अरगडेगव्हाण येथील शिंदे यांचे प्रयत्न यशस्वी
यंदाच्या दुष्काळाने जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चांगली परीक्षा पाहिली आहे. खरीप, रब्बी पाण्याअभावी वाया गेला. मोठ्या कष्टाने जगविलेल्या मोसंबी बागाही वाळत आहेत. अशा टोकाच्या परिस्थितीमध्येही अरगडेगव्हाण (ता. घनसावंगी) येथील शेतकरी अच्युतराव शंकरराव शिंदे यांनी काटेकोर पाणी व्यवस्थापन, आच्छादनातून मोसंबी बागा जगविण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.
मोसंबीचे आगार समजल्या जाणाऱ्या जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यांत जायकवाडीच्या डाव्या कालव्याबरोबर गोदावरी नदीवरील बंधारा तसेच तालुक्यातील सिंचनाच्या कामांमुळे मोसंबीचे पीक भरभराटीस आले. मात्र या वर्षी जालना जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. घनसावंगी तालुक्यात सर्वाधिक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीत फळबागा टिकविण्यासाठी शेतकऱ्यांना अतोनात कष्ट करावे लागत आहेत. खरीप व रब्बी पाण्याअभावी वाया गेला. मोठ्या कष्टाने जगविलेल्या फळबागा वाळत आहेत. अशाही टोकाच्या परिस्थितीमध्ये अरगडेगव्हाण (ता. घनसावंगी) येथील शेतकरी अच्युतराव शंकरराव शिंदे यांनी काटेकोर नियोजनातून मोसंबी बागा जगविण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.
अच्युतराव शिंदे यांची वीस एकर शेती आहे. जमीन हलकी व मध्यम स्वरूपाची आहे. या क्षेत्रापैकी त्यांच्याकडे पाच एकर मोसंबी लागवड आहे. त्याचबरोबरीने पाण्याच्या उपलब्धतेनुसार कापूस, ऊस लागवड असते. मात्र या वर्षी पाऊस कमी झाल्याने उपलब्ध पाण्याची परिस्थिती पाहून ऊस लागवड टाळून त्यांनी सात वर्षांपूर्वी लागवड केलेल्या साडेपाच एकर मोसंबी बागेच्या जोपासनेवर लक्ष केंद्रित केले. साडेपाच एकर क्षेत्रात सध्या सातशे पन्नास मोसंबीची झाडे आहेत.
दुष्काळातही जगविली फळबाग
या वर्षी सुरवातीपासूनच अरगडेगव्हाण गावाच्या परिसरात पाऊस झाला नसल्याने विहिरींना पाणी आले नाही. पावसाअभावी गोदावरी नदीचे पात्रही कोरडे पडले. या भागात पाण्याचा हक्काचा स्रोत असणाऱ्या जायकवाडीच्या डाव्या कालव्यालाही टंचाईमुळे पुरेसे पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे पाणीटंचाई तीव्र झाली. यंदाच्या वर्षी पाऊसच इतका कमी झाला की मोसंबी बागेतील विहिरीने तळ गाठला. त्यामुळे शिंदे यांना मोसंबी बाग जगविण्यासाठी पाणी विकत आण्याची वेळ आली. मोसंबीचा बाग हाच उत्पन्नाचा स्रोत असल्याने त्यांनी काळजीपूर्वक बागेच्या व्यवस्थापनाकडे लक्ष दिले. मिळेल तेथून टॅंकरने पाणी विकत घेऊन बागेसाठी पाण्याची सोय केली. तसेच पाण्याच्या उपलब्धतेसाठी राजाटाकळी शिवारात डाव्या कालव्याच्या पलीकडे आणि गोदावरी नदीच्या जवळ विहीर घेतली. सुदैवाने या विहिरीस चांगले पाणी लागले. सहा किलोमीटर अंतराची पाइपलाइन करून त्यांनी मोसंबीच्या बागेतील विहिरीमध्ये हे पाणी सोडले.
...असे केले नियोजन
1) कृषी विभागातर्फे पाणी बचतीसाठी फळबागांमध्ये आच्छादन करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र आच्छादनासाठी मिळणाऱ्या अनुदानास होणारा विलंब पाहता शिंदे यांनी शेतातील गवत, काडी कचरा, बाजरीच्या बनग्या, पालापाचोळा जमा करून मोसंबी झाडांच्या आळ्यात आच्छादन केले. दुपारच्या वेळेस झाडांची सावली जमिनीवर जेवढ्या क्षेत्रावर पडते त्या सर्व भागावर सेंद्रिय आच्छादन केले. पालापाचोळ्यामध्ये वाळवीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कृषी तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार कीडनाशक पावडर आच्छादनात मिसळून दिली.
2) बागेला ठिबक सिंचन केलेले होतेच. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर झाला. आच्छादनामुळे झाडाच्या आळ्यात ओलावा टिकून राहिला. पाण्याचे बाष्पीभवन कमी झाले. झाडाच्या सर्व मुळ्यांना पुरेशी ओल मिळू लागली. झाडाभावेतालची जमीन सतत वाफसा स्थितीत राहिल्यामुळे पांढऱ्या मुळीची वाढ झाली. पाण्याच्या उपलब्धतेमुळे झाडेही तजेलदार राहिली.
3) झाडांवर बहर धरला असता तरी प्रारंभीपासून पाण्याची मोठी गरज असते. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये तेवढे पाणी देणे शक्य नसल्याने शिंदे यांनी झाडावर मर्यादित प्रमाणातच फळे ठेवण्याचा प्रयत्न केला. योग्य पद्धतीने छाटणी करून जास्तीच्या फांद्या काढून झाडांची पाण्याची गरज कमी केली. विहिरीत उपलब्ध होणारे पाणी लक्षात घेऊन बागेला टप्प्याटप्प्याने ठिबकद्वारे पाणी व्यवस्थापन केले. दर झाडाला सरासरी 12 लिटर पाणी मिळते. दर दोन दिवसांनी सरासरी तीन तास ठिबकद्वारे पाणी दिले जाते.
4) मोसंबीचा आंबे बहर धरताना शिंदे यांनी नोव्हेंबर महिन्यात ताण दिल्यानंतर पाणी देऊन संपूर्ण साडेपाच एकरातील बागेला दहा ट्रॅक्टर शेणखत आळ्यातील मातीत मिसळून दिले.याचबरोबरीने 18ः46ः0 या खत दिले. खत व्यवस्थापनासाठी त्यांना 25,000 रुपये खर्च झाला. प्रत्येक महिन्याला बागेत टाचणी केली. त्यासाठी पाच हजार रुपये खर्च आला. पाणी उपलब्धतेसाठी दुसऱ्या शेतात विहीर आणि पाइपलाइनसाठी पाच लाख खर्च केला.
5) यंदा मोसंबीच्या क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याने बाजारात कमी प्रमाणात फळांची उपलब्धता राहणार आहे. शिंदे यांना साडेपाच एकर क्षेत्रातून सुमारे 60 टन मोसंबीचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यांच्या परिस्थितीचा अंदाज घेता मोसंबीला सरासरी 17,000 रुपये प्रति टन भाव मिळण्याची शक्यता त्यांना वाटते. यातून मिळणारा नफा पाहता विहीर आणि इतर बाग व्यवस्थापनाचा स्रव खर्च वजा जाता अंदाजे सहा लाखांचे उत्पन्न मिळेल अशी त्यांना आशा वाटते. ऐन दुष्काळात तालुक्याबरोबर जिल्ह्यात मोसबीच्या बागा संपत असताना शिंदे यांनी काटेकोर नियोजनातून मोसंबीची बाग यशस्वीपणे जगविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरत आहे.
मोसंबी जगली यातच समाधान
गरजेनुसार टॅंकरने पाणी विकत आणून मोसंबी जगवीत आहे. सरासरी एका टॅंकरसाठी 1500 रुपये खर्च येतो. एका वेळेस कमीत कमी सात ते आठ टॅंकर मागावावे लागतात. दुष्काळी परिस्थितीत कायमस्वरूपी पाण्याचा स्रोत नसल्याने धाडस करून विहिरीचे काम हाती घेतले, त्यास चांगले पाणी लागले. तेथील पाणी आणण्यासाठी पाइपलाइन केली. खर्च वाढला. परंतु ठिबक सिंचन आणि सेंद्रिय आच्छादन, पाण्याचे काटेकोर नियोजनातून मोसंबी जगली यातच समाधान आहे.
-अच्युतराव शिंदे
संपर्क : अच्युतराव शिंदे - 9405531413
माहिती संदर्भ : अॅग्रोवन