অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्रयोगशिल शेतकरी...

परंपरागत पद्धतीला नाविन्यपूर्ण प्रयोग आणि संशोधनाची जोड दिली तर शेती ही अजूनही उत्तम उत्पन्न देत असल्याचे दाखवून देणाऱ्या वांगणी येथील गणेश देशमुख या तरुण शेतकऱ्याच्या कर्तृत्वाची दखल घेत त्यांची डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने संशोधन समितीवर नेमणूक केली आहे. उत्पादक ते ग्राहक ही योजना प्रत्यक्षात राबविणारे म्हणून देशमुख यांनी आपले नाव कमावले आहे हे विशेष.

आपला देश हा कृषी प्रधान आहे व तो राहावा हाच त्यांचा ध्यास असतो. केवळ शासनावर अवलंबून न राहता स्वतः मेहनत घेवून शासनाच्या योजना कशा पद्धतीने यशस्वी होतील यासाठी ते प्रयत्नशील असतात. अनेक पुरस्कार मिळाले असले तरी अन्य शेतकऱ्यांना जास्तीत जास्त माहिती देणे आणि नव नवीन माहिती घेणे हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्या या निवडीने वांगणी पंचक्रोशीत आनंद व्यक्त होत आहे. ठाणे जिल्ह्यातून एकमेव प्रतिनिधी म्हणून देशमुख या संशोधन समितीवर नियुक्त झालेले आहेत. ब्रांडेड कलिंगडाचे उत्पादन घेणारे ते पहिले शेतकरी असून आता त्याचे पेटंट घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गणेश देशमुख यांनी सांगितले

उत्पादक ते ग्राहक योजना

दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या गणेश देशमुख यांनी काही काळ नोकरी केली. मात्र त्यात त्यांचे मन फारसे रमले नाही. त्याऐवजी शेती करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यांच्या मालकीची फारशी जमीन नाही. त्यामुळे पावसाळ्यानंतर नापिकी अवस्थेत असलेली वांगणी परिसरातील नदीकाठची जमीन संबंधित शेतकऱ्याकडून आठ महिन्यांसाठी भाड्याने घेऊन ते शेती करतात. गेली २२ वर्षे अशा पद्धतीने भाडे तत्त्वावर ते शेती करतात. कलिंगड, टॉमेटो, काकडी, कारली आदी विविध प्रकारच्या भाज्या ते पिकवितात. परंपरागत भाजी मंडईच्या पुढे जात देशमुखांनी "उत्पादक ते ग्राहक" ही योजना यशस्वीपणे राबविली असून आता त्याही पुढे एक पाऊल टाकत त्यांनी मॉलच्या बाजारपेठेत त्यांच्या शेतमालास स्थान मिळवून दिले आहे. हायपर सिटी, रिलायन्स आणि बिग बाझार या मॉल्समध्ये त्यांचे टॉमेटो, कलिंगड आणि भाजीपाला विकला जातो. या शेती व्यवसायातून परिसरातील ३०-३५ जणांना त्यांनी रोजगार मि़ळवून दिला आहे.

हायपर सिटी मॉलला भाजीपाला आणि कलिंगड विकताना त्यांनी काही वर्षांपूर्वी एक प्रयोग यशस्वी केला तो म्हणजे कलिंगडाचे उत्पादन करताना थेट त्या कलिंगडावर त्या मॉल चे नाव असलेले कलिंगड तयार केले. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर त्या मॉल मालकानी देशमुख यांचा सत्कार केला. आता त्यांना एका नामांकित कंपनीकडून ऑफर आली आहे. त्या कंपनीचे नाव असलेले कलिंगड तयार करून दिल्यास त्या कंपनीच्या मालकाशी थेट भेट घडवून देण्यात येईल. त्यासाठी देशमुख आता प्रयत्न करीत आहेत. परंतु त्याआधी ते आपल्या कलिंगड उत्पादनाचा पेटंट घेणार आहेत.

कलिंगडाचे उत्पन्न

कोकणातील इतर गावांप्रमाणे वांगणीतील शेतीही पावसाळ्यानंतर नापिकी अवस्थेतच असते. संबंधित शेतकऱ्याकडून जागा भाड्याने घेऊन गणेश देशमुख यांनी सुरूवातीला टॉमेटोची लागवड करण्यास सुरूवात केली. ठिबक सिंचन, पेपर मल्चिंग आदी पद्धतींचा अवलंब केल्याने शेतीतून चांगले उत्पन्न घेण्यात ते यशस्वी ठरले आहेत. गरजेनुसार उत्पन्न घेतले की चांगला भाव मिळतो, हे त्यांनी गेल्यावर्षी एप्रिल ते जून दरम्यान कलिंगड पिकवून दाखवून दिले. सर्वसाधारणपणे मार्च अखेरीस कलिंगडाचा सीझन संपतो. खरेतर उन्हाळ्यात या फळाची अधिक गरज असते. त्यामुळे गेल्यावर्षी त्यांनी कलिंगडाची लागवड काहीशी उशिराने केली. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यात फळ हाती आल्याने त्याचा त्यांना चांगला फायदा झाला. कोकणात सर्वसाधारणपणे एकरी १० ते १२ टन कलिंगडाचे उत्पन्न मिळते. मात्र गणेश देशमुख एकरी ३० टन कलिंगडाचे पीक घेण्यात यशस्वी झाले आहेत. टॉमेटोचे दर एकरी ५० टन इतके विक्रमी उत्पन्न ते घेतात.

२६ जुलै २००५ च्या महाभयंकर महापुरात या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांप्रमाणेच गणेश देशमुख यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. अन्य शेतकऱ्यांप्रमाणेच देशमुख यांनाही शासनाने नुकसान भरपाई मंजूर केली मात्र देशमुख यांनी ही शासनाची तब्बल दोन लाखावर असलेली आर्थिक मदत नम्रपणे परत करीत शासनाला अन्य शेतकऱ्यांना मदत करावी अशी भूमिका घेतली.

शेतीचा कसदारपणा

आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते परंतु मदत नाकारल्याने शासनाकडे आणि बँकेत माझी पत वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्याकडे साडेसात लाखांचे किसान क्रेडीट कार्ड उपलब्ध झालेले आहे त्याचा मला फार चांगला उपयोग होत आहे. शासन कमी दरात व्याज उपलब्ध करून देते ते कर्ज आपण मुदतीत फेडले तर दुसरे कर्जही लगेच उपलब्ध होते. शेतकऱ्यांनी सुद्धा कर्ज फेडीची सवय लावणे गरजेचे आहे. आता पूर्वीसारखे एकच उत्पादन आणि एकट्यानेच शेती करण्यासारखे राहिले नसून सामुदायिक शेतीला चांगले दिवस आलेले आहेत. त्यातून वर्षभर उत्पादन करतानाच शेतीचा कसदारपणासुद्धा वाढविता येतो इतके चांगले प्रयोग यशस्वी झालेले आहेत, असे देशमुख यांनी सांगितले.

अशा या प्रयोगशील आणि प्रामाणिक मेहनती शेतकऱ्याची शासनाने दाखल घेत त्यांना कृषिभूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. त्यांना आतापर्यंत आदर्श शेतकरी, वांगणी गौरव, ठाणे जिल्हा परिषदेचा प्रगतशील पुरस्कार, झी २४ तासचा अनन्य सन्मान पुरस्कार, नाशिक येथील यंग फार्मर्स पुरस्कार असे अनेक पुरस्कार देशमुख यांना प्राप्त झालेले आहेत. पुरस्कार मिळूनही ते अतिशय विनम्र आणि इतरांना मदत करण्याची त्यांची तयारी असते.

नाशिक, धुळे, नंदुरबार, विदर्भ मराठवाडा आदि भागात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते जात असतात तेथे जातानाही त्यांच्यातील नवीन काही तरी शिकण्याची सवय आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात तरूण शेतकऱ्यांना कार्यशाळा तसेच प्रशिक्षण शिबिरांमधून मार्गदर्शनही करतात. 

लेखक - गिरीश त्रिवेदी,
पत्रकार, बदलापूर

माहिती स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 7/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate