सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्याचा पश्चिम भाग द्राक्षपिकाचा "बेल्ट' म्हणून ओळखला जातो. तुरची हे या परिसरातीलच गाव. द्राक्ष उत्पादन व बेदाणा निर्मितीकडे येथील शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त कल असतो. भाजीपाला उत्पादनही घेतले जाते. तासगाव, पलूस, सांगली ही शहरे जवळ असल्याने, शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळते.
तुरची गावातील विजय गलांडे या तरुणाने कृषी शिक्षणाची पदवी घेतल्यानंतर बाहेर काही काळ नोकरी केली. या दरम्यान जालना जिल्ह्यातील जरडगाव येथील आंबा गट शेतीची ऍग्रोवनमधील यशकथा त्याच्या वाचनात आली. पुढे विजय गावी आल्यावर आपली शेती करू लागला. त्यातून गटशेतीची संकल्पना हळूहळू डोक्यात आकार घेत गेली.
स्वतःची दहा एकर शेती करताना गावातील शेतकऱ्यांना एकत्र करून विचारांची देवाणघेवाण सुरू केली. बैठकाही सुरू झाल्या. वीस शेतकऱ्यांना एकत्र आणताना त्यांच्या नाकी नऊ येत होते. सर्वांना सांगितल्यावर सहा-सात जण येत होते. पुढील बैठकीत त्यांतील चार-दोन कमी होत होते. गटशेतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रयत्न सुरू होते; परंतु यश येत नव्हते. तरीही प्रयत्नांत सातत्य ठेवताना 18 मार्च 2010 रोजी भाग्योदय स्वयंसहायता शेती गटाची स्थापना झाली.
गटाच्या माध्यमातून शेतकरी एकत्र आल्यावर विचारांची देवाणघेवाण वाढली. ऍग्रोवन, अन्य कृषी प्रकाशनांमधून माहितीची गोडी लागली. रोग-किडी, उपाययोजना यांविषयी ज्ञान वाढले. रासायनिक खते, कीडनाशके, यांचा वापर संयमित होऊ लागला. अनेक शेतकरी पाटपाणी द्यायचे. चर्चेतून सर्वत्र "ड्रीप'ची यंत्रणा बसवण्यात येऊ लागली. आता शंभर टक्के ठिबक झाले आहे.
कृषी विभागाच्या प्रोत्साहनातून गटाने दोन वर्षांपूर्वी सांगलीत थेट भाजीपाला विक्री केंद्र सुरू केले. गटातील शेतकऱ्यांतर्फे उत्पादित शेवगा, मेथी, कोथिंबीर, वांगी, काकडी, टोमॅटो, सिमला मिरची, द्राक्षे, डाळिंब, कोबी, फ्लॉवर, मिरची व बेदाणा यांची विक्री केली. तीन महिन्यांत सुमारे पाच लाख चाळीस हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले. ग्राहकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला; परंतु निसर्गाची अवकृपा, पाऊस न झाल्याने पाणीटंचाई आदी कारणांमुळे शेतीवर परिणाम होऊन विक्री केंद्र बंद करावे लागले. पुन्हा लवकरच ते सुरू करण्याचे प्रयत्न आहेत.
भविष्यात येणारे सण-उत्सव, त्या अनुषंगाने विविध बाजारपेठांतील मालाची आवक, दर यांची माहिती घेतली जाते. रमजान सणासाठी माल उपलब्ध करण्यासाठी पपईची लागवड त्या अनुषंगाने केली जाते. श्रावण, मार्गशीर्ष महिन्यातील उपवास लक्षात घेऊन पेरूचे नियोजन होते.
भाग्योदय गटातर्फे हे वीस शेतकरी एकत्र येऊन महिन्याला प्रत्येक शेतकरी 200 रुपयेप्रमाणे बचत जमा करतात. त्यासाठी राष्ट्रीयीकृत बॅंकेत या गटाच्या नावाने खाते उघडण्यात आले आहे. रकमेचे दोन टक्के अल्प व्याजाने गरजू शेतकऱ्यांना वाटप केले जाते. त्यामुळे शेतीकामाला शेतकऱ्यांना सहज पैसे उपलब्ध होतात. या बचतीची उलाढाल वर्षाला एक लाख रुपयांपर्यंत होते.
गटात उत्पादित होणारा शेतमाल प्रामुख्याने सांगली, कऱ्हाड, पलूस शहरांत विकला जातो. दर्जेदार माल असल्याने अनेक व्यापारी गटाचा माल आवर्जून खरेदी करतात. माल विक्रीसाठी नेताना संपूर्ण गटातर्फे एकच वाहन सांगितले जाते. सर्वांचा माल एकत्र केला जातो. प्रातिनिधिक स्वरूपात दोन शेतकरी या वाहनाबरोबर जातात व मालाची विक्री करून येतात. त्यानंतर सर्वांचा हिशोब पूर्ण केला जातो.
राजाराम पाटील म्हणाले, की गटशेतीमुळे शेतीत नवी दिशा सापडली. द्राक्षाचे एकरी 13 ते 15 टनांपर्यंत उत्पादन मिळते. वीस गुुंठे गुलाबाची खुली (ओपन) शेती आहे. त्यातून दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. लक्ष्मण पाटील म्हणाले, की गटाच्या माध्यमातून तैवान वाणाची वीस गुंठे पपई लागवड केली आहे. कुक्कुटपालनही सुरू केले. गटशेतीमुळे शेतीची गोडी वाढली. विजय गलांडे म्हणाले, की 10 एकरांपैकी माझ्याकडे साडेचार एकरांवर शेवगा आहे. वार्षिक उत्पन्न एकरी दोन लाख रुपयांपर्यंत आहे.
गटातील अशोक अबदर म्हणाले, की पपई दीड एकर व दोन एकरांवर शेवगा आहे. बाजारपेठेत प्रतिकिलो पन्नास ते साठ रुपये दर शेवग्याला मिळतो. हा दर वीस ते पंचवीस रुपये किलोवर येतो, तेव्हा बाजारात प्रत्यक्ष बसून पाच शेंगांना दहा रुपये या पद्धतीने हातविक्री केली जाते.
गटात सुमारे वीस शेतकरी असले तरी प्रमुख सात ते आठ तरुण विविध कामांसाठी आघाडीवर असतात. त्यात कामांची विभागणी केली जाते. दोघे जण शेतीविषयक माहिती घेऊन ती सदस्यांना पुरवतात. अन्य दोघे गटातील शेतकऱ्यांच्या सहलींसाठी पुढाकार घेतात. गटाचे शेती रेकॉर्ड, विक्री व्यवस्था आदी कामेही वाटून घेतली जातात.
-शेतकरी संख्या - 20
-गटातील शेतकऱ्यांचे क्षेत्र- दोन ते 10 एकरांपर्यंत
यात पपई, पेरू, शेवगा, गुलाब, फरसबी, द्राक्षे, ऊस, भाजीपाला आदी पिकांचा समावेश आहे.
मका प्रकल्प सुमारे 15 एकरांवर यंदा राबवला. गटात दहा हेक्टरवर फरसबी घेण्यात आली. किलोला 23 रुपये दराने एका कंपनीला मालविक्रीचे नियोजन केले. गुलाब मुंबईला पाठवला जातो. शेवग्याची एकूण विक्री आत्तापर्यंत 16 टनांपर्यंत झाली असण्याचा अंदाज आहे.
-भविष्यात शंभर टक्के सेंद्रिय शेती, बंदिस्त शेळीपालन करण्यात येणार आहे. गटातील सदस्यांना निविष्ठा वेळेवर उपलब्ध व्हावी यासाठी कृषी सेवा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्याचा परवाना व अन्य कामे पूर्ण झाली आहेत. रोपवाटिका, भाजीपाला साठवण केंद्र उभारले जाईल. गटाला कृषी विभागाचे मोठे सहकार्य लाभले आहे.
संपर्कः दिनकर गलांडे- 9890451455
(अध्यक्ष, भूमिपुत्र गट)
- विजय गलांडे - 9604731477
------------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: - अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
प्रगतिशील शेतकरी कुलदीप राजाराम राऊत यांनी विदर्भा...
नगर जिल्ह्यातील बलभीम पठारे यांना पारंपरिक पीक पद्...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...