অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एकीच्या बळावर नंदनवन

एकीच्या बळावर नंदनवन

निंबोडी (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील शेळके कुटुंबातील कृषी अधिकारी रामचंद्र सोनबा शेळके यांनी आपल्या चार भावंडांच्या एकीतून फळबाग व शेतीपूरक दुग्ध व्यवसायात प्रगती केली. एकमेकांना साहाय्य, शेतीचे योग्य नियोजन आणि सुधारित तंत्रज्ञानाच्या जोरावर खडकाळ माळरानावर शेळके कुटुंबीयांनी नंदनवन उभारले आहे.
लोणंद ते खंडाळा मार्गावर दक्षिणेस सहा किलोमीटरवर निंबोडी हे गाव आहे. या गावातील शेळके कुटुंबात मानसिंग, गुलाबराव, ज्ञानदेव, दत्तात्रेय व रामचंद्र ही पाच भावंडे. यामधील मानसिंग यांचे निधन झाले आहे. पाच जणांची वडिलोपार्जित 34 एकर कोरडवाहू शेती. कुटुंब 1991 मध्ये विभक्त झालेले. पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने शेती पिकत नव्हती. उदरनिर्वाहासाठी कुटुंबातील कर्त्या लोकांना दुसऱ्याच्या शेतावर मजुरीस जावे लागायचे. यातून कसातरी संसाराचा गाडा चालायचा. या पाच भावंडांतील रामचंद्र शेळके यांनी हलाखीच्या परिस्थितीत एम.एस्सी. (कृषी)ची पदवी घेतली. त्यांना 1996 साली लखमापूर (जि. नाशिक) येथे कृषी विभागात शासकीय नोकरी मिळाली.

नाशिक परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी साधलेल्या प्रगतीतून प्रेरणा घेऊन शेळके यांनी शेती प्रयोगांना सुरवात केली. सुरवातीला आपल्याकडील दीड एकर क्षेत्रात 360 भगवा व 250 गणेश डाळिंबाची लागवड केली. सन 2002-03 च्या कालावधीत पडलेल्या भीषण दुष्काळात न खचता त्यांनी प्रति टॅंकर 650 रुपये याप्रमाणे पाणी विकत घेऊन ते पाणी विहिरीत सोडून ठिबकद्वारे फळबाग जगवली. डाळिंब बाग जगविताना खरबूज आणि कलिंगडाच्या आंतरपिकातून 50 हजारांचे उत्पन्न मिळवले. डाळिंबाचा पहिला बहर दीड वर्षानंतर मिळाला. त्यातून 40 हजारांचे उत्पादन मिळाले.

व्यवस्थापनकामी 20 हजार रुपये खर्च आला. या बागेतील कष्टाची कामे कुटुंबातील सर्वजण पेलत होते. या पिकातून आलेले उत्पन्न आणि प्रचलित पारंपरिक पिकांचे अर्थशास्त्र यामधील तुलना रामचंद्र शेळके यांनी भावंडांच्या नजरेस आणून दिली. भावंडांनाही याचा प्रत्यक्ष अनुभव आल्याने त्यांनाही पारंपरिक पिकांऐवजी फळबागेच्या माध्यमातून शेतीत उत्पन्नाचे स्रोत वाढवता येतील ही गोष्ट पटली आणि विभक्त झालेले कुटुंब शेतीविकासासाठी एकत्र आले. शेळके कुटुंबीयांनी सन 2005 मध्ये कर्ज काढून आणखी चार एकर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड केली.

लागवडीसाठी झालेल्या खर्चाच्या उर्वरित रकमेतून गाईंसाठी गोठा उभारला. त्यानंतर डाळिंब रोपवाटिकेची उभारणी केली. भगवा जातीच्या डाळिंबाची दीड लाख गुट्टी बांधली. त्यातून विक्रीयोग्य एक लाख चार हजार रोपे तयार झाली. त्यातून सहा लाखांचे उत्पन्न मिळाले. यातून मिळालेले उत्पन्न बागेच्या व्यवस्थापनकामी ठेवून उरलेली रक्कम कर्जफेडीसाठी वापरली. दोन हजार डाळिंब झाडांच्या पहिल्या बहरापासून चांगले आर्थिक उत्पन्न मिळाले. त्या उत्पन्नातून कर्जाची परतफेड सुरू ठेवत शेती मशागतीसाठी ट्रॅक्‍टर आणि वैरणीसाठी कुट्टी यंत्र खरेदी केले. दुधाच्या उत्पन्नातून बागेतील मजूर व्यवस्थापनाचा खर्च पेलला जातो. गोठ्यातील शेणमूत्राचा वापर डाळिंब बागेसाठी केल्याने फळांच्या उत्पादनामध्ये चांगला फरक दिसतो आहे.

असा आहे दुग्ध व्यवसाय

गाईंच्या व्यवस्थापनाबाबत रामचंद्र शेळके म्हणाले, की आम्ही पहिल्यांदा गाईंच्या व्यवस्थापनासाठी 32 फूट बाय 52 फूट आकाराचा गोठा बांधला. गोठ्याच्या शेजारी शेणमूत्र एकत्रित करण्यासाठी सिमेंट टाकी बांधली. वासरांसाठी स्वतंत्र गोठा केला आहे. गोठ्यालगत गाईंसाठी पाण्यासाठी टाकी बांधली. चाऱ्यासाठी चार एकर क्षेत्रात मका, कडवळ व डीएचएन- 6 वैरणीची लागवड आहे. केवळ दूध उत्पादन हा उद्देश न ठेवता शेतीसाठी पुरेसे शेणखत, गांडूळ खत तसेच कालवडीची जोपासना हा उद्देश ठेवण्यात आला. 
1) सुरवातीला बारामती येथून सहा होल्स्टिन फ्रिजीयन गाई विकत आणल्या. त्याबरोबर पाचवड (ता. वाई) येथील बाजारातून पाच होल्स्टिन फ्रिजीयन वासरे विकत आणली. 
2) या गाईंचे योग्य व्यवस्थापन करत गोठ्यातच जातिवंत कालवडी तयार केल्या. 
3) सध्या गोठ्यात 22 गाई आहेत. गोठा चार विभागांत विभागला आहे. प्रत्येक विभागात सहा गाई आणि त्यांची वासरे आहेत. 
4) पहाटे पाच वाजता सुरवातीला गोठा स्वच्छ करून सहा वाजता यंत्राद्वारे दूध काढले जाते. संध्याकाळी सात वाजता दूध काढले जाते. 
5) दररोज एका गाईला 25 किलो हिरवा चारा, पाच किलो कोरडा चारा, दोन किलो गोळी पेंड दिली जाते. कुट्टी यंत्रामुळे चारा वाया जात नाही. 
6) गव्हाणीमध्येच दोन गाईंच्यामध्ये पाण्यासाठी पातेले लावले आहे. त्याला बायव्हॉल बसविलेला आहे, त्यामुळे गाईंनी पाणी प्यायले की लगेचच त्या पातेल्यात पाणी भरले जाते. त्यामुळे 24 तास गाईंना पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध राहते. 
7) सकाळी दूध काढणीनंतर पावसाळ्याव्यतिरिक्त सर्व हंगामात जनावरे गोठ्याशेजारील मोकळ्या जागेत बांधतात. 
8) पशुवैद्यकाकडून शिफारशीनुसार जंतनिर्मूलन, लसीकरण केले जाते. प्रत्येक गाईची ठराविक काळानंतर आरोग्य तपासणी केली जाते. 
9) साधारणपणे पाच वेतांपर्यंत गाय गोठ्यात ठेवली जाते. एक गाय सरासरी 15 ते 20 लिटर दूध देते. 
10) सध्या दहा गाई दुधात आहेत आणि 12 गाई गाभण आहेत. सध्या प्रति दिन सरासरी 125 ते 130 लिटर दूध जमा होते. प्रति लिटरला 18 रुपये दर मिळतो. दररोजचा खर्च हा 1500 रुपये आहे. 
11) दुधाच्या व्यतिरिक्त दरवर्षी 60 ते 70 ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. हे शेणखत संपूर्ण शेतीला वापरले जाते. सरासरी 3000 रुपये प्रति ट्रॉली या दराने दोन लाख रुपयांचे शेणखत गोठ्यातून उपलब्ध होते. 
12) गांडूळ खत निर्मितीसाठी आठ वाफे केले आहेत. दरवर्षी चार टन गांडूळ खत तयार होते, त्याचाही डाळिंब बागेला वापर होतो. 
13) दरवर्षी चार कालवडी विकतात. एक कालवड किमान 30 हजार रुपयांना विकली जाते. 
14) केवळ दूध उत्पादनावर न थांबता शेणखत, गांडूळ खत आणि कालवडींच्या निर्मितीमधून पशुपालन व्यवसाय आर्थिकदृष्ट्या सक्षम केला आहे. 

प्रत्येक सदस्याला मिळतो मेहनताना

डाळिंब व दुग्ध व्यवसायाच्या उभारणीच्या कालावधीत प्रत्येकाला कुटुंबाचा चरितार्थ चालवताना आर्थिक गरज भासली. यावर तोडगा शोधत रामचंद्र शेळके यांनी प्रति आठवडा प्रत्येक कुटुंबास दोनशे रुपये मेहनताना देण्याचे नियोजन सुरू केले. महागाई वाढल्याने आता सध्याच्या परिस्थितीमध्ये पुरुष व महिला मजुराला ज्या दराप्रमाणे मजुरी दिली जाते, त्याप्रमाणे घरातील प्रत्येक व्यक्तीला मेहनताना दिला जातो. त्यातून प्रत्येक कुटुंबाचा नफा शिल्लक राहू लागला. 

दर्जेदार डाळिंबाने दिला आर्थिक नफा

1) सुधारित तंत्राने डाळिंब बागेचे व्यवस्थापन केल्याने चांगले आर्थिक उत्पन्न शेळके कुटुंबीयांना मिळते. कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडे शेतीची जबाबदारी सोपविली आहे. 
2) 2011-12 मध्ये सात एकरांतून 95 टन डाळिंबाची विक्री झाली. प्रति किलो सरासरी 50 रुपये दराने विक्री केली. 
3) बागेतील एकूण दोन हजार 500 झाडांपैकी 500 झाडे मातृवृक्ष तत्त्वावर राखीव ठेवली आहेत. गेल्या वर्षी रोपवाटिकेतून 80 हजार रोपांची विक्री झाली. खर्च वगळता 15 लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाले. 
4) सध्या एकीच्या बळावर शेळके कुटुंबीयांनी 14 एकर क्षेत्रात डाळिंब, दीड एकरात डाळिंबाची रोपवाटिका, सहा एकर ऊस आणि 22 गाईंच्या व्यवस्थापनातून प्रगती साधली आहे. 
5) सध्या 17 एकर डाळिंब आणि दोन एकर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणले आहे. पाणीपुरवठ्यासाठी तीन विहिरी आहेत. 

रामचंद्र शेळके - 75883846397588384639
अमोल शेळके - 75883846287588384628 .

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

You'll need Skype CreditFree via Skype


© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate