অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फळांची थेट हातविक्री

फळांची थेट हातविक्री

पावसे कुटुंबीयांकडून पेरू, चिकू केळींची बाजारपेठेत स्वतः विक्री

शेतकऱ्यांनी शेतीमाल पिकविण्याबरोबर विक्रीचे तंत्रही अवगत केले तर त्यांचा फायदा अधिक वाढण्याची संधी असते. वैयक्तिक स्तरावर तसेच सामूहिकरीत्याही शेतकरी विक्री व मार्केटिंग या गोष्टींवर अधिक विचार करू लागले आहेत. सातारा जिल्ह्यातील जखीणवाडी (ता. कराड) येथील मारुती केरू पावसे यांनी हातविक्रीच्या तंत्राद्वारे आपल्या उत्पादनाची विक्री स्वतःच सुरू केली आहे. गावालगतच्या विद्यापीठाचे गेट व मलकापूरच्या बाजारात बसून ते आपल्या कुटुंबातील सदस्यांसह पेरू, चिकूची हातविक्री करतात. त्यातून समाधानकारक उत्पन्न ते घेत आहेत.
पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या आगाशिव डोंगरपायथ्याशी जखीणवाडी गाव आहे. कराड शहरापासून अवघ्या काही अंतरावर ते असल्याने परिसरातील शेतकऱ्यांचा शेतीमाल हातविक्रीकडेच कल राहिला आहे. यापैकीच असलेले पावसे प्रचंड जिद्दी शेतकरी आहेत. त्यांची डोंगर उतारास सुमारे साडेपाच एकर शेती आहे. विहीर व जलसिंचन योजनेतील पाण्याच्या आधारावर ती पिकते. सन 2010-11 मध्ये त्यांनी कृषी विभागाच्या सहकार्यातून दहा गुंठ्यांत शेततळे खोदले. त्यातील पाण्याचा सायफन पद्धतीने वापर केला. सुरवातीला भाजीपाला पिकांतून उत्पन्न घेऊन त्यातून विहिरीची सोय केली. त्या आधारावर दहा वर्षे पानमळा शेतीतून उत्पन्न मिळवले. याच दरम्यान तब्बल 45 जनावरांच्या गोठ्याचे व्यवस्थापन सांभाळले. मात्र वाढत्या मजूर समस्येमुळे जनावरांची संख्या पुढे केवळ चार ते आठवर आली आहे.
पानमळा काढलेल्या एक एकर क्षेत्रात पावसे यांनी एक एकरावर चिकूची लागवड केली. या बागेचा पुरेपूर वापर करताना चिकूबरोबर त्यांनी सलग चार वर्षे केळीचे पीक घेतले होते. चिकू झाडांच्या मोकळ्या अंतरात ग्रॅंडनाईन-9 जातीच्या केळीची लागवड केली. उत्पादित केळींचीही हातविक्री केली. केळीची काढणीपश्‍चात राहत्या घरातच नैसर्गिक पद्धतीने पिकवण केली. केळीच्या पहिल्या पिकातून पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. रोपे खरेदी, ठिबक सिंचन, खते, वरखते, मेहनती, मजुरी व अन्य मिळून सुमारे दीड ते दोन लाख रुपये खर्च आला. दुसऱ्या वर्षी खोडवा पिकातून चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. कीडनाशके, खते, पाणी, मेहनत, लागवडीकामीचा खर्च वगळता अन्य फारसा खर्च आला नाही. त्यानंतर तिसऱ्या पिकातून तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. या वेळी वन्यप्राण्यांचा त्रास झाल्याने पिकाचे नुकसान झाले. तीन एकरावर ठिबक सिंचन प्रणालीद्वारे पाणी व्यवस्थापन केले आहे.
सन 1998 मध्ये कृषी विभागाच्या फळबाग लागवड योजनेच्या माध्यमातून एक एकरात पेरूची लागवड केली. 
यामध्ये लखनौ जातीचा पेरू आहे. तसेच बारामती येथूनही पेरूची रोपे प्रति नग 25 रुपये या दराने आणली. बागेत दोन्ही जातींचे मिश्रण आहे. पेरू व चिकू बागेसाठी पावसे शेणखत, करंजी व निंबोळी पेंडीचा वापर करतात. सेंद्रिय खतांच्या वापरामुळे उत्पादित मालाची गुणवत्ता टिकवण्यास मदत होते. पेरू बागेस वर्षातून जानेवारी व जूनमध्ये शेणखत देतात. प्रति झाडास चर काढून त्यामध्ये 13 किलो शेणखत, दोन किलो करंजी पेंड व एक किलो निंबोळी पेंड एकत्रित मिसळून दिल्यानंतर चर मुजवतात. याबरोबरच चिकू बागेस प्रति झाड 26 किलो शेणखत, करंजी व निंबोळी पेंड पाच किलो एकत्रित देतात. किडींचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी वेळोवेळी फवारण्या घेतात. बागेत रासायनिक खतांचा वापर करीत नाहीत.
चिकू बागेला दोन दिवसाआड चार तास ठिबक सुरू ठेवून पाणी देतात. बागेच्या उंचावर शेततळे आहे. तळ्यातील पाणी सायफन पद्धतीने बागेस दिले आहे. त्यामुळे विजेची बचतही घडली आहे. बागेला उन्हाळ्यात पंधरा दिवसांच्या अंतराने सोडपाणी देतात. पाणी जास्त झाल्यास फळास गोडी कमी येते. त्यामुळे फळधारणेनंतर दरमहा पाणी देतात. पानगळतीवेळी दोन ते तीन महिने पाण्याचा ताण देतात. पानगळ संपल्यानंतर झाडावरील मर लागलेल्या फांद्या कमी करतात. स्वअभ्यास व याकामी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतात. माती व पाणी परीक्षणानुसार शेतीचे व्यवस्थापन सांभाळले जाते.

विक्रीचे व्यवस्थापन

शेतीसाठी भांडवल महत्त्वाची गोष्ट आहे. पावसे यांनी राष्ट्रीय बॅंकेच्या स्थानिक शाखेकडून अर्थसाहाय्य घेतले आहे व शेतीत खेळते भांडवल ठेवले आहे. सन 2011 मध्ये पेरूंची विक्री व्यापाऱ्यास एकरकमी 25 हजार रुपयांस केली. पुढील वर्षी व्यापाऱ्याबरोबर बोलणी होईपर्यंत स्थानिक बाजारपेठेत माल विकायचे ठरवले.
गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर कृष्णा अभिमत विद्यापीठ व वैद्यकीय महाविद्यालय आहे. त्यामुळे या परिसरातील उपलब्ध स्थानिक बाजारपेठेची संधी त्यांनी घेतली. विद्यापीठाचे प्रवेशद्वार व मलकापूरच्या बाजारात पेरूंची हातविक्री सुरू केली.
फळाची गोडी व गुणवत्ता चांगली असल्याने उत्पादित मालाला चांगला उठाव मिळाला. यातून दरदिवशी सरासरी एक हजार रुपये व काही प्रसंगी ते अगदी पाच हजारांपेक्षा अधिक मिळाले. ज्या वेळेस व्यापारी शेकडा दोनशे रुपये दराने माल विकत घेत होते त्याचवेळी पावसे यांच्या मालास दर चांगला मिळत होता. प्रत व आकारानुसार लहान आकाराचा पेरू शेकड्याला 350 रु, मोसंबी आकाराच्या पेरूला हाच दर 700 रुपये मिळाला. मोठ्या आकाराचा पेरू दहा रुपयांना एक याप्रमाणे हातोहात विकला गेला. दररोज बागेतील मालाच्या उपलब्धतेनुसार सातशे ते दीड हजार पेरूंची विक्री केली जायची.
पेरूच्या पाट्या मोटरसायकलवरून वाहून विक्रीच्या ठिकाणी आणल्या जातात. पावसे, त्यांच्या पत्नी सौ. छाया व मुलगा शंकर हे तिघेजण परिसरातील मोक्‍याच्या ठिकाणी (वैद्यकीय महाविद्यालय व मलकापूर बाजार) बसून फळांची विक्री करतात.
दररोज ताजी फळे तोडली जात असल्याने व नैसर्गिक पद्धतीने बागेचे व्यवस्थापन सांभाळल्याने फळांची गुणवत्ता टिकून राहाते. ज्या वेळी व्यापाऱ्यांना बाग दिली जाते, त्या वेळी कोवळी फळेही बाजारात येतात. तसे आपल्याकडे होत नसल्याचे पावसे सांगतात.
पेरूच्या एका जातीचा वर्षाआड बहर येतो. दुसऱ्या जातीला वर्षातून तीन बहर येतात. गेल्या वर्षी पेरूच्या विक्रीतून एक लाख 40 हजार रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले. यासाठी एकूण चाळीस हजार रुपये खर्च आला. पेरू व चिकू पिकातून खर्च वजा जाता दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.
चिकूचा विक्री हंगाम सप्टेंबरमध्ये सुरू होतो. चिकूची प्रति किलो ठोक स्वरूपात 60 रुपये, तर किरकोळ स्वरूपात 50 रुपये दराने विक्री होते. शेतीतील उत्पन्नातून पावसे यांनी तीन फूट व्यासाच्या विहिरीची खुदाई केली. एक हजार फूट पाइपलाइन केली आहे. त्याबरोबर मुलगा महादेव याला चांगले शिक्षण देऊन अभियंता बनवणे शक्‍य झाले.

संपर्क - मारुती पावसे, ९८२२८३५६३१

माहिती संदर्भ : अॅग्रोवन© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate