डॉ. खाशेराव गलांडे कार्यकारी अध्यक्ष
ग्रामीण विकास व प्रशिक्षण संस्था, पुणे
“‘चांगले उत्पन्न मिळवून देणारे पीक’ म्हणून ज्वारीचे पीक पुढे येऊ शकले तर अधिक पाणी लागणार्या ऊस या पिकाला नक्कीच पर्याय मिळू शकेल. आज महाराष्ट्रावर पाणी टंचाईचे जे संकट ओढवले आहे, त्या संकटावर मात करण्यासाठी गावरान ज्वारी लागवडीचा उपक्रम नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावू शकेल, असे आग्रहाने म्हणावेसे वाटते...”
हवामान बदलामुळे महाराष्ट्राच्या बर्याच मोठ्या भूभागावर दरवर्षी कोठे ना कोठे दुष्काळ पडलेला असतो. गेल्या वर्षी मराठवाडा व विदर्भात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडल्याचे दिसून आले. दुष्काळी परिस्थितीमध्ये माणसांसाठी अन्नधान्य व जनावरांसाठी चारा पिकविणे हे शासन, संशोधक व शेतकर्यांसमोरचे आव्हानच बनले होते.
ज्वारी हे मराठवाड्यात रब्बी हंगामामध्ये घेतले जाणारे महत्त्वाचे पीक आहे. बहुतांश शेतकरी रब्बी हंगामात ज्वारीची लागवड करतात. ज्वारीखालील एकूण लागवड क्षेत्रांपैकी सुमारे 95 टक्के क्षेत्र कोरडवाहू असते. मात्र कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारीसारख्या पिकांना गरज असेल त्या वेळी आणि गरजेइतकीच अन्नद्रव्ये, पाणी दिल्यास या पिकांमधून अधिकतम उत्पादन मिळू शकते, एवढेच नाही तर उत्पादनात तीन ते चार पटींनी अधिक वाढ करता येऊ शकते, हे विविध शेतकर्यांच्या सिंचनाधारित आणि कोरडवाहू शेतीमध्ये करण्यात आलेल्या गावरान ज्वारी लागवडीच्या अनोख्या प्रयोगांतून सिद्ध झाले आहे. गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात ‘ग्रामीण विकास व प्रशिक्षण संस्था’ आणि इतर विविध शासकीय, बिगर शासकीय संस्थांच्या सहकार्याने गावरान ज्वारीच्या लागवडीचे असे प्रयोग करण्यात आले.
2014-15 च्या रब्बी हंगामामध्ये सिंचनाधारित क्षेत्रावरील प्रयोगाअंतर्गत राज्यातील पाच जिल्ह्यांतील 48 एकर क्षेत्रावर ठिबक सिंचनाआधारे मालदांडी रब्बी ज्वारीचे पीक घेण्यात आले, तर कोरडवाहू शेतीतील प्रयोगाअंतर्गत बार्शी तालुक्यातील (जि. सोलापूर) व लातूर येथील 500 एकर आणि धर्माबाद तालुक्यातील (जि. नांदेड) येथील 12 गावांमधील 1 हजार एकरावर गावरान रब्बी ज्वारीची लागवड करण्यात आली.
या प्रयोगांअंतर्गत ज्वारी पेरावयाच्या क्षेत्रावर हेक्टरी 6 ते 10 टन कंपोस्ट खत मिसळून किंवा विस्कटून टाकण्यात आले. सर्व प्रकारची पूर्वमशागत व्यवस्थितपणे झाल्यानंतर ज्वारीची टोकण पद्धतीने लागवड करण्यात आली. पुणे जिल्ह्यामध्ये 30 सप्टेंबर, सोलापूर जिल्ह्यात 10 ते 25 ऑक्टोबर, लातूर जिल्ह्यात 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर, नांदेड जिल्ह्यात 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या काळात पेरणी केली गेली. याच काळात व थोडा उशिराने परभणी व इतर काही ठिकाणच्या शेतकर्यांनीही गावरान ज्वारीची लागवड केली. एकरी चाळीस हजार रोपे असे प्रमाण निश्चित करण्यात आले होते.
रासायनिक खतांचा बेसिक डोस दिल्यानंतर त्यास ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्यात आले, तसेच योग्य वेळी योग्य तेवढ्याच खताची मात्रा विद्राव्य खतांच्या माध्यमातून दिली गेली. आंतरमशागतीने पीक तणविरहीत ठेवले होते, तसेच ज्वारीची रोपे 85 दिवसांची आणि 5.5 फूट उंच होईपर्यंत कीडनाशके व रोगनाशकांच्या फवारण्या करण्याचे प्रयोग करण्यात आले. शेतकर्यांनी खालील पद्धतीने फवारण्यांचा प्रयोग करून पिकांची काळजी घेतली. त्या प्रयोगाच्या सर्व नोंदी प्रयोग निरीक्षकांनी वेळोवेळी घेतल्या होत्या.
अ) पहिला प्रयोग (ठिबकने पाणी पुरवठा होऊ शकेल अशा क्षेत्रावर)
ब) दुसरा प्रयोग (कोरडवाहू क्षेत्रात)
जेथे पिकांना पाणी पुरवठा होण्याची सुतराम शक्यता नाही आणि ज्वारी पेरताना पुरेशी ओल नसणे, उगवण कमी होणे किंवा जमिनीमधील ओलावा झपाट्याने कमी होणे इत्यादी कारणांमुळे पिकाचे बाटुकसुद्धा (1 ते दीड फूट उंचीची ज्वारी) येणार नाही अशा साधारणपणे 1 हजार 500 एकर क्षेत्राची निवड या प्रयोगासाठी करण्यात आली. कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारीचे बियाणे वाया जाऊ न देता 3 ते 4 फूट उंच ज्वारीची ताटे होऊ शकतील व 2 ते 4 क्विंटल धान्य येईल, असा अनोखा प्रयोग राबविण्यात आला.
1. प्राथमिक वाढीच्या अवस्थेत पिकाची चांगली वाढ व्हावी, यासाठी आंतरप्रवाही कीटकनाशक (कॉन्फिडॉर- 16 लीटर पाण्यात 8 मि.ली., आंतरप्रवाही बुरशीनाशक (बाविस्टिन कार्बेडाझिम - 16 लीटर पाण्यात 16 ग्रॅम), वाढ प्रेरक टॉनिक (16 लीटर पाण्यात 8 मि.ली.) आणि 19:19:19 हे विद्राव्य खत (16 लीटर पाण्यात 80 ग्रॅम) मिसळून फवारणी केली.
2. मध्यम वाढ अवस्थेत पिकांची चांगली वाढ व्हावी व दांडा जाड व्हावा, यासाठी 25 दिवसांनी 12:61:0 हे विद्राव्य खत (16 लीटर पाण्यात 80 ग्रॅम) फवारणीद्वारे देण्यात आले.
3. पताका पान निघताना 25 दिवसांनी ‘चिलेटझिंक पोटॅन्सी’प्रमाणे उदा. कॉम्पोचे झिंक - एकरी 75 ग्रॅम आणि 13:0:45 हे विद्राव्य खत (16 लीटर पाण्यात 80 ग्रॅम टाकून) फवारण्यात आले. यामुळे दाणे पोसण्यास मदत झाली.
एकरी खर्च - पूर्वमशागत, कंपोस्ट खत, बियाणे, विद्राव्य खते, तणनाशके, कीटकनाशके, मजुरी इत्यादींचा खर्च साधारणपणे 20 ते 25 हजार + ठिबकचा 5 हजार (एकरी 50 हजार खर्च 10 वर्षांत विभागून) म्हणजेच एकरी 30 हजारांपर्यंत एकूण खर्च.
एकरी उत्पन्न - एकरी 30 ते 50 क्विंटल (30 ते 35 हजार ताटे प्रत्येकी 100 ते 150 ग्रॅम दाणे.) म्हणजेच सरासरी 40 क्विंटल उत्पन्न व भाव 2 हजार 500 रुपये प्रति क्विंटल गृहीत धरल्यास 1 लाख + कडबा एवढे उत्पन्न मिळाले.
1. शेतकर्यांच्या उत्पन्नात भरपूर वृद्धी होईल.
2. शेतकर्यांना ज्वारीशिवाय जनावरांसाठी कडबाही उपलब्ध होईल.
3. ठिबक सिंचनाआधारे पाणी दिल्यामुळे पाण्यातही 50 ते 60 टक्के बचत होईल.
4. शेतकर्यांच्या मनात ऊस हेच नगदी पीक आहे व तेच फक्त फायदेशीर पीक होऊ शकते, हा गैरसमज काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.
5. ज्वारी हे फक्त एका हंगामाचे पीक आहे. त्यामुळे दुसर्या पिकासाठी जमीन उपलब्ध राहील.
6. उसाचे पीक अधिक काळ घेतल्याने जमिनीतील अन्नांशाचा व उपलब्ध पाण्याचा वारेमाप वापर होतो. त्याऐवजी तेवढ्याच वेळेत, कमी कष्टात व कमी पाण्यात आपण अधिक पिके घेऊन अधिक आर्थिक नफा मिळवू शकतो.
हे प्रात्यक्षिक एखादी स्वयंसेवी संस्था अथवा शेतकरी करू शकत असेल, तर विद्यापीठे व शासन यांनी या पीक पद्धतीची संशोधन केंद्रावर चाचणी घेऊन प्रयोगाच्या निष्कर्षाची शिफारस करून त्याचा प्रचार व प्रसार करणे गरजेचे आहे.
सद्यःस्थितीत या प्रयोगाची पहिली पायरी आहे. हा प्रयोग यशस्वी झाला, तर ज्वारीचे एकरी उत्पादन याहून अधिक वाढविणे, हे आमचे दुसरे उद्दिष्ट आहे. एका कणसातून सरासरी 250 ग्रॅमपर्यंत दाणे मिळू शकले, तर उत्पादन 100 क्विंटलला पोहोचण्यास कोणतीही अडचण येणार नाही. तसे उत्पादन प्रयोगशील शेतकरी निश्चित मिळवतील.
भारतात ज्वारीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ही मागणी गावरान ज्वारीच्या लागवडीतून पूर्ण करणे शक्य होईल. दुसरे म्हणजे ज्वारीपासून चांगल्या दर्जाचे पोहे (फ्लेक्स) व विविध उपपदार्थ तयार करता येऊ शकतील, तसेच ज्वारीपासून अल्कोहोलसुद्धा तयार होऊ शकते. त्याचप्रमाणे ज्वारीपासून चांगल्या प्रकारचे स्टार्च बनवणे शक्य होणार आहे आणि त्यास बाजारात मागणी आहे.
आज शेताचा पोत टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे. तीही गरज गावरान ज्वारीच्या लागवडीतून पूर्ण होऊ शकेल. आज ‘अन्न सुरक्षा’ हा ऐरणीवरचा विषय आहे. ज्वारीच्या अधिक उत्पादनामुळे हा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकेल, तसेच हवामान बदल होत असतानाच्या काळातही शेतीतून उत्पन्न मिळवून देऊ शकणारे ज्वारी हे एक उत्तम पीक ठरू शकेल.
चांगले उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून ज्वारीचे पीक पुढे येऊ शकले, तर अधिक पाणी लागणार्या ऊस या पिकाला नक्कीच पर्याय मिळू शकेल. आज महाराष्ट्रावर पाणी टंचाईचे जे संकट ओढवले आहे, त्या संकटावर मात करण्यासाठी गावरान ज्वारी लागवडीचा उपक्रम नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावू शकेल, असे आग्रहाने म्हणावेसे वाटते.
संपर्कः श्री. दिलीप पेंडसे - 09730 9102 72
डॉ. खाशेराव गलांडे - 7588 6813 89
स्त्रोत: वनराई
अंतिम सुधारित : 7/13/2020
या वर्षीच्या कमी पावसामुळे सिंचनासाठी पाण्याची उपल...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
उस शेतीमध्ये पाण्याचा कार्यक्षम काटेकोरपणे, नियोजन...
दूरदर्शन सह्याद्री निर्मित उपलब्ध पाण्याचा कार्यक्...