অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ड्रायव्हरने केली यशस्वी शेती

किसन मोरे यांना टोमॅटो पिकाने दिले आर्थिक इंधन

सुमारे वीस वर्षे विविध वाहनांवर चालकाची चाकरी केल्यानंतर गावामध्येच पिकअप गाडी घेऊन टोमॅटो वाहतुकीचा व्यवसाय सुरू केला. यानिमित्ताने विविध शेतकऱ्यांची शेती पाहता आली, त्यातून वडिलोपार्जित 30 गुंठे क्षेत्रात टोमॅटो घेण्याची प्रेरणा मिळाली. त्यात वाटचाल करताना पारंपरिक पद्धतीच्या टोमॅटो शेतीचे रूपांतर सुधारित शेतीत केले. शिरोली खुर्द (ता. जुन्नर) येथील किसन रामचंद्र मोरे यांचे शेतीतील नियोजन उल्लेखनीय असेच आहे. 

सुमारे 20 वर्षे वाहनचालक म्हणून देशभर फिरलो. सन 2009 मध्ये स्वतःचे वाहन घेतले. व्यवसायासाठी संधी नजीकच होती. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने 2004 मध्ये नारायणगावमध्ये टोमॅटोचे खुले मार्केट सुरू केले होते, त्यात विविध राज्यांतील व्यापारी येऊ लागल्याने जुन्नर तालुक्‍यात टोमॅटोचे क्षेत्र वाढले. त्याचा लाभ घेत तालुक्‍याच्या विविध भागांतील शेतकऱ्यांचे टोमॅटो संकलित करून या मार्केटमध्ये आणण्याचा व्यवसाय सुरू केला. यानिमित्ताने विविध शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची संधी मिळाली. त्यांचे शेत, तेथील तंत्रज्ञान आदी पाहण्यास मिळाले. त्यातून टोमॅटोच्या शेतीसाठी प्रेरणा मिळाली. शिरोली खुर्द (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील किसन मोरे यांनी आपल्या शेतीचा झालेला श्रीगणेशा या शब्दांमधून व्यक्त केला.
आपले अनुभव मोरे सांगू लागले, आई अपंग असल्याने शेती करण्यावर मर्यादा होत्या. वडिलोपार्जित 30 गुंठ्यांत ऊस होता. चार वर्षांपूर्वी पारंपरिक पद्धतीने टोमॅटो शेती सुरू केली. पहिल्यापासूनच उत्पादन वाढवण्यावर भर दिला. यंदाच्या वर्षी पॉलिमल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनाचा वापर करून सुधारित शेती करण्याचे ठरवले.
दुष्काळी परिस्थिती समोर होती. विहिरीचे काम सुरू केले होते. अर्धा तास मोटर चालेल एवढेच पाणी मिळायचे. शेजारीच चुलतभावाची शेती असल्याने त्याच्याकडून वर्षाला चार हजार रुपये दराने पाणी घेतले. पैशांची जुळवाजुळव करून यंदाच्या एक एप्रिलला लागवड केली. रासायनिक खते जमिनीतून देताना 12-61-0, 13-0-45 आदी विद्राव्य खते; तसेच कॅल्शिअम, बोरॉन, मॅग्नेशिअम आदी दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरही केला. डाऊनी, भुरी यासारखे रोग व नागअळीसारख्या किडीला रोखण्यासाठी कीडनाशकांच्या फवारण्या केल्या.

जिद्दीने वाढवले टोमॅटोचे पीक

पुरेसे पाणी उपलब्ध नसले तरी पॉलिमल्चिंग पेपर व ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची बचत करणे सुरू होते. ऐन उन्हाळ्यात पाणी कमी पडल्याने रोपांची मरतुक होऊ नये म्हणून काळजी घेत होतो. कोणत्याही परिस्थितीत बाग वाचवायची यासाठी प्रयत्न सुरू होते. पीक जोपासण्यासाठी खते व कीडनाशकांची गरज होती; मात्र कृषी विक्री केंद्र चालक उधारीवर या निविष्ठा देण्यास घाबरत होते. मात्र, माझी जिद्द पाहून त्यांनीही हात आखडता घेतला नाही. टोमॅटो पिकानंतर याच शेतात काकडी पिकाचे नियोजन असल्याचे मोरे म्हणाले. त्यांना पत्नी सौ. पूनम यांची शेतीत समर्थ साथ लाभते आहे. 
मोरे यांची टोमॅटो शेती दृष्टिक्षेपात
(30 गुंठे क्षेत्रात)
उत्पादन - मागील वर्षी - सुमारे 1500 क्रेट (क्रेट 20 किलोचा) 
मिळालेले दर - 200 ते 350 रुपये प्रति क्रेट 
उत्पन्न - तीन लाख रु. खर्च - सव्वा ते दीड लाख रु.
त्यामागील वर्षी - उत्पादन - 1300 क्रेट
यंदा आत्तापर्यंत मिळालेले उत्पादन - 1500 क्रेट, अजून एक हजार क्रेट उत्पादन अपेक्षित
एकूण नियोजनातून सुरू झालेल्या प्लॉटमध्ये ऐन उन्हाळ्यात 27 मे रोजी पहिला तोडा झाला. या वेळी 12 क्रेट माल निघाला. या वेळी प्रति क्रेट 450 रुपये दर मिळाला. यानंतर दिवसाआड तोडा सुरू असून प्रति तोड्याला सुमारे 125 ते 150 क्रेट माल निघत आहे. प्रति क्रेट किमान 475 रुपये, तर उच्चांकी दर सहाशे रुपयांपर्यंत मिळाला आहे. 

लागवड खर्च (रुपये) व संबंधित तपशील - (आत्तापर्यंत)

1) बियाणे विकत आणून रोपे तयार करवून घेतली जातात. 
पुनर्लागवड हंगाम हा एप्रिलचाच निवडला जातो. 
2) रोपे खर्च - सहा हजार 
3) ठिबक सिंचन संच - मजुरीसह - 31 हजार रुपये 
4) मल्चिंग पेपर - 11 हजार 
5) रोपलावणी मजुरी - तीन हजार 
6) शेणखत - 10 हजार 
7) रासायनिक खते - 12 हजार 
8) रोपे आधार काठी - 25 हजार (मजुरीसह) 
9) तारा - पाच हजार 500 (मजुरीसह) 
10) सुतळी - 6000 
11) तोडणी मजुरी - सात महिला - ............200 (प्रति दिन) 
  • पुरुष मजुरी - दोन पुरुष - ...............200
  • टोमॅटो वाहतूक खर्च - प्रति क्रेट 12 रुपये
  • खते, कीडनाशके - 45,000
  • पाणी - 4000 (प्रति वर्ष)
  • इतर - 10 हजा
एकूण खर्च - दोन लाख 52 हजार 500
संपर्क 
किसन मोरे - 9665803075 

मार्केट अभ्यास आणि जोखीम व्यवस्थापन

शेती ते मार्केट समितीपर्यंत टोमॅटो वाहतुकीचा व्यवसाय करीत असताना व्यापाऱ्यांशीही चर्चा करण्याची संधी मोरे यांना मिळाली. यातून कोणत्या हंगामात किती दर असतो याचा अंदाज येऊ लागला. थेट बाजार समितीमध्ये गेल्यावर कोणत्या शेतकऱ्याला किती दर मिळाला याची माहिती त्यांना चर्चेमधून मिळते. कोणत्या महिन्यात टोमॅटोची लागवड केल्यास चांगला दर मिळू शकतो हे समजून घेऊन त्यानुसार नियोजन केले. 
टोमॅटोच्या चार वर्षांच्या शेती अनुभवानुसार दर कितीही घसरले तरीही आपण अधिक उत्पादन काढण्यासाठी प्रयत्न करायचे, मग नुकसान होत नाही. मालाची टिकवणक्षमता अधिक ठेवण्याच्या दृष्टीने वाणाची निवड केली जाते 
असे मोरे यांचे म्हणणे आहे. टोमॅटो व्यतिरिक्त काकडी, गहू आदी पिकांतून चार वर्षांत समाधानकारक उत्पन्न मिळवल्याचे ते म्हणतात. 

मोरे यांच्याकडून शिकण्यासारखे

  • बाजारपेठेचा अभ्यास करून पिकाचे नियोजन
  • मार्केटमध्ये विविध शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी बोलून माहिती मिळवणे
  • दर आपल्या हाती नाहीत; मात्र उत्पादनवाढ आपल्या हाती आहे हे समजून त्याप्रमाणे शेतीचे व्यवस्थापन
  • पॉलिमल्चिंग पेपर, ठिबक सिंचन आदी गोष्टींतून सुधारित शेतीकडे वाटचाल
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोची झालेली आवक व उलाढाल
सन 2004-05 ते सन 2012-13 पर्यंत 40,37,333 
उलाढाल - तीन अब्ज, 82 कोटी 67 लाख 15 हजार 090 रु.
सन 2004-05 - 1,36,792 - सहा कोटी 25 लाख 30 हजार 930 रु. 
सन 2011-12- 9,77,822 - 87 कोटी 78 लाख 76 हजार रु. 
सन 2012-13 - 9,93,809- एक अब्ज 11 कोटी 59 लाख 84 हजार 700 रु.

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate