे. एक क्विंटल डाळ तयार करण्यासाठी तीनशे रुपये मजुरी लागते. पॅकिंग व वाहतूक यासाठी प्रत्येकी दहा रुपये खर्च होतो. खर्च वजा जाता किलोला 25 रुपयांपर्यंत नफा मिळतो.
आपल्या मालाचे मार्केटिंग कसे केले हे सांगताना डाबेराव म्हणाले, की अकोला शहर आम्हाला सहा किलोमीटरवर आहे. तेथील निवासी कॉलनींमध्ये आम्ही छोटा टेंपो घेऊन जायचो. त्यात डाळी असायच्या. जाहिरातीचे बॅनरही तयार केले होते. सुरवातीला प्रत्येक सदस्याची एक क्विंटल याप्रमाणे 10 क्विंटल डाळ वेगळी करून तिचे पाव, अर्ध्या किलोत पॅकिंग तयार केले.
ग्राहकांना ते सुरवातीला मोफत द्यायचो व आमची गुणवत्ता पाहा म्हणून सांगायचो. आमच्या मालात कोणतीही भेसळ नाही हे देखील सांगितले. अशा प्रयत्नांतूनच ग्राहक बाजारपेठ मिळवणे शक्य झाले.
संपर्क - संतोष पदमने - 9822641929
अमरदीप डाबेराव - 9552405918
लेखक : विनोद इंगोले
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
कुशल व्यवस्थापन, तरुण नेतृत्व, प्रभावी योजना यामधू...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...