অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

माणदेशात शेततळ्यातून फुलवली डाळिंबबाग

माणदेशात शेततळ्यातून फुलवली डाळिंबबाग

सांगली जिल्ह्यातील आटपाडीत पाऊस पडतो तो परतीचाच. माणदेश तोपर्यंत बऱ्यापैकी माळरान असते. पण, या माळरानावर सचिन नारायण नागणे यांनी जवळपास 20 एकर डाळिंबाची बाग फुलवली आहे आणि स्वतःच्या कुटुंबाची प्रगती साधली आहे.

आटपाडीपासून जवळपास 3 किलोमीटर अंतरावर पुजारवाडी हे सचिन नागणे यांचे गाव. घरात आई बाबा, भाऊ-बहिणी असा मोठा परिवार. दहा वर्षांपूर्वी कुटुंबाची स्थिती बेताचीच. मात्र, नागणे कुटुंबाने जिद्द आणि चिकाटीने ही परिस्थिती बदलून दाखवली आहे. कृषी विभागाच्या शेततळे आणि अन्य योजनांच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची प्रगती केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामुदायिक शेततळ्याच्या योजनेमधून सचिन नारायण नागणे यांनी शेततळे बांधले. शेततळ्याचा हौद 40 मीटर X 40 मीटर अशा आकाराचा आहे. शेततळ्यासाठी उच्च प्रतीचा कागद वापरला आहे. पाण्याची क्षमता 1 कोटी, 40 लाख लिटर्स आहे. याबाबत सचिन नागणे म्हणाले, शेततळ्यासाठी राज्य शासनाकडून त्यावेळी 4 लाख, 50 हजार अनुदान मिळाले आणि आम्ही स्वत:चे 2 लाख घातले. शेततळ्यासाठी एकूण 6 लाख, 50 हजार खर्च आला. एचडीपी मटेरियलमुळे शेततळ्याच्या कागदाचा दर्जा आज जवळपास 9 वर्ष पूर्ण झाली तरी चांगला आहे.

हे शेततळे भरण्यासाठी माझी एक बोअरवेल, दोन विहिरी आहेत. त्याचबरोबर जवळच कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. माझ्याच रानामध्ये गावतलाव आहे. या सर्व उपलब्ध सोयींच्या माध्यमातून आम्ही पावसाळ्यामध्ये शेततळे भरतो. जानेवारीपासून विहीर, बोअरवेलला कमी पाणी येते. त्यामुळे जानेवारीपासून 100 टक्के शेततळ्यातील पाण्याचा वापर करतो. जानेवारी ते मे या कालावधीमध्ये सायफन पद्धतीने विहिरीत पाणी सोडतो आणि विहिरीतून मोटारीने बागेला पाणी देतो.

शेततळे पूर्ण झाल्यानंतर सचिन नागणे यांनी 2008 साली 5 एकर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड केली. त्यातून मिळालेल्या लाभातून लागवड क्षेत्रात टप्प्याटप्प्याने वाढ केली. शेततळ्यातून वेळोवेळी पाण्याची सोय उपलब्ध झाल्यामुळे उत्पन्नात वाढ झाली. त्यानंतर पुन्हा 2014 साली 10 एकर डाळिंबाची बाग लावली आहे. आतापर्यंत 12 एकर डाळिंबाची बाग दरवर्षी करत असत. पण, चालू वर्षी 20 एकर क्षेत्रावर डाळिंबाची बाग केली आहे.

कृषी विभागाच्या योजनांमधून स्वतःची प्रगती साधली असल्याचे सांगून सचिन नागणे म्हणाले, शेततळ्याच्या पाण्याची सोय असल्याने आम्हाला डाळिंबापासून जास्त उत्पन्न मिळाले. जानेवारी ते मार्च दरम्यान डाळिंबाला चांगला भाव मिळतो. यातून माझी आर्थिक परिस्थिती सुधारली. यातून मी भावांचे शिक्षण पूर्ण करू शकलो, तसेच घरही बांधले आहे. सचिन यांचा एक भाऊ टेक्सटाईल इंजिनिअर, दुसरा भाऊ बँकेत कॅशियर, तिसरा भाऊ शिक्षक आहे आणि चौथा भाऊ मेडिकल फिल्डमध्ये एमबीए करुन तो एका कंपनीचा व्यवस्थापक आहे.

सचिन यांच्या मातोश्री सुमन नारायण नागणे म्हणाल्या, शेततळे मिळाल्यामुळे आमची डाळिंबाची 6 हजार झाडे जिवंत राहिली. सुरवातीला 1 हजार झाडे लावली. त्याचा अंदाज घेऊन शेततळ्याचा अंदाज घेऊन झाडे वाढवत गेलो आणि आता 6 हजार झाडे सुस्थितीत आहेत. हे सर्व शेततळ्यामुळे घडले. गेल्यावर्षी पाऊस नसताना सुद्धा आमची 6 हजार झाडे शेततळ्यातील पाण्यामुळे जिवंत राहू शकली आणि त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून माझी चारही मुले सुशिक्षीत झाली. हे सर्व घडू शकले ते शेततळ्यातील पाण्यामुळे. शेततळ्यामुळे शेती जिवंत राहिली आणि आम्हाला सुबत्तेचे दिवस आले.

सचिन नागणे यांचे वडील नारायण रामचंद्र नागणे हे शेती आणि वकिली करायचे. त्यांच्या अनुभवाचा बराच फायदा सचिन यांना झाला. नागणे कुटुंबाला 12 एकर बागेतून आतापर्यंत 40 ते 50 लाख उत्पन्न मिळाले आहे. चालू वर्षी 20 एकर बाग केल्यामुळे हा आकडा वाढेल. ही डाळिंबे दिल्ली मार्गे युरोप, बांग्लादेश याठिकाणीही जातात. जवळपास 80 टक्के डाळिंब निर्यात केली जातात. तर 20 टक्के स्थानिक व्यापाऱ्यास दिली जातात.

आटपाडीचा कृषी विभाग शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर असतो. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन अधिकारी प्रशांत पाटील म्हणाले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी श्री.कवडे, तालुका कृषी अधिकारी सुनील लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आटपाडी तालुक्यात कृषी विभागाच्या अनेक योजना राबवत आहोत. यामध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, पंतप्रधान कृषी सिंचन योजना अंतर्गत ठिबक सिंचन, पॅक हाऊस, क्रॉपसॅप, कृषी यांत्रिकीकरण, मागेल त्याला शेततळे अशा विविध योजनांचा समावेश आहे. या योजनांचा लाभ घेऊन तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेऊन स्वतःची प्रगती साधली आहे.

एकूणच कृषी विभागाच्या योजनांचा फायदा घेऊन नागणे कुटुंबियांनी केलेल्या प्रगतीपासून इतर शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल.

लेखक - द. बीडकर
प्र. जिल्हा माहिती अधिकारी, सांगलीस्त्रोत

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 2/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate