অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नैसर्गिक ऊस दर्जेदार गूळ

तेरा वर्षांपासून नैसर्गिक शेतीत सातत्य


कोल्हापूर जिल्ह्यातील भुयेवाडी (ता. करवीर) हे कोल्हापूर शहरापासून दहा किलोमीटर अंतरावरचे गाव. जिल्हा उसासाठी प्रसिद्ध, साहजिकच गुऱ्हाळांना चांगला वाव. सुमारे पाच हजार लोकसंख्येच्या भुयेवाडीतही गुऱ्हाळे मोठ्या प्रमाणात आहेत. याच गावात पेशाने बसवाहक (केएमटी) असलेले प्रताप पाटील यांनी नैसर्गिक व सेंद्रिय शेतीची वाट गेल्या तेरा वर्षांपासून जोपासली आहे. कोणतेही रासायनिक घटक न वापरता ऊसशेती व त्याआधारे सेंद्रिय पध्दतीने उत्पादित आपल्या गुळाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

अशी आहे पाटील यांची ऊसशेती


भुयेवाडी येथे डोंगराळ भागात पाटील यांची शेती आहे. सन 2000 मध्ये डोंगराच्या पायथ्याची जमीन फोडून त्यांनी शेतजमीन तयार केली. विहीर घेतली. कमी पाण्यात थोड्या क्षेत्रावर फार काही नियोजन न करता ऊसशेती सुरू केली. त्यादरम्यान अमरावती जिल्ह्यातील नैसर्गिक शेतीचे अभ्यासक सुभाष पाळेकर यांचे व्याख्यान त्यांनी कोल्हापुरात ऐकले. त्यानंतर याच मार्गाने आपण जायचे असे त्यांनी ठरविले. आजगायत त्यांचा प्रवास त्या दिशेने सुरू आहे.
पाटील यांची जमीन डोंगराळ भागात उंचावर आहे. पाण्याची अत्यंत कमतरता आहे. मागील वर्षी तर 12 गुंठ्यावरील ऊस पाण्याअभावी काढून टाकावा लागलेला. त्यात बसवाहक म्हणून नोकरी सुरू असल्याने पूर्ण वेळ शेतीकडे लक्ष देता येत नाही. अशाही परिस्थितीत किमान एक एकरावर त्यांनी ऊसशेती टिकवून ठेवली आहे. 
त्यातून दर वर्षी एकरी 30 ते 40 टन उत्पादन घेतले आहे; परंतु त्यात समाधानी असल्याचे पाटील म्हणतात. 
उसाला कोणतेही रासायनिक खत वा कीडनाशक वापरले जात नाही.

ऊसशेतीची काही वैशिष्ट्ये


लागवड करण्यापूर्वी शेताची मशागत केली जाते. उपलब्धतेनुसार एकरी चार ट्रॉली शेणखताचा वापर केला जातो. पाणीपुरवठा योजनेचे पाणी सिंचनासाठी उपलब्ध आहे. रासायनिक खतांऐवजी जीवामृत वापरले जाते. यात देशी गायीचे शेण, गोमूत्र, दोन किलो गूळ, कडधान्य याचे मिश्रण करून दहा दिवस ते ठेवले जाते. त्यानंतर प्रत्येक पाण्यासोबत पाटातून हळूहळू सोडले जाते. पूर्वी दर आठवड्याला दिले जायचे. आता जमिनीची सुपीकता वाढत चालली असून महिन्यातून दोनच वेळा जीवामृताचा वापर केला जातो.
  • उसात आंतरपिक म्हणून चवळी, हरभरा घेतला जातो.
  • गव्हाचे काड व वाळलेल्या पाल्याचे मल्चिंग केले जाते.
  • दर वर्षी पाच ते सात दिवस शेतात बकरी बसवल्या जातात.
  • को 86032 जातीचा वापर होतो. पाण्याचा अधिक काळ ताण बसला तरी ही जात त्यासाठी सहनशील असल्याचा अनुभव आल्याचे पाटील म्हणतात.

गुळाला तयार केले मार्केट


  • पाटील आपल्या चुलत्यांच्या गुऱ्हाळातून आपला सेंद्रिय गूळ बनवून घेतात.
  • सुमारे दहा टन उसापासून 1120 ते 1150 किलो गूळ उत्पादित होतो.
  • - गूळनिर्मितीत रानभेंडी, चुन्या व्यतिरिक्त कोणते घटक वापरले जात नाहीत.
  • पॅकिंग-
  • प्रति किलोची ढेप (रवा) तयार केली जाते.
  • पन्नास ते पंचावन्न रुपयाला प्रति किलो या प्रमाणे त्याची विक्री होते.
  • अठरा किलोचे बॉक्‍सही तयार केले जातात.
गेल्या दशकापासून पाटील गूळ तयार करीत असल्याने त्यांचा खास ग्राहकवर्ग तयार झाला आहे. प्रणव ओम नैसर्गिक गूळ असा त्यांचा ब्रॅंड असून मुंबई, पुणे, कोल्हापूर स्थानिक, रत्नागिरी, कुडाळ, वाई ते अगदी गुजरातपर्यंत त्यांच्या गुळाला मागणी असते. ऍग्रोवनच्या कृषी प्रदर्शनासह विविध प्रदर्शनांतून ते विक्री करतात.
वर्षाला सुमारे दोन टनांपर्यंत त्यांच्या गुळाची विक्री होते. गुळासाठी शासकीय व खासगी संस्थांचे प्रमाणपत्रही त्यांनी मिळविले आहे. गूळ तयार करतानाचा पन्नास हजार रुपयांचा प्रक्रिया व अन्य खर्च वजा जाता वर्षाला एकरी दीड लाख रुपयांपर्यंत नफा त्यांना मिळतो.
आपल्या रोजच्या आहारातील किमान एक पदार्थ तरी रासायनिक विरहित असावा व त्याचा लाभ आपल्या कुटुंबाला व समाजाला मिळावा याच हेतूने मी नैसर्गिक वा सेंद्रिय पद्धतीने ऊसशेती व गूळनिर्मिती करतो त्याचे मला समाधान आहे.

खडतर वाटचाल, मात्र यश मिळाले


पाटील यांनी नैसर्गिक शेतीची संकल्पना अंगिकारत शेती सुरू केली; पण अनेकांनी त्यांना अक्षरश: वेड्यात काढले; पण केवळ उत्पादन व उत्पन्न हा हेतू त्यांनी ठेवला नाही. लोकांना आरोग्यदृष्ट्या चांगले अन्न खायला मिळाले पाहिजे हा दृष्टिकोन त्यांनी कायम ठेवला. अन्य गुळाच्या तुलनेत त्यांचा गूळ रंगाने काहीसा लालसर व फारसा आकर्षक दिसत नाही, त्यामुळे सुरवातीला तो कोणी खरेदी करत नव्हते. गूळ तसाच पडून राहायचा. अनेकदा नुकसान झाले; पण हळूहळू तज्ज्ञ, जाणकार लोकांशी संपर्क वाढवत पाटील यांनी गुळाचे महत्त्व पटवून देत मार्केट वाढवले. वैद्यकीय अधिकारी, सिनेकलावंत, उद्योगपती पाटील हे यांच्या गुळाचे ग्राहक आहेत. अनेकांशी त्यांचे मैत्रीचे नाते निर्माण झाले आहे. "माऊथ पब्लिसिटी'द्वारेही त्यांचे ग्राहक वाढले आहेत. 
संघर्ष जरूर आहे. प्रतिकूल परिस्थितीमुळे उसाचे उत्पादन घटते, मागणीपेक्षा गूळ कमी होतो; पण आर्थिक लाभांसाठी अन्य ठिकाणाहून गूळ आणून विकणे असा प्रकार ते करीत नाहीत. ...
राजकीय नेत्यापासून अभिनेत्यांत प्रसिद्ध गूळ
पाटील गेल्या तेहेतीस वर्षांपासून कोल्हापूर महापालिकेच्या बससेवेत वाहक आहेत. "ड्युटी' सांभाळून ते शेतीकडे लक्ष देतात. कुटुंबातील सदस्यांची त्यांना मदत होते. या वाटचालीत अनेक लोकप्रिय व्यक्तींनी त्यांची पाठ थोपटली आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार एकदा गारगोटी दौऱ्यावर असताना पाटील यांना त्यांच्याशी नैसर्गिक व दर्जेदार गुळाच्या अनुषंगाने संवाद साधण्याची संधी मिळाली. सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक विठ्ठलराव कामत यांनीही पाटील यांच्या या गुळाच्या निर्मितीबद्दल कौतुक केले आहे. चित्रपट चित्रीकरणाच्या निमित्ताने भुयेवाडीत आलेल्या सिनेअभिनेता मकरंद अनासपूरे व त्यांच्या सहकाऱ्यांनाही या नैसर्गिक गुळाने भुरळ घातली आहे.

ऊस आणि गूळ- दोन्हीही नैसर्गिक


पाटील म्हणतात, की दोन प्रकारचे गूळ बाजारात उपबलब्ध होतात. रासायनिक शेतीतून उत्पादित झालेल्या उसावर रसायने न वापरता तयार केलेला गूळही सेंद्रिय म्हणून विकला जातो. आम्ही मात्र ऊसशेती नैसर्गिक पद्धतीने करतो आणि त्याच उसाचा गूळ नैसर्गिक पद्धतीने बनवतो. हा गूळ दिसायला लालसर असला तरी खऱ्या अर्थाने नैसर्गिक असतो... प्रयोगशाळांच्या तपासणीतून आम्ही हे सिद्ध केल्यानेच आमचा ग्राहकवर्ग टिकून आहे. 

प्रताप पाटील - 9881032188

माहिती संदर्भ : अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate