सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका उसाचा हुकमी पट्टा आहे. राज्यातील सर्वोत्तम ऊस उत्पादक या भागात पाहण्यास मिळतात. सुशिक्षित तरुणाई शेतात राबू लागल्याने पारंपरिक शेतीचा "ट्रेंड' बाजूला पडून प्रयोगशील उपक्रमास प्राधान्य दिले जात आहे. त्यातीलच एक भाग म्हणून स्वतः ऊस रोपनिर्मिती करून त्याची पुनर्लागवड करण्याच्या प्रयोगांवर येथील शेतकरी भर देऊ लागले आहेत.
शेतकऱ्यांनी आत्मसात केले तंत्र
रोपनिर्मिती तंत्रज्ञानाचे फायदे जसजसे दिसू लागले, तसतशी शेतकऱ्यांत त्याबाबत चर्चा वाढू लागली. रोपवाटिकांतील रोपांना मागणी वाढू लागली. मात्र त्याला प्रति रोप अडीच ते तीन रुपये दर पडायचा; परंतु काही शेतकऱ्यांनी रोपे विकत घेण्यापेक्षा आपल्याच शेतात तयार करण्याच्या दृष्टीने रोपनिर्मितीचे तंत्र आत्मसात करण्यास सुरवात केली. त्याचे प्रयोग सुरू झाले.
शेतकऱ्यांच्या रोपनिर्मिती तंत्रातील काही बाबी सांगायच्या तर उसाच्या एका डोळा टिपरीची निवड केली जाते. कोकोपीटचे माध्यम वापरून ट्रेमध्ये रोपे वाढवली जातात. त्यापूर्वी बेणेप्रक्रिया केली जाते. ट्रे एकत्रित करून चार ते पाच दिवस झाकून ठेवले जातात. कोंब बाहेर पडू लागले की ट्रे विलग करून सावलीत ठेवले जातात. साधारणतः तीन आठवडे ते एक महिना वयाची रोपे पुनर्लागवडीसाठी वापरली जातात.
ट्रे व कोकोपीटचा खर्च टाळण्यासाठी काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या उपलब्ध क्षेत्रावर गादी वाफा तयार करून त्यावर रोपनिर्मिती साधली आहे. एक डोळ्याची कांडी गादी वाफ्यावर आडवा डोळा करून लावली जाते. वरून हलके पाणी दिले जाते. सुमारे एक महिन्यानंतर रोपे लावणीयोग्य होतात.
दोन डोळा पद्धतीने पारंपरिक ऊस लागवड व ऊस रोपनिर्मितीचे फायदे याबाबत शेतकऱ्यांना आलेले अनुभव तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथील शास्त्रज्ञ डॉ. एस. बी. माने-पाटील यांनी सांगितलेली माहिती अशी.
पारंपरिक पद्धतीत ऊस लावण करताना दोन डोळ्यांची टिपरी (दोन टिपऱ्यांमध्ये सहा ते आठ इंच अंतर) वापरल्यास एकरी आठ ते दहा हजार टिपरी लागतात. प्रत्येक वेळी डोळा सरीच्या बगलेला येईल याची खात्री नसते. तळाकडील बाजूला गेलेला डोळा उशिरा उगवतो. पांढरी मुळे सुटण्याची प्रक्रिया वेळाने सुरू होते. वातावरणात अचानक झालेला बदल, उदा. अति पाऊस, पाणी साठणे यामुळे शंभर टक्के उगवणीची खात्री देता येत नाही. लहान कोंब असताना भांगलण करताना अडचण येते. खताची मात्रा देताना संपूर्ण सरीला द्यावी लागते. त्यामुळे तणांची मोठ्या प्रमाणात वाढ होते.
1) नर्सरीत एक डोळा पद्धतीने रोपे वाढवून त्यांची उगवणशक्ती शंभर टक्के होते, त्यामुळे पुनर्लागवडीनंतर पुढे उसांची संख्या एकरी 40 ते 45 हजार एवढी ठेवणे शक्य होते. ज्यामुळे उत्पादनवाढीस चालना मिळते.
2) पांढरी मुळे सुटण्यास मदत होते.
3) सुरवातीच्या दोन महिन्यांत रासायनिक खतांची मात्रा थेट रोपांजवळ मिळते.
4) पिकाच्या सुरवातीच्या काळात तणांचा प्रादुर्भाव कमी राहतो. त्यावरील खर्च एक हजार रुपये इतका येतो.
5) रोपे नर्सरीत तयार केल्यामुळे मुख्य शेताचा एक ते दीड महिन्याचा कालावधी वाचवता येतो.
विशेषतः सततचा पाऊस असेल व नियोजित महिन्यातील लागवडीला रान तयार होत नसेल तर नर्सरीत रोपे वाढवून ती वापरणे शक्य होते.
6) पाण्याच्या दोन ते तीन पाळ्या व एक खुरपणी यात बचत होते.
गेली चार वर्षे रोपनिर्मिती तंत्राद्वारा उसाची लावण करतो. दोन रोपांतील अंतर दोन व चार फुटांवरून सात फुटांवर नेले आहे, त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी बचत झाली. माझे सुरवातीचे एकरी उत्पादन 55 टनांपर्यंत होते. सुधारित व्यवस्थापनातून ते 85 टनांपर्यंत गेले आहे. ट्रे व कोकोपीट मध्ये रोपनिर्मिती करतो. बेणे, मजुरी, कोकोपीट, ट्रेसह प्रति रोप दीड ते दोन रुपये खर्च येतो. या तंत्रातून खात्रीशीर व निरोगी रोपे मिळतात, त्यामुळे पुढे उत्पादनात 25 ते 30 टक्के वाढ मिळते हे प्रयोगांती समजले आहे.
नंदकुमार जाधव, तांबवे
- 8600159550
दोन वर्षांपूर्वी रोपनिर्मिती व पुनर्लागवडीचा प्रयोग केला. त्याचा अनुभव चांगला आला. या वर्षी एक एकर आडसाली ऊस आहे. त्यासाठी जुलैच्या पहिल्या आठवड्यात गादीवाफ्यावर रोपानिर्मिती केली. त्यासाठी बेणे विकत आणले. गादीवाफा तयार करताना गांडूळ खत, कोकोपीट, डीएपी खताचे मिश्रण करून गादीवाफ्यावरील मातीत एकजीव केले. एक डोळ्याची कांडी करून रसायनांची बेणेप्रक्रिया केली. चार इंचाच्या अंतरावर चर काढून दोन कांडीतील अंतर दोन इंच ठेवून लागवड केली. स्प्रिंकलरने हलके पाणी दिले. पाऊस सुरू झाला. गादीवाफ्यावरील नर्सरी एक फुटापर्यंत वाढली आहे. उसाचे सर्व कोंब जोमदार आहेत. चार दिवसांत रोपांद्वारा एक एकरावरील लागवड करणार आहे. स्वतः रोपनिर्मिती केल्याने रोपनिर्मितीचा खर्च कमी येतो. चार मजुरांच्या मदतीनेच एक एकरावरील लागवड पूर्ण करू शकतो. रोपनिर्मिती व पुढेही सुधारित तंत्रज्ञान वापरल्याने प्रति गुंठा सव्वा दोन टनापंर्यंत उत्पादन मिळाल्याचा माझा अनुभव आहे.
संताजी वासुदेव चव्हाण, नवेखेड
- 98923139866
तीन वर्षांपासून स्वतः रोपनिर्मिती करून ऊस लागवड करतो. त्यासाठी जूनच्या सुरवातीला कामांना सुरवात होते. या तंत्रामुळे उसाची संख्या नियंत्रित राहते. पेरांची लांबी व जाडी नजरेत भरणारी आहे. भांगलणीचा खर्चही कमी होतो. सुधारित तंत्राच्या वापरातून माझे ऊस उत्पादन एकरी 55 ते 60 टनांवरून 80 टनांपर्यंत पोचले आहे. यात रोपलागवडीचा विशेष वाटा आहे.
सुनील शंकरराव पाटील, बोरगाव
- 9372069237
ऊस रोप लागवडीला अलीकडे मोठे महत्त्व आले आहे. शेतकरी स्वयंप्रेरणेने त्याकडे वळाले आहेत. आमच्या साखर कारखान्याच्या तीनही युनिटकडे मिळून आज अखेर रोपलागवडीद्वारा सुमारे पंधराशे एकरांवर आडसाली ऊस लागवड झाली आहे. शेतकऱ्यांचा रोपलागवडीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून कारखान्याने 24 एकरांवरील बेणे मळ्यातून रोपनिर्मितीचा मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार रोपे मिळावीत हा उद्देश आहे.
आबा पाटील, शेती अधिकारी, राजारामबापू सहकारी साखर कारखाना, साखराळे, ता. वाळवा
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
प्रगतिशील शेतकरी कुलदीप राजाराम राऊत यांनी विदर्भा...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
नगर जिल्ह्यातील बलभीम पठारे यांना पारंपरिक पीक पद्...