অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सुधारित तंत्राने वाटाणा उत्पादन

सुधारित तंत्राने वाटाणा उत्पादन

 

सातारा जिल्ह्यातील गोडवली येथील वाटाणा उत्पादकांसाठी कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पांतर्गत प्रशिक्षणासह सुधारित तंत्रज्ञान पुरवण्यात आले. त्यातून उत्पादनवाढीसह चांगला दरही शेतकऱ्यांना मिळाला. वाटाणा शेतीबाबत शेतकरी अधिक ज्ञानी झाले.

पाचगणी या पर्यटन केंद्राच्या पायथ्याशी दोन किलोमीटर अंतरावर गोडवली (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) गाव वसले आहे. गावची लोकसंख्या सुमारे 1600 पर्यंत असून साधारणपणे 400 एकर शेतजमिनीचे क्षेत्र आहे. महाबळेश्वर तालुक्‍यात हे गाव असल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस, तर उन्हाळ्यात काही प्रमाणात पाणी टंचाई असते. भाताव्यतिरिक्त बटाटा, गहू, स्ट्रॉबेरी, वाटाणा ही पिकेही घेतली जातात.

वाटाणा शेतीची सुधारित शेती

गावात पूर्वी पारंपरिक पद्धतीने वाटाणा शेती केली जायची. त्यात स्थानिक वाणांचा वापर केला जायचा. त्याचे एकूण दोन ते तीन तोडे मिळायचे. प्रति शेंग सुमारे तीन-चार दाणे असायचे. हा वाटाणा चवीला तुरट-गोड असायचा. या भागात पाऊस भरपूर असल्याने उगवणक्षमता कमी असायची. मर रोगाचे प्रमाणही अधिक होते. साहजिकच एकूण बाबी लक्षात घेतल्या तर उत्पादन कमी मिळत होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी कृषी विभागाच्या आत्मा उपक्रमाने पुढाकार घेतला. "आत्मा'चे (सातारा) संचालक गणेश घोरपडे (सातारा), तालुका कृषी अधिकारी शिवाजी चौगुले, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक संजय पार्टे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.

"आत्मा'ने काय निर्णय घेतला?

शेतकऱ्यांना वाटाणा पिकाचे सुधारित तंत्रज्ञान पुरवले तर त्यांना अधिक उत्पादनच नव्हे तर मालाचा दर्जा वाढून दरही चांगला मिळेल, या हेतूने प्रकल्प राबवायचे ठरवले.

प्रकल्पाची अशी झाली अंमलबजावणी

 • - सन 2013 च्या खरिपात प्रकल्प हाती घेतला.
 • -प्रकल्पात सुधारित वाणाची निवड. त्याचे एकूण पीक कालावधीत पाच ते सहाहून अधिक तोडे होतात. वाटाण्याची चव गोड आहे. प्रतिशेंगेत आठ ते नऊ दाणे असतात. या वाणाचे बाजारपेठेच्या दृष्टीने महत्त्व ओळखूनच त्याची निवड केली होती.
 • प्रकल्पाची आखणी
 • प्रकल्पात गावातील शंभर शेतकऱ्यांना सहभागी करून घेतले. प्रत्येक शेतकऱ्यांकडील 20 गुंठे क्षेत्र निश्‍चित करण्यात आले.
 • एकूण 50 एकर क्षेत्रात लागवड
 • सहभागी बहुतांशी शेतकऱ्यांनी तुषार सिंचन तर काहींनी पाटाने पाणी दिले.
 • किडींचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी कामगंध सापळे, यलो स्टिकी टॅप निविष्ठा मोफत देण्यात आल्या.
 • बियाणे मोफत दिले.
 • शेतकऱ्यांना तज्ज्ञांकरवी दिले असे प्रशिक्षण-
 • सासवड भागातील शेतकऱ्यांच्या शेतावर अभ्यास दौऱ्याचे आयोजन.
 • एकदिवसीय तांत्रिक प्रशिक्षण
 • शेतीशाळेचे आयोजन, पीकवाढीच्या अवस्थेनुसार त्यातून मार्गदर्शन
 • लावणी अंतर, लावणीची पद्धत, बीजप्रक्रिया याबाबत मार्गदर्शन
 • किडी-रोगांच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर भर

प्रयोगाचे रूपांतर

1) उत्पादनवाढ झाली- 
प्रति 20 गुंठ्यास आलेला एकूण खर्च-एकूण 11 हजार 370 रु. 
(बियाणे, गांडूळखत, रासायनिक खत, बीजप्रक्रिया, कामगंध सापळे व चिकट सापळे, मजुरी, कीडनाशके, पॅकिंग पिशवी, वाहतूक असा एकूण) (बियाणे व अन्य काही निविष्ठा मोफत दिल्या असल्या तरी खर्च समाविष्ट केला आहे.) 
-आत्ताच्या प्रयोगात 20 गुंठ्यात प्रति शेतकरी सरासरी 900 किलो ते कमाल 1200 किलो तर सरासरी एक हजार किलोपर्यंत म्हणजे एकरी दोन टन वाटाण्याचे उत्पादन मिळाले. पूर्वीच्या तुलनेत ते 50 टक्‍क्‍यापेक्षा अधिक असल्याचे प्रकल्पातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 
2) दर वाढून मिळाला- सर्वांत जास्त 120 रुपये, तर किमान दर 85 रुपये प्रतिकिलो दर मुंबई बाजारपेठेत मिळाला. हाच दर पूर्वीच्या वाणांना 55 ते 60 रुपयांपर्यंतच मिळायचा. 
3) उत्पादनखर्च झाला कमी- सर्व शेतकऱ्यांना प्रति 20 गुंठ्यासाठी 10 किलो बियाणे मोफत दिले. प्रतिकिलो बियाणे खर्च 220 रु. येतो. पीक संरक्षक काही साधनेही मोफत दिल्याने उत्पादनखर्चात बचत झाली.

शेतकरी झाले प्रशिक्षित

- मला 20 गुंठ्यात 1200 किलोपर्यंत वाटाणा उत्पादन मिळाले. पूर्वी तोड्यांची तीन ते चारची संख्या सात-आठवर गेली. पूर्वी कमी उत्पादन व दर यामुळे पीक परवडत नव्हते. सुधारित पद्धतीचा चांगला फायदा झाला आहे. 
रघुनाथ मालुसरे- -9545384344
सुधारित पद्धतीत एकरी अवघे 20 किलो बियाणे लागले. त्याच्या खर्चात मोठी बचत झाली असून उत्पादनातही वाढ झाली आहे. 
नामदेव मालुसरे- 8390797111
वाटाणा लागवडीत ट्रायकोडर्मा बीजप्रक्रियेचे महत्त्व समजले. त्यामुळे पिकात मर झाली नाही. उगवणही चांगली झाली. 
मारुती मालुसरे- 9657423371
-पूर्वी शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्यास मोठे नुकसान व्हायचे. सुधारित पद्धतीत कामगंध सापळे व रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी स्टिकी ट्रॅप वापरल्याने प्रादुर्भाव समजणे सोपे झाले. त्यानुसार आवश्‍यक फवारणी नियोजन करता आले. 
विलास गुरव- 9960357028.
सुधारित पद्धतीत प्रतवारीचे महत्त्व लक्षात आले. त्यानुसार मार्केटला माल पाठवला. इतरांपेक्षा सर्वांत जास्त म्हणजे प्रतिकिलो 120 रु. दर मिळाला. 
नितीन मालुसरे- 9764832759
मी पदवीधर असून नोकरीच्या मागे न धावता शेती करण्यास सुरवात केली. यंदाच्या प्रयोगात आलेल्या उत्पादनातून समाधानी झालो आहे. 
शैलेश मालुसरे-9960155793.
या उपक्रमातून आम्ही पाणीबचतीच्या अनुषंगाने तुषार सिंचनाकडे वळलो आहे. वाटाण्याचे सर्व क्षेत्र त्यावरच आधारलेले आहे. जैविक बीजप्रक्रियेमुळे बियाणे वाया न जाता शंभर टक्के उगवण झाली आहे. 
लक्ष्मण मालुसरे- 9049634217 

बाजारपेठ

गोडवली गावात पूर्वीपासून वाटाणा केला जातो. मात्र आर्थिकदृष्ट्या तो परवडत नव्हता. 
प्रकल्पातील वाटाण्याची चव चांगली असून शेंग लांब आहे. साहजिकच वाशी मार्केटला त्यास मागणी मोठी होती. हा वाटाणा मिळावा यासाठी "ऍडव्हान्स' रक्कम देण्यासही व्यापारी तयार होते. येथील शेतकरी सर्व वाटाणा एका व्यापाऱ्याला न देता विविध ठिकाणी देतात. त्यामुळे जास्त दर मिळण्यास मदत होते.
सुधारित तंत्रज्ञान वापरून केलेल्या वाटाणा लागवड कार्यक्रमासाठी निवडलेल्या गोडवली गावातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. या प्रकल्पामुळे पीक उत्पादनवाढीबरोबर शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे. 
संजय रामचंद्र पार्टे- 9423547763 
तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक 
"आत्मा', महाबळेश्वर

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

 © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate